प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते.

रतन टाटा यांचं नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) इथं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.

त्यानंतर अंत्य संस्कारासाठी त्यांचं पार्थिव वरळीमधील स्मशानभूमीत आणण्यात आलं. तिथं शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) मध्यरात्री जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, "आम्ही रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत, त्यांचं नेतृत्व खरोखर असामान्य होतं. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे केवळ टाटा समूहच नाही तर आपल्या राष्ट्राची रचना देखील घडली आहे."

या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, "टाटा समूहासाठी रतन टाटा हे एका अध्यक्षापेक्षा अधिक होते. माझ्यासाठी ते एक मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी स्वतःच उदाहरण जगासमोर ठेवून इतरांना प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने नेहमी उत्कृष्टता, सचोटी आणि नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्धता दाखवली. समूहाच्या नैतिकतेशी कुठेही तडजोड न करता टाटा समूहाने जागतिक स्तरावर ठसा उमटवला."

रतन टाटांनी केलेल्यासमाजसेवेची दखल या निवेदनात घेण्यात आली आहे, त्यात म्हटलं आहे की, "शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंत, त्यांच्या पुढाकारांनी खोलवर रुजलेली छाप सोडली आहे ज्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होईल".

शंतनू नायडू यांची पोस्ट

रतन टाटा यांचे तरुण मित्र आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षातील सहकारी शंतनू नायडू यांनी लिंकडिनवर पोस्ट लिहून दुःख व्यक्त केले आहे.

ते लिहितात, "ही मैत्री तुटल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करेन. प्रेमासाठी दुःखाची किंमत मोजावी लागते. माझ्या प्रिय दीपस्तंभाला निरोप...."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद मोदी यांनीदेखील एक्स (पूर्वीच्या ट्विटर) वर पोस्ट करून रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदींनी लिहिलं की, "रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत असू. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि प्रशंसकांसोबत आहेत. ओम शांती."

नरेंद्र मोदींनी पुढे लिहिलं की, "श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी व्यापारी होते. ते अत्यंत दयाळू होते आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला एक स्थिर नेतृत्व प्रदान केले. त्याच वेळी, त्यांचे योगदान त्यांच्या व्यवसायापलीकडे गेलं होतं. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय होते."

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना ट्विटरवर लिहिले की, रतन टाटा यांच्याकडे दूरदृष्टी होती. व्यवसाय आणि परोपकाराच्या क्षेत्रात त्यांनी आपली छाप सोडली आहे.

रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सवर लिहिले की, “श्री रतन टाटा यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. ते भारतीय उद्योग जगतातील एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. देशाच्या अर्थव्यवस्था, उद्योग आणि व्यापारात त्यांनी अविस्मरणीय योगदान दिले आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसह माझ्या संवेदना आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी देखील उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक्स(पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून शरद पवारांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली.

शरद पवारांनी लिहिलं की, "जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

रतन टाटा यांची कारकीर्द

1991 मध्ये रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या टाटा समूहाचे ते 2012 पर्यंत अध्यक्ष होते.

त्यांनी 1996 मध्ये दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि 2004 मध्ये आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी सार्वजनिक केली.

2009 मध्ये, रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार उपलब्ध करून देण्याचे वचन पूर्ण केले. ₹ 1 लाख किंमतीची टाटा नॅनो ही मध्यमर्गीयांसाठीची कार त्यांनी बाजारात आणली होती.

रतन टाटा हे टाटा समूहाचे 1991 ते 2012 आणि 2016 ते 2017 या काळात दोनदा अध्यक्ष होते. त्यांनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून माघार घेतली असली तरी, त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम चालू ठेवले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)