You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खोकल्यावरचं औषध म्हणून वापरलं जाणारं हेरॉइन व्यसन बनत गेलं आणि...
- Author, पिरिना पिघी बेल
- Role, बीबीसी न्यूज
हेरॉइनची निर्मिती 1800 दशकाच्या उत्तरार्धात प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी त्याचा वापर खोकल्याच्या औषधांमध्ये केला जात होता.
आज 100 वर्षांनंतर हेरॉईनचा वापर नशा करण्यासाठी केला जात आहे. त्याचे सेवन बेकायदेशीर आहे.
गेल्या 20 वर्षांत एकट्या अमेरिकेत एक लाख तीस हजारांहून अधिक लोकांना हेरॉईनच्या ओव्हरडोसमुळे (अतिसेवन) आपला जीव गमवावा लागला आहे.
कसं बनवलं हेरॉईन?
हेरॉईनचं रासायनिक नाव डायसेटाइलमॉर्फिन असं आहे.
हेरॉईनच्या निर्मितीसंदर्भात सर्वात जुना ज्ञात असलेला अहवाल 1874 सालचा आहे.
लंडनमधील सेंट मेरी हॉस्पिटल स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये सीआरए राईट या इंग्रजी रसायनशास्त्रज्ञाने मॉर्फिनशी सिंथेसाईज्ड (कृत्रिम प्रक्रियेने तयार करणं) केले होते.
औषधांच्या इतिहासाचे जाणकार आणि बफेलो विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड हर्जबर्ग यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं, "त्यावेळी अफू आणि मॉर्फिनचा वापर औषधांमध्ये केला जात होता, त्यामुळे लोकांना माहित होते की ओपिओइड्सचा वापर औषधं बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो."
पण स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसोपचाराचे प्राध्यापक कीथ हम्फ्रीस म्हणतात की, या गोष्टींच्या सेवनामुळे नशा होत होती आणि आजही होते. त्यामुळे औषध कंपन्यांना अशी औषधं हवी होती ज्यामुळे नशेचे व्यसन लागणार नाही. सुरुवातीला काही लोकांना असे वाटले असावे की हेरॉईनमुळे नशेचे व्यसन लागणार नाही आणि त्याचा दुष्परिणाम कमी असावा.
जून 2020 मध्ये 'द कन्व्हर्सेशन'मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात कॅमिलो जोस सेला विद्यापीठ आणि अल्काला विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्राचे प्राध्यापक फ्रान्सिस्को लोपेझ-मुनोझ आणि सेसिलिओ अलामो गोंजालेज लिहितात, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेरॉइन क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये खोकल्याचा आजार बरा करण्यासाठी उपयुक्त होतं आणि त्यामुळे रुग्णाला झोप मिळत होती."
असं असलं तरी हेरॉईनच्या संशोधनाच्या पहिल्या वर्षात वैद्यकीय स्तरावर त्याबद्दल फारसा उत्साह नव्हता.
वैद्यकीय दृष्टिकोनातून 1897 पर्यंत त्यात फार रस नव्हता, पण याच वेळी प्रोफेसर हेन्रिक ड्रेसर यांच्या नेतृत्वाखालील जर्मन फार्मास्युटिकल कंपनी बायरची संशोधन टीम मॉर्फिन आणि कोडीन (ओपिओइड) या औषधांच्या वापराऐवजी दुसऱ्या पर्याय शोधत होती. जेणेकरुन श्वासासंदर्भात आजार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळू शकेल.
ही माहिती बेअर लेव्हरकुसेन संग्रहातील दस्तऐवजावर आधारित आहे.
संशोधन पथकातील एक सदस्याने मॉर्फिन आणि कोडीन ऐवजी डायसेटाइलमॉर्फिन वापरण्याचा विचार मांडला. त्यांनी सर्वातआधी प्राण्यांवर याचा प्रयोग केला आणि त्यानंतर बेयरमधील लोक आणि मग बर्लीनमधील लोकांवर याची चाचणी केली.
खोकल्यावर उपचारम्हणून देताना
या चाचण्यांमधून लक्षात आले की डायसेटाइलमॉर्फिन खोकल्यावर प्रभावी ठरत आहे आणि कफसाठीही दिलासा देणारं आहे. त्यावेळी त्याला 'हेरोइक ड्रग' म्हटलं गेलं.
वर्ष 1898 मध्ये बायर कंपनीने एक कफ सप्रेसेंट बनवण्यास सुरुवात केली. यात मुख्य घटक म्हणून डिसॅटाइलमॉर्फिनचा वापर केला गेला. कंपनीने आपल्या या सप्रेसेंटला "हेरॉईन" असं नाव दिलं.
हे पावडरच्या स्वरूपात होते. 1 ग्रॅम, 5 ग्रॅम,10 ग्रॅम आणि 25 ग्रॅमच्या डोसमध्ये होते. मग नंतर ते सिरपच्या माध्यमातून आले. त्यानंतर ते लोंजेज आणि सपोसिटरीच्या गोळ्यांच्या माध्यमात उपलब्ध झाले.
'द कन्व्हर्सेशन'मध्ये लोपेझ-मुनोझ आणि अलामो लिहितात की, खोकला रोखणारं हे औषध व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले. जगभरातील लोक त्याचा वापर करत होते. विशेषत: खोकला प्रतिबंधासाठी.
या उपायामुळे क्षयरोग, न्यूमोनिया, ब्रोंकाइटिस सारख्या आजारात येणारा खोकला नियंत्रित होऊ लागला. बायरच्या लेव्हरकुसेन संग्रहाच्या दस्तऐवजानुसार 1899 पर्यंत कंपनी 20 हून अधिक देशांमध्ये हेरॉइनची विक्री करत होती.
हर्झबर्ग आणि हम्फ्रीस यांच्या म्हणण्यानुसार, हेरॉईन अमेरिकेत काऊंटरवर विकले जायचे. मुलंही ते विकत घेऊ शकत होती.
1914 पर्यंत रुग्णांना हेरॉइन विकत घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नव्हती. तोपर्यंत अमेरिकेने हॅरिसन नार्कोटिक्स कायदा आणला नव्हता.
हम्फ्रीज यांच्यानुसार, त्यावेळी हेरॉईन केवळ कफसाठी उपाय म्हणून ओळखले जात नव्हते तर मॉर्फिन आणि अल्कोहोलच्या व्यसनावर उपचार करण्यासाठीही वापरले जात होते.
दरम्यान, डॉक्टरांनी अल्पावधीतच याचा वापर कायम करण्याची कल्पना सोडली.
व्यसन लागण्याचा धोका
खरं तर त्याचे व्यावसायिकीकरण करण्यात आले त्यावेळीच हेरॉईनचे व्यसन लागू शकते असा इशारा देण्यात आला होता.
नॉर्थ फ्लोरिडा विद्यापीठातील प्राध्यापक आणि वैद्यकशास्त्राच्या इतिहासाचे जाणकार डेव्हिड कोर्टराइट सांगतात, 1900 ते 1906 दरम्यान प्रकाशित झालेल्या वैद्यकीय साहित्यात "या औषधाचे व्यसन होण्याची क्षमता आहे असा इशारा देणारे अनेक लेख आहेत."
येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या म्हणण्यानुसार, "डॉक्टर आणि फार्मासिस्टना लवकरच समजले की रुग्णांना ओव्हरडोस द्यावा लागू शकतो आणि असं केल्याने त्यांना व्यसन लागण्याची भीती आहे."
कोर्टराइट यांच्या मते, असं असलं तरी खोकल्यावर उपचार म्हणून हेरॉईन घेणाऱ्या रुग्णांना त्याचे व्यसन लागले नाही.
कोर्टराइट यांच्या मते, "20 व्या शतकाच्या सुरुवातीस या आजारासाठी मॉर्फिन, अफू किंवा हेरॉईनचा वापर करणाऱ्या 350 लोकांपैकी केवळ सहा जणांना हेरॉइनचे व्यसन लागले. ते 1.7% होते. या काळात अफू आणि मॉर्फिनचे व्यसन अधिक होते."
तज्ज्ञांच्या मते, याचे एक मुख्य कारण म्हणजे खोकल्याच्या औषधांमध्ये हेरॉईनचा डोस "खूप कमी" होता, फक्त एक किंवा दोन मिलीग्रॅम. तर कोर्टराइट यांच्या मते, "काही रुग्णांना हेरॉईनचे व्यसन होते, पण त्यांना मॉर्फिनचे व्यसन नव्हते."
प्रतिबंध
तज्ज्ञांच्या मते, याचे मुख्य कारण म्हणजे 1910 च्या दशकात हेरॉईन गुन्हेगारांमध्ये लोकप्रिय झाले होते. कोर्टराइट यांच्या मते, "अमेरिकेत हेरॉइन वैद्यकीय वापरात न आढळल्याचा सुरुवातीचा पुरावा 1910 च्या सुमारास आहे आणि हा तोच काळ होता जेव्हा औषधावरून वाद सुरू झाला."
पण हेरॉईन गुन्हेगारी जगतात कसं आलं?
डेव्हिड मॅस्टो यांनी "वन हंड्रेड इयर्स ऑफ हेरॉइन" या अध्यायात यासंदर्भात म्हटलं की, "देशाच्या तुरुंगातील काही कैद्यांना खोकल्यासाठी हेरॉईन मिळालं. हा नशा करण्यासाठीचा एक पदार्थ आहे अशी माहिती इतर कैद्यांपर्यंत पोहचली. जेलबाहेरही ही अफवा पसरू लागली."
"हेरॉईनच्या या अफवा अनेक ठिकाणांहून आल्या असं वाटतं." शिवाय, हेरॉईन कोकेनच्या तुलनेत काळ्या बाजारात स्वस्त होतं आणि अफीमच्या तुलनेत हे मिळवणं सोपं होतं.
येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांच्या सांगण्यानुसार, 1912 पर्यंत न्यूयॉर्कमधील तरुण याचा वापर रिक्रिएशनल औषध म्हणून करत होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)