You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लहान मुला-मुलींचे सोशल मीडियाहून लैंगिक छळवणूक करणाऱ्याला 20 वर्षांचा तुरुंगवास
- Author, फियोना मरे आणि कोमॅक कॅम्पबेल
- Role, बीबीसी न्यूज एनआय
स्नॅपचॅट आणि इतर सोशल मीडिया अकाउंटचा वापर करुन बालकांचा लैंगिक छळ करणाऱ्या अलेक्झांडर मॅककार्टनी या व्यक्तीला किमान 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे. या व्यक्तीने अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल केले होते. त्याच्या ब्लॅकमेलिंगमुळे एका मुलीने आत्महत्या केली होती. त्या गुन्ह्यातच त्याला किमान 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
2019 मध्ये 13 वर्षाच्या एका मुलीने स्कॉटलंडमध्ये एक फोन केला आणि त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून लहान बालकांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरोधात न्यायालयात आयर्लंडमध्ये सुनावणी सुरू होती. हे सगळं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.
अलेक्झांडर मॅककार्टनी असं या व्यक्तीचं नाव आहे. उत्तर आयर्लंडमध्ये रहायचा. तो किशोरवयीन मुलींशी मैत्रीचं नाटक करायचा, मग त्यांचा छळ करायचा. त्याने जगभरातील अनेक मुलांना ब्लॅकमेल केलं आहे आणि त्यांचे फोटो बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इतर व्यक्तींना शेअर करायचा.
काही लहान मुलं तर अगदी चार वर्षांची होती. काहींच्या घरापर्यंत जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाचं वर्णन केलं आणि धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला.
अलेक्झांडर मॅककार्टनीने त्याच्यावर असलेल्या 185 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
त्याच्या पीडित मुलांपैकी एका मुलीने आत्महत्या केली त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची देखील त्याने कबुली दिली.
पोलिसांनी त्याचा शोध कसा घेतला?
स्कॉटलंड पोलिसांना एका व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर Police Service of Northern Ireland (PSNI) या उत्तर आयर्लंडच्या पोलिसांनी मार्च 2019 मध्ये तातडीने कारवाईला सुरुवात केली.
पोलिसांनी अलेक्झांडर मॅककार्टनीच्या घराचा पत्ता शोधला, त्याला अटक केली आणि त्याची कसून चौकशी केली.
मॅककार्टनीच्या घरातून 64 डिव्हाइसेस जप्त करण्यात आले. त्यासाठी तब्बल चार वेगवेगळ्या धाडी टाकण्यात आल्या. त्याचं घर नेवरी शहराच्या बाहेर असलेल्या लिसुमन रोड या ग्रामीण भागात आहे.
त्या डिव्हाइसमध्ये अल्पवयीन मुलींचे शेकडो अश्लील फोटो आणि व्हीडिओ आहेत. ज्यात ब्लॅकमेल करत त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचार करतानाचे व्हीडिओज आहेत.
मॅककार्टनीने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मुख्यत: स्नॅपचॅटवर मुलींना जाळ्यात अडकवायला अनेक फेक अकाऊंट्स तयार केले होते.
PSNI (Police Service of Northen Ireland) चे अधिकारी एम्नॉनि कॉरिजेन म्हणाले की मॅककार्टनीने अगदी ‘औद्योगिक पातळीवर’ शोषणाचा बाजार मांडला होता.
त्याने पीडित मुलींसमोर असं भासवलं की त्यांच्याच वयाच्या एका मुलीशी ऑनलाइन बोलत आहेत. त्यानंतर त्यांना अश्लील फोटो पाठवायला सांगायचा, किंवा वेबकॅम किंवा मोबाइल फोनचा वापर करून अश्लील कृत्य करायला सांगायचा.
मॅककार्टनीने प्रत्येक वेळी हीच पद्धत अवलंबली. तपास अधिकारी म्हणाले, “बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इतर व्यक्तींच्या आनंदासाठी हे फोटो ऑनलाइन शेअर करण्याची तो धमकी द्यायचा आणि आधीच शोषित पीडित आणि घाबरलेल्या मुलांना आणखी घाबरवायचा.”
एका प्रसंगात तर त्याने अवघ्या 12 वर्षांच्या मुलीचं केवळ नऊ मिनिटांत लैंगिक शोषण केलं आणि तिला ब्लॅकमेल केलं.
कालानुरूप, मॅककार्टनीचे हे कृत्य फक्त यूकेच नाही तर जगाच्या इतर भागातही पसरले. या छळात इतर लोक, कुटुंबातील पाळीव प्राण्यांचा आणि वस्तूंचाही वापर त्याने केला.
आयर्लंड पोलिसांनी यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी. पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्व्हिस, आणि नॅशनल क्राइम एजन्सी बरोबर काम करत अमेरिका, न्यूझीलँड आणि 28 इतर देशांमधील पीडितांचा शोध घेतला.
मॅककार्टनी कडून जप्त केलेल्या डिव्हाइसचा वापर करूनच अनेक पीडितांची ओळख पटवण्यात आली.
पोलिसांच्या मते त्याने बाललैंगिक गुन्हेगारांची एक जाळंच तयार केलं होतं आणि त्याने या पीडितांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेतलं.
जेव्हा पीपीएसला कॅटफिशिंगची माहिती मिळते
2019 च्या उन्हाळ्यात पोलिसांनी पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्व्हिसच्या गंभीर गुन्हे शाखेच्या प्रमुख कॅथरिन कायरान्स यांना पाचारण केलं.
ते म्हणाले, ‘एक मोठं प्रकरण उघडकीला येत आहे, ते कॅटफिशिंगचं प्रकरण आहे.”
कॅटफिशिंगमध्ये समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्याचा छळ करण्यासाठी एका भलत्याच व्यक्तीच्या नावाने ओळख तयार केली जाते.
कायरान्स म्हणाल्या, “सरासरी 12 वर्षं वय असलेल्या मुलींना अतिशय वाईट पद्धतीने धमकावलं जात होतं.”
ज्या मुलांचा छळ झाला त्यांच्यापैकी काही मुलांनी त्याबद्दल वाच्यता केली होती, काही मुलं शांत राहिली.
“काही मुलांनी या प्रकाराची वाच्यता केली. त्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटवण्यास मदत झाली.मात्र पोलिसांनी घराचे दरवाजे ठोठावण्याआधी काही मुलांनी या प्रकाराबद्दल कुठेच काही सांगितलं नव्हतं.” त्या पुढे म्हणाल्या.
कायरान्स यांच्या मते, मॅककार्टनीने दिवसरात्र उच्छाद मांडला होता.
जेव्हा पीडितेनी आत्महत्या केली
जगभरात या प्रकरणाचा तपास करत असताना कायरान्स म्हणाल्या की मॅककार्टनीने अतिशय काळजीपूर्वक सगळे फोटो सेव्ह केले होते.
“तो जिथे मुलं आहेत तिथला नकाशा तो स्नॅपचॅटवर सेव्ह करायचा आणि त्यामुळे पोलिसांना मुलांना शोधायला त्याचा फायदा झाला.
"त्याचं आरोपपत्र दाखल करायला 2021 उजाडलं कारण अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका मुलीने आत्महत्या केल्याचं समोर आलं.
“सुरुवातीपासूनच छळाची पातळी इतकी वाईट होती की, आम्हाला भीती वाटत होती की आम्ही मुलांना ओळखलं तरी ते कोणत्या परिस्थितीत सापडतील याची आम्हाला भीती वाटायची,” असं कायरान्स म्हणाल्या.
“दुर्दैवाने आमची भीती खरी ठरली. एका लहान मुलीने तिचा जीव दिला. अमेरिकन प्रशासनाबरोबर काम करताना आम्ही हे सिद्ध करण्यात यशस्वी ठरलो की तिने ऑनलाईन छळ होत असतानाच तिने जीव दिला. त्यावेळी या मुलीचा मृत्यू आणि जवळचा संबंध होता. मॅककार्टनीनेच तिचा खून केला हे सिद्ध करण्यासाठी भक्कम पुरावे होते असं आम्हाला वाटलं.
"12 वर्षांच्या त्या लहान मुलीने मॅककार्टनी तिचा छळ करत असताना स्वत:वर गोळी झाडून जीव दिला."
मॅककार्टनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कायरान्स म्हणाल्या की जगात पहिल्यांदाच असा प्रसंग घडला आहे जिथे आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा आरोप केला जेव्हा पीडित आणि छळवणूक करणारा कधीही एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेले नाही.
या केसची व्याप्ती इतकी मोठी होती. त्यामुळे त्याच्यावर आरोप लावताना सरकारी वकिलांनी अतिशय काळजी घेतली.
“आम्ही आरोपपत्रात 3,000 आरोप तर टाकू शकत नाही,”कायरान्स म्हणाल्या.
“शेवटी त्यात 70 पीडितांशी निगडित 200 आरोप ठेवण्यात आले. उत्तर आयर्लंडमधलं सगळ्यात मोठ्या आरोपपत्रांपैकी हे एक आरोपपत्र होतं.
अलेक्झांडर मॅककार्टनी कोण आहे?
मॅककार्टनी हा आयर्लंडमधील नेवरी शहराचा राहिवासी आहे. हा अतिशय ग्रामीण भाग असून तिथे फक्त चर्च, शेतं आणि मोजके उद्योग आहेत.
नेवरी शहरातील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जेव्हा तो पहिल्यांदा आला तेव्हा तो फक्त 21 वर्षांचा होता. त्याचे केस लांब आणि विस्कटलेले होते. आपण कुठे आहोत असे आश्चर्याचे भाव त्याच्या डोळ्यात होते.
त्याने मॅगबेरी तुरुंगात पाच वर्षं रिमांडवर घालवली. पोलिसांकडून केली जाणारी चौकशी आणि कोर्टात येणंजाणं याच दोन प्रसंगी तो त्या तुरुंगातून बाहेर आला.
त्या सुनावणीत तो फक्त त्याचं नाव, जन्म तारीख सांगायचा आणि पुढे हळू आवाजात फक्त गुन्ह्याची कबुली द्यायचा.
‘त्याच्याबाबतीत काहीही असामान्य नाही’
मॅककार्टनी नेवरी शहरातील शाळेत शिकला. त्याला गेमिंगची प्रचंड आवड होती.
एका सूत्राने बीबीसीला माहिती दिली, “तो बराचसा अबोल होता आणि फारसा मिसळायचा नाही. त्याच्या ग्रुपमधील मित्रांशिवाय तो फारसा कोणाशी बोलायचा नाही.”
“तो या गोष्टी करत होता, पण त्याच्या मित्रांना याबद्दल काहीही माहिती नव्हती.”
त्यानंतर नेवरी येथील सदर्न रिजनल कॉलेजमध्ये एक कोर्स केला. तो शांत स्वभावाचा आहे आणि इतर वर्गाबरोबर तो फारसा मिसळत नाही असं सांगण्यात आलं.
जेव्हा त्याच्यावर आरोप झाले तेव्हा तो उलस्टर विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत होता.
त्याच्या शेजाऱ्यांसाठी हा सगळा प्रकार अतिशय धक्कादायक होता. “इथे राहणाऱ्या लोकांना प्रचंड धक्का बसला आहे,” असं एका राहिवाशाने सांगितलं.
“आधी याबद्दल दबक्या आवाजात चर्चा व्हायची, त्यानंतर अविश्वासाचं वातावरण तयार झालं. मला खात्री आहे की लोक याबद्दल त्यांच्या घरी बोलतच असतील, पण काय बोलावं असा प्रश्न पडल्यामुळे सार्वजनिकदृष्ट्या काही बोलत नसतील.” ते पुढे म्हणाले.
“तो अतिशय आनंदी, बुद्धिमान आणि सौम्य स्वभावाचा म्हणून ओळखला जायचा. त्याच्याबद्दल फार असामान्य असं काही नव्हतं,” आणखी एका शेजार्याने माहिती दिली.
मात्र त्याने केलेला गुन्हा अगदीच असामान्य आहे. अनेक पीडितांनी हा छळ थांबवण्याची विनवणी केली. मात्र सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने ते सुरूच ठेवलं, काही वेळेला तर तो पीडितांना लहान भावंडांना म्हणजे अगदी चार वर्षांच्या मुलांना सहभागी करून घ्यायला सांगायचा.”
कायरन्स यांच्या मते मॅककार्टनीची केस हा आमच्या पीपीएसमधला सगळ्यात विचलित करणारी केस आहे.
पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा काही पीडितांचा अद्याप शोध लागला नसल्याचं कायरन्स यांनी सांगितलं.
“मॅककार्टनीच्या गुन्ह्यामुळे हजारो मुलांचं नुकसान झालं आहे. या मुलांना आणि त्यांच्या पालकांना आयुष्यभराचा क्लेश दिला आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.