You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोनाल्डोवर सौदी अरेबियाने अब्जावधींची खैरात का केली?
कतारमध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत मोरोक्कोविरुद्ध पराभवानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगालचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं. पोर्तुगालला हरवत वर्ल्डकपची सेमी फायनल गाठणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिका अरब देश ठरला होता.
पराभवानंतर रडवेल्या रोनाल्डोला परतताना जगाने पाहिलं. यानंतर अवघ्या महिनाभरात रोनाल्डोने सौदी अरेबियातल्या एका क्लबशी नातं जोडलं आहे.
युरोपातील क्लब सोडून रोनाल्डो आता सौदी अरेबियातील अल नासर क्लबतर्फे खेळणार आहे. रोनाल्डो आणि या क्लबमध्ये अडीच वर्षांसाठी करार झाला असून त्यासाठी रोनाल्डोला 1800 कोटी रुपये मिळणार आहेत.
अल नासर आणि रोनाल्डो यांच्यात झालेल्या कराराची रक्कम ही एखाद्या फुटबॉलपटूला मिळणार असलेलं सर्वाधिक मानधन असणार आहे.
युरोपातल्या क्लबसाठी खेळताना अनेक विक्रम मोडले, जेतेपदं पटकावली, आता सौदी अरेबियात खेळू इच्छितो, असं रोनाल्डोने म्हटलं आहे.
कतारमध्ये झालेला वर्ल्डकप रोनाल्डोसाठी फारसा चांगला ठरला नाही. शेवटच्या दोन सामन्यांसाठी तर रोनाल्डोला फिट असतानाही अंतिम संघातून डच्चू देण्यात आला.
यंदाच्या हंगामात मँचेस्टर युनायटेडसाठी खेळताना रोनाल्डोला 16 सामन्यात केवळ तीनच गोल करता आले.
रोनाल्डोची 2022मधली कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नसली तरी सौदी अरेबियातर्फे तो खेळणार असल्याचं स्पष्ट होताच अरबविश्वात जल्लोषाची लाट उसळली.
अल नासर क्लबनेही रोनाल्डोचा जर्सीवाला फोटो ट्वीट केल्यानंतर त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. 37वर्षीय रोनाल्डोचा प्रचंड मानधनाचा करार याला काही विशेषज्ञ सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सुधारणावादी धोरणनीतीशी जोडतात.
पाश्चिमात्य देशांना मागे टाकून जागतिक पातळीवर सौदी अरेबियाला स्वतंत्र स्थान मिळवून देणं हा या धोरणाचा हेतू आहे.
सौदी अरेबियात फुटबॉलचा वाढता थरार
कतारमध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत सौदी अरेबियाच्या संघाने अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाला 2-1 असं नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली.
सामन्याच्या दिवशी सौदीत मंत्रालयं, सरकारी कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जेणेकरुन हा रंजक मुकाबला ते पाहू शकतील.
सौदीने ही लढत जिंकल्यानंतर किंग सलमान यांनी पुढच्या दिवशी सुट्टीची घोषणा केली.
या विजयाचा उत्साह केवळ सौदीतच नव्हे तर संपूर्ण अरब जगतातही पाहायला मिळाला. सोशल मीडियावर अन्य अरब देशही सौदीचा विजय त्यांचाच असल्याप्रमाणे साजरा करत होते.
सौदीच्या 2030 योजनेचा खेळ महत्त्वाचा भाग
कतार वर्ल्डकपदरम्यान सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अनेकदा फिफाचे प्रमुख जी. व्ही. इन्फॅन्टिनो यांना भेटले. 2016 मध्ये मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन 2030 अंतर्गत खेळांचा अव्वल प्राधान्य गोष्टींमध्ये समावेश केला.
यानंतर सौदीच्या खेळविषयक घडामोडींमध्ये बदल जाणवू लागला. व्हिजन 2030 अंतर्गत तीन लक्ष्यं निर्धारित करण्यात आली आहेत.
खेळांमधला लोकांचा सहभाग 2030 पर्यंत 40 टक्क्यांपर्यंत वाढवणं, विदेशात सौदीच्या खेळाडूंची कामगिरी सुधारणं आणि खेळांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणं.
फुटबॉलचं वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार उरी लेव्ही यांनी मोहम्मद बिन सलमान यांचा एक व्हीडिओ ट्वीट केला. त्यांनी म्हटलं आहे की रोनाल्डो सौदीत खेळणं हा मोठ्या बदलाचा संकेत आहे.
मध्यपूर्व आखात आता नवा युरोप असेल असं मोहम्मद बिन सलमान यांनी सूचित केलं. ते पुढे सांगतात,
"पुढच्या पाच वर्षात सौदी पूर्णत: बदलून जाईल. कुवेत आणि कतारही. आमच्यात काही मतभेद असतील पण तरीही. तेही एक भक्कम अर्थव्यवस्था आहेत. युएई, ओमान, लेबनॉन, जॉर्डन, इजिप्त, इराक या देशांमध्ये ज्या ज्या संधी आहेत- आम्ही यशस्वी झालो तर बहुतांश देश आमच्या पावलावर पाऊल ठेवतील."
पुढच्या 30 वर्षात जगाची नव्याने मांडणी होणार आहे. त्याचं केंद्र मध्यपूर्व असणार आहे. ही सौदीसाठी आणि वैयक्तिक पातळीवर माझ्यासाठी मोठी लढाई असणार आहे.
मध्यपूर्व आखात जगाचं नेतृत्व करत नाही तोवर मी जगाचा निरोप घेणार नाही. मला असं वाटतं 100 टक्के आम्ही लक्ष्य गाठू.
ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक राजकीय विषयांचे जाणकार गोकुल साहनी यांनी सांगितलं की हा व्हीडिओ शेअर करताना म्हटलं सौदी अरेबिया धर्माधिष्ठित ही प्रामुख्याने असलेली ओळख बाजूला सारत प्रमुख व्यापारी देश अशी ओळख प्रस्थापित करू पाहत आहेत.
रोनाल्डोमुळे सौदी अरेबियाला काय फायदा होईल?
रोनाल्डोला करारबद्ध केल्यानंतर अल नासर क्लबने ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं, इतिहास घडतो आहे. हा करार केवळ आमच्या क्लबसाठी नव्हे तर आमच्या लीगसाठी, आमच्या देशासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणा असेल. मुलामुलींना सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरेल.
रोनाल्डोने करारानंतर बोलताना सांगितलं की, एका नव्या देशात फुटबॉल खेळण्यासाठी मी आतूर आहे. अल नासर क्लब ज्या पद्धतीने पुरुष आणि महिलांच्या फुटबॉलसाठी काम करत आहेत ते प्रेरणादायी आहे.
कतारमध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत सौदीच्या संघाची कामगिरी आपण पाहिलीच. फुटबॉलविश्वात सौदी एक क्षमतापूर्ण देश होऊ शकतो.
या कराराने रोनाल्डोला फुटबॉलविश्वातला सगळ्यात श्रीमंत खेळाडू केलं आहे. रोनाल्डोच्या लोकप्रियतेचा फायदा सौदी अरेबियाला होणार आहे.
मिडल इस्ट इकॉनॉमी नावाच्या वेबसाईटने लिहिली की, 2030 फुटबॉल वर्ल्डकपचं आयोजन सौदीला मिळवून देण्यात रोनाल्डो महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.
रोनाल्डो सौदीत खेळणार असल्याने जगातल्या प्रसारमाध्यमांचं लक्ष आता सौदीकडे केंद्रित होईल. इथल्या लीगचं वृत्तांकन होईल, ती जगापर्यंत पोहोचेल.
वेबसाईटने सौदी अरेबियाचे पर्यटनमंत्री अल-खतीब यांच्या हवाल्याने लिहिलं की सौदी अरेबिया इजिप्त आणि ग्रीसच्या साथीने 2030 फुटबॉल वर्ल्डकपच्या आयोजनासाठी दावेदारी सादर करु शकतात.
अहमद खल-खतीब यांनी एका मुलाखतीत सांगितलं, आम्ही इजिप्त आणि ग्रीस यांच्याबरोबरीने वर्ल्डकप आयोजनासाठी दावेदारीसाठी प्रस्ताव देण्याच्या विचारात आहोत.
आम्ही यशस्वी होऊ. तिन्ही देशातल्या पायाभूत सुविधा प्रचंड रक्कम खर्च करुन सर्वोत्कृष्ट दर्जाच्या केल्या जातील. तोपर्यंत सौदी अरेबियात खास स्टेडियम तयार झालेलं असेल.
सौदी अरेबिया फॉर्म्युला वन रेस आणि एशियन विंटर गेम्स 2029सह अन्य आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करणार आहे.
अल नासर क्लबचा इतिहास काय?
अल नासर क्लबची स्थापना सौदी अरेबियाची राजधानी रियाध या शहरात 1955मध्ये झाली होती. सौदी प्रोफेशनल लीगमध्ये हा क्लब खेळतो. या लीगमध्ये एकूण 18 संघ खेळतात.
लीगमध्ये सर्वाधिक गोल माजिद अब्दुल्ला हा अल नासर क्लबचाच खेळाडू आहे. त्याच्या नावावर 189 गोल आहेत. अल नासरने 9वेळा लीगचं जेतेपद पटकावलं आहे.
लीगमध्ये यशस्वी संघांमध्ये अल नासरचा वाटा सिंहाचा आहे. अल नासरने 2018-2019 मध्ये जेतेपदाची कमाई केली आहे.
अल नासर क्लबचे प्रशिक्षक रुडी गार्शिया आहेत. कॅमेरुनचा विन्सेंट अबुबकर आणि ब्राझीलचा मिडफिल्डर लुईज गस्तावो हेही अल नासर क्लबसाठी खेळतात.
गोल डॉट कॉम या फुटबॉलचं वृत्तांकन करणाऱ्या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, दिवंगत सौदी प्रिन्स अब्दुल रहमान बिन सौद अल सऊद यांनी 1960 मध्ये क्लबची कमान हाती घेतली. अल नासरला देशातला सर्वोत्कृष्ट क्लब करण्यात त्यांची भूमिका मोलाची होती.
2004 मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतरही क्लबला शाही राजघराण्याकडून निधीपुरवठा सुरुच राहिला. यामुळे क्लबने मोठ्या खेळाडूंना ताफ्यात सामील केलं.
रोनाल्डो 2025 पर्यंत क्लबतर्फे खेळणार आहे. क्लबकडून खेळण्यासाठी रोनाल्डोला 1773 कोटी रुपये मिळणार आहेत.
गेल्या वर्षी सौदीच्याच अल हिलाल क्लबनेही रोनाल्डोसमोर प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी रोनाल्डोने त्या क्लबला नकार दिला. मँचेस्टर युनायटेडतर्फे खेळताना समाधानी असल्याचं त्याने सांगितलं होतं.
नोव्हेंबर महिन्यात एका मुलाखतीत रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर एरिक टेन यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडने त्याला रिलीज केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)