You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पास्ता खाणं चांगलं की वाईट? पास्ता खाल्ल्याने चरबी वाढते का?
- Author, एमा बेकेट
- Role, बीबीसीकरिता
नवं वर्ष उजाडतं, तसं प्रत्येक जण नवनवीन संकल्प करताना दिसतो. विशेषतः हे संकल्प आरोग्याच्या बाबतीत असतात.
आहाराच्या दृष्टीने काय करावं आणि काय करू नये, याचं नियोजन करण्यात येतं.
जास्त कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) न खाण्याचं, पॅकेज्ड किंवा बाहेरचं फास्टफूड टाळण्याचा संकल्प अनेकजण करतात.
या सगळ्या यादीत पिझ्झा आणि पास्ता पहिल्या क्रमांकावर आहेत.
अलीकडे पास्ता सर्वत्र अत्यंत आवडीने खाल्ला जातो. त्याचे विविध रेसिपीही बाजारात उपलब्ध आहेत.
अनेकांच्या जिभेचे चोचले पुरवणारे पिझ्झा आणि पास्ता चवीला कितीही चटकदार वाटत असले तरी पिझ्झा आणि पास्ता सोडून देण्याचा संकल्प अनेकजण करताना दिसतात.
त्यातही पास्ताबाबत अनेक भ्रम लोकांमध्ये आहेत. पास्ता खाल्याने चरबी वाढतो, लठ्ठपणा येतो, असंही नेहमी बोललं जातं.
याचं कारण काय आहे? पास्तामध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने असं आहे का? मात्र, पास्त्यामध्ये फक्त कर्बोदकेच असतात असं नाही.
सुमारे 145 ग्रॅम पास्त्यामध्ये (एक कप) सुमारे 38 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 7.7 ग्रॅम प्रथिने आणि 0.6 ग्रॅम फॅट्स असतात. तसंच पास्ता शिजवताना तो पाणीही शोषून घेतो. त्यामुळे त्यामधील जीवनसत्वे आणि खनिजेही त्यामध्ये शोषली जातात.
ही आकडेवारी पाहता, पास्ता फक्त कर्बोदकांनीच भरलेला असतो, असं नाही.
एका दिवसात जास्त काय खावं?
आपल्या शरीराला किती कॅलरींची आवश्यकता असते आणि आपण दररोज किती खाल्लं पाहिजे, याबाबत आपल्या सर्वांनाच माहीत आहे.
आपला आहार हा शरीराचं वजन, लिंग आणि शारीरिक हालचाल या गोष्टींवर अवलंबून असतो.
तथापि, मॅक्रो न्युट्रियंट प्रोफाईल नामक एक मोजणी पद्धत आहे. यामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा पुरवणाऱ्या विविध पदार्थांची गणना केली जाते.
स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि प्रथिने यांना मॅक्रो न्यूट्रियंट्स असं संबोधलं जातं. हे शरीरातील लहान लहान भागांमध्ये विभागली जातात. यानंतर ते ऊर्जा निर्मितीचं कार्य पार पाडतात.
ही मॅक्रो न्यूट्रियंट्स किती प्रमाणात घेतली पाहिजेत, याविषयीची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
कोणत्याही पोषणतत्वांची शरीराला गरज असतेच. पण त्याचा ओव्हरडोस कधीही करू नये. त्याचं प्रमाण थोडंसंही जास्त झाल्यास ते शरीरासाठी धोकादायक ठरतं.
शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्वं आणि खनिजंही मिळायला हवीत.
आपल्या शरीराला 45-65 टक्के ऊर्जा कार्बोहायड्रेट्सपासून मिळणं आवश्यक असतं. 10-30 टक्के प्रथिने तर 20-35 टक्के ऊर्जा फॅट्सपासून मिळायला हवी.
याचा अर्थ, प्रथिनांपेक्षा 1.2 ते 6.5 पट जास्त कार्बोहायड्रेट्स खाणं आरोग्यदायी मानलं जातं.
पास्तामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचं प्रमाण सुमारे 5:1 इतकं असतं.
म्हणजे हे प्रमाण संतुलित मानता येऊ शकतं. पास्ता बनवण्यासाठी गहू आणि अंडी वापरली जातात. दोन्ही पदार्थांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात आढळून येतात.
कॅलरी आणि वजन वाढणे यांच्यातील संबंध आपण विचार करतो, तितका साधा नाही.
काही अभ्यासात असंही दिसून आलं की पास्ता नियमित खाल्यामुळे वजन कमी होण्यातही मदत होते. शिवाय, पास्ता हे शरीरातील साखरेच्या पातळीच्या दृष्टीकोनातून ब्रेड किंवा बटाट्यांपेक्षा चांगलं ठरतो, असंही काही संशोधनांमध्ये दिसून आलं आहे.
त्यामुळे, पास्ता खाल्ला तरीसुद्धा कमी प्रमाणात खाणं, किंवा पूर्णपणे गव्हाने तयार करण्यात आलेला पास्ता खाणं, असे पर्याय आपल्याला स्वीकारता येतील.
पास्ता खाल्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही. अलीकडे ग्लुटेन फ्री पास्ताही बाजारात उपलब्ध होतो. त्यामध्ये प्रोटीन अल्प प्रमाणात असतं. त्यामुळे गरजेच्या वेळी या पर्यायांचाही तुम्हाला विचार करता येऊ शकतो.
सूक्ष्म पोषक घटक म्हणजे काय?
जीवनसत्वं आणि खनिजे यांना सूक्ष्म पोषक घटक असं म्हटलं जातं. पास्तामध्ये B1 आणि B9 जीवनसत्वं आढळून येतात.
थंड झाल्यानंतर पास्तामधील कार्बोहायड्रेट्स स्टार्चमध्ये बदलतात. तो पचण्यास हलका असतो. म्हणजे, ते शरीराला कमी ऊर्जा पुरवतो. रक्तातील साखरेची पातळीही यामुळे जास्त वाढत नाही. म्हणून थंड केलेला पास्ता पुन्हा गरम करण्यातही काही नुकसान नाही.
वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स टाळावीत का?
बऱ्याच लोकांना वाटतं की कार्बोहायड्रेट्स कमी केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की कार्बोहायड्रेट्स वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात अस्तित्वात आहेत.
मात्र, पास्तासारख्या पदार्थांमधील कर्बोदके शरीरासाठी हानिकारक नसतात. पास्तापेक्षाही केक, मिठाई यांच्यातील कर्बोदके जास्त हानिकारक ठरू शकतात.
त्यामुळे वजन कमी करायचंच असेल, तर केक, मिठाई यांचं सेवन कमी केलं पाहिजे. पास्ता सोडून काहीही फायदा होणार नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)