You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गन पॉलिसी, गांजा, स्थलांतरीत यासह 'ही' आहेत हॅरिस आणि ट्रम्प यांनी मतदारांना दिलेली आश्वासनं
- Author, टॉम जिओगेगन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत होत आहे.
निवडणुकीनंतर या दोघांपैकी एकजण अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेईल. मात्र, त्याआधी दोघांनी सत्तेत आल्यावर काय करणार याबाबत काही आश्वासनं दिली आहेत.
त्यात महागाई, कर, गर्भपात, स्थलांतर, परराष्ट्र धोरण, व्यापार, हवामान बदल, आरोग्य, कायदा सुव्यवस्था, गन पॉलिसी, गांजा या मुद्द्यांचा समावेश आहे. ही ती आश्वासनं काय आहेत हे जाणून घेऊयात.
महागाई
कमला हॅरिस - हॅरिस यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी अन्न आणि घरांच्या किमती कमी करण्याला प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन दिलं.
किराणा मालावरील किमतीत वाढ करण्यावर बंदी घातली जाईल, पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना मदत केली जाईल, घरांचा पुरवठा वाढवला जाईल आणि किमान वेतन वाढवलं जाईल, अशी आश्वासनं हॅरिस यांनी दिली.
जो बायडन अध्यक्ष असताना अमेरिकेत महागाई वाढली आहे. या काळात अनेक पाश्चात्य देशांमध्येही महागाई वाढली आहे. कोविडनंतरच्या पुरवठ्यातील अडचणी आणि युक्रेन युद्ध याचा महागाईवर परिणाम झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प - ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यावर महागाई संपवण्याचं आणि पुन्हा अमेरिकेला परवडणारा देश करण्याचं आश्वासन दिलं आहे. इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी अधिक प्रमाणात तेलाचे साठे शोधू, असंही त्यांनी नमूद केलं.
याशिवाय ट्रम्प यांनी व्याजदरही कमी करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे हे असं आश्वासन आहे जे पूर्ण करणं अध्यक्षांच्या नियंत्रणात नसतं. ज्या विस्थापितांकडे कागदपत्रे नाहीत त्यांना अमेरिकेतून बाहेर हकललं जाईल आणि त्यामुळं घरांच्या उपलब्धतेवर आलेला ताण कमी होईल, असंही त्यांनी नमूद केलं.
आयातीवर अधिक कर लावल्याने अमेरिकेत वस्तूंच्या किमती वाढू शकतात, असा इशारा अर्थशास्त्रज्ञांनी दिला आहे.
कर
कमला हॅरिस - हॅरिस मोठ्या उद्योजकांवर आणि वर्षाला 4 लाख अमेरिकन डॉलर (3 कोटी 36 लाख 38 हजार रुपये) उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवरील कर वाढवण्याचा विचार करत आहेत.
त्यांनी सामान्य नागरिकांवरील कराचा बोजा कमी करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचंही म्हटलं. यात चाईल्ड टॅक्स क्रेडिटचा विस्तार करण्याचाही समावेश आहे.
भांडवली नफा कराबाबत हॅरिस यांनी बायडन यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी भांडवली नफा कर 23.6 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत करत मध्यम वाढीचे समर्थन केले. बायडन यांची भांडवली नफा कराबाबतची भूमिका 44.6 टक्के इतकी होती.
डोनाल्ड ट्रम्प - ट्रम्प यांनी ट्रिलियन्स डॉलरच्या घरात कर कपातीचं आश्वासन दिलं आहे. याआधी 2017 च्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी कर कपातीचा सर्वाधिक फायदा मुख्यतः श्रीमंतांना झाला होता.
यासाठी ट्रम्प उच्च वाढ आणि आयातीवरील शुल्क याचा वापर करणार आहेत. मात्र, या दोन्ही कर योजनांमुळे 'बलूनिंग' तूट वाढेल, असं विश्लेषक सांगतात.
गर्भपात
कमला हॅरिस - हॅरिस यांनी गर्भपाताच्या अधिकाराचा मुद्दा त्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला आहे. तसेच देशात यासाठी कायदा करण्याचीही त्या वकिली करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प - गर्भपाताच्या अधिकाराच्या मुद्द्यावर निश्चित भूमिका घेण्यात ट्रम्प चाचपडताना दिसत आहेत.
ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नियुक्त केलेले तीन न्यायाधीशांनीच गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रद्द करण्यात निर्णायक भूमिका निभावली होती.
रद्द केलेला 1973 चा निर्णय रो विरुद्ध वेड म्हणून ओळखला जात होता. या निर्णयानुसार अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार बहाल केला होता. मात्र, ट्रम्प यांच्या काळात तो रद्द करण्यात आला.
स्थलांतर
कमला हॅरिस - याआधी हॅरिस यांच्यावर अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरील संकटामागील मूळ कारणं हाताळण्याचं काम सोपविण्यात आलं होतं. त्यांनी उत्तरेकडील प्रवाह रोखण्यासाठी प्रादेशिक गुंतवणूक करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खासगी निधी उभारण्यास मदत केली होती.
वर्ष 2023 च्या अखेरीस मेक्सिकोमधून विक्रमी लोकांनी अमेरिकेत स्थलांतर केले होते. मात्र, त्यानंतर ही संख्या चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. या प्रचारात हॅरिस यांनी या मुद्द्यावर अधिक ठोस भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये सरकारी वकील म्हणून मानवी तस्करीवर केलेल्या कामाच्या अनुभवावरही अधोरेखित केला.
डोनाल्ड ट्रम्प - ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्याचं काम पूर्ण करून सीमा बंद करण्याची आणि सीमेवर अधिक सैन्य तैनात करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच हॅरिस यांचा पाठिंबा असलेल्या क्रॉस-पार्टी इमिग्रेशन बिलचाही मुद्दा उपस्थित केला.
अमेरिकेच्या इतिहासात कधीही झाले नाही इतक्या मोठ्या प्रमाणात कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना हद्दपार केलं जाईल, असंही आश्वासन ट्रम्प यांनी दिलं आहे. तज्ज्ञांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या या धोरणाला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागेल.
परराष्ट्र धोरण
कलमा हॅरिस - हॅरिस यांनी युक्रेनला रशियाविरोधातील युद्धात जेवढा काळ पाठिंबा लागेल तोपर्यंत पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. तसेच निवडून आल्यास 21 व्या शतकातील स्पर्धा चीन नव्हे, तर अमेरिका जिंकेल, असंही म्हटलं.
हॅरिस यांनी मोठ्या काळापासून इस्त्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यातील वादावर द्विराष्ट्रवादाची भूमिका घेतली आहे. तसेच गाझामधील युद्ध संपविण्याचे आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प - ट्रम्प यांचं परराष्ट्र धोरण अलिप्ततावादी आहे. अमेरिकेने जगातील इतरत्र सुरू असलेल्या युद्धांपासून दूर रहावं असं त्यांना वाटतं.
त्यांनी रशियाशी वाटाघाटी करून 24 तासांमध्ये युक्रेनमधील युद्ध संपवलं असतं, असं ट्रम्प सांगतात. मात्र, असा पाऊल उचलल्याने व्लादिमीर पुतिन यांना प्रोत्साहन मिळेल, असं डेमोक्रॅट्सचं म्हणणं आहे.
प्रचारात ट्रम्प यांनी स्वतःला इस्रायलचा कट्टर समर्थक म्हटलं आहे. मात्र, गाझामधील युद्ध कसं संपवायचं याबद्दल त्यांनी पुरेशी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
व्यापार
हॅरिस यांनी आयातीवर शुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेवर टीका केली आहे. या निर्णयामुळे कामगार सदस्य असलेल्या कुटुंबांवर दरवर्षी 4 हजार अमेरिकन डॉलरचा भार पडेल असं हॅरिस यांनी म्हटलं आहे.
बायडेन-हॅरिस प्रशासनाने चीनच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आयातीवर जो कर लावला होता तोच कमला हॅरिस कायम ठेऊ इच्छित आहेत.
ट्रम्प यांनी अमेरिकन उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी बाहेर देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लावण्याची भूमिका घेतली आहे. हाच त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू राहिला आहे. बहुतेक आयात केलेल्या परदेशी वस्तूंवर 10-20 टक्के कर लावावा आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर त्यापेक्षा जास्त कर लावावा, असंही ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
याशिवाय त्यांनी कॉर्पोरेट कराचा दर कमी देऊन कंपन्यांना अमेरिकेत राहून वस्तू तयार करण्यासाठी प्रवृत्त केले जाईल, असंही आश्वासन दिलं आहे.
हवामान
हॅरिस उपाध्यक्ष असताना त्यांनी चलनवाढ कमी करण्याचा कायदा पास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहन कर क्रेडिट आणि सवलत योजनांसाठी शेकडो अब्ज डॉलर्स खर्च केले गेले.
असं असलं तरी पर्यावरणवाद्यांचा विरोध असलेल्या नैसर्गिक वायू आणि इंधन काढण्यासाठीच्या फ्रॅकिंग तंत्राला असणारा विरोध हॅरिस यांनी सोडला आहे.
ट्रम्प यांनी अध्यक्ष असताना पॉवर प्लांट्स आणि वाहनांमधून उत्सर्जन होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडवरील मर्यादांसह शेकडो पर्यावरणीय उपाययोजना मागे घेतल्या होत्या.
या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी आर्क्टिक ड्रिलिंग योजनेचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच इलेक्ट्रिक कारवर हल्ला केला आहे.
आरोग्यसेवा
हॅरिस उपाध्यक्ष असताना त्यांच्या सरकारने औषधांच्या किमती कमी केल्या होत्या आणि इन्सुलिनच्या किमती 35 अमेरिकन डॉलरच्या वर जाणार नाहीत, अशी मर्यादा घातली होती.
ट्रम्प यांनी अनेकदा परवडणाऱ्या आरोग्य सेवेचा कायदा मोडून काढण्याचं वक्तव्य केलं आहे. निवडून आल्यास या योजनेत सुधारणा करू, असं ते म्हणत आहेत. मात्र, नेमकी काय सुधारणा करणार याचे तपशील ते देताना दिसत नाहीत. परवडणाऱ्या आरोग्य सेवा कायद्यामुळे अमेरिकेतील लाखो लोकांना आरोग्य विमा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
ट्रम्प यांनी करदात्यांच्या पैशातून प्रजननविषयक उपचार देण्यावर जोर दिला आहे. मात्र, त्याला अमेरिकन संसदेत रिपब्लिकन सदस्यांकडूनच विरोध होऊ शकतो.
कायदा आणि सुव्यवस्था
हॅरिस यांनी त्यांचा सरकारी वकील म्हणून केलेल्या कामाचा अनुभव सांगत ट्रम्प यांना एका प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
ट्रम्प यांनी ड्रग्जचं जाळं नष्ट करण्याचं, गुन्हेगारी टोळ्यांचा हिंसाचाराला चिरडून टाकण्याचं आणि डेमोक्रॅटिक पक्षांची सत्ता असलेल्या शहरांची पुनर्बांधणी करण्याचं आश्वासन दिलं आहे. या शहरांमध्ये गुन्हेगारी बोकाळली आहे, असाही आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेतील अंतर्गत शत्रु, कट्टरपंथी डावे यांनी निवडणुकीत अडथळा आणला, तर या विरोधकांचा बिमोड करण्यासाठी सैन्य किंवा नॅशनल गार्ड, एक राखीव दलाचा वापर केला जाईल, असंही ट्रम्प म्हणत आहेत.
गन पॉलिसी
हॅरिस यांनी बंदुकांचा वापर करून होणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्याचं आश्वासन दिलं आहे. त्या स्वतः आणि टिम वॉल्झ दोन्ही बंदूक मालकांनी अनेकदा कठोर कायद्यांचं समर्थन केलं आहे. असं असलं तरी बंदूक परवाना देण्याआधी संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्यासाठी किंवा प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालण्यासाठी त्यांना काँग्रेसची मदत घ्यावी लागेल.
ट्रम्प यांनी स्वतःला शस्त्र बाळगण्याच्या घटनात्मक अधिकारांचे (दुसरी घटना दुरुस्ती) कट्टर समर्थक म्हटलं जातं.
मे महिन्यात झालेल्या नॅशनल रायफल असोसिएशनसमोर बोलताना त्यांनी स्वतःला नॅशनल रायफल असोसिएशनचा मित्र म्हटलं होतं.
गांजा
हॅरिस यांनी कमी प्रमाणात गांजा आढळला तर त्याचं गुन्हेगारीकरण करण्यावर भाष्य केलं आहे. अनेक लोकांना असा कमी गांजा सापडला तरी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. यात कृष्णवर्णीय आणि लॅटिन नागरिकांची संख्या मोठी आहे, असं हॅरिस अधोरेखित करतात.
ट्रम्प यांनीही यावर आपली भूमिका सौम्य केली आहे. तसेच वैयक्तिक वापरासाठी अल्प प्रमाणात गांजा आढळला म्हणून होणाऱ्या अटक आणि तुरुंगवासाला थांबवण्याची भूमिका घेतली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)