तुमच्या घरातून पाली गायब झाल्या तर काय होईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एम. आर. शोभना
- Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी
जेव्हा आपण अधिवास हा शब्द ऐकतो, तेव्हा डोळ्यांसमोर घनदाट जंगल, पर्वतरांगा येतात. पण आपल्या अगदी जवळपास राहणाऱ्या लहान-सहान जीवांचा, त्यांचं आपल्यासाठी काय महत्त्व आहे याचा विचार आपण करू शकत नाही.
आपल्या आसपासच्या जैवविविधतेचा आणि त्यापासून आपल्याला मिळणाऱ्या फायद्यांकडे आपलं लक्ष जात नाही. घरामधल्या पालींबद्दलही असंच काहीसं असतं.
पालीकडे पाहिलं की अनेकांना भीती वाटते, किळस वाटते. काही जणांना पाल चुकचुकली की अपशकुन, काहीतरी वाईट घडण्याची धाकधूक वाटते. पण त्यांचं जैवविवधतेमधलं महत्त्व मात्र आपल्याला समजून घेता येत नाही.
जर घरात पालीच नसतील तर काय होईल? आपलं घर आणि पालींचं नातं काय आहे?
वाइल्डलाइफ आणि पर्यावरणवादी ए. षण्मुगनाथम यांनी या सगळ्याबद्दल बीबीसी तमीळला माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
घरात पाली असण्याचे काय फायदे?
घरातली कीटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यात पालींची भूमिका महत्त्वाची असते. आपण बहुतांश वेळा म्हणतो की, जग हे वेगवेगळ्या जीवांनी भरलेलं आहे. पण खरंतर जग हे कीटकांनी भरलं आहे. जगातली कीटकांची संख्या प्रचंड आहे.
कीटकांशिवाय जग ही जशी भयंकर कल्पना आहे, त्यापेक्षाही जगात प्रचंड संख्येनं असलेले कीटक ही कल्पना जास्त भीषण आहे. संतुलन राखणं हे अत्यंत आवश्यक आहे. पाली तो बॅलन्स राखतात.
पाली घरातल्या माशा आणि डास खातात, त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात राहते. त्याचबरोबर पाली पाकोळी आणि चतुर खातात. काही पक्षी पालींना खातात. यातून अन्नसाखळी राखली जाते.
पालींचे प्रकार कोणते? त्या विषारी असतात?
अगदी ढोबळमानानं सांगायचं झालं, तर पालींचे दोन प्रकार दिसतात- एक म्हणजे घरात आढळणारी किंवा बागेत, झाडावर आढळणारी. पण त्यातही अनेक उपप्रकार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
बऱ्याचदा पाली विषारी असल्याचं सांगितलं जातं. पण ते खरंच आहे का? त्यांचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात?
पाल जेवणात पडली तर ते जेवण विषारी होतं असं अनेकदा म्हटलं जातं. पण तसं नाहीये. माणसाचा मृत्यू होईल, इतक्या विषारी पाली नसतात. पण त्या अन्नात पडल्यामुळे मळमळ, उलट्या, चक्कर येणं होतं. हा त्रास अॅलर्जिक रिअॅक्शनमुळे होतो. त्यावर उपचार करता येऊ शकतो.
याबद्दल अधिक शास्त्रीय माहिती आपल्याला अजून संशोधनातून मिळू शकते.
पालीसारखाच दिसणारा आणि ज्याची आपल्याला भीती वाटते असा जीव म्हणजे सापसुरळी. कीड्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यात ते पण महत्त्वाची भूमिका बजावतात. पण हा प्राणीही आपल्याला आता फारसा दिसत नाही. याचं कारण काय असावं?
घरांच्या बदलत्या रचना हे त्याचं मुख्य कारण. पूर्वी घरांना अंगण असायचं. अगदी खूप नसली तरी चार-दोन झाडं तरी घराभोवती लोक लावायचे. या झाडांवर, फुलांवर कीटक यायचे आणि ते खाण्यासाठी, थंडाव्यासाठी सापसुरळ्या.
पाली सहसा रात्री कीडे खातात आणि या सापसुरळ्या दिवसा. पण या सापसुरळ्यांचे नैसर्गिक अधिवासच नष्ट झाले आणि त्या पूर्वीप्रमाणे दिसेनाशा झाल्या.
जर पाली नसतील तर काय होईल?
याचं साधंसरळ उत्तर म्हणजे कीड्यांची संख्या वाढेल आणि त्यांच्यामुळे पसरणारे आजारही. अगदी साधं उदाहरण द्यायचं झाल्यास अनेकदा डास वाढले की आपण वैतागतो. डासांची संख्या वाढण्याची अनेक कारणं आहेत. त्यावर औषध फवारणीसारखे उपायही आहेत.
इतर कीटकांसाठीही केमिकलयुक्त औषधं वापरली जाऊ शकतात. पण त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाली या नैसर्गिकरित्या 'पेस्ट कंट्रोल'चं काम करतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








