रतन टाटा: पाय जमिनीवर असलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवन प्रवास कसा होता?

    • Author, रेहान फजल
    • Role, प्रतिनिधी, बीबीसी हिंदी

टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 28 डिसेंबर 1937 ला जन्मलेल्या रतन टाटांनी देशाच्या औद्योगिक जडण घडणीत मोलाचा वाटा उचलला.

'टाटा' हे फक्त नाव नाही. तर तो विश्वास, विश्वासार्हतेला असलेला समानार्थी शब्द आहे. टाटांच्या घराण्यातील प्रत्येकानं तो सार्थ करून दाखवला आहे. याच टाटा समूहातील आणखी एक चकाकता हिरा म्हणजे रतन टाटा. भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी असलेले रतन टाटा फक्त उद्योग विश्वासाठीच नव्हे तर सर्व भारतीय समाजासाठीच आदर्श होते. ज्यांच्यापुढे सर्वांनीच आदरानं नतमस्तक व्हावं अशा काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते.

इंडियन एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांचा 1992 मध्ये एक अनोखा सर्व्हे करण्यात आला.

त्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानांमध्ये असो कोणता प्रवासी होता ज्याचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला? या प्रश्नावर उत्तर देताना सर्वांत जास्त समोर आलेलं नाव म्हणजे...रतन टाटा.

अनेकांनी हेच उत्तर का दिलं? यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातून समोर आलं की रतन टाटा हे एकमेव व्हीआयपी किंवा अती महत्त्वाची व्यक्ती होते ज्यांचा आजूबाजूला सुरक्षा रक्षक किंवा पर्सनल स्टाफचा गराडा नसायचा.

त्यांची बॅग, फाइल उचलण्यासाठी देखील कुणी सहायक नसायचा. विमानानं उड्डाण घेतलं की शांतपणे ते आपल्या कामाला सुरुवात करायचे.

त्यांना एक सवय होती, खूप कमी साखर असलेली ब्लॅक कॉफी मागायचे. मात्र आपल्या आवडीची कॉफी न मिळाल्यावर ते कधीही फ्लाइट अटेंडंट, हवाई सुंदरी किंवा विमानातील स्टाफला रागावले नव्हते.

रतन टाटा यांच्या साधेपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी टाटा समुहावर एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे, 'द टाटाज: हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँँड अ नेशन'.

या पुस्तकात गिरीश कुबेर यांनी लिहिलं आहे की रतन टाटा ज्यावेळेस टाटा सन्सचे चेअरमन झाले तेव्हा ते जेआरडी टाटांच्या खोलीत बसले नाहीत. त्यांनी स्वत:साठी एक साधी आणि छोटीशी खोली तयार करून घेतली. तेच त्यांचं कार्यालय होतं.

रतन टाटा जेव्हा एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याशी बोलत असायचे, त्याचवेळेस जर एखादा वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला आला तर ते वरिष्ठ अधिकाऱ्याला वाट पाहायला सांगत असत. कनिष्ठ अधिकाऱ्याला जायला सांगून वरिष्ठाची भेट घेतली असं ते कधी करत नसत.

त्यांच्याकडे दोन जर्मन शेफर्ड कुत्रे होते. एकाचं नाव 'टीटो' आणि दुसऱ्याचं 'टँगो'. हे दोन्ही कुत्रे त्यांचे फार लाडके होते.

त्यांचं या कुत्र्यांवर इतकं प्रेम होतं की जेव्हा ते त्यांच्या कार्यालयात म्हणजे बॉम्बे हाऊसमध्ये पोहोचायचे तेव्हा, रस्त्यावरील कुत्रे त्यांच्याभोवती गोळा होत असत आणि त्यांच्याबरोबर लिफ्टपर्यंत जात असत.

हे कुत्रे अनेकदा बॉम्बे हाऊसच्या लॉबीमध्ये फिरताना दिसायचे. गमतीची गोष्ट म्हणजे माणसांना मात्र तिथे तेव्हाच परवानगी मिळायची जर ते टाटांचे कर्मचारी असतील किंवा त्यांनी भेटण्यासाठी वेळ घेतली असेल.

कुत्र्याचं आजारपण

रतन टाटा यांचे माजी सहायक आर. वेंकटरमण यांना त्यांच्या बॉस बरोबरच्या संबंधांबद्दल जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा त्यांचं उत्तर होतं, "मिस्टर टाटा यांना जवळून फार थोडे लोक जाणतात. दोन जण आहेत जे त्यांच्या खूपच जवळ आहेत. ते म्हणजे 'टीटो' आणि 'टँगो', हे त्यांचे लाडके जर्मन शेफर्ड कुत्रे. त्यांच्या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्या जवळपास देखील कोणी जाऊ शकत नाही."

प्रसिद्ध व्यावसायिक आणि लेखक सुहेल सेठ यासंदर्भात एक किस्सा सांगतात, "6 फेब्रुवारी 2018 ला ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स बकिंगहॅम पॅलेसमध्ये रतन टाटा यांना समाजसेवेसाठी 'रॉकफेलर फाऊंडेशनचा लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्कार प्रदान करणार होते. मात्र या पुरस्कार समारंभाच्या काही तास आधीच रतन टाटा यांनी आयोजकांना सांगितलं की ते या समारंभाला हजर राहू शकणार नाहीत. कारण टीटो हा त्यांचा कुत्रा अचानक आजारी पडला आहे. चार्ल्स यांना जेव्हा ही माहिती देण्यात आली तेव्हा ते म्हणाले होते हीच खरी माणसाची ओळख आहे."

एकटे आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारे रतन टाटा

जेआरडी टाटांप्रमाणेच रतन टाटा देखील काटेकोर शिस्तीसाठी ओळखले जात. ते बरोबर साडे सहा वाजता कार्यालयातून बाहेर पडत. जर कार्यालयातील कामासाठी त्यांना कोणी घरी संपर्क केला तर ते अनेकदा चिडायचे.

घरी ते एकांतात फाईल आणि इतर कागदपत्रांचा अभ्यास करायचे, वाचन करायचे. जर ते मुंबईत असले तर वीकेंड त्यांच्या अलीबाग येथील फार्म हाऊसवर घालवायचे. त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या कुत्र्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नसायचं.

त्यांना फिरण्याची आवड नव्हती आणि ना त्यांना भाषण द्यायला आवडत होतं. बडेजाव दाखवणं किंवा दिखाऊपणाचा त्यांना राग यायचा. लहानपणी जेव्हा त्यांना शाळेत रोल्स रॉईसमधून सोडलं जात असे तेव्हा ते अवघडून जायचे.

रतन टाटा यांना जवळून ओळखणाऱ्याचं म्हणणं आहे की जिद्द हे रतन टाटा यांच्या कुटुंबाचं स्वभाव वैशिष्ट्यं होतं. जेआरडी टाटा आणि त्यांचे वडील नेवल टाटा यांच्याकडून रतन टाटांकडे हा गुण आला होता.

सुहेल सेठ सांगतात, "तुम्ही त्यांच्या डोक्याला बंदूक लावलीत तरी ते हेच म्हणतील की मला गोळी घाला, पण मी माझा मार्ग सोडणार नाही."

बॉम्बे डाइंगचे प्रमुख नस्ली वाडिया हे रतन टाटा यांचे जुने मित्र. ते रतन टाटांबद्दल सांगतात, "रतन टाटा यांचं व्यक्तिमत्त्व खूप गुंतागुंतीचं आहे. त्यांना पूर्णपणे कोणी जाणलं असेल असं मला वाटत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रचंड खोली आहे. आमचे चांगले संबंध असून देखील माझ्यात आणि रतनमध्ये कधीही वैयक्तिक स्वरूपाचे संबंध नव्हते. ते एकदम एकाकी आहेत."

कूमी कपूर यांनी 'अॅन इंटिमेट हिस्ट्री ऑफ पारसीज' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्या लिहितात, "रतन यांनी स्वत: मला सांगितलं होतं की ते त्यांच्या खासगीपणाला खूप महत्त्व देतात. ते म्हणायचे की कदाचित मी खूप मिळून मिसळून राहणारी व्यक्ती नाही, मात्र मी समाजापासून फटकून राहणारा देखील नाही."

आजी नवाजबाई टाटांकडून रतन टाटांचं संगोपन

रतन टाटा यांच्या तरुणपणीचे त्यांचे एक मित्र सांगतात की टाटा समूहातील आपल्या सुरूवातीच्या काळात रतन यांना त्यांच्या आडनावाचं ओझं वाटायचं.

अमेरिकेत शिक्षण घेत असताना ते निर्धास्त असायचे. कारण त्यांच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत नसायची. रतन टाटा यांनी कूमी कपूर यांना दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली होती.

त्यांनी सांगितलं होतं, "त्या काळी परदेशात शिकण्यासाठी रिझर्व्ह बँक फारच थोडं परकीय चलन वापरण्याची परवानगी द्यायचं. माझ्या वडिलांना कायदा मोडलेला अजिबात चालत नसे. त्यामुळे ते माझ्यासाठी ब्लॅक मधून डॉलर विकत घ्यायचे नाहीत."

"त्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की महिना संपेपर्यंत माझ्याकडील पैसे संपून जायचे. त्यामुळे कधी कधी मला माझ्या मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागत. अनेकदा तर मी काही ज्यादा पैसे कमवण्यासाठी भांडी देखील घासली."

रतन टाटा फक्त 10 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. रतन टाटा 18 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी सिमोन दुनोयर या एका स्विस महिलेशी लग्न केलं.

तर घटस्फोटानंतर त्यांच्या आईनं सर जमसेटजी जीजीभॉय यांच्याशी लग्न केलं. त्यामुळे रतन टाटांचं संगोपन त्यांची आजी लेडी नवाजबाई टाटा यांनी केलं.

रतन टाटा अमेरिकेत सात वर्षे होते. तिथे कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली.

त्यांना लॉस एंजेलिसमध्ये चांगली नोकरी मिळाली होती, एक छान घर होतं. मात्र त्यांची आजी आणि जेआरडी यांच्या इच्छेमुळे त्यांना भारतात परतावं लागलं.

त्यामुळेच त्यांना आपल्या अमेरिकन गर्लफ्रेंडसोबतचे नातेसंबंध पुढे नेता आले नाहीत आणि रतन टाटा जन्मभर अविवाहित राहिले.

जमशेदपूरमध्ये सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे गणवेश घालून करियरची सुरूवात

1962 मध्ये रतन टाटा यांनी जमशेदपूर मधील टाटा स्टीलच्या कारखान्यात काम करण्यास सुरूवात केली.

गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, "रतन टाटा जमशेदपूरमध्ये सहा वर्षे होते. तिथे त्यांनी सुरूवातीला शॉप फ्लोअरवरील एका सर्वसामान्य कर्मचाऱ्या प्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून अप्रेनटिसशिप पूर्ण केली होती."

"यानंतर त्यांना प्रकल्प व्यवस्थापक बनवण्यात आलं होतं. नंतर ते व्यवस्थापकीय संचालक असलेल्या एस के. नानावटी यांचे विशेष सहायक झाले. रतन टाटा यांच्या मेहनती स्वभावाची ख्याती मुंबईपर्यंत पोहोचली आणि जेआरडी टाटांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतलं."

यानंतर त्यांनी एक वर्ष ऑस्ट्रेलियात काम केलं. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या सेंट्रल इंडिया मिल आणि नेल्को या कंपन्यांना रुळावर आणण्याची जबाबदारी जेआरडींनी रतन टाटांना दिली.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षांमध्ये नेल्कोचा कायापालट झाला. कधीकाळी आर्थिक अडचणीत असलेल्या नेल्कोनं नफा कमावण्यास सुरूवात केली.

1981 मध्ये जेआरडींनी रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीजचा प्रमुख केलं. त्यावेळेस कंपनीची उलाढाल फक्त 60 लाख रुपयांची होती. मात्र या जबाबदारी महत्त्वं यासाठी होतं, कारण जेआरडी स्वत: त्या कंपनीचं कामकाज पाहायचे.

अतिशय साधी जीवनशैली

त्या काळातील बिझनेस पत्रकार आणि रतन टाटांचे मित्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करताना ते खूप मिळूनमिसळून राहणारे, कोणताही बडेजाव नसलेले सभ्य आणि आकर्षून घेणारे व्यक्ती होते असं सांगतात.

त्यांना कोणीही भेटू शकायचं. ते स्वत:च त्यांचा फोन घ्यायचे.

कूमी कपूर लिहितात, "बहुतांश भारतीय अब्जाधीशांच्या तुलनेत रतन यांची जीवनशैली अतिशय संयमित आणि साधी होती."

"त्यांच्या एका बिझनेस सल्लागारानं मला सांगितलं होतं की रतन टाटांकडे सचिव किंवा सहाय्यकांची गर्दी नव्हती ही गोष्ट पाहून त्यांना आश्चर्य वाटलं होतं."

"एकदा मी त्यांच्या घराची बेल वाजवली तर एका छोट्या मुलानं दरवाजा उघडला. तिथे नोकरचाकरांचा थाट किंवा बडेजाव नव्हता. कुलाब्यातील समुद्राच्या दिशेनं असलेलं त्यांचं घर त्यांचा अभिजातपणा आणि जीवन विषयक दृष्टीकोन दाखवतो."

जेआरडी यांनी निवडला त्यांचा वारसदार

जेव्हा जेआरडी 75 वर्षांचे झाले तेव्हा त्यांचा वारसदार किंवा उत्तराधिकारी कोण असणार याबद्दल खूप अंदाज बांधले जात होते.

टाटांचे चरित्रकार एम लाला लिहितात की, "नानी पालखीवाला, रूसी मोदी, शाहरुख साबवाला आणि एच एन सेठना यापैकी कोणाला तरी स्वत:चा उत्तराधिकारी करण्याबद्दल जेआरडी विचार करत होते. स्वत: रतन टाटा यांना वाटत होतं की पालखीवाला आणि रूसी मोदी हे दोघे या पदासाठीचे दोन प्रमुख दावेदार असतील."

1991 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी जेआरडी टाटांनी टाटा समूहाचं चेअरमन पद सोडलं. त्यावेळेस त्यांनी रतन टाटा यांची निवड केली, जे ही जबाबदारी सांभाळण्याची योग्यता असलेले एकमात्र टाटा राहिले होते.

जेआरडी टाटांना वाटत होतं की रतन टाटांच्या जमेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचं आडनाव 'टाटा' होतं. टाटांचे मित्र नस्ली वाडिया आणि त्यांचे सहाय्यक शाहरुख साबवाला यांनी देखील रतन टाटा यांच्याच नावाला पाठिंबा दिला होता.

रतन टाटा, 25 मार्च 1991 ला टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यावेळेस त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे सेठ, रूसी मोदी आणि अजीत केरकर या टाटा समूहातील तीन दिग्गजांचा प्रभाव कमी करणं.

कारण हे तिघेही टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये मुख्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय काम करत आले होते. रतन टाटांच्या वडिलांनी त्यांना सावधसुद्धा केलं की टाटा समूहाच्या प्रत्येक कंपनीत एक मोगल सम्राट आहे.

टेटली, कोरस आणि जॅग्वार या कंपन्याचं अधिग्रहण

सुरूवातीला अनेकांनी रतन टाटांच्या व्यावसायिक आकलनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र 2000 मध्ये त्यांनी टाटांपेक्षा दुपटीनं मोठ्या असलेल्या 'टेटली' या ब्रिटिश समूहाचं अधिग्रहण करून सर्वांना आश्चर्यचकित केलं.

आज टाटा समूहाची ग्लोबल बेवरेजेस जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे. यानंतर रतन टाटांनी 'कोरस' ही युरोपातील सर्वात मोठी पोलाद कंपनी विकत घेतली. टीकाकारांनी या अधिग्रहणाच्या व्यवहार्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले.

मात्र टाटा समूहानं ही कंपनी विकत घेऊन एकप्रकारे त्यांची क्षमताच सिद्ध केली होती. 2009 मध्ये दिल्ली ऑटो एक्स्पो मध्ये त्यांनी पीपल्स कार म्हणून लोकांसमोर आलेल्या 'नॅनो' चं अनावरण केलं.

त्यावेळेस त्या कारची किंमत एक लाख रुपये होती. नॅनोच्या आधी 1998 मध्ये टाटा मोटर्सनं 'इंडिका' ही कार बाजारात लॉंच केली होती.

ती भारतात डिझाईन करण्यात आलेली पहिली कार होती. सुरूवातीला या कारला अपयश आलं आणि रतन टाटांनी ती फोर्ड मोटर कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळेस रतन टाटा डेट्राइट ला गेले असताना बिल फोर्डनं त्यांना विचारलं की त्यांनी या क्षेत्राबद्दल पुरेसं ज्ञान नसताना यात प्रवेश का केला? त्यांनी टाटांना टोमणा मारला की जर त्यांनी 'इंडिका' विकत घेतली तर ते भारतीय कंपनीवर मोठे उपकार करतील.

बिल फोर्ड यांच्या या वर्तणुकीनं रतन टाटांची टीम नाराज झाली आणि बोलणी पूर्ण न करताच तिथून निघून आली. त्यानंतर एका दशकानं परिस्थिती बदलली.

2008 मध्ये फोर्ड कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली. त्यामुळे त्यांनी 'जॅग्वार' आणि 'लॅंड रोवर' हे ब्रिटिश लक्झरी कार ब्रँड्स विकण्याचा निर्णय घेतला.

कूमी कपूर लिहितात, "त्यावेळेस बिल फोर्ड यांनी मान्य केलं होतं की फोर्डच्या या लक्झरी कार कंपन्या विकत घेऊन भारतीय कंपनी त्यांच्यावर मोठे उपकार करेल. रतन टाटांनी 2.3 अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये या दोन मोठ्या ब्रँड्सचं अधिग्रहण केलं."

नीरा राडिया, तनिष्क आणि सायरस मिस्त्री यांच्याशी संबंधित वाद

2010 मध्ये रतन टाटा एका मोठ्या वादात अडकले होते. लॉबिस्ट नीरा राडिया यांच्याबरोबरचं फोनवरील त्यांचं संभाषण लीक झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता.

ऑक्टोबर 2020 मध्ये टाटा समुहानं 'तनिष्क' या त्यांच्या ज्वेलरी ब्रँडची एक जाहिरात घाईघाईनं मागे घेतल्यामुळे देखील रतन टाटा यांच्यावर मोठी टीका झाली होती.

या जाहिरातीत सर्व धर्मांना एकसमान मानणाऱ्या एकत्र भारताचं चित्रण करण्यात आलं होतं. या जाहिरातीला उजव्या विचारसरणीच्या ट्रोल्सचा सामना करावा लागला होता.

शेवटी या दबावामुळे 'तनिष्क' ला ती जाहिरात मागे घ्यावी लागली होती. काही लोकांचं म्हणणं होतं की जर जेआरडी टाटा जिवंत असते तर त्यांनी अशा दबाबात आले नसते.

नंतरच्या काळात रतन टाटा आणि सायरस मिस्त्रींसंदर्भातील वादाची चर्चा झाली. 24 ऑक्टोबर 2016 ला टाटा समूहाचे तत्कालीन चेअरमन सायरस मिस्त्री यांना एक तासापेक्षा कमी कालावधीची नोटिस देऊन पदावरून हटवल्यामुळे रतन टाटा पुन्हा वादात सापडले होते.

या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

टाटा समूहाला बनवलं विश्वासार्ह ब्रँड

मात्र असं असूनही रतन टाटांचा समावेश नेहमीच भारतातील सर्वात विश्वासार्ह उद्योगपतींमध्ये होत आला.

भारतात कोरोनाचं संकट आल्यानंतर आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी म्हणून रतन टाटांनी तत्काळ टाटा ट्रस्टकडून 500 कोटी रुपये आणि टाटा कंपन्यांकडून 1000 कोटी रुपयांची मदत केली होती.

स्वत:ला मोठ्या धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना राहण्यासाठी त्यांनी टाटांच्या लक्झरी हॉटेलचा वापर करण्याची ऑफर दिली होती. असं पाऊल उचलणारे देखील रतन टाटाच पहिले होते.

आज सुद्धा भारतातील ट्रक चालक त्यांच्या वाहनांचा मागील बाजूस 'ओके टाटा' असं लिहितात. जेणेकरून कळावं की हा ट्रक टाटांच्या कंपनीचा आहे आणि म्हणून विश्वासार्ह आहे.

टाटांनी जागतिक स्तरावरील देखील मोठा ठसा उमटवला आहे. टाटा समूह 'जॅग्वार' आणि 'लॅंड रोवर' सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या कारचं उत्पादन करतो. तर 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' जगातील सर्वात प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे.

हे सर्व उभं करण्यामागील रतन टाटांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल.

भारतीय संस्कृतीत परोपकार, निस्वार्थपणा, साधेपणा, सामाजिक बांधिलकी, नम्रपणा या मूल्यांना प्रचंड महत्त्व आहे.

यशाच्या शिखरावर असताना आणि देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाच्या प्रमुखपदी असूनही रतन टाटा नावाच्या एका अद्भूत माणसाच्या अंगी या सर्व गुणांचं प्रकटीकरण झालेलं होतं.

म्हणूनच उद्योगविश्वातील त्यांच्या योगदानाबरोबरच एक उत्तम माणूस म्हणून त्यांनी समाजात दिलेलं योगदान भारतीय समाज कधीच विसरू शकणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)