आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांचा रेडिओ कॉलरमुळे मृत्यू होतोय का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, नवी दिल्ली
चित्त्यांच्या भारतातील पुनर्वसनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'प्रोजेक्ट चित्ता' सप्टेंबर 2022 मध्ये वाजत गाजत सुरू झाला. त्यानंतर जवळपास 20 चित्ते आफ्रिकेतून भारतात - मध्य प्रदेशात आणण्यात आले.
कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेल्या चित्त्यांपैकी आतापर्यंत 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) असीम श्रीवास्तव यांनी दुजोरा दिला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून या मादी चित्त्याचा शोध सुरू होता. तिच्या तपासणीसाठी तिला पुन्हा ताब्यात घ्यायला वनविभाग प्रयत्न करत असतानाच तिच्या मृत्यूची बातमी आल्याने पुन्हा एकदा रेडिओ कॉलरविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले. त्यानंतर 'प्रोजेक्ट चित्ता'अंतर्गत भारताने जगात पहिल्यांदाच या प्राण्याचं आंतरखंडीय स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेतून आणलेले हे सगळे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहेत.
मार्चमध्ये तीन चित्त्याच्या पिलांचा इथेच जन्म झाला. पण त्यांच्यासह एकूण 9 चित्ते आतापर्यंत मरण पावले आहेत.
यातल्या काही चित्त्यांचा मृत्यू हा टाळता न येण्यासारख्या कारणांमुळे झाल्याचं नंतरच्या तपासणीत आढळून आलं. म्हणजे काहींचा अतिताणामुळे हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला, काहींचा आपसातल्या झटापटींत झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाला.
पण काही वन्यजीव अभ्यासक आणि पशुवैद्यकांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, त्यातल्या दोन चित्त्यांचा मृत्यू हा त्वचेखाली झालेल्या जखमेतून एक प्रकारचा जंतूसंसर्ग झाल्याने ओढवला. याला Maggot Infestation म्हणतात. जंगलात मुक्त सोडलेल्या या संरक्षित प्राण्यांच्या हालचालींची नोंद ठेवता यावी यासाठी त्यांच्या गळ्याभोवती रेडिओ कॉलर लावल्या जातात. यामुळे तो संसर्ग झाला, असंही सांगतात.
अर्थात हा दावा पर्यावर आणि वनमंत्रालयाने साफ फेटाळला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असं स्पष्ट म्हटलं आहे की, 'चित्त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झाला. त्यांच्या मृत्यूला रेडिओ कॉलर हे कारण असल्याच्या बातम्या अफवा आहेत आणि त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.' याविषयी खातरजमा करण्यासाठी बीबीसीने चित्ता प्रकल्पाचे अध्यक्ष राजेश गोपाल यांच्याशीही संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून अद्याप कुठलंही उत्तर आलेलं नाही.

फोटो स्रोत, ANI
वन्यजीव अभ्यासक सांगतात की, भारतातल्या दमट आणि पावसाळी हवेत अशा प्रकारच्या जखमा होणं मार्जारवर्गीय मोठ्या प्राण्यांमध्ये नवीन नाही.
मध्यप्रदेशातील माजी मुख्य वन्यजीवसंरक्षक अलोक कुमार 'बीबीसी'शी बोलताना म्हणाले की, "रेडिओ कॉलरच नव्हे तर चित्त्यांचा मृत्यू होण्यामागे इतर अनेक कारण असू शकतात. उलट रेडिओ कॉलरमुळे त्यांची वाचण्याची शक्यता तरी असते."
"या मानेभोवती बांधलेल्या पट्ट्यात एक चिप बसवलेली असते. उपग्रहाच्या माध्यमातून या चिपद्वारे चित्ते संपर्कात राहू शकतात. त्यांच्या संरक्षण आणि बचावासाठी त्यांच्या हालचालींचा माग ठेवणं आवश्यक आहे. हे काम रेडिओ कॉलरमुळे होतं", कुमार म्हणाले. "अशा प्रकारे कॉलरमुळे वाघांना देखील जखमा आणि जंतुसंसर्ग झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत", असंही त्यांनी सांगितलं.
ज्येष्ठ वन्यजीव संरक्षण आणि चित्त्यांचा पुनर्वसन प्रकल्प ज्यांनी आखला त्या तज्ज्ञ समितीपैकी एक असलेले यादवेंद्रदेव झाला यासंदर्भात बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आर्द्रता, घाम यामुळे प्राणीच कॉलरभोवतीचा भाग खाजवतात, खरवडतात त्यामुळे जखमा होऊ शकतात."
"आफ्रिकेच्या तुलनेने कोरड्या वातावरणातून भारतासारख्या मान्सून हवामानात आणलेल्या चित्त्यांचा नव्या वातावरणातला हा पहिलाच पावसाळा आहे. ते अजूनही इथल्या हवामानाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत आहेत", असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
चित्त्यांच्या मानेखाली बऱ्याच प्रमाणात दाट अशी फर असते. तिथले त्यांचे केस भरपूर जाडसर असतात. त्यामुळे या भागात अधिक आर्द्रता शोषून घेतली जाते आणि दमट हवेत ती दीर्घकाळ तशीच राहते. त्यामुळे चित्त्यांच्या मानेखालचा भाग मऊसर आणि नाजूक होतो. तिथे खाज सुटते.
"प्राण्याने मग तिथे सतत नखाने खाजवलं की, तिथली नाजूक त्वचा फाटते. जखम होते आणि माशा त्या जखमेच्या जागी अंडी घालतात. तेव्हा संसर्ग होऊन maggot infestation होतं. त्यातून पुढे बॅक्टेरिअल इन्फेक्शन वाढतं. मग सेप्टिक होतं आणि अखेर मृत्यू होतो, " असं झाला यांनी सांगितलं.
भारतातल्या चित्ता प्रकल्पाविषयी जगभरात खूप चर्चा आहे. हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गेल्या सप्टेंबरमध्ये कुनो येथे येऊन नामिबियातून आणलेल्या चित्त्यांची पहिली बॅच अभयारण्यात सोडली होती. या वर्षाच्या सुरुवातील आणखी 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून आणले गेले. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक चित्त्याचा मृत्यू आणि नव्या चित्त्याचा जन्म ही बातमी होते.

फोटो स्रोत, Getty Images
मार्चमध्ये नुकत्याच जन्मलेल्या पिलांचा मृत्यू कुपोषण आणि डिहायड्रेशनमुळे झाल्याचं समोर आल्यानंतर अनेकांनी तिथल्या व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केले. नव्याने जन्मलेले बछडे वाचावेत म्हणून वेळीच हस्तक्षेप करत उपाययोजना का केली नाही, असे प्रश्न विचारण्यात आले. आता नुकत्याच झालेल्या चित्त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा याच पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या दोनपैकी एका चित्त्याच्या मृतदेहाचा व्हिडीओ पाहिलेल्या एका पशुवैद्यकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर असं सांगितलं की, "चित्त्याच्या शरीरावर पायापासून डोक्यापर्यंत सर्वत्र शेकडो मॅगट्स म्हणजे माशा बसलेल्या होत्या."
"मॅगट इन्फेस्टेशन झाल्याच्या काही दिवसांनंतर प्राणी मरतो. मग जंतुसंसर्ग झाल्यानंतर एवढ्या दिवसात कुणालाच ते कसं दिसलं नाही?" ते प्रश्न उपस्थित करतात.
2 ऑगस्टला मृत्यू झालेल्या चित्त्याचं नाव तिबिलिसी. भारतात आल्यानंतर तिचं नाव धात्री असं ठेवण्यात आलं होतं. ती साडेतीन वर्षांची होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, गेले दोन आठवडे धात्रीचा शोध वन्यजीव संरक्षक घेत होते. तिच्या रेडिओ कॉलरने सिग्नल देणं थांबवल्याने तिचा पत्ता लागत नव्हता. या मादी चित्त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप पुढे आलं नसलं आणि पोस्टमॉर्टमनंतर ते समोर येईल. पण तरीही तिच्याही मानेवर जखमा आणि मॅगट इन्फेस्टेशनच्या खुणा दिसल्याचं वृत्त न्यूज18 ने दिलं आहे.
त्याअगोदर गेल्या महिन्यात सूरज नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूपूर्वी 3 तास अगोदर तो अत्यवस्थ असलेला दिसला होता आणि त्याच्या मानेवर माश्या होत्या, असं इंडियन एक्स्प्रेसने बातमीत म्हटलं होतं.
वनअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्राथमिक तपासणीनंतर चित्त्याचा मृत्यू मानेभोवती आणि पाठीवर झालेल्या जखमांमुळे झाल्याचं समोर आलं आहे."
वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, मध्यप्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जे.एस.चौहान यांनी आणखी एका मादी चित्त्याचाही अशाच प्रकारच्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेनंतर चौहान यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. "रेडिओ कॉलर हे मृ्त्यूच्या अनेक कारणांपैकी एक असू शकतं", असं चौहान म्हणाले होते.
त्यानंतरच्या आठवड्यात आलेल्या वृत्तांनुसार, आणखी तीन चित्ते अशाच प्रकारच्या जखमांमुळे आजारी असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. आणि रेडिओ कॉलरमुळे काही होऊ शकतं का याचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, ANI
झाला यांच्या मते, यातून मार्ग काढण्याचा एकच उपाय म्हणजे सगळ्या चित्त्यांचा माग काढून त्यांना कुठला संसर्ग झाला नाही ना याची प्रत्यक्ष तपासणी करणं हाच आहे.
"आणि एखाद्या प्राण्यात संसर्ग आढळला तर त्याच्यावर लगेच उपचार सुरू करणं आवश्यक आहे. अर्थातच त्यामुळे त्यांच्या मानेभोवतीची कॉलर कायमची काढून टाकणं शक्यच नाही. कारण नाहीतर त्यांचा माग काढता येणारच नाही. प्राणी पूर्णपणे बरा झाल्याशिवाय ते शक्य नाही. याचाच अर्थ सर्व चित्त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा संरक्षित बंद जागेत ठेवणं अपरिहार्य ठरेल", असं झाला सांगतात.
चित्त्यांचं भारतात पुनर्वसन करण्याच्या प्रकल्पात पहिल्या वर्षभरात निम्मे चित्ते जगणार नाहीत असा अंदाज बांधण्यात आलेला होता.
झाला सांगतात, "काही चित्ते मरतील हे गृहित धरलं होतं. पण त्यांचा मृत्यू हा बिबट्याशी झालेल्या संघर्षातून, वाहनाला धडकून किंवा शिकार अथवा फासेपारध्यांच्या जाळ्यात अडकून होतील, असं वाटलं होतं."
"या गृहित धरलेल्या कारणांमुळे मृत्यू झालेले नाहीत, ही सकारात्मक गोष्ट आहे. उलट या मृत्यूंमधून बरंच काही शिकायला मिळत आहे. अर्थात त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते आहे", असंही ते म्हणतात.
कुमार यांच्या मते, चित्ता प्रकल्पांसारख्या प्रकल्पांना पुरतं रुजायला मोठा कालावधी लागतो. "चित्ता ही आपल्या घरात आलेली आणि रुजू पाहणारी नवी प्रजात आहे. भारतीय वातावरणाशी जुळवून घेत जगायला शिकण्यासाठी कदाचित चित्त्यांना पुढची पाच-दहा वर्षं लागू शकतात", असं ते सांगतात.
"त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काय करता येईल याचा आमच्यासाठी रोज एक नवा धडा मिळतो आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








