श्रीलंकेतील मराठी मुलीची व्यथा : ‘शहरातही लोक आता चुलीवर स्वयंपाक करू लागलेत’

    • Author, अनुष्का बहुतुले, कोलंबोतील मराठी रहिवासी
    • Role, शब्दांकन - जान्हवी मुळे, बीबीसी मराठी

"आमच्या घरी आता रोजचं जेवण बनवतानाही विचार करावा लागतो. म्हणजे किती जेवण बनवायचं, किती वेळा बनवायचं..."

अनुष्का बहुतुले श्रीलंकेतल्या गॅस टंचाईविषयी सांगते. मूळची रायगड जिल्ह्यातल्या कर्जतची असलेली अनुष्का आता श्रीलंकेत कोलंबोजवळच्या उपनगरात राहते आहे.

खरं तर पाचूचं बेट म्हणून ओळखला जाणारा श्रीलंका तिथल्या पाहताक्षणी प्रेमात पाडणाऱ्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पण सध्या या देशाला अभूतपूर्व आर्थिक संकटानं ग्रासलं आहे.

कोव्हिड आणि लॉकडाऊनमुळे बंद झालेले उद्योग, पर्यटन व्यवसायाला लागलेली घरघर, रशिया युक्रेन युद्धामुळे तिथल्या पर्यटकांचा आटलेला ओघ, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि सरकारची काही धोरणं अशा कारणांमुळे श्रीलंकेतली आर्थिक परिस्थिती बिघडलेलीच आहे.

अनुष्काला तिथे आलेले अनुभव तिच्याच शब्दांत.

पर्यटकांचा 'स्वर्ग' संकटात

मी पेशानं इंग्लिश टीचर आहे. मी सध्या एका कंपनीसोबत ऑनलाईन काम करते आणि त्यांच्यासाठी इंग्रजीचा अभ्यासक्रम तयार करते आहे.

माझे पती चंद्रबोस साई प्रशान श्रीलंकन नागरीक आहेत. 2019 मध्ये दोघांचं लग्न झालं. त्याआधी 2018 सालीही मी श्रीलंकेत आले, तेव्हा परिस्थिती चांगली होती.

श्रीलंका म्हणजे जणू स्वर्ग आहे, खूप सुंदर आहे असं लोक म्हणतात. माझा अनुभवही तेव्हा अगदी तसाच होता. आम्ही इथे समुद्रकिनाऱ्यांवर गेलो, हॉटेल-रिझॉर्टमध्ये राहिलो. इथे डोंगर आहेत, हायकिंग करण्याच्या जागा आहेत. इथे खूप सुंदर आणि चवदार चहा मिळतो.

पण गेल्या दोन-तीन वर्षांत ही परिस्थिती बदलली. 2020 मध्ये मी इथे स्थायिक झाले, तेव्हा मला मोठा फरक जाणवला. कोव्हिडची भीती तर होतीच, पण इथलं खूप महत्त्वाचं असलेलं पर्यटन क्षेत्र जवळपास बंद झालं होतं.

कोव्हिडमुळे भरपूर उद्योग बंद झाले. थोडी गरीबी आली. पण आताची परिस्थिती खूप कठीण आणि वाईट आहे लोकांसाठी. जगण्यासाठी अगदी गरजेच्या अशा भरपूर साऱ्या गोष्टी महाग झाल्या आहेत.

कुकिंग गॅस, पेट्रोल, तांदूळ, डाळ हे श्रीलंकेत आयात करावं लागतं. त्यासाठी या देशांना अमेरिकन डॉलर्स द्यावे लागतात.

पण आता तेवढे अमेरिकन डॉलर्स सध्या श्रीलंकन सरकारकडे नाहीत. त्यामुळे ते अनेक गोष्टी आयात करू शकत नाहीयेत आणि परिणामी इथे वस्तूंची भरपूर टंचाई आहे आणि महागाई वाढली आहे.

पेट्रोल, गॅस, अन्नासाठी वणवण

पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाच्या तुटवड्यानं तर अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी आम्ही सुट्टीसाठी म्हणून कोलंबोपासून तीनशे किलोमीटरवर असलेल्या एका शहरात जाणार होतो. आम्ही जायचा प्लॅन केला आणि हॉटेल वगैरेही बुक केलं होतं.

पण त्याच दरम्यान सगळीकडे पेट्रोलच संपलं. आम्हाला ती सहल रद्द करावी लागली. कारण आधेमधे गाडीतलं पेट्रोल संपलं तर काय करणार? आता आमची फक्त ट्रिप होती, त्यामुळे ठीक आहे.

पण इतर भरपूर लोकांना त्रास झाला. काही इमर्जंसी असेल, कुणाला हॉस्पिटलला किंवा दुसऱ्या शहरात जावं लागणार असेल आणि पेट्रोलच नाही, तर आणखी काय होणार?

इथल्या वीजनिर्मिती केंद्रांमध्ये वापरलं जाणारं इंधनही बाहेरून आयात केलं जातं. त्याचीही कमतरता असल्यानं इथे दररोज सात ते आठ तास लाईट जातात. असं लोडशेडिंग आता नेहमीचंच झालं आहे.

न्यूजपेपर्समध्ये किंवा इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या वेबसाईटवर वीज कधी असेल याचं वेळापत्रक देतात आणि त्यानुसार लोकांना आपली कामं करावी लागतात.

जानेवारीमध्ये कोलंबोत पेट्रोलची किंमत साधारण 150 श्रीलंकन रुपये प्रतिलीटर एवढी होती. ते आता 304 श्रीलंकन रुपयांवर गेलं आहे. दुधाच्या पावडरीचं जे पाकीट आधी चारशे श्रीलंकन रुपयांना मिळायचं, त्यासाठी आता 790 श्रीलंकन रुपये मोजावे लागतात.

दुधाची पावडर श्रीलंकन कुटुंबांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण इथे दुधाऐवजी पावडरचा जास्त वापर होतो. पण इथे दूध पावडर आयात केली जाते. ती नसल्यामुळे आता लोकांनी चहाही पिणं बंद केलंय.

दूध पावडरप्रमाणेच श्रीलंकेत दुधाचीही टंचाई निर्माण झाली आहे. मोठ्या सुपरमार्केट्समध्येही कार्टन किंवा बाटलीमध्ये मिळणारं दूध आता दिसेनासं झालं आहे.

आम्ही तीन तीन चार चार सुपरमार्केटमध्ये किंवा दुकानांत जाऊन तपासतो की दूध किंवा दुधाची पावडर कुठे मिळते आहे का. पण अनेक गोष्टी सुपरमार्केटमध्ये नाहीत, त्यामुळे शेल्फ रिकाम्या आहेत. वस्तू आहेत त्यांची किंमतही दुप्पट तिप्पट झाली आहे.

'रोजचं जेवण करतानाही विचार करावा लागतो'

श्रीलंकेत कुकिंग गॅसच्या किंमतीही बऱ्याच वाढल्या आहेत. आता जेवण बनवायला गॅस खूप महत्त्वाचा आहे. पण गॅस सिलिंडर इथे मिळत नाहीयेत. मिळतात तेही दुप्पट तिप्पट किंमतीला.

त्यामुळे आता आमच्या घरी आम्ही जेवण बनवतानाही विचार करतो. म्हणजे किती जेवण बनवायचं, किती वेळा बनवायचं; शक्य झालं तर अशा गोष्टी खायच्या ज्या शिजवाव्या लागत नाहीत किंवा कमी शिजवलं तरी चालेल.

गावाकडे तर अनेकांजण चुलीवर जेवण बनवतात. आता शहरातही ज्यांना शक्य आहे, ते चुलीवर स्वयंपाक करू लागले आहेत किंवा इलेक्ट्रिक इंडक्शन वापरतायत.

बातम्यांमध्ये आम्ही ऐकलंय की लोक सिलिंडरसाठी लांब लांब लाईनीत चार चार पाच पाच तास उभे होते. वयस्कर माणसांपैकी चार पाच जण चक्कर येऊन पडले आणि कुणाचा मृत्यूही झाला. कुठे पेट्रोल स्टेशनवर मारामारी झाली.

आमच्याही मनात धाकधूक असते, की पेट्रोल पंपवर किंवा कुठे गेलो आणि असा काही प्रकार घडला तर? त्यामुळे आम्ही आता बाहेर जाताना अलर्ट असतो, कुठे किती माणसं आहेत यावर लक्ष ठेवून असतो.

ओस पडलेली दुकानं

रोजच्या वापरातल्या अनेक गोष्टी, डिओडरंट, हेअर डाय, काही आवडत्या खायच्या प्यायच्या गोष्टी इथे फारच महाग मिळतात. त्यामुळे मागच्या वर्षी मी भारतातून येताना बॅगेत जेवढी जागा आहे, तेवढं सामान घेऊन आले. तेवढे पैसे वाचतील या उद्देशानं.

इथे आता शॉपिंग मॉल आणि सुपर मार्केटमध्येही गर्दी कमी झाली आहे, कारण लोकांकडे पैसे नाहीयेत खर्च करायला. गरजेच्या वस्तू मिळत नाहीत, तिथे ब्लॅकमार्केटिंगही सुरू झालंय. हे भीतीदायक आहे, कारण ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना त्या गोष्टी मिळवण्यासाठी बराच खर्च करावा लागतो आहे.

एवढी महागाई आहे की ज्या किंमतीला वस्तू विकली जातेय, तीच किंमत उद्या असेल असं नाही. त्यामुळे खर्चाचा काही प्लॅन करता येत नाही. आम्हाला पगारातून पैसे वाचवायचे आहेत, पण ते सध्या अजिबात शक्य नाही, कारण जेवण-खाणं, लाईटबिल वगैरेवरच खर्च होतो.

सरकारनं प्रयत्न करून मदत करून लोकांना यातून बाहेर काढालायल पाहिजे कारण लोकांना खूप त्रास होतोय.

मी आणि माझ्या नवऱ्यानं आता ठरवलं आहे की आम्हाला श्रीलंकेत राहणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही भारत किंवा इतर परदेशात जाण्याचा विचार करतो आहोत.

मी ऑनलाईन काम करत असल्यानं मी आता काही महिने भारतात राहायला येणार आहे, म्हणजे एका माणसाचा खर्च कमी होईल. पुढच्या काही महिन्यांत काय परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर आम्ही पुढे काय करायचं ते ठरवू.

माझ्या नवऱ्याचे मित्र आणि नातेवाईकांकडूनही अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. जे तरूण आहेत, नोकरी करतायत आणि ज्यांच्याकडे शिक्षण आहे, पात्रता आहे ते श्रीलंका सोडून चालेल आहेत. या देशात पुढे काय होईल हे सांगता येणं कठीण आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)