You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मार्क टली यांना अयोध्येत कारसेवकांनी जेव्हा घेराव घालून बंदी बनवलं होतं...
- Author, रामदत्त त्रिपाठी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
मार्क टली माझे फक्त सहकारीच नव्हते, तर ते माझे चांगले मित्रही होते.
साधा, सरळ आणि संतुलित स्वभाव ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं होती. काम आणि आयुष्य अशा दोन्ही बाबतीत ते अनावश्यक दिखाऊपणापासून दूर राहत असत.
1991 सालची गोष्ट आहे. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांच्या जनता दल (एस) या पक्षाचं राष्ट्रीय संमेलन भरवलं होतं. ते संमेलन शहरापासून दूर, मोकळ्या ग्रामीण वातावरणात झालं होतं.
या संमेलनाच्या वेळेस मार्क टली यांनी शहरांमधील हॉटेलांमध्ये मुक्काम करण्याऐवजी तिथेच तंबूमध्ये राहण्यास पसंती दिली होती. लखनौ आणि दिल्लीहून आलेल्या बहुतांश पत्रकारांनी बलिया शहरात मुक्काम केला होता. मात्र मी देखील मार्क टली यांच्या शेजारी त्याच तात्पुरत्या तंबूमध्ये राहिलो होतो.
त्यावेळेस मी संडे मेलसाठी काम करायचो. सकाळच्या वेळेस कच्च्या रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर चहा पिणं, बाटी-चोखा खाणं आणि मीडिया सेंटरमधून बातम्या पाठवणं हे सर्व कामाचा, प्रवासाचा भाग होता.
लखनौला परत येत असताना एका ठिकाणी एक ट्रक ड्रायव्हर आमच्या कारला वाट देत नव्हता.
त्यावेळेस मी मार्क टली यांना क्षणिक रागावलेलंही पाहिलं. मात्र ते त्यांच्या स्वभागात क्वचितच दिसायचं. कधीही जेव्हा एखादी गैरसोयीची परिस्थिती समोर यायची, तेव्हा ते अतिशय सहजतेनं हनुमान चालीसा म्हणू लागायचे.
त्यानंतर झाशी ते कानपूरपर्यंत राजीव गांधी यांच्या यात्रेचं वार्तांकन आम्ही सोबतच केलं. राजीव गांधी रात्री जवळपास 3 वाजता हमीरपूरला पोहोचले होते. थोडा वेळ झोप घेतल्यानंतर आम्ही सकाळी 7 वाजता त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो.
आधी मार्क यांनी त्यांच्या मुलाखतीचं रेकॉर्डिंग केलं. नंतर मी जेव्हा मुलाखत घेऊ लागलो, तेव्हा मार्क यांनी अतिशय नम्रपणे विचारलं की ते याचं बीबीसी हिंदीसाठी रेकॉर्डिंग करू शकतात का. अर्थात त्यात मला काय आक्षेप असणार होता.
या प्रसंगातून अधोरेखित होतं की मार्क मूळात बीबीसी इंग्रजीचे पत्रकार होते. मात्र ते नेहमीच या गोष्टीची काळजी घ्यायचे की त्यांचं डिस्पॅच वेळेवर झालं पाहिजे. जेणेकरून बीबीसीच्या भारतीय भाषांसाठी त्यांना वेळेवर उपलब्ध करून देता यावं.
नेहमीच फील्डवरची पत्रकारिता करण्यावर होता भर
त्यांच्या वार्तांकनाचं भाषांतर होऊन त्याचं बीबीसी बांगला, हिंदी, उर्दू, तामिळ आणि नेपाळी सेवांमध्ये प्रसारण होत असे. त्यामुळेच मार्क टली दक्षिण आशियातील घराघरात पोहोचले होते. हा सन्मान बीबीसीच्या फार थोड्या पत्रकारांच्या वाट्याला आला होता.
मार्क टली यांनी भारतीय राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घटनांचं वार्तांकन केलं. संपर्कासाठी सूत्र तयार करण्यात ते निपुण होते. त्यामुळेच अनेकदा बातम्या आपोआपच त्यांच्यापर्यंत पोहोचत असत. असं असूनही ते नेहमीच फील्डवर जाऊन, संबंधित लोकांना भेटूनच वार्तांकन करणं पसंत करायचे.
आणीबाणीच्या वेळेस इंदिरा गांधींना त्यांना अटक करायची होती. त्यावेळेस ते काही काळासाठी भारत सोडून लंडनला गेले होते. त्यांनी 1978 मध्ये प्रयागराजचा कुंभमेळ्याचं व्यापक वार्तांकन केलं. नंतर त्यांनी त्यांच्या 'नो फुल स्टॉप्स इन इंडिया' या पुस्तकात कुंभमेळ्यावर एक पूर्ण प्रकरण लिहिलं.
बीबीसीच्या वार्तांकनात तथ्यांच्या प्रामाणिकपणाबरोबरच सांस्कृतिक संवेदनशीलतेवर विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळेच कुंभमेळ्यावरील प्रकरण खासकरून मला वाचण्यासाठी पाठवण्यात आलं होतं.
त्यावेळेस बीबीसीचे दिल्ली ब्युरोचे डेप्युटी ब्युरो चीफ सतीश जेकब यांच्याबरोबर मार्क टली यांचा खूपच चांगला ताळमेळ होता. दोघांनी मिळून ऑपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधीची हत्या, आसाममधील नेल्ली नरसंहार, राजीव गांधींची हत्या यासारख्या घटनांव्यतिरिक्त भारताच्या राजकारणात घडलेल्या उलथापालथीचं वस्तुनिष्ठ वार्तांकन केलं.
अनेक नोकरशहा, लष्करी अधिकारी आणि राजकारण्यांबरोबर त्यांचे वैयक्तिक संबंध होते. या संबंधांमुळे त्यांची पत्रकारिता आणखी समृद्ध झाली.
अयोध्येतील राम मंदिर आंदोलनाचं वार्तांकन
अयोध्येत जेव्हा बाबरी मशीद विरुद्ध राम जन्मभूमी वाद पेटला आणि उत्तर प्रदेश राष्ट्रीय बातम्यांच्या केंद्रस्थानी आलं, तेव्हा मार्क टली यांनी मला औपचारिकपणे बीबीसी नेटवर्कशी जोडून घेतलं.
बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 ला पाडण्याच्या घटनेचं आम्ही सोबत राहून वार्तांकन केलं होतं.
जगभरातील सर्व प्रसारमाध्यमं मोठ्या प्रमाणात उपस्थित असूनदेखील, मशीद पडण्याचीच नाही, तर 2 दिवसांनी पोलिसांनी वादग्रस्त स्थळ पुन्हा ताब्यात घेण्याची बातमी सर्वात आधी आम्हीच दिली होती.
त्याच दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1992 च्या दुपारी 12 वाजता, जेव्हा शेकडो कारसेवक बाबरी मशिदीवर चढून तोडफोड करू लागले, तेव्हा मार्क टली यांना लगेच ही बातमी पोहोचवण्याविषयी काळजी वाटू लागली. त्या काळी मोबाईल फोन नव्हते. तसंच आंतरराष्ट्रीय कॉल करणंदेखील कठीण होतं.
एक दिवस आधी विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी बीबीसीच्या वार्तांकनावर (ज्यात 1990 मध्ये बळाचा वापर केल्याचे काही जुने व्हिज्युअल होते) खुल्या व्यासपीठावरून टीका केली होती.
त्यामुळे फक्त मार्क टलीच नव्हेत, तर सर्व श्वेतवर्णीय पत्रकार कारसेवकांच्या निशाण्यावर होते. त्यामुळेच आम्हाला वार्तांकनाबरोबर स्वत:चं आणि मार्क टली यांचं संरक्षणदेखील करावं लागलं होतं.
कारसेवकांनी मशिदीवर तोडफोड करण्याबरोबर अयोध्येतील सर्व तारा तोडल्या होत्या. जेणेकरून तिथून बातम्या बाहेर जाऊ नयेत. आम्ही कारसेवकांपासून वाचत फैजाबादच्या ग्रामीण भागांमधून मध्यवर्ती तार कार्यालयात पोहोचलो होतो. बातमी फाईल करण्यात आल्यानंतर मार्क यांनी मला लखनौमध्ये काय घडतं हे, याची माहिती घेण्यास सांगितलं.
त्याचदरम्यान ते काही पत्रकारांसह पुन्हा अयोध्येला निघून गेले. या वेळेपावेतो कारसेवक आणखी नियंत्रणाबाहेर गेले होते. कारसेवकांच्या एका गटानं मार्क आणि इतर पत्रकारांना दशरथ महालच्या जवळ घेराव घालून बंदी बनवलं होतं.
सुदैवाची गोष्ट म्हणजे दशरथ महालचे महंत मार्क यांना ओळखत होते आणि त्यांनी कारसेवकांना समजावलं.
याच दरम्यान तिथे तैनात असलेले तत्कालीन एडीएम तिवारी यांना मार्क यांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. तेदेखील लगेच तिथे पोहोचले. त्यांनी कसंबसं मार्क आणि इतर पत्रकारांची सुटका करून त्यांना हॉटेलवर पोहोचवलं.
कारसेवकांचं मनोबल इतकं वाढलेलं होतं की ते आमच्या हॉटेलच्या समोर येऊन घोषणा देत होते. मात्र ते हॉटेलच्या आत आले नाहीत.
मार्क रात्रभर बीबीसीच्या सर्व आउटलेट्सला बातम्या देत राहिले. मार्क यांना सवय होती की, ते कधीही संपादक किंवा डेस्कला नाही म्हणत नसत. दुसऱ्या दिवशी लंडनहून सांगण्यात आलं की कारसेवकांचे बाईट्स पाठवा.
आम्ही बाहेर कारसेवकांमध्ये जाण्यात धोका होता. मात्र तरीदेखील मार्क रेल्वे स्टेशनवर गेले. तिथे त्यांनी परत जात असलेल्या कारसेवकांशी बोलून ते बाईट्स लंडनला पाठवले.
नंतरच्या काळात लंडनमध्ये बीबीसीच्या नवीन डायरेक्टर जनरलनं मॅनेजमेंटमध्ये केलेल्या बदलांशी मार्क टली आणि इतर अनेक वरिष्ठ पत्रकार सहमत नव्हते. याच संदर्भात मार्क यांना ब्रिटनमधील बर्मिंगहम शहरातील रेडिओ महोत्सवातील एका प्रतिष्ठित कार्यक्रमात भाषणासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं.
त्यावेळेस मार्क यांनी बीबीसीचे डायरेक्टर जनरल जॉन बर्ट यांच्या मॅनेजमेंट शैलीवर टीका करणारं जे भाषण तयार केलं, ते त्यांनी मलादेखील दाखवलं होतं.
ते भाषण लंडनच्या वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्यानं छापलं गेलं. बीबीसीच्या बातम्यांमध्येही ते मोठ्या प्रमाणात त्याचं वृत्तांकन करण्यात आलं. या वैचारिक मतभेदामुळे 1994 मध्ये मार्क टली यांनी भारतातील बीबीसीच्या ब्युरो चीफ पदाचा राजीनामा दिला. अर्थात त्यानंतर देखील ते बीबीसीसाठी लिहित राहिले आणि बोलत राहिले.
मूळात मार्क हे एक अध्यात्मिक व्यक्ती होते. त्यांनी सांगितलं होतं, त्यानुसार सुरुवातीला त्यांना पाद्री व्हायचं होतं. मात्र ते पाद्री नाही तर पत्रकार झाले. निवृत्तीनंतर अनेक वर्षे त्यांनी इंग्रजीत 'समथिंग अंडरस्टूड' हा कार्यक्रम सादर केला.
मार्कसोबत मी शेवटचं काम 2013 मध्ये प्रयागराज कुंभमेळ्यात फील्डवर केलं. त्यावेळेस त्यांनी एक प्रदीर्घ रेडिओ माहितीपट तयार केला होता. कुंभमेळ्यात शाही स्नानाचं वार्तांकन करणं अतिशय आव्हानात्मक असतं. असं असूनही वयाच्या 78 व्या वर्षी ते पहाटे लवकर तयार झाले होते.
गर्दीमुळे घाटावर पोहोचण्यास अडचण येऊ नये म्हणून ते धरण ओलांडून एका तंबूमध्ये राहिले. एकदा तर भीती वाटली की गर्दीच्या धक्काबुक्कीत ते चिरडले तर जाणार नाहीत ना. मात्र कसंतरी ते सुखरुपपणे बाहेर पडले.
दक्षिण आशियाच्या राजकारणाचे उत्तम जाणकार
अनेकदा जेव्हा एखाद्याला खोटी माहिती पसरवायची असते, तेव्हा म्हटलं जातं की, "बीबीसीवर ऐकलं आहे" किंवा "मार्क टली यांनी लिहिलं आहे."
अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या नावाचा वापर करून दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात आली. मार्क टली यांनी अनेक वेळा स्पष्टीकरण दिलं. मात्र प्रत्येक वेळेस ऐकणारे भेटतील, असं होत नाही.
नंतरच्या काळात मी जेव्हा दिल्लीला गेलो किंवा ते लखनौला आले, तेव्हा आमची भेट नक्की व्हायची. ते बऱ्याच काळापासून आजारी होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात, त्यांच्या वयाची 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फोनवर त्यांच्याशी बोलणं झालं होतं. मात्र त्यावेळेस वाटलं नव्हतं की हे संभाषण इतक्या लवकर आठवणींचा भाग बनून जाईल.
मार्क यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांचंही त्यांनी मोठ्या प्रमाणात वार्तांकन केलं होतं. त्यामुळेच त्यांना दक्षिण आशियाची उत्तम जाण होती. हादेखील योगायोगाचा भाग होता की भारताच्या कोलकाता शहरात 1935 मध्ये जन्मलेल्या मार्क टली यांचं शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी असलेलं नात कायम राहिलं.
मार्क टली यांचं भारत आणि दक्षिण आशियाबद्दलचं आकलन फक्त राजकीय किंवा प्रशासकीय स्वरुपाचं नव्हतं. त्यांनी हा प्रदेश, सामाजिक जडणघडण, सांस्कृतिक परंपरा आणि सर्वसामान्य लोकांच्या अनुभवांसह समजून घेण्याचा प्रयत्न केला.
सत्ताकेंद्रापर्यंत त्यांचा संपर्क होता. मात्र ही जवळीक कधीही त्यांच्या वार्तांकनातील तटस्थेच्या आड आली नाही. ते सत्तेतील लोकांशी संवाद ठेवायचे. मात्र बातमीच्या पातळीवर ते अंतर राखून असायचे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणताही अहंकार नव्हता. मात्र ते त्यांच्या मूलभूत तत्वांशी कधीही तडजोड करत नसत. बहुधा याच कारणामुळे मार्क टली यांना फक्त एक परदेशी पत्रकार म्हणूनच नव्हे तर या भूप्रदेशाची जाण असणारा एक संवेदनशील आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणूनही ओळखलं जातं.
साधेपणाचं उदाहरण असलेले मार्क टली
मार्क टली यांच्या व्यक्तिमत्त्वात अतिशय साधेपणा होता. ते एका घटनेतून लक्षात येऊ शकतं.
लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवरील एका मोठ्या क्लबमध्ये आत जाण्यासाठी टाय लावणं आवश्यक असतं. आम्ही लंडनमध्ये प्रवास करत असताना मार्क टाय न लावताच तिथे आले होते. तिथे लक्षात आल्यावर ते निंकोचपणे रिसेप्शनकडे गेले. तिथे त्यांनी एक टाय उधार घेतला. नंतर आम्ही डिनरसाठी आत गेलो.
दुसरी घटना, बुश हाऊस या बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या जुन्या मुख्यालयाजवळची आहे. तिथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या शेजारी चहाचं दुकान होतं. मार्क यांच्यासोबत मी, त्यांची मैत्रीण जिलियन राईट आणि बीबीसी उर्दूचे एक सहकारी होते.
चहाच्या दुकानाच्या मालकिणीला वाटलं की, मार्क एखादे प्राध्यापक आहेत. ते एक कपभर चहावर तासनतास त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत बसतात. त्यांनी बराच वेळ हुज्जत घातली की आम्ही इतरत्र जावं. शेवटी मार्क यांनी हसत समजावलं की आम्ही बीबीसीचे पत्रकार आहोत आणि थोडा बसून निघून जाऊ.
मार्क ख्रिश्चन धर्माचं श्रद्धेनं पालन करायचे. मात्र त्यांचं मत होतं की देवापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. ते प्रत्येक धर्म किंवा संस्कृतीचा आदर करायचे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)