अमेरिकेत ज्याच्या मृत्यूमुळे लोक रस्त्यावर उतरले, तो अ‍ॅलेक्स प्रेटी कोण होता?

अमेरिकेतील मिनेसोटामधील मिनियापोलिस येथे एका व्यक्तीचा इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटच्या (आयसीई) अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडल्यानं मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरले आहेत.

अमेरिकेत 3 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी घटना आहे. 8 जानेवारीला 37 वर्षीय रेनी निकोल गुड हिचा देखील आयसीईच्या अधिकाऱ्याने झाडलेल्या गोळीत मृत्यू झाला होता.

मिनेसोटातील घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेतून नाराजीचे पडसाद उमटले आहेत.

शनिवारपासून (24 जानेवारी) सॅन फ्रान्सिस्को, उत्तर कॅलिफोर्नियातील ओकलंड, लॉस एंजेलिस, शिकागो आणि इलिनॉय येथे हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान, शेकडो लोक वॉशिंग्टनमधील आयसीई मुख्यालयासमोर जमले आणि आंदोलन केले.

मिनियापोलिसमधील बीबीसी प्रतिनिधी अ‍ॅना फागाय यांच्या मते, -23 अंश सेल्सिअस तापमान असूनही लोक गोळीबाराच्या ठिकाणी आहेत आणि जवळच मोठा पोलीस बंदोबस्त आणि लष्करी वाहने तैनात करण्यात आली आहेत.

मिनेसोटाचे सिनेटरने मृत व्यक्तीची ओळख अ‍ॅलेक्स प्रेटी अशी सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, 37 वर्षीय प्रेटी मिनियापोलिसचे रहिवासी होते. ते व्यवसायाने परिचारक (वॉर्डबॉय) आणि अमेरिकन नागरिक होते.

होमलँड सिक्युरिटीच्या सेक्रेटरी क्रिस्टी नोएम म्हणाल्या की, प्रेटीने कथितपणे हिंसक प्रतिक्रिया दिल्यामुळे आयसीई अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला.

दुसरीकडे गव्हर्नर वॉल्झ यांनी अमेरिकेच्या केंद्रीय अधिकाऱ्यांना राज्य सोडण्यास सांगितल्याची माहिती दिली.

ट्रम्प काय म्हणाले?

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिनियापोलिसचे महापौर आणि मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांच्यावर 'बंडखोरीला चिथावणी देण्याचा' आरोप केला.

सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी संशयिताकडून जप्त केलेल्या पिस्तूलचा फोटो शेअर केला आहे.

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले, "स्थानिक पोलीस कुठे होते? त्यांना आयसीई अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्याची परवानगी का नव्हती? महापौर आणि राज्यपालांनी त्यांना थांबवले का? अनेक पोलीस अधिकाऱ्यांना त्यांचे काम करण्याची परवानगी नव्हती, म्हणून आयसीईला स्वतःचे संरक्षण करावे लागले, असंही सांगितलं जात आहे. हे सोपे काम नाही."

कोणताही पुरावा न देता ट्रम्प यांनी स्थानिक अधिकाऱ्यांवर चोरी आणि फसवणूक लपवण्यासाठी सारवासारव करण्याचा आरोप केला.

त्यांनी पुढे म्हटले, "महापौर आणि राज्यपाल त्यांच्या अहंकारी आणि धोकादायक भाषणाने बंड भडकावत आहेत. आमच्या आयसीई देशभक्तांना त्यांचे काम करू द्या."

त्यांनी इशारा दिला, "12 हजार बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांना मिनेसोटामधून अटक करून तेथून बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी बरेच हिंसक आहेत. जर ते अजूनही तिथे असते, तर आज आपण जे पाहतो त्यापेक्षा खूपच वाईट परिस्थिती तुम्हाला दिसली असती."

ट्रम्प यांनी एक पोस्टही शेअर केली. त्यामध्ये असा दावा करण्यात आला की, आंदोलकांनी एका आयसीई अधिकाऱ्याला इजा पोहचवली.

ट्रम्प यांनी वारंवार मिनियापोलिसमधील फेडरल इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या विरोधातील आंदोलन रोखण्यासाठी विद्रोह कायदा (इंसरेक्शन अ‍ॅक्ट) लागू करण्याची धमकी दिली आहे. हा कायदा केवळ अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत लागू केला जातो.

एका प्रत्यक्षदर्शीने काय म्हटले?

एका जबाबात, गोळीबाराचा व्हीडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका अज्ञात प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, फेडरल एजंट्सने गोळीबार करण्यापूर्वी अ‍ॅलेक्स प्रेटीजवळ बंदूक दिसली नव्हती.

स्थलांतरितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या 'अमेरिकन इमिग्रेशन कौन्सिल' या संस्थेच्या एका व्यक्तीने संबंधित महिलेचं नाव काढून हे प्रतिज्ञापत्र X वर शेअर केले होते.

त्या महिलेने सांगितले की, तिच्या घराजवळील रस्त्यावर आयसीई अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा इशारा देणाऱ्या शिट्ट्या ऐकल्यानंतर ती तेथे गेली.

तिच्या म्हणण्यानुसार, एका वाहतूक नियंत्रकाने तिला पार्किंगची जागा शोधण्यास मदत केली. नंतर तिने या व्यक्तीची ओळख प्रेटी अशी सांगितली.

त्यानंतर महिलेने तिच्या मोबाईल फोनचा वापर करून एका आयसीई अधिकाऱ्याचा 'स्प्रे करण्याची धमकी' देत ​​असल्याचा व्हीडिओ काढला.

महिलेने म्हटले की, एका आयसीई अधिकाऱ्याने नंतर एका महिलेला जमिनीवर पाडलं आणि तिच्यावर पेपर स्प्रे फवारला.

तिच्या म्हणण्यानुसार, प्रेटीने स्वतःवर पेपर स्प्रेचा परिणाम होऊनही त्या महिलेला उठण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या आयसीई अधिकाऱ्याने त्याला पकडले.

या महिलेने सांगितले की, प्रेटीने प्रतिकार केला नाही. "मला त्याच्याकडे बंदूक दिसली नाही. त्यांनी त्याला जमिनीवर पाडले. 4-5 आयसीई अधिकाऱ्यांनी त्याला जमिनीवर दाबून ठेवलं आणि त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या."

'आयसीईपासून असा बचाव करा', संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य

दरम्यान, संरक्षण मंत्री पीट हॅगसेट यांनी एक्सवर एका आयसीई अधिकाऱ्याचा फोटो पोस्ट केला. तसेच आयसीई अधिकाऱ्यांपासून कसा बचाव करायचा यावर भाष्य केलं.

यात म्हटलं, "येथे बेकायदेशीरपणे राहू नका," "आयसीई अधिकाऱ्यांवर हल्ला करू नका," आणि "केंद्र आणि राज्याच्या कायद्यांचे पालन करा."

त्यांनी आधीच्या एका पोस्टची लिंकही शेअर केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, आयसीई 'देशभक्त' "देश वाचवत आहेत", आणि "आम्ही तुमचे पूर्णपणे संरक्षण करू."

अ‍ॅलेक्स प्रेटीच्या आई-वडिलांनी काय म्हटले?

अ‍ॅलेक्स प्रेटीचे आई-वडील, मायकेल आणि सुसान प्रेटी यांनी त्यांच्या मुलाबद्दल 'सत्य' समोर आणावं अशी विनंती केली आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्हाला खूप दुःख झाले आहे, पण खूप रागही आला आहे."

त्यांनी म्हटले, "अ‍ॅलेक्स एक दयाळू आणि भावनिक व्यक्ती होता. जो त्याच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि मिनियापोलिस व्हेटरन्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटलमधील माजी सैनिकांसाठी प्रिय होता. तेथे तो आयसीयू परिचारक म्हणून काम करत होता."

त्यांनी पुढे म्हटले, "अ‍ॅलेक्स जग बदलू इच्छित होता, पण त्याच्यामुळे काय बदल घडला हे पाहण्यासाठी दुर्दैवाने तो आमच्यासोबत नसेल.तो एक चांगला व्यक्ती होता. कृपया आमच्या मुलाबद्दल सत्य समोर आणा."

अ‍ॅलेक्सच्या आई-वडिलांनी असेही म्हटले की, प्रशासनाकडून त्यांच्या मुलाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टी 'खूपच घृणास्पद' आहेत. व्हीडिओमध्ये अ‍ॅलेक्स सशस्त्र नव्हता, तर जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा तो उघड्या हातांनी एका महिलेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता, असंही त्यांनी नमूद केलं.

अ‍ॅलेक्सकडे कायदेशीररित्या खरेदी केलेली बंदूक होती, परंतु त्यांनी त्याला कधीही ती घेऊन जाताना पाहिले नव्हते, असंही अ‍ॅलेक्सच्या आई-वडिलांनी सांगितले.

रेनी गुडच्या मृत्यूनंतरच्या आंदोलनात सहभाग

याआधी शहरात इमिग्रेशन अधिकाऱ्यानी केलेल्या गोळीबारात रेनी गुडचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या आंदोलनात अ‍ॅलेक्स प्रेटी सहभागी झाला होता.

त्याचे वडील मायकल प्रिटी यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले, "त्याला लोकांची खूप काळजी होती आणि मिनियापोलिस आणि संपूर्ण अमेरिकेत आयसीईमुळे जे घडत होते त्यामुळे लाखो इतर लोकांप्रमाणे तोही खूप अस्वस्थ होता."

ते म्हणाले, "त्याला असे वाटले की, आंदोलनांमध्ये सहभागी होणं हा इतरांबद्दलची त्यांची चिंता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे."

या प्रकरणाची केंद्रीय चौकशी सुरू आहे, अशी माहिती यूएस डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी बीबीसीच्या यूएस मीडिया पार्टनर सीबीएसला दिली.

त्यांनी असेही म्हटले की, हा प्राणघातक गोळीबार टाळता येण्यासारखा होता. त्यांनी केंद्रीय कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करून चिथावणी दिल्याचा आरोप करत मिनेसोटा राज्य आणि शहर अधिकाऱ्यांवर टीका केली.

हाऊस डेमोक्रॅटिक नेते हकीम जेफ्रीज म्हणाले की, ट्रम्प आणि होमलँड सिक्युरिटी विभाग "पूर्णपणे नियंत्रणाबाहेर" आहे.

"आज, कायदा अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेशातील बेकायदेशीर, मुखवटा घातलेल्या गुंडांनी मिनियापोलिसच्या रस्त्यावर विनाकारण आणखी एका अमेरिकन नागरिकाची निर्घृण हत्या केली," असंही त्यांनी एका निवेदनात म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)