You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगाला भयंकर रोगापासून वाचवण्यासाठी ‘या’ डॉक्टरनं खाल्ली आपल्याच पेशंटची विष्ठा
- Author, मायकल मोस्ले
- Role, बीबीसी
आता जगभरात सगळीकडे आरोग्यक्षेत्रात पोषणमूल्यं, डाएट-आहाराची चर्चा सुरू असते.
अगदी आपणही यावर सारखा विचार करत असतो.
पण एकेकाळी असं नव्हतं. खुद्द आरोग्यक्षेत्रातच पोषण-आहाराला अगदी कमी स्थान होतं.
हो हे खरं आहे. आश्चर्य वाटेल पण आरोग्य आणि आहार यांच्या संबंधावर अत्यंत कमी प्रमाणात संशोधन झालेलं होतं.
परंतु आज आहाराबद्दल जे काही महत्त्वाचं ज्ञान उपलब्ध आहे त्यासाठी काही डॉक्टरांनी आपलं स्वतःचं आयुष्य पणाला लावून स्वतःवरच प्रयोग केलेले आहेत. म्हणूनच हे महत्त्वाचं ज्ञान आज जगाला मिळालं आहे.
अशा महान डॉक्टर्समध्येच न्यूयॉर्कमध्ये राहाणारे ज्यूधर्मिय डॉक्टर होते जोसेफ गोल्डबर्गर.
1914 साली ते अमेरिकेच्या अतिदक्षिण प्रदेशात आले.
तिथं त्यांनी एक रहस्य उलगडण्यासाठी संशोधन केलं आणि त्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचवले.
त्यांच्या या संशोधनामुळेच सरकारला प्रथमच लोक काय खात आहेत याकडे लक्ष देणं भाग पडलं.
अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये आलेल्या भयंकर साथीवर तोडगा काढण्यासाठी संशोधन करावं लागणार होतं.
अमेरिकेच्या सर्जन जनरलनी या शोधाची जबाबदारी डॉ. जोसेफ गोल्डबर्गर यांच्यावर सोपवलेली होती.
हा महाभयंकर आजार होता पेलेग्रा (Pellagra)
या आजारात सुरुवातीला हातावर थोडेसे सनबर्नसारखे चट्टे येत असत.
त्यानंतर चेहऱ्यावर फुलपाखराच्या आकारात पुरळ येत असे.
त्यापाठोपाठ त्या रुग्णाला नैराश्य येई, गोंधळल्यासारखं वाटे आणि स्मृतिभ्रंशही होई.
यापैकी 40 टक्के रुग्णांचे प्राण जात.
अमेरिकेत या रोगामुळे दरवर्षी हजारो लोकांचा जीव जात होता आणि आणखी काही हजार लोक यामुळे आजारीही पडत होते.
याचं कारण शोधण्यासाठी गोल्डबर्गर यांची पाठवणी झाली होती.
महत्त्वाची माहिती गोळा केली
हा आजार अचानक उपटत असे. एखाद्या घरात कोणाला हा आजार झाला तर घरातल्या इतरांना तो होण्याची 80 टक्के शक्यता असे.
त्यामुळे हा आजार अतिसंसर्गजन्य मानला गेला यात काही आश्चर्य नाही. ज्यांना हा रोग होई त्या रोग्यांना कुष्ठरोगी समजून बाजूला केलं जाई.
यावर संशोधन करण्यासाठी गोल्डबर्गर यांच्यामागे सर्जन जनरल उभे होतेच पण गोल्डबर्गर हे स्थलांतर करुन आलेल्या कुुटुंबातले असल्यामुळे ते नेहमीच स्वतःला एक आऊटसायडर म्हणजे उपरा समजत.
त्यांच्यावर आधारित गोल्डबर्गर्स वॉर नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे.
या पुस्तकाचे लेखक डॉ. अॅलन क्राऊट बीबीसीला म्हणाले, “अमेरिका आणि पाश्चिमात्यांबद्दल जोसेफ गोल्डबर्गर यांना आयुष्यभर आकर्षण वाटत होतं. त्यांच्या हा साथीविरोधातत लढण्याचा वैद्यकीय तपास म्हणजे काहीतरी धाडस करुन मौल्यवान गोष्ट करुन दाखवण्याच्या धडपडीचाच एक भाग होता.”
गोल्डबर्गर यांचे नातू डॉ. डॉन शार्प आपल्या आजोबांबद्दल सांगतात, “ते स्वतःला विज्ञानाच्या गोळ्यांचा वापर करुन शेताची राखण करणाऱ्या काऊबॉयसारखं समजत.”
या रोगाच्या कारणाचा माग काढण्यासाठी गोल्डबर्गर यांनी अमेरिकेच्या दक्षिण भागात तुरुंग, अनाथालयं, नर्सिंग होम्समध्ये भेटी दिल्या.
त्यांना या भेटींमध्ये काहीतरी विशेष असं आढळून आलं.
ही गोष्ट म्हणजे, या संस्थांत किंवा तुरुंगात भरती झालेल्या लोकांना पेलेग्रा झालेला असायचा पण तिथल्या कर्मचारीवर्गाला मात्र त्याची लागण झालेली नसायची.
त्यामुळे वैद्यक क्षेत्रातले लोक समजतात तसा हा काही संसर्गजन्य रोग नसावा, हे काहीतरी वेगळं आहे... असं त्यांच्या लक्षात आलं.
याला बळी पडणाऱ्या लोकांच्या आहारातच काहीतरी चूक आहे हे त्यांच्या लक्षात आलं. याच चुकीमुळे त्यांना पेलेग्रा होतोय हे त्यांना समजलं.
पण आपण अमेरिकेच्या उत्तर भागात राहातो आणि म्हणून दक्षिणेच्या प्रांतामधल्या आहाराला नावं ठेवली तर ते लोकांना रुचणार नाही हे त्यांना माहिती होतं.
पेलेग्रा हा जंतूंमुळे झालेला रोग नसून तो आहारातील कोणत्यातरी पोषण कमतरतेमुळे आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्याची गरज होती असं क्राऊट सांगतात.
त्यामुळेच त्यांनी या वादग्रस्त प्रयोगाचा घाट घातला.
पेलेग्रा आहारातील कोणत्यातरी पोषणमूल्याच्या कमतरतेमुळे होतो हे सिद्ध करण्यासाठी डॉ. जोसेफ गोल्डबर्गर यांनी मिसिसिपी तुरुंगातील काही कैद्यांना स्वयंसेवक म्हणून घेतलं.
अमेरिकेच्या दक्षिण भागात चांगली मेजवानी समजली जाईल असे पदार्थ त्यावेळचे गरीब लोक खात असत.
ते लोक फॅटबॅक किंवा लार्डो नावाचं अन्न खात. यामध्ये डुकराच्या पाठीची चरबी, ग्रीट्स म्हणजे टरफलासकटचे ओट्स आणि काकवीचा समावेश असे.
गोल्डबर्गर यांचे नातू डॉ. डॉन शार्प सांगतात, “तुरुंगातल्या या कैद्यांना ताजं मटण, अंडी, भाज्यांऐवजी साधं नेहमीचं अन्न दिलं जाई.”
“सुरुवातीला त्यांना ते बरं वाटलं.”
मात्र सहा महिन्यानंतर सगळ्या कैद्यांना पेलेग्रा झाला आणि डॉ. गोल्डबर्गर यांनी प्रयोग थांबवला.
आहारातल्या पोषणमुल्याच्या कमतरतेमुळेच हा आजार होतोय याची त्यांना आता पूर्ण खात्री झालेली होती.
डॉक्टरसाहेबांची स्वतःची खात्री झाली असतील तरी त्यांच्या क्षेत्रातल्या इतर लोकांना मात्र ते पटलेलं नव्हतं.
क्राऊट सांगतात, “वैद्यकक्षेत्रातल्या लोकांनी त्यांच्या प्रयोगाच्या पद्धतीवर टीका केली. डॉ. गोल्डबर्गर यांनी काहीही निष्कर्ष काढलेला असला तरी हा आजार जंतुमुळेच होतो आणि ते जंतू काही त्यांना सापडेलेले नाहीत असं या लोकांना वाटत होतं.”
आता मात्र गोल्डबर्गर यांना राग अनावर झाला.
“ही आंधळी, स्वार्थी, पूर्वग्रहदुषित गाढवं रेकून रेकून टीका करत असली, तरी मी आता माझं म्हणणं सिद्ध करायला काहीही करायला तयार आहे”, असा पणच त्यांनी केला.
वैद्यकक्षेत्रातल्या टीकाकारांचं तोंड बंद करायला आणि पेलेग्रा हा संसर्गजन्य आजार नाही हे सिद्ध करण्यासाठी आणखी एक वादग्रस्त पाऊल उचललं, ते म्हणजे याचा स्वतःवरच प्रयोग करायचा.
ते तडक पेलाग्राचे रुग्ण भरती झालेल्या रुग्णालयात गेले. एका रुग्णाच्या नाकातल्या शेंबडामधील काही भाग घेतला आणि तो आपल्या नाकात घातला.
नाकात घातलेला हा स्राव या ना त्या मार्गाने गिळलाच जातो हे लक्षात घ्या, असं ते लिहितात.
त्यानंतर त्यांनी रुग्णाचे मूत्र, त्वचेचे नमुने आणि विष्ठेचे नमुने गोळा केले.
ज्या रुग्णाची विष्ठा त्यांनी गोळा केली होती त्याचं पोट खराब झालं होतं त्याला त्या दिवसात चारवेळा शौचाला झालं होतं.
ते सगळं त्यांनी गव्हाच्या पिठात मिसळून त्याची गोळी करुन ती गिळली.
फिल्थ पार्टीज
तुम्हाला याची किळस नक्कीच वाटत असेल. क्राऊटही यावरच भर देतात, एखाद्याची विष्ठा,त्वचेचे नमुने असे दुसऱ्याच्या शरीरात सोडणं किळसवाणं नक्कीच आहे असं क्राऊट सांगतात.
डॉ. शार्प यांनाही याचा धक्का बसतोच. ते म्हणतात, “आम्हा कुटुंबीयांना ही पद्धत नेहमीच कोड्यात टाकत आलेली आहे. त्यांनी आपलं आयुष्य असं धोक्यात कसं टाकलं असेल याचं आश्चर्य वाटतं. कुटुंबीयांबरोबर, मित्रांमध्ये बोलताना ज्या ज्यावेळेस हा विषय येतो तेव्हा आम्हाला नव्याने याचा धक्का बसतोच.”
गोल्डबर्गर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही या प्रयोगात सहभागी होण्यासाठी आग्रह केला. त्याला ते ‘फिल्थ पार्टीज’ म्हणजे घाणीच्या पार्टी म्हणत.
आणि विष्ठा, मूत्राने काही होत नसेल तर गोल्डबर्गर यांनी या प्रयोगात रुग्णांचं रक्तही आणायला सुरुवात केली.
रुग्णांचं थोडं थोडं रक्त ते स्वयसंवेकांना टोचू लागले, अगदी त्यांची पत्नी मेरीही यात सहभागी होती.
शार्प सांगतात, “कदाचित आजोबांवर टीका करणाऱ्यांची तोंडं बंद करायला आजी सर्व प्रकारची मदत करायची म्हणून हे सगळं ती करत असेल.”
“मी ती गोळी खाल्ली नाही पण मला पेलाग्रा झालेल्या बाईचं रक्त टोचण्यात आलं, हे सगळं मी त्यांच्या संशोधनावरील माझ्या निष्ठेसाठी केलं शौर्य म्हणून नाही,” असं मेरी सांगतात.
मेरी यांना दाखवलेल्या निष्ठेचं फळ मिळालच.
कोणताही स्वयंसेवक या प्रयोगात आजारी पडला नाही.
छोट्याश्या डायरियापलिकडे यापैकी कोणताही स्वयंसेवक आजारी पडला नाही हे पाहून माझे आजोबा एकदम आनंदी झाले होते.
त्यांच्यापैकी कोणालाही पेलेग्रा नक्कीच झाला नाही.
गोल्डबर्गर यांना आपण हे काम करुन दाखवलं असं वाटलं. पेलाग्रा संसर्गजन्य नाही हे सांगणारे पुरावे त्यांच्याकडे आता होते.
दक्षिणेकडील प्रांतातील अन्नात नक्कीच काहीतरी कमी असावं म्हणून पेलाग्रा होत असावा.
त्यांनी केलेलं संशोधन आता पुराव्यानिशी ठाम उभं होतं.
आता ते लोकांना सांगणं गरजेचं होतं, त्यांना आपलं कौतुक होईल असं वाटलं होतं.
पण झालं उलटंच. त्यांना अमेरिकेच्या दक्षिण प्रांतांतील लोकांकडून हिंसक टीकेचा सामना करावा लागला.
पण ही टीका ते ज्यू आहेत म्हणून, न्यू यॉर्कचे आहेत म्हणून, की हा असा प्रयोग करुन संशोधन केलं म्हणून झाली की कोणत्या कारणाने ते आम्हाला माहिती नाही, असं शार्प सांगतात.
यावर काही साधा स्वस्तातला तोडगा काढल्याशिवाय डॉक्टर मंडळींना पेलेग्रा हा संसर्गजम्य नाही हे पटणार नाही, हे गोल्डरबर्गना समजून चुकलं.
…. आणि मग एक दिवस
1923मध्ये गोल्डरबर्ग यांना जे हवं होतं ते सापडलं. आणि हा शोधही अगदी निराळ्याच पद्धतीने त्यांना लागला.
ते एकदा कुत्र्यांवर प्रयोग करत होते. कुत्र्यांना ते अमेरिकेच्या दक्षिण प्रांतांमधील पदार्थ खायला घालत होते.
पण प्रश्न असा होता की ते पदार्थ खायला कुत्रे नकार देत होते.
त्यामुळे त्यावेळेस अपेटाइट स्टिम्युलेटर म्हणजे भूक वाढवणारा पदार्थ म्हणून ओळखला जाणारा एक पदार्थ ते त्यात मिसळून कुत्र्यांना देऊ लागले.
अनेक महिने असेच गेले. कुत्र्यांना काहीच झालं नाही. त्यांची तब्येत चांगली तगडीच राहिली.
मग गोल्डरबर्ग यांच्या लक्षात आलं ते म्हणजे हे स्टिम्युलेटरच त्यांचं पेलाग्रापासून रक्षण करत होतं. या पदार्थाच्याच शोधात त्यांनी इतके दिवस काम केलं होतं.
ते स्टिम्युलेटर होतं यिस्ट.
सगळा उलगडा होईपर्यंत 1927 साल उजाडलं.
महापुरांमुळे पेलेग्रा पुन्हा एकदा सर्वत्र दिसत होता.
गोल्डरबर्ग यांनी पुरातून वाचलेल्या आश्रितांसाठी यिस्ट दिलं.
हे सगळं भारी होतं. काही चमचे यिस्ट घेतल्यामुळे त्यांचा आजार बरा झाला होता.
गोल्डरबर्ग नायक ठरले होते.
काही वर्षांनंतर संशोधकांना पेलेग्रा दूर ठेवणाऱ्या यिस्ट मधल्या त्या घटकाची ओळख पटली.
तो घटक म्हणजे यिस्टमध्ये असणारं नियासिन हे जीवनसत्व.
अमेरिकन सरकारने धान्य दळणाऱ्या गिरण्यांना पिठात नियासिन मिळण्याची सूचना केली.
सगळ्या देशानं त्या सुचनेनुसार अंमलबजावणी केली आणि लवकरच पेलेग्रा अमेरिकेत दुर्मिळ झाला.
नियासिन हे जीवनसत्व आपल्या चांगल्या त्वचेसाठी आणि पचनशक्ती तसेच मज्जासंस्था नीट कार्यरत राहावी यासाठी आवश्यक असतं.
पण यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल्डरबर्ग यांनी अन्न आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध प्रकाशात आणला होता.
आपण काय खातो आणि आपल्याला काय आजारी पाडू शकतं हे अन्न-आरोग्याचं नातं समोर आलं होतं. डॉ. गोल्डरबर्ग यांनी हे नातं जगासमोर आणलं.
बी 3 म्हणजेच नियासिन हे जीवनसत्व कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रोटिन्सच्या चयापचयासाठी महत्त्वाचे जीवनसत्व, डीएनए निर्मितीसाठी आवश्यक असते.
त्वचा, चेतापेशींचं कार्य आणि पचनक्रियेतही वाटा असतो. मांस, मांसे, गहू, दूध, अंडे यामध्ये हे जीवनसत्व सापडते. नियासिन हे पुरुषांना प्रतिदिन 16.5 मिलिग्राम आणि महिलांना 13.2 मिलिग्राम इतके लागते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)