टाटा ट्रस्टचे नेतृत्व नोएल टाटांकडे, ट्रस्टकडून एकमताने झाली अध्यक्षपदावर नियुक्ती

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतातील मोठे उद्योगपती म्हणून नावलौकिक असलेल्या रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यानंतर आता टाटा समूहाचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (76) यांचा या पदासाठी विचार करण्यात आला आहे.

रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांची दुसरी पत्नी म्हणजे सिमोन टाटा यांचे नोएल टाटा सुपुत्र आहेत. ते टाटा ट्रस्टसहित टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत.

टाटा ट्रस्टने एकमताने नोएल टाटा यांची अध्यक्षपदावर नियुक्ती केल्याची घोषणा टाटा समूहाकडून करण्यात आली.

नोएल हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टाज् अँड टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे व्हाईस-चेअरमन आहेत.

नोएल टाटा यांची तीन मुलेदेखील टाटा समूहाशी निगडीत असलेल्या काही धर्मादाय संस्थांच्या मंडळावर आहेत.

नोएल टाटा यांचे सुपुत्र नेव्हिल हे स्टार बझारचे प्रमुख आहेत. त्यांची मुलगी लिया टाटा या गेटवे ब्रँड सांभाळत आहे. त्यांची दुसरी मुलगी माया टाटा यांच्याकडे टाटा डिजीटलची जबाबदारी आहे.

टाटांच्या पुढच्या पिढीत कोण?

"एवढ्या मोठ्या समूहाची जबाबदारी सांभाळारी व्यक्ती नम्र असावी. त्याच्यामध्ये कसलाही अहंभाव नसावा आणि जबाबदारी मिळाल्यानंतर त्याने उतू नये, मातू नये..."

टाटा समूहाचा वारसदार कसा असावा? याबाबत रतन टाटांचे हे विचार होते.

ज्येष्ठ संपादक गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या टाटायन या पुस्तकात रतन टाटांच्या भूमिकेबाबत सविस्तर लिखाण केलं गेलं आहे.

टाटा समूहाने एक्स आणि त्यांच्या वेबसाईटवर माहिती निवेदन देऊन रतन टाटांच्या मृत्यूबाबत माहिती दिली.

सोमवारी रतन टाटांनी केलेल्या पोस्टमध्ये ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. तेव्हापासूनच त्यांच्या पुढचा वारसदार कोण असणार? याबाबत चर्चा सुरू झाली होती.

सध्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे रतन टाटा यांच्यानंतर व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, टाटा कुटुंबीयांची पुढची पिढी म्हणून रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि त्यांची मुलं लिया, माया आणि नेव्हिल टाटा यांची नावं घेतली जातायत.

टाटा समूहाच्या भविष्यातील पिढीमध्ये कोण-कोण आहे? आणि सध्या त्यांच्या व्यवसाय आणि एकंदर समूहाचे वारसदार म्हणून ज्यांची नावे चर्चेत आहेत, त्यांच्याबाबत जाणून घेऊयात.

सावत्र भाऊ नोएल टाटा चेअरमन का बनू शकले नाहीत?

2012 मध्ये रतन टाटांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आणि दुसरीकडे त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे त्यांचे उत्तराधिकारी असतील अशी चर्चा सुरू झाली.

मात्र, पुढं नोएल टाटा यांच्याऐवजी सायरस मिस्त्री यांना रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आलं. टाटा ग्रुपच्या निवड समितीनं पालोनजी समूहाच्या सायरस यांची निवड त्यावेळी केली होती.

डिसेंबर 2012 मध्ये सायरस यांनी चेअरमन पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली. त्यानंतर 2016 पर्यंत सायरस टाटा समूहाचे चेअरमन राहिले. टाटा आडनाव नसलेले ते केवळ दुसरे चेअरमन होते, त्यांच्या आधी नौरोजी सकलतवाला यांच्याकडे टाटा समूहाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आली होती.

24 ऑक्टोबर 2016 ला सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या प्रमुखपदावरून काढण्यात आलं. त्यानंतर, रतन टाटा यांच्या शिफारशीवरून एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सचे चेअरमन म्हणून निवड झाली होती.

टाटा समूहाच्या भविष्यातील नीती विस्ताराबाबत रतन टाटा आणि मिस्त्री यांच्यामध्ये मतभेद होते असं बोललं जातं.

आता नोएल टाटा यांना रतन टाटांनी संधी का दिली नाही? असा प्रश्न निर्माण होतो.

खरंतर रतन टाटा 18 वर्षांचे असताना त्यांचे वडील नवल यांनी दुसरं लग्न केलं होतं.

स्वित्झर्लंडच्या सिमॉन यांच्याशी नवल यांनी दुसरं लग्न केलं होतं. सिमॉन आणि नवल टाटा यांचे नोएल हे चिरंजीव.

गिरीश कुबेर यांच्या टाटायन पुस्तकात असा उल्लेख आहे की, नोएल टाटा यांची आई सिमोन यांनी स्थापन केलेल्या ट्रेंट या किरकोळ विक्री क्षेत्रातल्या कंपनीचं प्रमुखपद त्यांच्याकडे होतं.

सध्या बाजारात दिसणारी 'वेस्टसाईड', 'स्टार बझार' वगैरे दुकानांच्या साखळीचा कारभार याच ट्रेंट कंपनीअंतर्गत चालतो.

किरकोळ विक्री क्षेत्रात टाटा समूहाने जी मुसंडी मारली, त्यामागे नोएल टाटा यांची मोठी भूमिका होती.

दुसरी बाब म्हणजे टाटा समूहात ज्यांची सर्वाधिक मालकी होती त्या पालोनजी मिस्त्रींचे नोएल हे जावई आहेत. पालोनजी मिस्त्रींची मुलगी आलू मिस्त्री यांनी नोएल टाटांशी लग्न केले.

टाटा समूहाची 18 टक्के मालकी पालोनजी यांच्याकडे होती. त्यामुळे रतन यांच्यानंतर नोएल हेच टाटा अँड सन्सचे प्रमुख होतील असा अंदाज अनेकांनी बांधला होता.

पण खुद्द रतन टाटांनीच ही शक्यता फेटाळून लावली होती. रतन टाटा म्हणाले की, "नोएल यांच्याकडं इतक्या मोठ्या उद्योगसमूहाला नेतृत्व देण्याइतका अनुभव नाही," त्यानंतर नोएल यांचं नाव मागे पडलं.

रतन टाटांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत काय वाटत होतं?

रतन टाटांच्या उत्तराधिकाऱ्याबाबतच्या कल्पना स्पष्ट होत्या. फक्त नेमायचंय म्हणून कुणालाही नेमण्यात त्यांना रस नव्हता असं 'टाटायन' या पुस्तकातून समजते.

आपला उत्तराधिकारी द्रष्टा हवा, त्याची नजर भविष्यवेधी हवी आणि पुढची किमान दोन-तीन दशकं तरी नेतृत्व करता यावं, अशा वयाचा तो असावा असं त्यांचं म्हणणं होतं.

टाटायनमध्ये सांगितलंय की, "आणखीन एक महत्त्वाची आणि वेगळी अट त्यांनी घातली होती. ती म्हणजे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला अहं नसावा. एक व्यक्ती म्हणून, इतक्या मोठ्या व्यवसायाचा प्रमुख म्हणून कोणीही उतायची शक्यता होती."

हा दुर्गुण त्यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याकडे नसावा असं रतन टाटांना वाटत होतं.

टाटा समूहातील एन. चंद्रशेखरन कोण आहेत?

सायरस मिस्त्री यांच्या एक्झिटनंतर एक नाव खूप चर्चेत आलं आणि ते होतं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन यांचे.

रतन टाटा यांच्या समर्थनाने चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे चेअरमन म्हणून निवडण्यात आलं.

या स्पर्धेत इतर अनेक उमेदवार होते पण चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली कारण त्यांनी टाटांसोबत तीन दशके घालवली होती आणि भारतातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी TCS च्या वाढीमध्ये त्यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली होती.

टाटा समूहाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, एन. चंद्रशेखरन हे ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या बोर्डात सामील झाले आणि जानेवारी 2017 मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, एअर इंडिया, टाटा केमिकल्स, टाटा ग्राहक उत्पादने, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे ते अध्यक्ष आहेत.

एन. चंद्रशेखरन हेच आता टाटांच्या व्यवसायाचे प्रमुख चेअरमन असतील.

टाटा कुटुंबाच्या पुढील पिढीत कोण कोण आहे?

नोएल टाटा यांना तीन मुलं आहेत. त्यांचीच नावं सध्या टाटांच्या पुढच्या पिढीचे वारसदार म्हणून चर्चेत आहेत. माया, नेव्हिल आणि लिया टाटा ही नोएल टाटांची मुलं वारसदार होऊ शकतात असं अनेकांचं म्हणणं आहे.

या तिन्ही मुलांमध्ये वयाने सगळ्यात मोठ्या असणाऱ्या लिया टाटा यांनी स्पेनच्या माद्रिद येथील IE बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

लिया टाटा ग्रुपमध्ये ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेसमध्ये सहाय्यक विक्री व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्या आणि सध्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) मध्ये उपाध्यक्ष म्हणून त्या काम करतात.

नोएल टाटा यांच्या धाकट्या कन्या माया टाटा यांनी टाटा कॅपिटलमध्ये अनॅलिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली होती. टाटा समूहातर्फे वित्तीय सेवा देणारी ही कंपनी आहे.

लिया आणि माया यांचा भाऊ नेव्हिल टाटा यांनी वडिलांनी घडवलेल्या ट्रेंटमध्ये व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली. 34 वर्षांच्या माया यांनी टाटा समूहात अल्पवधीतच प्रगती केली आहे.

त्यांनी बेज बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकमधून शिक्षण घेऊन टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. Tata Neu ॲप लाँच करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

32 वर्षांचे नेव्हिल टाटा हे टाटा समूहाच्या व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या मानसी किर्लोस्कर यांच्याशी त्यांचं लग्न झालं आहे. नेव्हिल सध्या ट्रेंट लिमिटेड अंतर्गत येणाऱ्या स्टार बझारचं नेतृत्व करतात.

रतन टाटा यांनी 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले, त्यांच्या पणजोबांनी एक शतकापूर्वी स्थापन केलेल्या या महाकाय समूहाची धुरा त्यांनी यशस्वीपणे त्यांच्या खांद्यावर घेतली. त्यांच्याच नेतृत्वाखाली, टाटा टेलिसर्व्हिसेस 1996 मध्ये सुरू झाली आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी 2004 मध्ये सार्वजनिक क्षेत्रात लिस्टेड झाली होती.

टाटा समूहाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार रतन टाटा हे 1991 ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत म्हणजेच 28 डिसेंबर 2012पर्यंत चेअरमन म्हणून काम करत होते.

निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 29 डिसेंबर 2012 पासून रतन टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे 'चेअरमन एमिरेट्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.