1971 युद्ध : बीएसएफचा एक जवान प्राध्यापकाचा वेश घेऊन पूर्व पाकिस्तानात गेला आणि...

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दिवस होता 26 मार्च 1971 चा. मेघालयातील तुरा येथील सीमा सुरक्षा दलाच्या 83 व्या बटालियनच्या मुख्यालयात पहाटे 2 वाजता फोनची बेल वाजल्याने सीमा सुरक्षा दलाचे डेप्युटी कमांडंट वीरेंद्र कुमार गौर यांना जाग आली.

मनकचार चौकीच्या प्रभारींनी त्यांना फोनवर सांगितलं की, पूर्व पाकिस्तानातील काही लोक भारताकडे आश्रय मागत आहेत.

गौर म्हणाले, "मी यासाठी परवानगी देऊ शकत नाही कारण बीएसएफकडे असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. यापूर्वी माझ्यासमोर अशी कोणतीही मागणी आलेली नाही. मात्र, मी सकाळी वरिष्ठांना ही बातमी कळवतो. पण तोपर्यंत कोणालाही भारतीय हद्दीत प्रवेश करू देऊ नका."

काही मिनिटांनंतर बाघमारा चौकीच्या एका संत्रीनेही अशीच बातमी दिली.

त्याने सांगितलं की, "शरणार्थी म्हणत आहेत की, पूर्व पाकिस्तानमध्ये लोकांना मारलं जातंय."

हा फोन ठेवेपर्यंत दलू चौकीतून फोन आला. गौर यांनी ताबडतोब त्यांचे वरिष्ठ डीआयजी बरुआ यांना सांकेतिक भाषेत संदेश पाठवून वाढत्या संकटाची माहिती दिली.

त्या वेळी गाढ झोपेत असल्याने डीआयजीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. बीएसएफ मुख्यालयातील कोणीतरी डीआयजीला जागं केलं आणि सीमेवर सुरू असलेल्या हालचालींची माहिती दिली.

गौर यांच्या संदेशाला उत्तर देताना ते म्हणाले की शरणार्थ्याना त्या रात्रीसाठी भारतीय हद्दीत राहण्याची परवानगी द्यावी.

पाकिस्तानी रायफल्सच्या सैनिकांनी बीएसएफ अधिकाऱ्यांना पूर्व पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले.

कोणाला माहिती होतं की, या शरणार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आकडा एक कोटीच्या वर पोहोचेल. त्यांना पुढे एक वर्ष भारतीय भूमीवर राहावं लागलं.

बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात निमलष्करी दल बीएसएफ अधिक सक्रिय भूमिका बजावेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

सीमा सुरक्षा दलाची भूमिका

हेड कॉन्स्टेबल नुरुद्दीन बंगाली हे पूर्व पाकिस्तान रायफल्सच्या छग्गलनैया चौकीचे प्रभारी होते. भारताच्या श्रीनगर चौकीवर तैनात परिमल कुमार घोष यांच्याशी त्यांची मैत्री होती. ते अनेकदा सीमेवर येऊन घोष यांना भेटत असत.

26 मार्च रोजी पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईनंतर नुरुद्दीन यांनी परिमल घोष यांना सीमा ओलांडून पाकिस्तानी लष्करासोबतच्या संघर्षात मदत करण्याची विनंती केली. घोष यांनी गणवेश बदलला आणि साधे कपडे घातले.

पुढे चितगावच्या पटिया कॉलेजचे प्राध्यापक अली यांचे बनावट ओळखपत्र तयार करून नुरुद्दीनसोबत ते सुभापूर पुलावर पोहोचले. तिकडे पूर्व पाकिस्तान रायफल्सचे सहा सैनिक आधीच हजर होते.

त्यांनी पूर्व पाकिस्तानची माती हातात घेतली आणि आतापासून बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी काम करणार असल्याची शपथ घेतली.

पाकिस्तानी सैनिकांसाठी कशा अडचणी तयार करता येऊ शकतात हे त्यांनी सांगितलं. पूर्व पाकिस्तानच्या सैनिकांना सूचना दिल्यानंतर घोष भारतीय सीमेवर परतले.

आपल्या अहवालात त्यांनी पूर्व पाकिस्तानात सुरू असलेल्या कारवायांची माहिती दिली, पण ते स्वतः सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात गेल्याचा उल्लेख त्यांनी केला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचे वरिष्ठ लेफ्टनंट कर्नल एके घोष त्यांना त्यांच्या चौकीवर भेटायला आले.

युद्धापूर्वीचा नवा तपशील

उशिनोर मजुमदार त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'इंडियाज सिक्रेट वॉर बीएसएफ अँड नाइन मन्थ्स टू द बर्थ ऑफ बांग्लादेश' या पुस्तकात लिहितात, "चहा पिऊन झाल्यावर परिमल घोष यांनी त्यांचे वरिष्ठ ए. के. घोष यांना सांगितलं की, ते स्वत: सीमा ओलांडून सुभापूर पुलापर्यंत गेले होते. यावर घोष यांनी रागाने टेबलावर हात आपटला, त्यामुळे टेबलावर ठेवलेला चहा सांडला."

ए के घोष म्हणाले, "माझ्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याची तुमची हिंमत कशी झाली? यासाठी तुम्हाला कोर्ट मार्शल केले जाऊ शकते याची कल्पना आहे का?"

असं म्हणत घोष रागाने उठले आणि जीपकडे निघाले. तेथून जात असताना परिमल यांनी त्यांना सलाम केला पण ए के घोष यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. आता आपली नोकरी धोक्यात आल्याचं परिमल घोष यांना वाटू लागलं.

भारताच्या पूर्व सीमेपासून 2000 किलोमीटर अंतरावर असलेल्या दिल्लीतील गृहसचिव गोविंद नारायण यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारत सरकारच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, सीमा सुरक्षा दलाचे संचालक के रुस्तमजी आणि रॉचे संचालक आर एन काव देखील उपस्थित होते.

या बैठकीत असं ठरलं की, सीमा सुरक्षा दल आपल्या मध्य प्रदेशातील टेकनपूर येथील अकादमीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर पाठवेल जेणेकरून तिथल्या परिस्थितीवर नजर ठेवता येईल.

दुसऱ्या दिवशी लेफ्टनंट कर्नल ए के घोष पुन्हा श्रीनगर चौकीवर पोहोचले. यावेळी ते हसत हसत आपल्या जीपमधून खाली उतरले. खाली उतरताच ते म्हणाले, "मागील वेळी तुम्ही दिलेला चहा मी प्यायलो नाही. आज मला चहा लागेलच."

हे ऐकून असिस्टंट कमांडंट परिमल घोष यांना हायसं वाटलं. आता कोर्ट मार्शल होण्याची शक्यता संपल्याचं त्यांना वाटू लागलं.

उशिनोर मजुमदार लिहितात, "29 मार्च रोजी परिमल घोष पुन्हा एकदा प्राध्यापक अलीच्या वेशात पूर्व पाकिस्तानच्या सीमेत घुसले. यावेळी त्यांच्या साहेबांच्या संमतीने ते या मोहिमेवर गेले होते. त्यांच्यासोबत ईस्ट पाकिस्तान रायफल्सचे नुरुद्दीन आणि काही बीएसएफचे जवानही होते. त्यांनी साधे कपडे घातले होते."

"भारताने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून ऐकून पूर्व पाकिस्तानातील बंडखोरांना आनंद झाला. त्यांनी परिमल घोष यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि नाचू लागले. घोष यांनी तेथे बंडखोर कमांडर मेजर झिया-उर-रहमान यांची भेट घेतली. त्यांनी भारताकडे मोर्टार आणि तोफगोळ्यांची मदत मागितली."

इंदिरा गांधींनी म्हटलं की, पकडले जाऊ नका

दिल्लीत लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी मुक्ती वाहिनीला मर्यादित मदत देण्याचे मान्य केले.

बीएसएफचे संचालक रुस्तमजी यांनी ही बातमी लेफ्टनंट कर्नल घोष यांना दिली. घोष यांनी परिमल घोष यांना सूचना देताना 92 व्या बटालियनच्या मुख्यालयातून मोर्टार आणि काही तोफगोळे पाठवण्याची व्यवस्था केली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 मार्च रोजी परिमल घोष यांनी मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना हे सामान पोहोचवलं. 29 मार्च रोजी पूर्व पाकिस्तानमध्ये बातमी पसरली की, भारतीय संरक्षण अधिकारी बंडखोरांना भेटले आहेत. शस्त्रं पोहोचताच भारत मुक्ती वाहिनीला समर्थन देत असल्याचं समजलं.

मेजर झिया यांनी ही बातमी मुक्ती वाहिनीच्या इतर सदस्यांपर्यंत पोहोचवली. दरम्यान, बीएसएफचे संचालक रुस्तमजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी गेले असता गांधी म्हणाल्या, 'तुम्हाला जे हवं ते करा, पण पकडले जाऊ नका.'

सोव्हिएत युनियनमधील भारताचे राजदूत आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीय डी पी धर यांना सुरुवातीपासूनच मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना तोफगोळे आणि मोर्टार पुरवायचे होते.

त्यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि इंदिरा गांधींचे प्रधान सचिव पी.एन. हक्सर यांना पत्र लिहून कळवलं होतं की, 'आपल्याला हा प्रतिकार कोणत्याही परिस्थितीत थांबवायचा नाहीये.'

अवामी लीगच्या नेत्यांनी इंदिरा गांधींची भेट घेतली

30 मार्च 1971 रोजी सीमा सुरक्षा दलाला अवामी लीगचे दोन ज्येष्ठ नेते ताजुद्दीन अहमद आणि अमीरुल इस्लाम भारतीय सीमेजवळ पोहोचल्याची माहिती मिळाली. 76 बीएनच्या अधिकार्‍यांनी बीएसएफचे आयजी गोलक मजुमदार यांना गुप्त संदेश पाठवून याची माहिती दिली.

मजुमदार यांनी त्यांचे वरिष्ठ रुस्तमजी यांच्याशी हॉटलाइनवर संपर्क साधला. रुस्तमजींनी माहिती ऐकताच विमानतळ गाठलं आणि तेथे तैनात असलेल्या बीएसएफच्या विमानाने ते कलकत्याला पोहोचले. मजुमदार डमडम विमानतळावर रुस्तमजींना आणायला गेले. त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते.

रुस्तमजी लिहितात, "मजुमदार मला विमानतळाजवळ उभ्या असलेल्या जीपमध्ये घेऊन गेले. त्यात ताजुद्दीन अहमद बसले होते. जीप सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरली होती. आम्ही त्यांना आणि अमीरुल इस्लाम यांना आमच्या काळ्या एंबेसडर कारमध्ये बसवून आसाम हाऊसमध्ये घेऊन गेलो."

ते लिहितात की, "मी त्यांना माझा कुर्ता-पायजमा दिला जेणेकरून ते आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालू शकतील. तोपर्यंत रात्रीचे एक वाजले होते. रात्रीच्या यावेळी कुठेही जेवण मिळणार नव्हतं. त्यामुळे आयजी गोलक यांनी स्वतः दोघांसाठी ऑम्लेट बनवलं."

रुस्तमजी लिहितात, "दुसऱ्या दिवशी गोलक आणि मी न्यू मार्केटला गेलो. तिथून ताजुद्दीन आणि अमीरुलसाठी कपडे, सुटकेस आणि टॉयलेटचं सामान खरेदी केलं. 1 एप्रिल रोजी गोलक ताजुद्दीन आणि त्यांच्या साथीदाराला दिल्लीला घेऊन गेला. दिल्लीत त्यांना सेफ हाऊस मध्ये ठेवण्यात आलं. दोन दिवसांनी त्यांची पंतप्रधान इंदिरा गांधींशी भेट घालून दिली. दिल्लीत एक आठवडा घालवून ते 9 एप्रिलला कलकत्त्याला परतले."

बांगलादेशच्या निर्वासित सरकारला संविधानाची गरज होती. बीएसएफचे कायदा अधिकारी कर्नल एन एस बैन्स यांनी ताजुद्दीन अहमद यांच्यासोबत असलेले बॅरिस्टर अमीरुल इस्लाम यांना बांगलादेशची तात्पुरती घटना लिहिण्यास मदत केली.

कलकत्त्याचे दुसरे बॅरिस्टर सुब्रतो रॉय चौधरी यांनी त्याची फेरतपासणी केली. नवीन देशाचं नाव काय असावं यावर बराच वाद झाला. त्यासाठी 'ईस्ट बंगाल', 'बंग भूमी', 'बंगा', 'स्वाधीन बांगला' अशी अनेक नावे सुचवण्यात आली.

शेवटी ताजुद्दीन म्हणाले की, शेख मुजीब यांनी बांगलादेश नावाला समर्थन दिलं होतं. त्यामुळे बांगलादेशच्या नावावर सर्व नेत्यांचं एकमत झालं.

पूर्वी हे दोन शब्द होते, ते बदलून एक शब्द बांगलादेश करण्यात आला. आता प्रश्न असा निर्माण झाला की बांगलादेशच्या निर्वासित सरकारने शपथ कुठे घ्यायची? रुस्तमजींनी शपथविधी सोहळा पूर्व पाकिस्तानच्या भूमीवर व्हावा, अशी सूचना केली. त्यासाठी मेहेरपूर शहराजवळील बैद्यनाथ तालुक्‍यात आंब्याच्या बागेची निवड करण्यात आली.

सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जनसंपर्क युनिटचे प्रमुख समर बोस आणि कर्नल आय रिखिये यांनी पुढाकार घेऊन सुमारे 200 पत्रकारांना कारच्या ताफ्यात कलकत्त्याहून बैद्यनाथ तालपर्यंत नेलं.

बंदुकीच्या घेऱ्यात मंत्र्यांनी शपथ घेतली

आपण नेमकं कुठे जातोय हे पत्रकारांना आधी सांगितलं नव्हतं.

मानस घोष त्यांच्या 'बांगलादेश वॉर रिपोर्ट फ्रॉम ग्राउंड झिरो' या पुस्तकात लिहितात, "साध्या वेषात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी बैद्यनाथ तालला चारही बाजूंनी वेढा घातला होता. भारतीय हवाई दलाची विमाने या भागात गस्त घालत होती जेणेकरून पाकिस्तानी हवाई दलाचा कोणताही हल्ला हाणून पाडता येईल.

ईस्ट पाकिस्तान रायफल्सच्या सैनिकांनी त्यांच्या फाटक्या गणवेशात, बांगलादेशच्या निर्वासित सरकारच्या मंत्र्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला होता. एका कोपऱ्यात काही लोक विना वाद्य 'आमार शोनार बांग्ला' गाणं गात होती.”

मग गोलक यांना जवळच्या भारतीय गावातून तबला आणि हार्मोनियमची व्यवस्था करायला सांगितलं. अवामी लीगचे दिनाजपूरचे खासदार युसूफ अली यांनी माईकवर बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा वाचून दाखवली. यानंतर सर्व मंत्र्यांनी एकापाठोपाठ एक शपथ घेतली. बांगलादेशचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि संपूर्ण परिसर ‘जॉय बांगला’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

दरम्यान, बीएसएफचे संचालक रुस्तमजी आणि आयजी गोलक मजुमदार भारतीय हद्दीत राहून संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून होते. बांगलादेशच्या हंगामी सरकारचे कार्यालय 8 थिएटर रोड येथे बनविण्यात आले.

ताजुद्दीन अहमद त्यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या खोलीत राहू लागले. उर्वरित मंत्र्यांच्या राहण्याची सोय बल्लीगंज सर्कुलर रोडवरील बीएसएफच्या इमारतीत करण्यात आली होती.

रुस्तमजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी हॉटलाइनवर बोलणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी एक होते. एक दिवस त्यांनी गांधींना फोन करून विचारलं की, कलकत्ता येथील पाकिस्तानी उप-उच्चायुक्तालयातील सर्व बंगाली कर्मचाऱ्यांनी बाजू बदलली तर त्यांना तुमचा पाठिंबा मिळेल का? या प्रस्तावावर इंदिरा गांधी फारशा खूश नव्हत्या.

त्यांनी रुस्तमजींना इशारा दिला की, या ऑपरेशनमधील एक छोटीशी चूक भारताला अडचणीत आणू शकते.

रुस्तमजी म्हणाले, "मी तुम्हाला निराश करणार नाही." त्यांनी पाकिस्तानचे उपउच्चायुक्त हुसैन अली यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांना बाजू बदलण्यास राजी केले. शिवाय निर्वासित सरकारचे पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचीही भेट घालून दिली.

18 एप्रिल रोजी हुसेन अली पाकिस्तानशी संबंध तोडून बांगलादेश सरकारप्रती आपली वचनबद्धता व्यक्त करतील, असा निर्णय घेण्यात आला.

उशिनोर मजुमदार लिहितात, "सकाळी दहाच्या सुमारास कलकत्त्यात एक जोरदार वादळ आले ज्याने पार्क सर्कस मैदानातील अनेक झाडे तर उखडून टाकलीच पण उप-उच्चायुक्तालयात ज्या खांबावर पाकिस्तानी ध्वज फडकत होता तो खांबही उखडला. वादळ थांबताच हुसेन अली आणि त्यांचे कर्मचारी इमारतीत पोहोचले. त्यांच्यापैकी एकाने ध्वजाच्या खांबावरून पाकिस्तानी ध्वज काढून त्या जागी बांगलादेशचा ध्वज फडकावला."

तेथे उपस्थित असलेल्या बीएसएफच्या जवानांनी इमारतीवरील पाकिस्तानी बोर्ड काढून एक नवीन बोर्ड लावला ज्यावर 'प्रजासत्ताक लोकशाही बांगलादेशचे उच्चायुक्त कार्यालय' असे लिहिले होते.

बीएसएफने रेडिओ ट्रान्समीटर दिला

पाकिस्तानने प्रत्युत्तराची कारवाई करत ढाका येथील भारताचे उप उच्चायुक्तालय बंद केले. या ऑपरेशनमध्ये डायरेक्टर रुस्तमजी, आयजी ऑपरेशन्स मेजर जनरल नरिंदर सिंग, आयजी इंटेलिजन्स पीआर राजगोपाल आणि आयजी ईस्टर्न झोन गोलक मजुमदार उप-उच्चायोगाच्या रस्त्यावर वेश बदलून उभे होते.

27 मार्च 1971 रोजी सायंकाळी 7 वाजता मुक्ती वाहिनीचे मेजर झिया-उर-रेहमान यांनी कालूरघाट रेडिओ स्टेशनवरून स्वातंत्र्याची घोषणा केली. तीन दिवसांनंतर पाकिस्तानी विमानांनी रेडिओ स्टेशनवर बॉम्बफेक करून ते उद्ध्वस्त केले.

बीएसएफचे संचालक रुस्तमजी यांनी बीएसएफच्या टेकनपूर अकादमीमधून 200 वॅटचा शॉर्ट वेव्ह ट्रान्समीटर मागवला. लेफ्टनंट कर्नल ए के घोष यांनी त्यांच्या बटालियनचे जुने रेकॉर्ड प्लेयर दिले आणि 'स्वाधीन बांगला बेतार केंद्र'ने प्रसारण सुरू केले.

उशिनोर मजुमदार लिहितात, "बीएसएफचे उपनिरीक्षक रामसिंग हे एकमेव व्यक्ती होते ज्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील रेडिओ ट्रान्समीटर कसे चालवायचे माहित होते. हा ट्रान्समीटर दिवसातील केवळ दीड तासच ऑपरेट व्हायचा. अभियंते आणि स्क्रिप्ट लेखकांच्या एका टीमने पाकिस्तान विरुद्ध युद्ध लढणाऱ्या बांगलादेशातील लोकांसाठी कार्यक्रमांचे प्रसारण सुरू केले. सुरुवातीच्या काळात वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या."

यानंतर जगभरातील लोकांना बांगलादेशच्या संघर्षात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आणि नजरुल यांची गाणी ऐकविण्यात आली.

दर अर्ध्या तासाला 10 मिनिटांचा ब्रेक घेतला जायचा कारण जुना ट्रान्समीटर जास्त गरम व्हायचा. बीएसएफच्या दोन अधिकाऱ्यांना, डेप्युटी कमांडंट एस पी बॅनर्जी आणि असिस्टंट कमांडंट एम आर देशमुख यांना गुप्त रेडिओ स्टेशन चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

या लोकांची आगरतळा येथील सर्किट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांना ये-जा करण्यासाठी जीप देण्यात आली.

काही दिवसांनंतर, हे रेडिओ स्टेशन पश्चिम बंगालमध्ये हलवण्यात आले जेथे रॉने पूर्व पाकिस्तानातील रेडिओ कलाकारांच्या मदतीने रेडिओ कार्यक्रम बनवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.

29 पूल उध्वस्त केले

सीमा सुरक्षा दलाचे अभियंते आणि सैनिकांनी सुभापूर पूल पाडण्यासाठी मुक्ती वाहिनीला मदत केली. सहा आठवड्यांत बीएसएफने पूर्व पाकिस्तानमधील 29 रस्ते आणि रेल्वे पूल उद्ध्वस्त केले. याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांपर्यंत साहित्य पोहोचण्यास विलंब झाला.

जेव्हा जेव्हा बीएसएफचे सैनिक पूर्व पाकिस्तानच्या सीमेत घुसले तेव्हा त्यांना त्यांचा गणवेश घालण्याची परवानगी नव्हती. ना त्यांना जंगल बूट घालता येत होते ना भारतात बनवलेली शस्त्रे बाळगता येत होती. प्लाटून कमांडर रूपक रंजन मित्रा यांनी गुप्तपणे पूर्व पाकिस्तानात घुसलेल्या बीएसएफ सैनिकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

उशिनोर मजुमदार लिहितात, "त्यांना 'अस्सलामवालेकुम' म्हणत अभिवादन कसं करायचं हे शिकवण्यात आलं होतं. काही जण नमाज अदा करायला शिकले आणि रोज पाच वेळा पठण केल्या जाणाऱ्या नमाजांची नावे लक्षात ठेवली.

हिंदू बीएसएफ सैनिकांनी त्यांची नावे बदलली. मित्रा यांनी त्यांचे नाव बदलून तालिब हुसेन ठेवले. ते एकमेकांना त्यांच्या नव्या नावानेच हाक मारायचे."

त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना रात्री त्यांच्या बॅरेकमध्ये राहण्यास भाग पाडले. रात्रीच्या वेळी ते रस्त्यावर गस्त घालण्यासाठी निघाले की त्याच्यावर गोळ्या झाडल्या जात. काही दिवसांनी त्यांनी रात्री बाहेर पडणंच बंद केलं.

भारताने मुक्ती वाहिनीला मदत दिल्याचं नाकारलं

इंदिरा गांधींचे प्रधान सचिव परमेश्वर नारायण हक्सर यांनी अमेरिकन राष्ट्रपतींचे सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांच्याकडे अमेरिकन शस्त्रास्त्रे पाकिस्तानला दिल्याची तक्रार केली. यावर किसिंजर यांनी भारत बंगाली बंडखोरांना शस्त्रे देत असल्याचा आरोप केला पण हक्सर यांनी हे आरोप फेटाळले.

खरं तर ते चुकीचं नव्हतंच. श्रीनगर चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीसाठी 19 राजपुताना रायफल्सच्या चार कंपन्याच तैनात नव्हत्या तर सहा तोफगोळे आणि तीन इंच मोर्टारचीही व्यवस्था करण्यात आली होती.

भारताने तेव्हाही आणि आजही मुक्ती वाहिनीला मदत केल्याचं जाहीरपणे मान्य केलेलं नाही.

न्यूयॉर्क टाईम्सचे प्रतिनिधी सिडनी शोनबर्ग हे प्रशिक्षण शिबिरात पोहोचण्यात यशस्वी झाले जेथे सीमा सुरक्षा दलाचे जवान मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना प्रशिक्षण देत होते. त्यांनी भारत आणि पूर्व पाकिस्तान सीमेवर चार दिवस घालवले आणि पाकिस्तानी सीमेत घुसण्यातही ते यशस्वी झाले. 22 एप्रिल 1971 च्या न्यूयॉर्क टाइम्सच्या अंकात त्यांनी 'बेंगलीज टू रीग्रुप देअर फोर्स फॉर गुरिल्ला अॅक्शन' या शीर्षकाचा लेख लिहिला.

या अहवालात त्यांनी लिहिलं होतं की, "भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे लोक मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना प्रशिक्षण आणि शस्त्रं देताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे."

1971 च्या युद्धात सीमा सुरक्षा दलाच्या 125 जवानांनी बलिदान दिलं तर 392 जवान जखमी झाले. युद्धानंतर, रुस्तमजी आणि अश्वनी कुमार या बीएसएफच्या दोन उच्च अधिकाऱ्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आयजी गोलक बिहारी मजुमदार यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. हा सन्मान मिळवणारे ते पहिले गैर-लष्करी अधिकारी होते. याशिवाय असिस्टंट कमांडंट राम कृष्ण वाधवा यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)