You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय बनावटीच्या औषधामुळे उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू?
भारतीय औषध निर्माती कंपनी मेरियन बायोटेकचं कफ सिरप सेवन केल्याने 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
गांबिया पाठोपाठ आता उझबेकिस्तानमध्ये ही असा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.
या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आढळून आल्याचं, उझबेकिस्तान सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय.
तसेच Dok-1 Max हे औषध मुलांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देण्यात आलं असून या औषधाचा डोस मुलांसाठी प्रमाणित डोसपेक्षा जास्त असल्याचंही सरकारने या निवेदनात म्हटलंय.
मागच्या काही महिन्यांपूर्वी असंच एक प्रकरण समोर आलं होतं.
गांबियामधील लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका भारतातील औषध कंपनीवर ठेवल्यानंतर आता उझबेकिस्ताननेही 18 मुलांच्या मृत्यू प्रकरणी भारतीय कफ सिरप कंपनीला जबाबदार धरलंय.
दरम्यान सगळ्या प्रकरणात भारताच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय. यात म्हटलंय की, "आम्ही या प्रकरणाची दखल घेतली असून, भारताची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना 27 डिसेंबर 2022 पासून उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय औषध नियामकाशी संपर्कात आहे."
तसेच, उत्तर प्रदेशच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या औषधाची निर्मिती करणाऱ्या मेरियन बायोटेकच्या परिसराची तपासणी केली.
कंपनीतून औषधाचे नमुने घेतले असून पुढील चाचणीसाठी हे नमुने चंदीगडच्या प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचं निवेदनात म्हटलंय.
या सगळ्या घटनेवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसीने मेरियन बायोटेकशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून अद्यापही कोणता प्रतिसाद आलेला नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेने मेरियन बायोटेकच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलंय की, कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात या सिरपचं उत्पादन थांबवलं असून सध्या चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कंपनी पुढची कारवाई करेल.
दिल्लीजवळील नोएडा स्थित मेरियन बायोटेक या कंपनीची स्थापना 1999 मध्ये झाल्याचं कंपनीच्या लिंक्डईन प्रोफाईलवर म्हटलंय. या कंपनीची वेबसाईट सध्या बंद आहे.
या कंपनीची उत्पादने मध्य आशियाई देश, मध्य आणि लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत निर्यात केली जातात.
भारत जगातील एक तृतीयांश औषधांचं उत्पादन करतो, बहुतेक औषधं ही जेनेरिक स्वरूपातील असतात. भारतात फार्मास्युटिकल कंपन्यांची संख्या वाढताना दिसते आहे.
यामुळेच भारताला "जगाची फार्मसी" अशी ओळख मिळाली आहे. भारत विकसनशील देशांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करतो.
27 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात उझबेकिस्तान सरकारने म्हटलंय की, 2012 पासून देशात Dok-1 Max गोळ्या आणि सिरप विकले जात आहेत.
तपासात असं आढळून आलंय की, मृत्यू झालेल्या मुलांनी 2 ते 7 दिवस सतत 3 ते 4 वेळा कफ सिरपचं सेवन केलं होतं.
त्याचं प्रमाण 2.5 ते 5 मिलीच्या दरम्यान होतं. हे प्रमाण मुलांसाठी प्रमाणित डोसपेक्षा जास्त असल्याचं मंत्रालयाने म्हटलंय.
मुलांचा मृत्यू नेमका कोणत्या कालावधीत झाला हे निवेदनात स्पष्ट केलेलं नाही. बीबीसी मॉनिटरिंगने 23 डिसेंबर रोजी Gazeta.uz या वेबसाईटचा हवाला देत एक बातमी प्रसिद्ध केली होती.
यात असं म्हटलं होतं की, उझबेकिस्तान मधील आरोग्य अधिकारी 'मागील दोन महिन्यांत भारतात बनवलेलं कफ सिरप घेतल्याने मध्य समरकंद प्रदेशातील 15 मुलांचा मृत्यू झाल्याच्या दाव्याची' चौकशी करत आहेत.
26 डिसेंबर रोजी Podrobno.uz या न्यूज बेबसाइटने एक बातमी दिली होती. यात म्हटलंय की, सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत उझबेकिस्तान मधील 21 मुलांना उपचारादरम्यान भारतात तयार केलेलं Dok-1 Max कफ सिरप देण्यात आलं होतं. या 21 मुलांपैकी 15 मुलं तीन वर्षांखालील होती.
या औषधामुळे या मुलांची मूत्रपिंडं निकामी झाली तर केवळ तीन रुग्ण बरे झाले.
मंत्रालयाने आपल्या निवेदनात नमूद केलंय की, प्राथमिक प्रयोगशाळेच्या तपासात कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल आढळून आलं आहे.
यापूर्वी गांबियामध्ये 66 मुलांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण जगभरात खळबळ माजली होती.
संबंधित मुलांचा मृत्यू हा भारतातील मेडेन फार्मा या कंपनीने बनविलेल्या सर्दी-खोकल्याच्या औषधाने झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने संबंधित औषधामध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल हे विषारी पदार्थ अस्वीकार्य प्रमाणात असल्याचं म्हणत या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता.
भारत सरकार आणि कंपनी मेडेन फार्मास्युटिकल्स या दोघांनीही हे आरोप फेटाळून लावले आहेत.
भारताने डिसेंबरच्या सुरुवातीला म्हटलं होतं की, या चारही कफ सिरप मध्ये गुणवत्ता मानांकनाचं पालन करण्यात आलं होतं. एका भारतीय अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटनेने या कफ सिरपच्या बाबतीत आतातायी भूमिका घेतली होती.
मात्र संघटनेने सांगितले की ते कारवाईच्या बाजूने उभे आहेत.
मागील आठवड्यात, गांबियातील संसदीय समितीने तपास केल्यानंतर मेडेन फार्मास्युटिकल्सवर कारवाई करण्याची शिफारस केली. तसेच इथून पुढे कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घालण्याची शिफारस केली.
गांबियामधील औषधामध्ये वापरण्यात आलेल्या डाय इथेलिन ग्लायकॉल आणि इथेलिन ग्लायकॉलमुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता.
औषधामध्ये याचं प्रमाण जास्त असून हे दोन्ही पदार्थ विषारी आहेत. आता गांबिया पाठोपाठ उझबेकिस्तानचे नवे प्रकरण पुढे आले आहे.
भारतीय कायद्यांनुसार सर्व उत्पादकांना कठोर गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन पद्धतींचे पालन करणं आवश्यक असतं.
काही तज्ञ बीबीसीशी बोलताना सांगतात की, निर्यातीसाठी असलेली औषधे स्थानिक वापरासाठी असलेल्या मानकांच्या अधीन असल्याचं नियम सांगतात. पण उत्पादक या मानकांची अंमलबजावणी नेमकी कशी करतात हे काही स्पष्ट नाही.
सार्वजनिक-आरोग्य कार्यकर्ते दिनेश ठाकूर सांगतात की, कमी दर्जाची औषधं तयार केल्यास जी कठोर कारवाई व्हायला हवी ती होताना दिसत नाही. जर तुम्ही गुणवत्ता मानकांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला 242 यूएस डॉलर एवढा दंड आणि दोन वर्षांपर्यंतचा कारावास एवढ्याच शिक्षेची तरतूद आहे.
ते पुढे सांगतात, "जोपर्यंत औषध आणि प्राणहानी यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तरी तुम्हाला इतकीच शिक्षा मिळते."
याआधी व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या देशांनी निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे भारतीय बनावटीच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे.
गुणवत्ता नियंत्रणाचा मुद्दा पुढे करत यूएस फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशननेही भारतीय बनावटीच्या काही औषधांवर बंदी घातली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)