अमेरिकेतली मतमोजणी पूर्ण, ट्रम्प यांनी अ‍ॅरिझोना जिंकले; ट्रम्प यांना एकूण 312 मतं

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा विजय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील.

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले होते. यंदाच्या विजयानंतर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

ट्रम्प यांना 312 इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली आहेत, तर कमला हॅरिस यांना 226 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत केवळ सर्व सात स्विंग राज्यं जिंकली असं नाही तर त्यांनी अंतिम इलेक्टोरल कॉलेज मतंही जिंकली आहेत, असं चित्र ॲरिझोनामधील अंदाजित निकालातून स्पष्ट होतं आहे.

दक्षिण-पश्चिम राज्यात चार दिवसांच्या मतमोजणीत, ॲरिझोना हे सर्वात शेवटचं होते ज्याचा निकाल लागला आणि मतदारांनी कोणाला कौल दिला याची घोषणा झाली.

यात ट्रम्प यांनी त्यांची सर्व 11 इलेक्टोरल कॉलेज मते जिंकली, म्हणजेच ट्रम्प यांना एकूण 312 मते मिळाली तर कमला हॅरिस 226 मतांवर राहिल्या.

अमेरिकेत एकूण 538 इलेक्टोरल मते आहेत, बहुमतासाठी 270 मते आवश्यक असतात.

विजय निश्चित झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडात भाषण केले. त्यानंतर त्यांचे समर्थक गोळा होण्यास सुरुवात झाली आहे.

ट्रंप आपल्या फ्लोरिडातील प्रचार मुख्यालयात येतील, तसेच उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हेन्सही तिथं येण्याची शक्यता आहे.

'ट्रम्प यांचं ऐतिहासिक कमबॅक'

उत्तर अमेरिकेतील बीबीसीचे प्रतिनिधी अँथनी झर्चर यांचं विश्लेषण :

"हिलरी क्लिंटन यांच्या अनपेक्षित पराभवानंतर आठ वर्षांनी आणि जो बायडन यांच्या विजयाच्या चार वर्षांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा विजय मिळवून दाखवला आहे.

"जो बायडन यांच्याविरुद्ध झालेल्या नामुष्कीजनक पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या सर्वोच्च सत्तास्थानापर्यंत मजल मारली आहे. प्रचारसभांमधल्या भाषणात ट्रम्प अनेकवेळा गडबडलेले दिसले पण त्यांनी स्वतःभोवती जाणकार आणि अनुभवी कर्मचारी नेमलेले होते.

"सर्वेक्षणांमधून असं दिसून आलं आहे की, अमेरिकन मतदारांनी दोन मुद्द्यांवर ट्रम्प यांच्यावर विश्वास दाखवला. हे दोन मुद्दे म्हणजे अर्थव्यवस्था आणि इमिग्रेशन. ट्रम्प यांच्या प्रचारकार्यात गुंतलेल्या टीमने हा मुद्दा पुन्हा पुन्हा लोकांच्या मनावर ठसवला.

"निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डेमोक्रॅटिक पक्षाने बायडन यांच्या जागी कमला हॅरिस यांना उमेदवारी दिल्यानंतर अचानक बदललेली ही परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प यांच्या टीमचा गोंधळ झाला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षविरोधात असलेलं जनमत ओळखून पुन्हा एकदा सत्तेचा सोपान गाठला आहे.

"आता त्यांच्याकडे शासन करण्यासाठी आणखी चार वर्षे आहेत - यावेळी त्यांच्या मागे एक अधिक विकसित राजकीय संघटना आहे, त्यांच्या प्रचारातील आश्वासनांना कृतीत रुपांतरित करण्यास उत्सुक आहे."

पंतप्रधान मोदींनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट लिहून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.

मोदींनी लिहिलं की, "निवडणुकीतील ऐतिहासिक विजयासाठी माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन."

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "तुमच्या मागील काळात केलेल्या यशस्वी कामांप्रमाणेच, मी भारत आणि अमेरिका यांच्यातील जागतिक आणि रणनीतीक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमधील संबंध पुढे नेण्यास उत्सुक आहे. चला आपण मिळून आपल्या लोकांच्या कल्याणासाठी, जागतिक शांततेसाठी, स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी काम करूया."

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कसा ठरतो?

राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्टोरल कॉलेजची मतं जिंकण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात.

अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत.

अशी एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स संपूर्ण अमेरिकेत मिळून आहेत. ज्या उमेदवाराला 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं मिळतात, तो जिंकतो.

म्हणजे जेव्हा एखादा अमेरिकन मतदार त्याच्या आवडत्या उमेदवाराला मत देतो तेव्हा ते राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेसाठी नसून राज्यपातळीसाठी असतं.

एखाद्या राज्यात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याच्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीची सगळी इलेक्टोरल व्होट्स जमा होतात. अमेरिकेतली दोन राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हा नियम आहे.

त्याचा परिणाम म्हणजे देशभरातून सर्वांत जास्त मतं मिळवणारा उमेदवार विजेता ठरतोच, असं नाही. 2016साली हिलरी क्लिंटन यांच्याबाबत असंच घडलं होतं. त्यांना देशाचा विचार करता ट्रंप यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती, पण त्यांना 270 इलेक्टोरल व्होट्स मात्र मिळाली नाहीत.

बहुतेक राज्य अशी आहेत जिथे पारंपरिकरित्या मतदारांचा कल हा दोनपैकी एकाच कुठल्यातरी पक्षाकडे जास्त असतो. म्हणूनच मग उमेदवार सहसा अशा डझनभर राज्यांवर आपलं लक्ष केंद्रित करतात, जिथे दोन्ही उमेदवारांना जिंकण्याची संधी असते.

या राज्यांना 'बॅटलग्राऊंड स्टेट्स' म्हटलं जातं. यांनाच 'स्विंग स्टेट्स' (Swing States) असंही म्हणतात, कारण त्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते.

कमला हॅरिस : वकील ते डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा आहेत. एक वेळा यशस्वी झाले तर एक वेळा जो बायडन यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली आणि आता ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी अमेरिकेला सर्वपरिचित अब्जाधीश अशी त्यांची ओळख होती.

'न्यूयॉर्क रिअल इस्टेटचा बादशाह' म्हणून बिरूदावली मिळवलेला हा उद्योगपती 2015 - 16 ला पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याआधी टॅबलॉईड्स आणि टीव्हीवर विविध कारणांसाठी झळकलेले दिसायचे.

श्यामला यांनी त्यांच्या दोन्ही मुली कमला आणि माया यांना भारतीय संस्कृतीचा वारसा जपत लहानाचं मोठं केलं. आईबरोबर कमला अनेकदा भारतातही येत होत्या.

पण, तसं असलं तरी त्यांनी अमेरिका आणि आफ्रिकेची संस्कृतीही स्वीकारली होती. मुलींनाही त्यांनी तशी संमिश्र शिकवण दिली. त्यामुळं लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टीकोन त्यांना मिळत गेला.

कमला यांनी त्यांच्या 'द ट्रुथ वी होल्ड' नावाच्या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केल आहे.

"माझ्या आईला चांगल्या प्रकारे जाणीव होती की, ती दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवत आहेत.आपण ज्या भूमीचा स्वीकार केला आहे, ती आपल्या मुलींकडे कृष्णवर्णीय मुली म्हणूनच बघेल हेही त्यांना माहिती होती. त्यामुळं आम्ही आत्मविश्वासपूर्ण कृष्णवर्णीय महिला बनावं याची काळजी त्यांनी घेतली."

कमला यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या आई श्यामला गोपालन यांचा जन्म चेन्नईत झाला होता.

1958 मध्ये न्यूट्रिशन आणि एंडोक्रनॉलोजीमध्ये पीएचडी करण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या. नंतर ब्रेस्ट कॅन्सरच्या क्षेत्रात त्या संशोधक बनल्या होत्या.

कमला यांचे आजोबा पी. व्ही. गोपालन भारत सरकारचे वरिष्ठ राजदूत होते.

डोनाल्ड ट्रम्प: रिअल इस्टेटचा बादशाह ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा आहेत. एक वेळा यशस्वी झाले तर एक वेळा जो बायडन यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली आणि आता ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी अमेरिकेला सर्वपरिचित अब्जाधीश अशी त्यांची ओळख होती.

'न्यूयॉर्क रिअल इस्टेटचा बादशाह' म्हणून बिरूदावली मिळवलेला हा उद्योगपती 2015 - 16 ला पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याआधी टॅबलॉईड्स आणि टीव्हीवर विविध कारणांसाठी झळकलेले दिसायचे.

घराघरात पोहोचलेले त्यांचे नाव आणि आपल्या बिनधास्त प्रचाराच्या शैलीमुळे त्यांनी कसलेल्या राजकारण्यांचा पराभव केला. पण त्याचवेळी त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा काळ वादग्रस्त ठरला.

2020 सालच्या पुढच्या निवडणुकीतही ते रिपब्लिकन पक्षातर्फे उभे राहिले. पण यावेळी मात्र डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला.

आता 4 वर्षांनी 78 वर्षांचे डोनाल्ड ट्रम्प सलग तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

त्यांनी प्रचारात पुरेशी वातावरण निर्मिती तर केली आहे. पण त्यांचं हे दमदार पुनरागमन त्यांना परत एकदा व्हाईट हाऊसमध्ये विराजमान व्हायला पुरेसं ठरेल का याचा निर्णय लवकरच होईल.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.