Women’s t20 world cup : भारताचं विजेतेपदाचं स्वप्न हरमनप्रीतच्या नेतृत्वात पूर्ण होणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
3 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाची सुरूवात होणार आहे. भारतीय महिला संघाच्या नावावर अद्याप विश्वचषक नाहीये. तेव्हा यंदा टी 20 विश्वविजेता बनण्याचं स्वप्न भारतीय महिला क्रिकेट संघ साकारू शकेल का?
विजेतेपदाचा हा दुष्काळ संपवण्यासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या दिग्गज संघाचं आव्हान असणार आहे.
2023 विश्वचषकातील सेमी फायनल आणि 2020 विश्वचषकातील फायनमधील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने भारतीय महिला क्रिकेट संघ मैदानात उतरेल.
हरमनप्रीतला आहे विजयाचा विश्वास
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “हा प्रतिष्ठित चषक जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ती क्षमता सुद्धा आहे. 2020 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.
"मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत भरलेल्या विश्वचषक स्पर्धेत आम्हाला सेमी फायनलला थोडक्यात हार पत्करावी लागली. गेल्या काही विश्वचषकातील सातत्यपूर्ण कामगिरी हेच दर्शवते की सगळ्याच प्रतिष्ठित स्पर्धा जिंकण्याची क्षमता भारतीय संघात आहे,” हरमनप्रीत म्हणाली.
“ऑस्ट्रेलियन संघ अतिशय मजबूत आहे. नेहमीप्रमाणे तो सुद्धा या विश्वचषकाचा प्रमुख दावेदार असेल यात शंका नाही. पण आम्ही त्यांना हरवू शकतो असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे,” ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाबाबत हरमनप्रीत म्हणाली.

फोटो स्रोत, ANI
“आम्ही या विश्वचषकासाठी भरपूर तयारी आणि मेहनत केलेली आहे. कागदावर बनवलेली योजना आता मैदानात उतरवण्याची वेळ आलेली आहे,” अशा शब्दात भारताची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने आपली उत्सुकता व्यक्त केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया एकाच गटात
भारत ज्या गटात आहे त्या गटात चुरशीची टक्कर बघायला मिळणार आहे.
'अ' गटात असलेल्या भारतासमोर ऑस्ट्रेलियासोबतच न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. तर 'ब' गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एका गटातील संघ एकमेकांशी राऊंड रॉबिन पद्धतीने म्हणजेच प्रत्येकी एक वेळा भिडतील. त्यानंतर प्रत्येक गटात पहिल्या दोन स्थानावर असलेले संघ उपांत्य फेरीत जातील.
उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी तर अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीने होईल अभियानाची सुरुवात
भारताच्या टी 20 विश्वचषक अभियानाची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या लढतीने होईल.
त्यानंतर 6 ऑक्टोबरला पाकिस्तान, 9 ऑक्टोबरला श्रीलंका आणि 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया असे भारताचे अ गटातील सामने असणार आहेत.
उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर ग्रुप स्टेमधील किमान 3 सामने भारताला जिंकावे लागतील. भारताचा गट पाहता कुठलाचा सामना तसा सोपा अथवा गृहीत धरण्याजोगा नाही. न्यूझीलंडच्या संघानं वेळोवेळी भारताला कडवी झुंज दिलेली आहे.
आकडेवारी बघायला गेल्यास टी 20 मध्ये न्यूझीलंड भारताला वरचढच ठरला आहे. आत्तापर्यंत टी 20 मध्ये न्यूझीलंड आणि भारताचे महिला संघ 13 वेळा एकमेकांना भिडलेले आहेत.
13 पैकी 9 सामने न्यूझीलंडने आणि फक्त 4 सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे या विश्वचषकात न्यूझीलंड भारताची डोकेदुखी वाढवू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी सातत्यानं वरचा आलेख गाठत चालली आहे. त्यामुळे क्षमतेनुसार खेळ केल्यास भारताचा महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडच काय कुठल्याही संघाला मात देऊ शकतो.
श्रीलंकेविरुद्धचा सामना तुलनेनं सोप्पा म्हणता येईल. किमान आकडेवारीतून तरी हेच दिसतं. भारत आणि श्रीलंका एकमेकांविरुद्ध 23 टी 20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 18 भारताने जिंकले आहेत तर 5 सामन्यांमध्ये श्रीलंकेनं विजय मिळवलेला आहे.
मात्र, श्रीलंकेला फारसं गांभीर्याने न घेणंही भारताला महागात पडू शकता. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून भारताला पत्कारावा लागला ही या गोष्टीची साक्ष आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध सुद्धा भारतीय संघाला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावं लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानची कर्णधार फतिमा सना हीने देखील भारताविरोधात पूर्ण ताकदीने आणि आक्रमक होऊन मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
त्यामुळे पाकिस्तान देखील या स्पर्धेत भारतासमोर आव्हान उभा करू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा संघ असू शकतो विजेतेपदाचा प्रमुख दावेदार
टी 20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया महिला संघाची कामगिरी वर्चस्वाचे नवीन मापदंड प्रस्थापित करणारी राहिलेली आहे.
2009 सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघ महिला टी 20 विश्वचषक भरवत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आत्तापर्यंत झालेल्या 8 महिला टी 20 विश्वचषकांपैकी 6 विश्वचषक एकट्या ऑस्ट्रेलियाच्या ताब्यात आहे. मागचे तिन्ही टी 20 विश्वचषक ऑस्ट्रेलियानं जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ आणि विजेतेपद हे जणू ठरलेलं समीकरण आहे.

फोटो स्रोत, ANI
विजेतेपद पटकावण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या या रेकॉर्डच्या जवळपासही कोणी फिरकू शकलेलं नाही. 8 पैकी तब्बल 6 विश्वचषक एकट्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत.
2007 साली इग्लंड आणि 2016 साली वेस्ट इंडिज यांनी पटकवलेलं विजेतेपद वगळता प्रत्येक वेळा ऑस्ट्रेलियानं टी 20 विश्वचषकावर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं आहे.
त्यामुळे यावेळीही ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानलं जाणं सहाजिकच आहे. टी 20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाची कामगिरी स्वप्नवत आहे.
मेग लेनिंगची अनुपस्थिती जाणवणार का?
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघानं जागतिक क्रिकेटमध्ये निर्माण केलेल्या वर्चस्वात मेग लेनिंगचं मोठं योगदान आहे.
तिच्या नेतृत्वाखालीच ऑस्ट्रेलियन महिला संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. पण मेग लेनिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एलिसा हिली ऑस्ट्रेलियाची कर्णधार बनली आहे.
या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाची धुरा एलिसा हिलीकडेच असणार आहे. उत्कृष्ट कर्णधार असण्याबरोबरच मेग लेनिंग एक अनुभवी व दर्जेदार फलंदाज देखील होती. तिच्या अनुपस्थिती ऑस्ट्रेलियन संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणं रंजक असणार आहे.


पण मेग लेनिंगच्या अनुपस्थितीत देखील ऑस्ट्रेलियाचा संघ अनेक दर्जेदार फलंदाज आणि तितक्याच घातक गोलंदाजांनी सज्ज आहे.
त्यामुळेच या विश्वचषकावरही त्यांचीच दावेदारी सगळ्यात प्रबळ मानली जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एकामागोमाग एक विजेतेपद पटकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियानं स्वतःचा दबदबा निर्माण केलाय. पण मागच्या काही काळात भारत आणि दक्षिण आफ्रिकन महिला संघाच्या कामगिरीतही सातत्यानं सुधारणा झालेली पाहायला मिळते.
हे संघ आपली कामगिरी आणखी उंचावून ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला आव्हान निर्माण करू शकतात. सोबत इंग्लंडचा संघदेखील तितकाच स्फोटक आहे. हा संघ सगळं जुळून आल्यास स्पर्धेत मोठी उलटफेर करू शकतो. त्यामुळे पारडं ऑस्ट्रेलियाचं जड असलं तरी लढत चुरशीची असणार आहे, हे नक्की.
फिरकी गोलंदाजी ठरणार निर्णायक
यूएईमध्ये नेहमीच फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहिलेला आहे. इथली खेळपट्टी आणि परिस्थिती पाहता फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. भारताकडे देखील राधा यादव, श्रेयांका पाटील आणि आशा शोभना सारखे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. या तिघींच्या फिरकीवर भारतीय संघाची मदार असेल.
याशिवाय आता यूएईमध्ये थंडीचे दिवस सुरू झाले असून हवेतील ओलावा देखील खेळावर परिणाम दिसून येईल. या अनुकूल परिस्थितीत जलदगती गोलंदाज देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

फोटो स्रोत, ANI
आयसीसीने अगदी ऐनवेळी स्पर्धेचं ठिकाण बदललेलं आहे. खरंतर या स्पर्धेचं यजमानपद बांगलादेशला देण्यात आलेलं होतं. पण तिथं सुरू झालेलं सरकारविरोधातील आंदोलन चांगलंच पेटलं. त्यातून निर्माण झालेल्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेमुळे ऐनवेळी आयसीसीला स्पर्धा दुसरीकडे हलवावी लागली. बांगलादेशनंतर भारतात किंवा श्रीलंकेत स्पर्धा भरवण्याचा आयसीसीचा विचार होता.
पण पुढच्या वर्षी होणाऱ्या एकदिवस विश्वचषकाचं यजमानपद आधीच भारताकडे आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डानं ही स्पर्धा आपल्याकडे भरवण्यात स्वारस्य दाखवलं नाही. तर श्रीलंकेत मान्सून हंगाम सुरू झाल्यामुळे बरेच सामने पावसामुळे वाया जाण्याची भीती होती. या सर्व परिस्थितीचा विचार करून आयसीसीने शेवटी यूएईवर शिक्कामोर्तब केलं.
विशेष म्हणजे यजमानपद असलेल्या युएईचाच संघ स्पर्धेत नाही. यजमानपद असलेल्या देशाचाच संघ स्पर्धेत न उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ही स्पर्धा आपत्कालीन परिस्थितीमुळे यूएईमध्ये हलवण्याचा निर्णय अगदी शेवटी घेतला गेला. तोपर्यंत पात्रता फेरी पार पडून स्पर्धेतील सहभागी संघ आधीच निश्चित झालेले होते. त्यामुळे यजमानपद असलेल्या देशाच्या संघाशिवाय स्पर्धा भरवली जाण्याचा अनोखा योगायोग यावेळी जुळून आलेला आहे.
महिला आणि पुरुष क्रिकेटमधील भेदभाव कमी करण्यासाठी आयसीसीचा प्रयत्न
यावेळी महिला टी - 20 विजेतीपदाची रक्कम ही पुरुष टी - 20 विजेतीपदाएवढीच असणार असल्याची ऐतिहासिक घोषणा आयसीसीने केली आहे.
त्यामुळे यंदाच्या विश्वविजेत्या संघाला मिळणारं बक्षीस मागच्या महिला विश्वविजेत्या संघाला मिळालेल्या रकमेपेक्षा 225 टक्क्यांनी जास्त असणार आहे.

फोटो स्रोत, Reuters
टी - 20 विश्वचषक विजेत्या पुरूष संघाला दिली जाते तितकीच म्हणजे 23.4 लाख डॉलर्सची रक्कम या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला मिळेल. तर उपविजेत्या संघाला 11.7 लाख डॉलर्स आयसीसी कडून दिले जातील.
या स्पर्धेत आयसीसी एकूण 79 लाख, 58 लाख इतक्या रकमेचं बक्षीस स्वरूपात वाटप करेल. पुरूष आणि महिला क्रिकेटमधील भेदभाव मिटवण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे.
महिला क्रिकेटलाही पुरूषांच्या बरोबरीने वागणूक दिली जावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. बक्षिसाची रक्कम समान करून आयसीसीने याची सुरुवात केलेली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











