You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दोनदा झालं अपहरण, सापडली ड्रग्सच्या विळख्यात ; सिएरा लिओनमधील एका सेक्स वर्करची कथा
- Author, टायसन कॉंटेक, मेकेनी कर्टनी बेम्ब्रिज लंडन
- Role, बीबीसी आफ्रिका आय
जगातील कोणत्याही देशावर किंवा समाजावर जेव्हा मोठं संकट येतं तेव्हा त्याचा सर्वाधिक विपरित परिणाम महिलांवर होतो. सिएरा लिओन मधील यादवी संघर्ष, आर्थिक संकट यामुळे तिथल्या अनेक तरुणींवर सेक्स वर्कर होण्याची वेळ आली. असह्य झालेल्या मानसिक तणावामुळे त्या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकल्या आहेत. अत्यंत भयानक, विदारक आणि अंगावर काटा आणणारं आयुष्य जगणाऱ्या हजारो निरपराध महिलांच्या आयुष्याची भयावह कहाणी...
ती एक विशीतील 'सिंगल मदर' आहे. तिचं नाव 'आयसाटा' (Isata).
तिला मारहाण झाली, तिचे पैसे लुटण्यात आले. इतकंच काय तिचं अपहरण झालं आणि दुसऱ्या देशात तिची मानवी तस्करी देखील झाली. तिथून ती सुटली, पुन्हा त्याच चक्रात ती अडकली आणि पुन्हा एकदा तिची सुटका झाली.
ही काही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. परिस्थितीमुळे सेक्स वर्कर झालेल्या आयसाटाच्या आयुष्याची ही कथा आहे.
आफ्रिकेच्या पश्चिमेला असणाऱ्या सिएरा लिओन या अतिशय छोट्याशा देशाची ती रहिवासी आहे. सिएरा लिऑनमधील सेक्स वर्कर्सच्या भीषण आणि अत्यंत वेदनादायक आयुष्याचं आयसाटा प्रतीक बनली आहे.
या सर्व भीषण आयुष्याला, सहन करण्यापलीकडच्या दु:खाला तोंड देताना ती कुश (kush) या अंमली पदार्थाच्या आहारी गेली. याला स्ट्रीट ड्रगदेखील म्हणतात. सिएरा लिओनमध्ये या अंमली पदार्थानं उच्छाद मांडला आहे.
बीबीसी आफ्रिका आय (BBC Africa Eye) चार वर्षांपासून मेकेनी (Makeni) मधील काही सेक्स वर्कर्सच्या आयुष्याचा अभ्यास करतं आहे.
त्यातून अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे.
मुलीसाठी सेक्स वर्कर झालेली आयसाटा
मेकेनी हे सिएरा लिओनच्या उत्तर प्रांतातील सर्वांत मोठं शहर आहे. सिएरा लिओनची राजधानी असलेल्या फ्रीटाउन (Freetown) पासून हे शहर जवळपास 200 किमी (124 मैल) अंतरावर आहे.
हिऱ्यांच्या खाणींनी समृद्ध असलेल्या भूभागात हे शहर आहे. हिऱ्यांच्या खाणींमुळेच सिएरा लिओनमध्ये यादवी युद्धाचा वणवा पेटला आहे. या संघर्षाचे विनाशकारी परिणाम आजसुद्धा जाणवतात.
आयसाटा ही मेकेनीतील शेकडो सेक्स वर्कर पैकी एक आहे. आम्ही बोललेल्या इतर महिलांप्रमाणेच तीदेखील फक्त तिचं पहिलं नावच वापरते.
"मी जो त्याग करते आहे, तो माझ्या मुलीसाठीच आहे. रस्त्यांवर मला प्रचंड त्रास आणि वेदनांना सामोरं जावं लागलं आहे," असं ती म्हणते.
"एकदा क्लबमध्ये मी एका माणसाला भेटले. त्याने माझे कपडे फाडले. माझ्याजवळचे पैसे त्यानं हिसकावून घेतले. माझ्या परीनं मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे एक बंदूक होती."
"त्या बंदुकीनं त्यानं माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूस आघात केला. तो मला ठार करू इच्छित होता."
हे खूपच भयानक, भयंकर असं आयुष्य आहे. आम्ही भेटलेल्या काही महिलांना एचआयव्ही (HIV)चा देखील संसर्ग झाला होता. इतर मारल्या गेल्या होत्या.
मात्र अनेकांना वाटतं की तिथे त्यांच्यासमोर फारसा पर्याय नाही.
या मुली काम कुठे करतात, कसं करतात याविषयी दोन सेक्स वर्करने सांगितले.
शहराजवळ असलेल्या निर्मनुष्य दलदलीच्या भागात जमिनीवर धान्याच्या रिकाम्या गोण्या पसरवलेल्या दिसत होत्या. त्यांच्याकडे बोट दाखवत त्यांनी सांगितलं की आम्ही यावरच काम करतो.
त्यातील एक तरुणीचं नाव मॅबिन्टी (Mabinty)होतं. तिनं आम्हाला सांगितलं की त्या इथे सोबतच काम करायच्या. एका रात्रीत त्यांना 10 पुरुषांसोबत देखील जावे लागत असे.
एका वेळेसाठी पुरुष त्यांना एक डॉलर देतात.
त्यांच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी पुरेसा पैसा हाती असावा यासाठी त्यांची धडपड सुरू असते. तिला सहा अपत्ये होती. मात्र त्यातील तीन दगावली.
उरलेली तीन अपत्यं शाळेत जातात.
"त्यातील एका मुलाची नुकतीच परीक्षा झाली. जर मी सेक्स वर्करचं काम केलं नाही तर त्याच्या शाळेची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. हे माझं दु:खं आहे. या माझ्या वेदना आहेत," असं तिनं पुढे सांगितलं.
सिएरा लिओनमधील गरिबी आणि महिलांच्या नरकयातना
सिएरा लिओनमधील कोणा एका महिलेची ही कहाणी नाही, तर सेक्स वर्कर व्हावं लागलेल्या हजारो महिलांची ती व्यथा आहे.
यादवी युद्धात त्या अनाथ झाल्या आहेत. या युद्धात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2002 मध्ये या युद्धाचा शेवट होईपर्यंत सिएरा लिओनची जवळपास निम्मी लोकसंख्या विस्थापित झाली होती.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था म्हणतात की इबोला रोगाचा उद्रेक आणि कोरोनाचं संकट यानंतर हा देश आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या तरुण मुलींच्या संख्येत आणखी भर पडली आहे.
इतर अनेक संकटांप्रमाणेच या संकटाचाही महिलांवरच सर्वाधिक विपरित परिणाम झाला.
सिएरा लिओनमध्ये वेश्या व्यवसाय बेकायदेशीर नाही. मात्र सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिलांकडे बहिष्कृत म्हणून पाहिलं जातं. त्यांना सरकार किंवा समाजातून फारच थोडी मदत किंवा आधार मिळतो.
2020 मध्ये आम्ही आयसाटाला भेटल्यानंतर थोड्याच दिवसात एका गुन्हेगारी टोळीनं तिचं अपहरण केलं आणि गॅम्बिया, सेनेगल आणि शेवटी माली या देशांमध्ये तिला सेक्स स्लेव्ह म्हणून काम करण्यास भाग पाडलं.
तिनं कसातरी एक फोन मिळवला आणि आम्हाला तिच्या आयुष्याची कहाणी सांगितली.
"ते ज्या पद्धतीनं आमच्याशी संपर्क साधतात, ते असं असतं की जर आम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर ते आम्हाला ठार करतील," असं ती म्हणाली.
"मी खूपच त्रासातून, वेदनेतून जाते आहे."
बीबीसी आफ्रिका आयनं मग तिला शोधून काढलं. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) या संयुक्त राष्ट्रसंघांच्याच एका संस्थेनं मग आयसाटाला सिएरा लिओनमध्ये परतण्यास मदत केली.
त्यानंतर तिनं सेक्स वर्कर म्हणून काम करणं बंद केलं.
2021 मध्ये आम्ही जेव्हा तिला पाहिलं तेव्हा ती एका स्थानिक किचनमध्ये स्वयंपाक्याचं काम करत होती. मात्र त्यातून तिच्या मुलीचं संगोपन करण्यासाठी पुरेसे ठरतील इतके पैसे तिला मिळत नव्हते.
त्यानंतर 2023 मध्ये आम्हाला तिच्याविषयी नवीन माहिती मिळाली. त्यावेळेस तिला कुश (kush) या अंमली पदार्थाचं व्यसन जडलं होतं आणि ती पुन्हा सेक्स वर्कर म्हणून काम करू लागली होती.
कुश या अंमली पदार्थाचा विळखा
कुश (kush)हा अतिशय स्वस्तात मिळणारा अंमली पदार्थ असतो आणि त्यामध्ये मानवी हाडं असू शकतात.
सिएरा लिओनमध्ये कुश या अंमली पदार्थाचं व्यसन ही एक मोठी समस्या बनली आहे. त्याचं स्वरूप इतकं गंभीर आहे की तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी त्याला राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली आहे.
अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या नशेत असताना आयसाटा तिच्या सर्वांत लहान मुलाला, जो अवघ्या चार महिन्यांचाच होता, त्याला सोडून गेली.
आयसाटाची आई पोसेह त्या मुलाचं संगोपन करते आहे.
"रस्त्यावरील आयुष्याच्या तणावामुळे ती कुशचं सेवन करू लागली. ती या विळख्यात अडकण्यामागे हा तणावच कारणीभूत होता," असं पोसेह म्हणाल्या.
सेक्स वर्कर असलेल्या तरुण माता आणि त्यांची मुलं
नाटा (Nata) सुद्धा एक सिंगल मदर आहे. ती तिच्या विशीत आहे. तिला तीन मुली आहेत.
आम्ही तिला तिच्या घरी भेटलो तेव्हा ती बाहेर कामावर जाण्यासाठी तयार होत होती.
"माझ्या मुलांनी चांगलं आयुष्य जगावं अशी माझी इच्छा आहे. परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल अशी मला आशा आहे," असं ती म्हणाली.
ती मेकअप करत असताना तिची मुलगी तिच्याकडे पाहत होती. तिच्या मुलीनं आम्हाला सांगितलं की मोठं झाल्यावर तिला वकील व्हायचं आहे.
"माझ्या आईला मदत करण्यासाठी मला वकील व्हायचं आहे," असं ती लहानगी आम्हाला म्हणाली.
त्या शहरात आमची भेट आणखी एका लहान मुलीशी झाली. तिचं नाव रुगियाटू (Rugiatu)होतं. ती साधारण 10 वर्षांची होती.
तिची आई गिना (Gina)सुद्धा एक सेक्स वर्कर होती. ती फक्त 19 वर्षांची असताना 2020 मध्ये तिची हत्या झाली होती.
रुगियाटू आता तिच्या वृद्ध आजी सोबत राहते.
तिनं पुढे जे म्हटलं त्यामुळे कोणत्याही सुसंस्कृत आणि सहृदय माणसाच्या अंगावर काटा येईल.
"माझी आई आणि वडील दोघेही या जगात नाहीत. आता फक्त मी आणि माझी आजीच आहे. जर माझ्या आजीचं निधन झालं तर माझ्यासमोर एकच पर्याय राहील तो म्हणजे रस्त्यावर जाऊन भीक मागण्याचा," असं रुगियाटू म्हणाली.
"त्यांनी माझी सुद्धा रस्त्यावरच हत्या करावी अशी माझी अजिबात इच्छा नाही."
त्यानंतर आम्ही जेव्हा नाटाला पाहिलं तेव्हा ती ओळखू देखील आली नाही.ती सुद्धा कुश या अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडली होती.
"माझ्या या स्थितीबद्दल मी अजिबात आनंदी नाही. मात्र मला खूप जास्त विचार करायचा नाही," असं तिनं आम्हाला सांगितलं.
इतर महिलांप्रमाणे ती देखील प्रचंड तणावात जगत होती. तो असह्य झाल्यामुळेच तिनं कुश या अंमली पदार्थाची वाट धरली होती. स्वत:च्या आयुष्याबद्दल अधिक विचार करणं बहुधा तिच्या सहन करण्यापलीकडे गेलं असावं.
"मला जेव्हा जुन्या गोष्टी आठवतात तेव्हा कधीतरी मला रडू येतं. ते विसरण्यासाठीच मी अंमली पदार्थाचं सेवन करते," नाटा सांगते.
या परिस्थितीत तिच्या तिन्ही मुलींना त्यांच्याकडे नातेवाईकाकडे जाऊन राहावं लागलं आहे.
आयसाटाची तस्करी, मरण यातना आणि सुटका
मग 2024 च्या सुरूवातीला एक आणखी वाईट बातमी आली. ती आयसाटाच्या बाबतीत होती.
मानवी तस्करी करून आयसाटाला पुन्हा दुसऱ्या देशात पाठवण्यात आलं होतं. काही महिलांना घानामध्ये लहान मुलांना सांभाळण्याचं (nanny work) मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आयसाटा देखील त्यामध्ये होती.
मात्र घानामध्ये पाठवण्याऐवजी त्यांना मालीमध्ये पाठवण्यात आलं होतं. तिथे सोन्याच्या खाणीच्या परिसरात त्यांना जबरदस्तीनं सेक्स वर्करचे काम करण्यास भाग पाडण्यात आलं होतं.
"मला घरी परत जायचं आहे. मी कळकळीने सांगते. मला प्रत्येक गोष्टीची खंत वाटते," असं आयसाटानं आम्हाला फोनवर बोलताना सांगितलं.
ती म्हणाली की ज्या माणसानं तिला नॅनीचं काम मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्या माणसानं जेव्हा प्रवासात प्रत्येक टप्प्यावर पोलीस चौकी आणि सीमेवरील चौक्यांना हुलकावणी दिली, तेव्हा ती चिंताग्रस्त झाली.
"त्यानं आम्हाला जॉय नावाच्या नायजेरियन महिलेच्या ताब्यात दिलं," असं ती म्हणाली.
"आम्ही त्याला विचारलं, तू आम्हाला सांगितलं होतंस की आपण नॅनीचं काम करण्यासाठी घानाला जात आहोत. हे घाना आहे का?"
"जॉयनं आम्हाला सांगितलं की 'तुम्ही सेक्स वर्कर म्हणून काम करण्यासाठी येत आहात हे तुम्हाला सांगण्यात आलं नव्हतं का?' त्यावर मी म्हणाले: 'नाही'."
"ती म्हणाली 'जा आणि थोडे पैसे घेऊन ये, आणि तिला दे."
इतर असंख्य मानवी तस्करी केलेल्या महिलांप्रमाणेच, आयसाटाला देखील सांगण्यात आलं होतं की तिला तिचं स्वातंत्र्य परत मिळण्यासाठी तिनं काम केलं पाहिजे आणि त्यातून मोठी रक्कम तिच्या तस्करांना दिली पाहिजे.
त्यांनी आयसाटाला सांगितलं की तिला तिच्या स्वातंत्र्यासाठी 1,700 डॉलर (1,300 पौंड) मोजावे लागतील.
इतकी मोठी रक्कम जमा करण्यासाठी तिला शेकडो पुरुषांबरोबर सेक्स करावा लागेल.
तस्करांनी तिला सांगितलं की त्यांचे पैसे देण्यासाठी तिच्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे.
हजारो जणांची होते तस्करी
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM)ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था अशा प्रकारे तस्करी करण्यात आलेल्या लोकांची मदत करते. या संस्थेने सांगितलं की सिएरा लिओनमधून लहान मुलांसह दरवर्षी हजारो लोकांची तस्करी होते.
मानवी तस्करी करताना एकतर या लोकांचं अपहरण केलं जातं किंवा चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून त्यांना परदेशात जाण्यासाठी फसवलं जातं.
त्यानंतर या लोकांना आफ्रिका खंडातील परदेशी लोकांना विकलं जातं. तिथं त्यांना जबरदस्तीनं कष्टाच्या कामाला जुंपलं जातं किंवा लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागतं.
यातील कित्येकजणांना पुन्हा त्यांच्या घरी कधीच परतता येत नाही.
सुदैवानं आयसाटा ला मात्र मेकेनीतील तिच्या घरी परतता आलं. आता आई आणि आपल्या दोन मुलांसह आयसाटा तिथे राहते आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)