बीबीसीचे माजी प्रतिनिधी मार्क टली यांचं निधन, भुट्टोंच्या खटल्यापासून इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत वार्तांकन करणारा पत्रकार

ज्येष्ठ पत्रकार आणि भारतातील बीबीसीचे माजी प्रतिनिधी मार्क टली यांचं रविवारी (25 जानेवारी) नवी दिल्ली येथे निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांचे माजी सहकारी सतीश जॅकब यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

त्यांनी अनेक वर्ष बीबीसीसाठी पत्रकारिता केली. बीबीसीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांनी स्वतंत्र पत्रकारिता केली.

मार्क टली यांनी भारतातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे रिपोर्टिंग केले होते. ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचे वार्तांकन त्यांनी केले होते.

ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांनी मार्क टली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी 'एक्स'वर लिहिलं की, "मार्क टली यांच्या निधनावर दुःख व्यक्त करतो. ते कदाचित त्यांच्या पिढीतील सर्वात महान रेडिओ पत्रकार होते. त्यांनी भारताला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं आणि बीबीसीला भारतात जी विश्वासार्हता मिळाली होती, ती त्यांच्या योगदानामुळेच होती."

ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनी 'एक्स'वर लिहिलं, "भारताबद्दल विशेष प्रेम असलेले आणि बीबीसीचे दिग्गज पत्रकार मार्क टली आता आपल्यात नाहीत. बीबीसीतील त्यांचे मित्र आणि दीर्घकाळ सहकारी राहिलेले सतीश जेकब यांनी फोनवरून ही दुःखद बातमी मित्रांना दिली."

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी 'एक्स'वर लिहिले, "माझ्यासारखे अनेकजण त्यांचा आवाज ऐकत आणि त्यांची पुस्तके वाचत मोठे झाले. ज्या भागात ते अनेक वर्षे राहिले आणि ज्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले, त्याच परिसरात मी राहायला गेलो. तुमचा अंतिम प्रवास मंगलमय होवो, पद्मश्री सर मार्क टली."

'एक मुलाकात' या बीबीसी हिंदीच्या विशेष कार्यक्रमात 2009 मध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अज्ञात पैलू उघड केले होते.

त्यावेळचे बीबीसी हिंदीचे भारतातील संपादक संजीव श्रीवास्तव यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. मार्क टली यांच्या मुलाखतीतील प्रश्न-उत्तरांबद्दल जाणून घेऊया.

प्रश्न - ज्यावेळेस आम्ही पत्रकारितेत येत होतो आणि कोणीही पत्रकारितेत काही करण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा त्याची तुलना तुमच्याशी किंवा अरुण शौरी यांच्याशी केली जायची. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटायचं?

उत्तर - लोक असं का म्हणायचे हे मला माहीत नाही. माझं करियर फक्त माझ्या मेहनतीतूनच घडलं होतं, असं मी म्हणणार नाही. त्यात नशीब आणि देवाची मला साथ होती.

त्याकाळी भारतात टीव्ही नव्हता किंवा फारच कमी होता. रेडिओ फक्त सरकारच्या ताब्यात होता. लोक म्हणायचे की ऑल इंडिया रेडिओ हा सरकारी रेडिओ आहे. लोकांना दुसऱ्या दृष्टीकोनातून बातम्या ऐकायच्या असायच्या. मग ते बीबीसी ऐकायचे. मी बीबीसीशी जोडलेलो होतो. त्यामुळेच मी नावलौकिकाला आलो.

प्रश्न - आजदेखील आम्ही जेव्हा श्रोत्यांमध्ये किंवा व्हीआयपींमध्ये असतो, तेव्हा लोक विचारतात की ते तुमचे मार्क टली साहेब होते, ते आता कुठे आहेत. अशाप्रकारची प्रतिष्ठा किंवा प्रतिमा तयार करणं, म्हणजे बीबीसी म्हणजे मार्क टली. असं करियर घडवल्यानंतर काय वाटतं?

उत्तर - नाही. असं काहीही वाटत नाही. असं झालं तर माझ्यामध्ये अहंकार येईल. अहंकारी असणं पत्रकारितेसाठी चांगलं नाही. मी तरुण पत्रकारांनादेखील हेच सांगतो की पत्रकारितेसाठी अहंकार हे सर्वात मोठं पाप आहे.

मी खूप मोठी स्टोरी लिहिली आहे, मी मोठा पत्रकार झालो आहे, असा विचार करणं चुकीचं आहे. उदाहरणार्थ, मी झुल्फिकार अली भुट्टो यांच्या फाशीच्या बातमींच वार्तांकन केलं होतं. ती माझी नाही तर भुट्टोंची स्टोरी होती. त्यामुळे लोक जेव्हा म्हणतात की मी खूप मोठा माणूस आहे. तेव्हा मला भीती वाटते की माझ्यात अहंकार तर येणार नाही ना.

प्रश्न - भुट्टो यांच्याप्रमाणेच तुम्ही इंदिरा गांधी हत्याकांडांचं देखील वार्तांकन केलं होतं. राजीव गांधी यांचा ट्रान्झिस्टर ऐकतानाचा फोटो. राजीव गांधी ट्रान्झिस्टरवर काय ऐकत होते, ते माहीत नाही. मात्र लोक म्हणतात की ते बीबीसी ऐकत होते?

उत्तर - मी तुम्हाला सांगू इच्छितो की ट्रान्झिस्टरवर आवाज मार्क टलीचा नाही तर सतीश जेकब यांचा होता. मी तर असं म्हणेन की सतीश जेकब यांची साथ मिळाली नसती, तर कदाचित माझं इतकं नाव झालं नसतं.

प्रश्न - आता पुन्हा सुरुवातीकडे वळूया. तुमचा जन्म भारतात झाला, मग तुम्ही लंडनला गेलात. तुमच्या आयुष्याबद्दल थोडं सांगा?

उत्तर - माझा जन्म कोलकात्यात टॉलीगंजमध्ये झाला. माझे वडील तिथे ग्लँडर रॉबर्ट्सनॉब नावाच्या कंपनीत भागीदार होते. ही कंपनी तेव्हा खूप मोठी होती. त्यांच्या ताब्यात कोळशाच्या खाणी, रेल्वे आणि विमा कंपनी असायची. माझ्या आईचा जन्म बांगलादेशातील ऑकेरा जंक्शन नावाच्या छोट्याशा ठिकाणी झाला होता. आजदेखील तिथे फक्त ट्रेननंच जाता येतं.

मी 10-15 वर्षांपूर्वी जेव्हा ऑकेरा जंक्शनला गेलो होतो, तेव्हा स्टेशन मास्तरनं मला विचारलं होतं की तुम्ही इथे का आले आहात. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या आईचा जन्म इथेच झाला आहे. त्यावर ते म्हणाले होते की मग तर तुमचा नागरी सत्कार झाला पाहिजे. मग मी तिथून पटकन काढता पाय घेतला होता.

माझं बालपण कोलकात्यातच गेलं. आम्ही भारतीय मुलांबरोबर खेळत नसू. शाळेत इंग्रज मुलांबरोबरच शिकायचो. इतकंच काय, जेव्हा मी थोडीफार हिंदी लिहिण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्यासोबत 24 तास एक आया ठेवण्यात आली. जेणेकरून मी हिंदी भाषा शिकू नये. मला सांगितलं जायचं की मी आचारी किंवा इतर नोकरांच्या जास्त जवळ जाऊ नये.

एकदा माझ्या आई-वडिलांच्या ड्रायव्हरबरोबर मी हिंदीत संख्या मोजत होतो. त्यावेळेस माझ्या आयानं मला कानशिलात लगावली आणि सांगितलं की ही तुझी भाषा नाही. त्यामुळे बालपणी मला हिंदी किंवा बंगाली भाषा शिकण्याची संधी मिळाली नाही.

प्रश्न - मग शिक्षण, शाळा-कॉलेज कुठे झालं?

उत्तर - मी इंग्लंडमध्ये एका पब्लिक स्कूलमध्ये शिकलो. ही मुलांची शाळा होती. खोड्या केल्यास किंवा नीट अभ्यास न केल्यास शिक्षक चांगला चोप द्यायचे. मग मी 2 वर्षे सैन्यातदेखील गेलो होतो. मात्र मला सैन्यातील नोकरी अजिबात आवडली नाही. मग मी केंब्रिज विद्यापीठात गेलो. तिथे मी इतिहास आणि धार्मिक शिक्षण घेतलं. मी पाद्री बनण्याचा विचार केला होता. मात्र माझं शिक्षण होऊ शकलं नाही.

मग 5 वर्षे मी दार्जिलिंगमध्ये बोर्डिंगमध्ये शिकलो. त्यानंतर मी पुन्हा इंग्लंडला गेलो. माझं वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत फक्त शिक्षण झालं. विद्यापीठात गेल्यावर एकप्रकारच्या स्वातंत्र्याची जाणीव झाली. तिथे अभ्यास फार थोडा करायचे. खेळणं-मजा करणं आणि मुलींच्या मागे पळणं असायचं.

प्रश्न - तुम्ही वयाच्या 9 व्या वर्षी कोलकात्यातून इंग्लंडला गेलात, तेव्हा कसं वाटलं?

उत्तर - मला वाटलं की मी फार वाईट ठिकाणी आलो. त्यामागे दोन-तीन कारणं होती. एक तर तिथलं हवामान फार वाईट होतं. फार थोडं ऊन पडायचं. भारतात आमच्याकडे अनेक नोकर होते. तिथे स्वत:चं काम स्वत:च करावं लागायचं. भारतात माझे अनेक मित्र होते. तिथे फारशी मैत्री नव्हती. तिथे गेल्याबरोबरच माझा शाळेत प्रवेश घेण्यात आला होता. शाळेतील शिक्षक अतिशय कडक शिस्तीचे आणि कठोर होते. दार्जिलिंगमधील आमची शाळा खूप छान होती.

प्रश्न - सैन्यातून आल्यावर केंब्रिजमध्ये इतिहास आणि थियोलॉजीचं शिक्षण घेतलं. मग बीबीसीशी कसे जोडले गेलात?

उत्तर - हेदेखील योगायोगानं झालं. मी पाद्री होण्यासाठीचं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. प्राचार्यांनी मला बोलावून सांगितलं की तू चांगला माणूस आहेस, मात्र गंभीर नाहीस. त्यामुळेच तू लोकांना उपदेश देऊ नकोस आणि पब्लिक हाऊसमध्ये राहा.

त्यानंतर मी वृद्ध लोकांना मदत करणाऱ्या एका बिगर सरकारी संस्थेत 4 वर्षे काम केलं. योगायोगानं मी एक जाहिरात पाहिली आणि बीबीसीत अर्ज केला. मात्र मला पत्रकारितेची संधी मिळाली नाही. तिथे मी पर्सोनल डिपार्टमेंटमध्ये होतो. ते कारकुनी काम होतं. एक वर्षानं मला भारतात येण्याची संधी मिळाली. भारतात जाण्यासाठी जेव्हा माझी मुलाखत झाली, तेव्हा त्यांना आशा होती की मी भारतात 9 वर्षे राहिलो आहे, त्यामुळे मला थोडीफार हिंदी येत असेल. मात्र मला फक्त लहान-सहान कविताच येत होती.

प्रश्न - मग भारतात आल्यावर पत्रकारिता करण्याची संधी कशी मिळाली?

उत्तर - भारतात मी पर्सोनल डिपार्टमेंटमध्येच आलो होतो. तिथे फारसं काम नव्हतं. मी स्वत:च पत्रकार होण्याचा निर्णय घेतला. मी टीव्ही टीमला मदत करायचो. मी सर्वात आधी स्टेट्समन विंटेज कार रॅलीमध्ये दिसलो होतो. त्यादरम्यान निर्मात्या एक महिला होत्या. त्यांना ते फार आवडलं होतं.

प्रश्न - लहानपणी तुम्ही हिंदी शिकू शकला नाहीत. नंतर इंग्लंडला गेलात. मग तुम्ही हिंदी कशी शिकलात?

उत्तर - मी हिंदी बोलण्याचा प्रयत्न तर केला होता. मात्र पत्रकारितेच्या काळात मी खूप व्यग्र झालो होतो. नियमितपणे तर मी हिंदी शिकलो नाही. मात्र वृत्तपत्र वाचून मी हिंदी शिकलो. मी नेहमीच म्हणतो की या देशासाठी ही खूप लाजिरवणी गोष्ट आहे की जेव्हाही मी एखाद्याशी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती व्यक्ती इंग्रजीतून उत्तर देते.

प्रश्न - तुम्हालाही असं वाटतं का की भलेही हिंदी राष्ट्रभाषा असेल, मात्र एक काळ असा होता की ज्या लोकांना इंग्रजी बोलता येत नव्हतं, त्यांच्यात न्यूनगंड असायचा?

उत्तर - त्या काळात जर तुम्ही लोकांशी हिंदीत बोलला, तर लोक नाराज व्हायचे. ते विचार करायचे की या माणसाला वाटतं की मला इंग्रजी येत नाही. मला वाटतं की भारताचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. मात्र हिंदी बोलणाऱ्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला पाहिजे.

प्रश्न - पत्रकार म्हणून तुम्ही अनेक बातम्यांचं वार्तांकन केलं आहे. एखादी लक्षात राहिलेली बातमी?

उत्तर - एक रंजक घटना आहे. आणीबाणीच्या काळात विद्याचरण शुक्ला माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यांनी मला बोलावलं आणि विचारलं की तुम्हा लोकांना बातम्या कुठून मिळतात. मी उत्तर दिलं की आमच्याकडे पत्रकार आहेत. आम्ही आकाशवाणीवर बातम्या ऐकतो. मग ते म्हणाले की मला वाटतं की तुम्ही हेरगिरी करता. मी त्यांना विचारलं की मी हेर असल्याचं तुम्हाला का वाटतं. त्यावर ते म्हणाले की जर तुम्ही हेर नाहीत, तर मग तुम्ही हिंदी का शिकलात?

प्रश्न - विद्याचरण शुक्ल यांना संजय गांधी यांचं निकटवर्तीय मानलं जायचं. अलीकडेच टीव्हीवर पाहिलं की वरुण गांधी प्रकरणात शुक्ला यांना कोणीतरी विचारलं की जर संजय गांधी असते तर काय केलं असतं. त्यावर शुक्ला यांचं उत्तर होतं की संजय गांधींनी वरुणला दोन थप्पड लगावल्या असत्या. तुम्हाला काय वाटतं?

उत्तर - संजय गांधी खूपच कडक स्वभावाचे होते. त्यांना वाटायचं की सर्वकाही जबरदस्तीनं ठीक करता येतं. त्यामुळेच आणीबाणी फार वाईट होती.

प्रश्न - इंदिरा गांधींना तुम्ही भेटला होता. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

उत्तर - मी इंदिरा गांधींबद्दल निश्चितपणे काहीच सांगू शकत नाही. कधी त्या खूप मैत्रीपूर्ण वागायच्या तर कधी अतिशय हातचं राखून. आणीबाणीनंतर मी एक-दोनदा डायरेक्टर जनरलसोबत इंदिरा गांधींकडे गेलो होतो. तिथे डायरेक्टर जनरलनं इंदिराजींना विचारलं की लोकांनी तुमचा पराभव केला, तुम्हाला काय वाटतं. इंदिरा गांधींचं म्हणणं होतं की अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे. बहुतांश अफवा बीबीसीनं पसरवल्या आहेत.

मी इंदिरा गांधींना शेवटचं 1983 मध्ये कॉमनवेल्थ प्राईम मिनिस्टर कॉन्फरन्समध्ये भेटलो होतो. मी त्यांची छोटीशी मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर इंदिराजींनी मला टेप रेकॉर्डर बंद करण्यास सांगितलं. त्यानंतर 10-15 मिनिटं त्या देशाच्या परिस्थितीबाबत चर्चा करत राहिल्या.

प्रश्न - आठवणीत राहिलेल्या घटनांबद्दल सांगा?

उत्तर - सर्वात शेवटची घटना अयोध्येची होती. ज्यावेळेस तिथे तोडफोड सुरू होती, त्यावेळेस मी तिथेच उपस्थित होतो. अयोध्येतून बातमी पाठवणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी लगेच फैजाबादला गेलो आणि तिथून बातमी पाठवली.

तोडफोडीची बातमी सर्वात आधी बीबीसीनं दिली होती. नंतर अयोध्या आणि फैजाबाददरम्यान काहीजणांनी आम्हाला घेरलं. माझ्यासोबत काही भारतीय पत्रकारदेखील होते. मला आणि माझ्या भारतीय पत्रकार मित्रांना एका खोलीत बंद करण्यात आलं.

प्रश्न - तुमच्या करियरमधील सर्वात कठीण असाइनमेंट?

उत्तर - मला वाटतं की झुल्फिकार अली भुट्टो यांच्या खटल्याच्या सुनावणीचं वार्तांकन खूप कठीण होतं. मी दररोज संध्याकाळी न्यायाधीशाकडे जायचो. ते मला म्हणायचे की ते मला सर्व माहिती देतील, मात्र जर बातमी आली, तर ते नाकारतील. ती माझ्यासाठी खूप कठीण परिस्थिती होती.

प्रश्न - तुमच्या करियरमधील सर्वात चांगलं वार्तांकन?

उत्तर - मला रेल्वे खूप आवडते. तो माझा आवडता विषय आहे. मी कराची ते खैबर खिंडीपर्यंतच्या रेल्वे प्रवासावर बीबीसीसाठी फिल्म बनवली. पेशावर ते खैबर खिंडीपर्यंतची ऐतिहासिक रेल्वे लाईन अनेक वर्षे बंद होती. आम्ही पाकिस्तान रेल्वेला ती सुरू करण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली.

प्रश्न - तुम्ही अनेक दशकं भारतात वार्तांकन केलं. तुमच्या दृष्टीकोनातून भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे?

उत्तर - माझ्या मते, भारताची सर्वात मोठी ताकद त्याचं स्थैर्य आहे. भारताचं सर्वात मोठं वैशिष्ट्यं म्हणजे इथे सर्व धर्माचे लोक आहेत. डोंगर आहेत, वाळवंट आहे, समुद्रकिनारे आहेत. हा देश एकजूट आहे आणि एकजूट राहील.

प्रश्न - भारताची सर्वात कमकुवत बाब काय आहे?

उत्तर - माझ्या मते सर्वात कमकुवत गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांनी ब्रिटिश राजवटीकडून प्रशासकीय व्यवस्था घेतली आणि ती अजूनही सुरू आहे.

प्रश्न - प्रशासकीय व्यवस्थेशिवाय देश कसा चालेल. कोणती व्यवस्था लागू करण्यात आली पाहिजे?

उत्तर - अजूनही इथे ठाणेदार व्यवस्था आहे. इंग्लंडमध्ये मॉडर्न पोलीस फोर्स आहे. भारतात मॉडर्न पोलीस आहेत, असं तुम्ही म्हणू शकत नाहीत. आजही तुम्हाला गावांमध्ये ही तक्रार ऐकायला मिळेल की प्रशासकीय अधिकारी त्यांचं ऐकून घेत नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आजही असंच वाटतं की त्यांना लोकांवर राज्य करायचं आहे.

प्रश्न - तुम्हाला नाईटहूड, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारा मिळाला आहे. त्याबद्दल काय वाटतं?

उत्तर - मी कधीही विचार केला नव्हती की मला हे पुरस्कार मिळतील. ब्रिटिश उच्चायुक्तांनी मला विचारलं होतं की मी नाईटहूडचा पुरस्कार घेऊ की नाही. त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की मी आधीच्या काळातील आहे, आताचा नाही. उच्चायुक्त म्हणाले की आम्ही तर तुम्हाला अजूनही याच काळातील मानतो.

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाला, तेव्हादेखील खूप छान वाटलं.

प्रश्न - तुमचे आवडते भारतीय राजकारणी?

उत्तर - चौधरी देवीलाल. ते माझे खूप चांगले मित्र होते. निवडणुकीच्या वेळेस एकदा मी त्यांच्याकडे गेलो होतो. चौधरी साहेब म्हणाले की ते खूप कंटाळले आहेत. मी विचारलं की मी तर ऐकलं आहे की जाहीरनामा तर खूपच चांगला झाला आहे. त्यावर त्यांचं उत्तर होतं, 'मूर्खा, मी किती निवडणुका लढवल्या आहेत, ते मी मोजू शकत नाही. मात्र इतकं सांगू शकतो की मी एकही जाहीरनामा वाचलेला नाही.'

चौधरी साहेबांबद्दल एक गोष्ट खूप चांगली होती. त्यांना गावा-गावांमधील प्रत्येक माणूस ओळखायचा.

दुसरे होते राजीव गांधी. ते मला खूप आवडायचे. माझ्या मते जर त्यांची हत्या झाली नसती तर भारतानं आणखी प्रगती केली असती. कारण त्यांना माहीत होतं की काय करायचं आहे.

प्रश्न - तुम्हाला क्रिकेटही खूप आवडतं. तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण?

उत्तर - मी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देतो. विशेषकरून आजच्या टीमला. मला महेंद्र सिंह धोनी खूप आवडतो. मी जेव्हा पहिल्यांदा धोनीला पाहिलं होतं, तेव्हा मी जवळपासच्या लोकांना सांगितलं होतं की तो खूप पुढे जाईल.

त्याच्याव्यतिरिक्त मला सौरभ गांगुलीदेखील खूप आवडतो. हरभजन सिंगसुद्धा आवडतो. अर्थात तो खूप उदास दिसतो.

प्रश्न - तुम्हाला हिंदी चित्रपटदेखील आवडतात. तुमचा आवडता चित्रपट कोणता?

उत्तर - मला हिंदी चित्रपट आवडतात. ओंकारा, 'तारे जमीं पर' हे चित्रपट मला आवडले होते. जुन्या चित्रपटांमध्ये मला 'नया दौर' हा चित्रपट आवडतो. मला अमरीश पुरी खूप आवडायचे. नसरुद्दीन शाह, सैफ अली खान खूप उत्तम अभिनेते आहेत. मला बोमन ईराणीदेखील आवडतात.

अमरीश पुरी यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतो. मला जेव्हा नाईटहूडचा पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाला, तेव्हा पत्रकारांनी मला विचारलं की तुमची आणखी काय इच्छा आहे.

माझी हिंदी चित्रपटात एखादी छोटीशी भूमिका करण्याची इच्छा आहे. पण त्या चित्रपटात अमरीश पुरी हवेत. पलीकडून आवाज आला, मार्क टली साहेब, मी तुमचा मित्र अमरीश पुरी बोलतो आहे. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या घटनेनंतर काही काळातच त्यांचं निधन झालं.

प्रश्न - तुमची आवडती गाणी कोणती?

उत्तर - मला 'सारे जहाँ से अच्छा...' हे गीत आवडतं. त्याशिवाय ओंकाराचं शीर्षकगीत 'ओंकारा', जुनून चित्रपटातील 'आज रंग है', परिणिताचं 'ये हवा गुनगुनाए' ही गाणी मला खूप आवडतात. लगान चित्रपटातील 'घनन घनन बरसे रे बदला' आणि झुबैदा चित्रपटातील 'धीमे-धीमे' ही गाणी देखील मला आवडतात. मुन्ना भाई एमबीबीएस या विनोदी चित्रपटातील आणि 'तारे जमीं पर' या चित्रपटातील गाणीदेखील माझी आवडती आहेत. जुन्या चित्रपटांमध्ये नया दौरमधील गाणी मला आवडतात.

प्रश्न - तुम्ही भारतात 60 च्या दशकापासून ते आतापर्यंतच्या निवडणुका पाहिल्या आहेत. भारतातील निवडणुकांमध्ये काय बदल घडला आहे?

उत्तर - खूप बदल झाला आहे. सर्वात मोठा बदल व्यवस्थेत झाला आहे. आता तर निवडणुका एक-एक महिना चालतात. आधी फक्त काँग्रेस पक्ष हाच राष्ट्रीय पक्ष होता. इतर सर्व लहान-मोठे पक्ष होते. मात्र आता दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. छोट्या राजकीय पक्षांची ताकददेखील खूप वाढली आहे.

प्रश्न - तुम्हाला काय वाटतं. इतके राजकीय पक्ष असणं भारतासाठी चांगलं आहे का?

उत्तर - फक्त एकच राष्ट्रीय पक्ष असता कामा नये. हे छोटे राजकीय पक्ष वाढल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली आहे. ती म्हणजे दलित आणि ओबीसींना संधी मिळाली आहे. देशाच्या सर्वात मोठ्या राज्याची म्हणजे उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री एक दलित महिला असेल, असा विचार 10-15 वर्षांपूर्वी कोणीही करू शकलं नसतं. हा बदल चांगला नाही, असं कोण म्हणेल.

प्रश्न - आगामी वर्षांमध्ये भारताच्या वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

उत्तर - आगामी काळात भारताची आर्थिक प्रगती वेगानं होईल. राजकीय व्यवस्थेत सुधारणा होईल. मात्र या सुधारणा तेव्हाच होतील, जेव्हा सर्वसामान्य लोक आवाज उठवतील.

प्रश्न - तुमच्या हितचिंतकांनी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात?

उत्तर - भारतातील आर्थिक सुधारणांवर मी सध्या एक पुस्तक लिहितो आहे. माझ्या मते हे माझं शेवटचं पुस्तक असेल. त्यानंतर मी निवृत्त होईन.

(हा लेख 05 एप्रिल 2009 ला पहिल्यांदा बीबीसीवर प्रकाशित झाला होता. ही मुलाखत त्यावेळचे बीबीसी हिंदीचे भारतातील तत्कालीन संपादक संजीव श्रीवास्तव यांनी घेतली होती.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.