You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत गोवरची साथ, अशी घ्या काळजी
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
मुंबईत गोवर या आजाराचा उद्रेक झाल्याचं चित्र आहे. मुंबईतल्या काही भागांमध्ये लहान मुलांमध्ये गोवर पसरल्याने रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय आरोग्य पथक निर्माण झालं असून त्यांच्याकडून विविध रुग्णालयांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाहणी सुरू आहे.
गोवर रुग्णसंख्येत मोठी वाढ
गोवर रुग्णसंख्या अचानक का वाढत आहे? सध्याची काय परिस्थिती आहे? गोवर हा आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणं काय आणि काळजी काय घ्यावी? अशी सर्व माहिती जाणून घेऊया,
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात मुंबईत गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याचं स्पष्ट झालं आहे.
हा संसर्गजन्य आजार असल्याने आणि बालकांना अधिक होत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे.
मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत 9 लाखहून घरांचं सर्वेक्षण केलं आहे. या अंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांची आरोग्य तपासणी करत आहेत.
मुंबईत ठिकठिकाणी स्पीकरच्या माध्यमातूनही गोवर आजाराविषयी माहिती दिली जात आहे.
गोवरची लक्षणं कोणती?
- गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो.
- अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणं या आजाराची प्रमुख लक्षणं मानली जातात.
- सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणं दिसतात. तसंच डोळे लाल होऊ शकतात.
- बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो.
यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “मुंबईत गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गोवंडी, एफ नॉर्थ, एच इस्ट अशा काही प्रभागांमध्ये आजाराचा उद्रेक दिसून येतो.
आम्ही आरोग्य पथके नेमली आहेत. स्थानिकांच्या घरी जाऊन ते भेट घेत आहेत. गोवरच्या लक्षणांची तपासणी आम्ही करत आहोत. संशयितांना व्हिटामीन ए दिलं जात आहे.”
प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबियांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावं. तसंच गोवर हा वेगाने पसरणारा आजार असल्याने लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करा असं आवाहन डॉ. मंगला गोमारे यांनी केलं आहे.
मुंबई महानगरपालिकेने यासाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 9 महिन्यांचे बालक आणि 16 महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जाते.
डॉ. गोमारे सांगतात, “कोणत्याही कारणास्तव पालकांनी ही लस मुलांना दिली नसेल तरी पाच वर्षापर्यंत मुलांना ही लस देता येते. त्यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणं नसली तरीही बालकांचे लसीकरण करून घ्यावे आणि काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”
मुंबईत अचानाक रुग्णसंख्या का वाढली याची माहिती अद्याप आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली नाही. परंतु इतर काही राज्यांमध्येही गोवरचे रुग्ण आढळल्याने मुंबईत त्याचा प्रसार झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
गोवर झाल्यावर काय काळजी घ्याल?
- आरोग्य तपासणी दरम्यान संशयित रुग्णांना विटामीन ए दिलं जात आहे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले जात आहेत.
- गोवर आजाराचे निदान करण्यासाठी रक्त आणि लघवीची तपासणी केली जाते. तसंच स्वॅबद्वारे सुद्धा चाचणी केली जाते.
- या चाचण्या महत्त्वाच्या असून गोवर किंवा रुबेलाचे निदान करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवरची कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने चक अप करून घ्यावे.
घरच्याघरी उपचार किंवा अंगावर काढू नये. कारण गोवर हा संसर्गजन्य आजार आहे
.
आपल्या घरातील लहान मुलांना गोवरची लक्षणं असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये असंही आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.
मिसल्स, मम्प्स आणि रुबेला (MMR) म्हणजे गोवर आणि गालगुंड यांवरची लस तसंच व्हेरिसेला म्हणजे कांजिण्यांवरची लस भारतात लहानपणी दिल्या जाणाऱ्या लशींचा भाग आहे. पण ज्यांना ही लस मिळालेली नाही त्यांना ही लस दिली जाऊ शकते.
‘लिंबाचा पाला वापरून घरच्याघरी उपचार करू नका’
मुंबई महानगरपालिकेने गोवर आजार वेगाने पसरत असल्याने विशेष मोहीम सुरू केली आहे.
डॉ. गोमारे सांगतात, “काही जण गोवरच्या आजारावर उपचार म्हणून लिंबाचा पाला वापरतात किंवा लिंबाच्या पाल्यावर मुलांना झोपवलं जातं. आमच्याकडे अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. परंतु आम्ही आवाहन करतो की नागरिकांनी घरच्याघरी असे कोणतेही उपचार करू नयेत. गोवरची कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करावेत.”
त्या पुढे सांगतात, “गोवरमुळे निमोनीया होण्याचीही शक्यता असते. तसंच यात बालकाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे निष्काळजीपणा किंवा टाळाटाळ न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत,”