कोरोना व्हायरस बरा झाल्यावर लहान मुलांना होणारा हा आजार नेमका काय आहे?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांना एक दुर्मिळ इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या मते, कोव्हिड-19 नंतर होणाऱ्या या इन्फेक्शनच्या लक्षणाबाबत आई-वडीलांनी आणि घरातील सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे. कोव्हिड-19 नंतर होत असल्याने डॉक्टरांनी या आजाराला 'कोविसाकी' असं नाव दिलं आहे.

कोव्हिड-19 नंतर होणारं इंन्फेक्शन काय आहे?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनावर यशस्वी मात केलेल्या लहान मुलांमध्ये 'Multisystem Inflammatory Syndrome in Children' (MISC) किंवा 'Paediatric Multisystem Inflammatory Syndrome (PIMS) या आजाराच्या केसेस वाढत आहेत. मुंबई, ठाणे, वाशीच नाही तर वैजापूरसारख्या भागातही कोव्हिड-19 मुक्त झालेल्या मुलांना हे इन्फेक्शन झाल्याचं आढळून आलं.

लहान मुलांना होणाऱ्या या इन्फेक्शनबाबत बोलताना मुंबईतील वाडिया बाल रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या,

"गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांमध्ये हे इन्फेक्शनचं आढळून येत आहे. वाडिया रुग्णालयात या आजारने ग्रस्त 14 मुलांना दाखल करण्यात आलं होतं. योग्यवेळी रुग्णालयात आल्याने 12 मुलांचा जीव वाचवता आला. पण, 2 मुलांचा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एका तासात मृत्यू झाला."

"या आजाराचं प्रमुख कारण आहे मुलांच्या रोगप्रतिकार क्षमतेत अचानक बदल होणं. वाडिया रुग्णालयात कोव्हिड-19 ग्रस्त असलेल्या 700 पेक्षा जास्त मुलांवर उपचार करण्यात आले. ज्यातील 14 मुलांना हे इन्फेक्शन झालं." असं डॉ. बोधनवाला म्हणाल्या.

कोविसाकी आजार नक्की आहे काय?

डॉक्टरांच्या मते, हा आजार दुर्मिळ असला तरी लहान मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्तींनी मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे.

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते म्हणतात, "कोव्हिडनंतर होणाऱ्या या आजारात लहान मुलांच्या शरीरातील रक्तवाहिन्या आणि हृदयावर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांमध्ये प्रचंड जळजळ सुरू होते. याला Inflamation of Blood Vessles असं म्हणतात. तर, हृदयावर परिणाम झाल्याने हृदयाची कार्यक्षमता कमी होते. ज्यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होतो."

"या आजारात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच शरीराविरोधात लढाई सुरू करते. ज्यामुळे अवयवांवर परिणाम होतो. साधारणत: कोरोनामुक्त झाल्यानंतर 15 दिवसांनी या आजाराची लक्षणं दिसू लागतात," असं डॉ. अन्नदाते पुढे म्हणतात.

ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील पेडीअॅट्रीक रुमेटॉलॉजिस्ट डॉ. विजय विश्वनाथन यांनीदेखील गेल्या काही दिवसात या आजाराने ग्रस्त लहान मुलांवर उपचार केले आहेत.

डॉ. विश्वनाथन म्हणतात, "लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे मुलांमध्ये जास्त लक्षणं दिसून येत नाहीत. दुसरीकडे व्हायरससोबत लढण्यासाठी शरीर रोगप्रतिकारक शक्ती तयार करत असंत. कोव्हिड बरा झाल्यानंतर 2-4 आठवड्यांनी पुन्हा व्हायरस शरीरात शिरला तर, लढाईसाठी गरजेपेक्षा जास्त सैनिक (रोगप्रतिकारक शक्ती) तयार असतात. ज्याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होतो."

"हा आजार साधारणत: 7 ते 15 वर्षाच्या मुलांमध्ये आढळून आला आहे. आतडं, हृदय, मेंदू आणि किडनीवर याचा परिणाम होतो. याबाबत लंडन आणि अमेरिकेतील डॉक्टरांना पहिल्यांदा माहिती मिळाली." असं डॉ. विश्वनाथन पुढे म्हणाले.

कोविसाकी आजाराची लक्षणं काय आहेत?

डॉ. अमोल यांच्या माहितीनुसार, "ताप, अंगावर येणारे चट्टे या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता सतर्क राहिलं पाहिजे. मुलांच्या शरीरातील बदलावर लक्ष ठेवलं पाहिजे. हा आजार दुर्मिळ आहे."

डॉ. अमोल यांनी काही दिवसांपूर्वी वैजापूरात साडेसात वर्षाच्या लहान मुलाला 'Paediatric Multisystem Inflammatory Syndrome' (PIMS) या आजाराचं निदान केलं होतं.

या आजाराची लक्षणं लोकांना सोप्या शब्दात समजावून देण्यासाठी डॉ. विजय विश्वनाथन यांनी इंग्रजी बाराखडीचा चार्ट लोकांसाठी बनवला आहे.

  • A- अॅबडॉमिनल पेन ( Abdominal Pain)
  • B- डोळे लाल होणं (Bloody Eyes)
  • C- हृदयावर परिणाम (Cardiac)
  • D- डायरिया (Diarrhoea)
  • E- खूप थकवा (Extreme Tiredness)
  • F- ताप (Fever)

डॉ. विश्वनाथन म्हणतात, "पालकांनी A_B_C_D लक्षात ठेवलं आणि मुलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांवर लक्ष दिलं तर योग्यवेळी निदान आणि उपचार शक्य आहेत. यासोबत मुलांची जीभ लाल झाली असेल किंवा अंगावर लाल चट्टे असतील तर तात्काळ डॉक्टरकडे जावं. घाबरून न जाता सतर्क रहावं जेणेकरून उपचार योग्यवेळी शक्य होतील."

हा आजार 'कावासाकी' संसर्गापेक्षा वेगळा आहे?

'वेब-एमडी' च्या माहितीनुसार लहान मुलांना होणारा 'कावासाकी' हा आजार व्हायरस, बॅक्टेरिया किंवा इतर कोणत्या कारणांमुळे होतो. याबाबत शास्त्रज्ञांना अजूनही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

कावासाकीची लक्षणं-

  • पाच दिवस 101 पेक्षा जास्त ताप येणे
  • अंगावर पुरळ येणे
  • डोळे लाल होणे
  • मानेच्या भागातील ग्रंथींना सूज येणे

(स्रोत-वेब-एमडी)

डॉ. अन्नदाते सांगतात, "कावासाकी आजारात डोळे लाल होतात. खूप ताप येतो. जीभ स्ट्रोबेरीसारखी दिसते. ज्याला 'स्ट्रोबेरी टंग' म्हणतात. 'Paediatric Multisystem Inflammatory Syndrome' (PIMS) ची लक्षणं कावासाकी सारखी असल्याने याला 'कावासाकी सदृष्य आजार' म्हणतात."

कोरोनाग्रस्त लहान मुलांची संख्या

आपला सर्वांचा असा समज आहे कोरोना व्हायरसची लागण फक्त रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना होते. पण, महाराष्ट्रात 10 वर्षापर्यंत वयाच्या 8227 मुलांना जुलैपर्यंत कोरोनाची लागण झाली होती.

राज्यातील कोरोनाग्रस्त लहान मुलांची माहिती

(स्रोत-वैद्यकीय शिक्षण विभाग)

मुंबईतील कोरोनाग्रस्त लहान मुलांची आकडेवारी

मुलांची आणि मुलींची टक्केवारी

(स्रोत - मुंबई महापालिका)

डॉ. विश्वनाथन सांगतात, कावासाकीमध्ये रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. पण हृदयावर तात्काळ परिणाम होत नाही. कोविसाकीमध्ये मात्र हृदयाची कार्यक्षमता खूप कमी होते.

'लहान मुलांसाठी खास कोव्हिड सेंटर उभारा'

मुंबई आता हळुहळु पूर्वपदावर येत आहे. राज्यातही लॉकडाऊनमध्ये टप्प्या-टप्याने शिथिलता देण्यात येतेय. लोक कामाला जाऊ लागलेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये काही वाढ होण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. सुभाष साळुंखे राज्य सरकारचे सल्लागार आहेत. डॉ. साळुंखेंनी राज्य सरकारला लहान मुलांसाठी खास कोव्हिड-19 सेंटर उभारण्याची सूचना केली आहे.

बीबीसीशी बोलताना डॉ. सुभाष साळुंखे म्हणतात, "लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यांना कोरोनाची लागण होत नाही. या भ्रमात कोणीही राहू नये. लहान मुलांनाही कोरोनाची लागण होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोक कामासाठी बाहेर पडलेत. त्यांच्याकडून हा संसर्ग लहान मुलांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे."

"येणाऱ्या दिवसात लहान मुलांमध्ये केसेस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने लहान मुलांसाठी खास कोव्हिड-19 सेंटर उभारावं. सद्य स्थितीत लहान मुलांच्या आयसीयूची संख्या मर्यादीत आहे. बेड्स कमी आहेत. येत्या काळात इन्फेक्शन वाढलं तर हे अपूरं पडेल याकडे सरकार लक्ष दिलं पाहिजे," असं डॉ. साळुंके म्हणाले.

"त्यातच, कोव्हिड-19 मुक्त झालेल्या मुलांमध्ये काही आजार दिसून येत आहेत. आपण याकडे एक धोक्याची सूचना म्हणून पाहिलं पाहिजे. कोरोना व्हायरस कोणत्या अवयवावर आघात करेल याची डॉक्टरांनाही अजून पूर्ण कल्पना नाही. त्यामुळे सरकारने येत्या काळात लहान मुलांकडे खास लक्ष दिलं पाहिजे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)