'डॉक्टरांनी हाती गिटार देऊन वाजवायला सांगितली, तेव्हाच ते माझ्या मेंदूची सर्जरी करत होते'

फोटो स्रोत, BMJH/Bengaluru
- Author, इमरान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, बंगळुरु
एखाद्या रुग्णाची मोठी शस्त्रक्रिया म्हटली की डोळ्यासमोर ऑपरेशन थिएटरमधील गंभीर वातावरण आणि तणाव डोळ्यासमोर येतो. त्यातच मेंदूवरील शस्त्रक्रिया म्हटल्यावर प्रचंड तणाव असतो. पण कल्पना करा की ज्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया होत आहे अन् ती व्यक्ती गिटार वाजवते आहे.
बंगळुरूत एक अशीच शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णाच्या दोन बोटांमध्ये समस्या होती म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
डोक्याला एक बारीक छिद्र पाडून मेंदूतील सर्किट जाळून ही शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया नेमकी कशी असते आणि ज्या व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया झाली त्यांचा अनुभव कसा होता हे आपण पाहू.
जोसेफ डिसूजा हे अमेरिकेत राहणारे गिटारिस्ट आहेत. शस्त्रक्रियेसाठी ते बंगळुरूला आले. बंगळूरूच्या भगवान महावीर जैन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मेंदूवर दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली.
डिसूजा हे 65 वर्षांचे आहेत. पण ते अगदी फिट दिसतात. त्यांचा जन्म गोव्यात झाला तर बहारीनमध्ये वाढले.
त्यानंतर 1999 मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले. ते सहा वर्षांचे असल्यापासून त्यांना एका गोष्टीचं प्रचंड वेड होतं. ते म्हणजे गिटारचं. त्यांना बँडमध्ये लीड गिटारिस्टही व्हायचं होतं.


जोसेफ यांनी बीबीसीला काय सांगितलं?
ऑपरेशनचा अनुभव कसा होता याबद्दल जोसेफ यांनी बीबीसीला म्हणाले, "जेव्हा ते माझ्या मेंदूत झालेली जखम जाळत होते, तेव्हा मी सातत्यानं माझा हात वर उचलावा आणि त्याची उघडझाप करत करावी असं मला सांगण्यात येत होतं."
"शिवाय त्यांनी मला वन-टू, वन-टू बोलण्यास सांगितलं. प्रत्यक्षात ही एक प्रकारची सांकेतिक भाषा होती. याचा अर्थ होता की सर्वकाही ठीक आहे. एका टप्प्यावर, मला बरं वाटत नव्हतं. तेव्हा त्यांनी 5 सेकंदात ते ठीक केलं होतं."
शरण श्रीनिवासन स्टीरियोटॅक्टिक फंक्शनल न्यूरोसर्जन आहेत. शस्त्रक्रियेच्या एका टप्प्यावर त्यांनी डिसूजा यांना गिटार दिली आणि ती वाजवण्यास सांगितलं. जेणेकरून हे याची खातरजमा करता यावी की शस्त्रक्रियेदरम्यान त्यांची बोटं योग्य प्रकारे काम करत आहेत की नाही.
शस्त्रक्रियेआधी डिसूजा यांनी डॉक्टरांची भेट घेतली होती, तेव्हा ते एका विचित्र समस्येला तोंड देत होते. गिटार वाजवताना त्यांची दोन बोटं आपोआप वळायची. यामुळे त्यांना व्यवस्थित गिटार वाजवता येत नसे.
मात्र जेव्हा त्यांच्या मेंदूमधील काही सर्किट्स जेव्हा जाळण्यात आले तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव होत होती की जशी 2004 पासून त्यांची बोट खाली खेचली जायची किंवा आपोआप वळायची तशी ती आता होत नव्हती.
त्यांनी त्यांची एक आठवण सांगितली.
"मी म्युझिक स्कूलमध्ये होतो गाण वाजवत असताना अचानक मला जाणीव झाली की माझी बोटं काम करत नाहीत. ज्याप्रकारे कधी कधी पाय सुन्न पडतात, तसंच बोटांच्या बाबतीत झालं होतं."
"तेव्हा नेमकं काय होत होतं, हे मला माहीत नव्हतं. हे जे काही घडत होतं ते सर्व मला खूप गोंधळात टाकणारं होतं."

फोटो स्रोत, Madhu Y
यानंतर डिसूजांनी अनेक डॉक्टर्सना त्यांची समस्या दाखवली. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे गिटार वादक म्हणून आपलं करियर त्यांना सोडावं लागलं.
शेवटी लॉस एंजेलिसमधील एका डॉक्टरनं डिसूजांना सांगितलं की त्यांना 'फोकल डिस्टोनिया' नावाचा आजार झाला आहे.
याला टास्क स्पेसिफिक फोकल हँड डिस्टोनिया किंवा टीएसएफएचडी म्हटलं जातं. ही एकप्रकारची न्यूरोलॉजिकल अवस्था असते. हात आणि बोटांच्या मांसपेशी आपोआप आकुंचन पावल्यामुळे ही स्थिती निर्माण होते.
डॉक्टर श्रीनिवासन यांनी बीबीसीला सांगितलं, "हा एक विचित्र आजार आहे. यात एका बाजूला रुग्णाच्या डोक्यात एक प्रकारची रिअॅक्शन होत असते तर दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीची बोटं आपाओप वळतात. अशा स्थितीत बोटांची विचित्री स्थिती तयार होते."
डॉक्टर श्रीनिवासन यांनी सांगितलं की या आजाराचं निदान होऊ शकत नसल्यामुळे ही समस्या आणखी वाढत जाते.
ते म्हणाले, "एमआरआय केल्यानंतर देखील हे लक्षात येत नाही की मेंदूत नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली होत आहेत. डिसूजा यांच्या मेंदूत सुरू असलेल्या हालचाली थांबवण्यासाठी त्यांच्या कवटीत एक 14 एमएमचं छिद्र पाडण्यात आलं. त्यानंतर काही सर्किट्स जाळून नष्ट करण्यासाठी त्यात एक इलेक्ट्रॉड टाकण्यात आला."
जोसेफ डिसूजा डॉक्टर श्रीनिवासनपर्यंत कसे पोहोचले?
डिसूजा यांची अवस्था कळल्यानंतर त्यांच्या एका मित्राने त्यांना एक व्हीडिओ पाठवला.
जी समस्या डिसूजांना होती त्याचाच सामना व्हीडिओतील व्यक्ती करत होती.
त्या व्यक्तीच्या तीन बोटांमध्ये हीच समस्या होती. ते 2017 चं वर्ष होतं. त्यावेळेस डिसूजा यांना डॉक्टर श्रीनिवासन यांच्याबद्दल माहिती मिळाली होती.
व्हीडिओत दिसत असलेल्या व्यक्तीचं नाव अभिषेक प्रसाद होतं. ते आयटी क्षेत्रात काम करत होते. त्यांना देखील गिटार वाजवण्याचा छंद होता.
हातांच्या एका सर्जननं अभिषेक प्रसाद यांना डॉक्टर श्रीनिवासन यांच्याकडे पाठवलं होतं. त्यांनी प्रसाद यांना सांगितलं होतं की त्यांच्या समस्येचा उपाय डॉक्टर श्रीनिवासन यांच्याकडे आहे.
2016 मध्ये अभिषेक प्रसाद डॉक्टर श्रीनिवासन यांच्याशी बोलले होते. त्यानंतर मग 9 महिने दोघांमध्ये कोणतंही बोलणं झालं नव्हतं.
कारण, बोटांची समस्या दूर करण्यासाठी अभिषेक प्रसाद यांना मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागेल हे कळल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला होता.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र जुलै 2017 मध्ये अभिषेक प्रसाद यांच्या लक्षात आलं की जेव्हा ते लॅपटॉपच्या कीबोर्डवर काम करतात तेव्हा त्यांची बोटं आपोआप वरच्या दिशेला जातात.
यानंतर डॉक्टर श्रीनिवासन यांनी त्याच पद्धतीनं उपचार केले, ज्या पद्धतीनं त्यांनी डिसूजावर उपचार केले होते.
ताकाओमी तायरा, टोकियो वुमन्स मेडिकल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ते 'अवेक ब्रेन सर्जरी'त आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ आहेत. डॉक्टर श्रीनिवासन यांनी त्यांच्याकडूनच याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
डॉक्टर श्रीनिवासन यांनी अभिषेक प्रसाद यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. फंक्शनल न्यूरोसर्जरीचा हा त्यांचा पहिलाच रुग्ण होता.
टीएसएफएचडी चा सर्वसामान्य प्रकार म्हणजे रायटर्स क्रॅम्प. हा प्रकार पियानो, व्हायोलिन किंवा सेलो वादन करणाऱ्यांमध्ये आढळून येतो.
'अवेक ब्रेन सर्जरी'त काय केलं जातं?
या शस्त्रक्रियेत आधी रुग्णाला लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो. मग एक स्टीरियोटॅक्टिक फ्रेम मेंदूत टाकली जाते. डोक्याच्या कवटीत पुढच्या बाजूला कपाळाच्या भागात दोन स्क्रू लावले जातात. तर दोन स्क्रू कवटीच्या मागच्या भागात लावले जातात.
रुग्णाचा एक स्टीरियोटॅक्टिक एमआरआय केला जातो. मग ते फोटो सॉफ्टवेअरमध्ये पाठवले जातात.
यातून हे कळतं की मेंदूमध्ये इलेक्ट्रॉड कुठून टाकायचा आहे आणि ज्यांना जाळायचं आहे असं दुष्परिणाम करणारे किंवा कामात अडथळा आणणारे सर्किट्स कुठे आहेत.
यानंतर रुग्णाला ऑपरेशन टेबलवर नेलं जातं. तिथे रुग्णाचं डोकं अतिशय व्यवस्थितरीत्या आणि सुरक्षित स्थितीत स्थिर ठेवलं जातं. जेणेकरून ऑपरेशन करताना रुग्णाचं डोक 'एक मिलीमीटर' देखील हलता कामा नये.

फोटो स्रोत, Getty Images
शस्त्रक्रियेची तयारी झाल्यानंतर शस्त्रक्रियेच्या सुरूवातीलाच कवटीमध्ये 14 एमएमचं छिद्र केलं जातं. त्यानंतर मेंदूमध्ये एक इलेक्ट्रॉड टाकला जातो आणि अनावश्यक किंवा बिघडलेले सर्किट्स जाळले जातात.
प्रत्येक जखम किंवा सर्किट्स जाळण्यासाठी 70 अंश सेंटीग्रेड तापमान राखलं जातं आणि त्याला 40 सेकंदांपर्यंत तसंच ठेवलं जातं.
प्रसाद यांच्या बाबतीत इलेक्ट्रॉड 8.3 सेंटीमीटर आत आणि डिसूजांच्या बाबतीत तो 10 सेंटीमीटर आत टाकण्यात आला होता.
डॉक्टर श्रीनिवासन म्हणाले, "डिसूजांच्या बाबतीत जेव्हा तिसरं सर्किट जाळण्यात आलं होतं, तेव्हा त्यांची बोटं चांगल्या स्थितीत आली होती. सर्वसामान्यपणे आम्हाला अशी स्थिती चौथं सर्किट जाळल्यानंतर दिसते. मात्र ही समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी आम्ही सात वेळा सर्किट जाळतो."
मात्र ही समस्या कायमस्वरूपी बरी होते का?
डॉ. श्रीनिवासन म्हणाले, "जर रुग्ण तीन महिन्यांच्या आत एखादी तक्रार घेऊन आला नाही, तर मग तो येण्याची शक्यता नसते. कारण त्याला कोणताही त्रास होत नाही. प्रसाद देखील उपचार घेतल्यानंतर पुन्हा आले नाहीत. त्यांना कोणतीही समस्या उद्भवली नाही."
"तास्कीन अली देखील उपचारानंतर पुन्हा आले नाहीत. ते बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाक्यात एक व्यावसायिक गिटार वादक आहेत. त्यांचा आजार अधिक गंभीर स्वरुपाचा होता."

फोटो स्रोत, BMJH/ Bengaluru
रुग्णांना काय सल्ला दिला जातो?
डॉक्टर श्रीनिवासन म्हणाले की रुग्णांना फक्त एकच सल्ला दिला जातो. तो सल्ला म्हणजे त्यांनी सराव करावा.
ते म्हणाले, "प्रसाद यांच्या बाबतीत हा काही वर्षांचा मुद्दा होता. तर डिसूजा 20 वर्षांपासून या समस्येला तोंड देत होते. खरंतर मेंदूला पुन्हा पुन्हा प्रशिक्षित करण्याची आवश्यकता असते."
तर डिसूजा म्हणतात, "मी अलीकडेच पुनर्वसन केंद्रात (रिहॅब सेंटर) जाण्यास सुरूवात केली आहे. हे तीन महिने करावं लागेल. यात संयमाची आवश्यकता असते. मी आता त्यावर आणखी काम करणार आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











