You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो? कोणकोणत्या सुविधा असतात?
जगभरातील राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रप्रमुखांची जीवनशैली, त्यांची अधिकृत निवासस्थानं, त्यांना पुरवली जाणारी सुरक्षा व्यवस्था, त्यांना मिळणाऱ्या इतर आलिशान सुविधा आणि त्यांना मिळणारा पगार या सर्व गोष्टींबद्दल जगभरातील सर्वसामान्य माणसांना प्रचंड कुतूहल असतं. ही गोष्ट स्वाभाविकच आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नेमका किती पगार मिळतो? या प्रश्नाचं उत्तर या लेखात जाणून घेऊया.
राष्ट्राध्यक्षांना नेमका किती पगार मिळतो?
जर कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर त्यांच्या पगारात दुपटीने वाढ होईल.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांना सध्या दरवर्षी 2,35,100 डॉलर्स इतका पगार मिळतो. जर त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर त्यांच्या पगारात जवळपास दुपटीनं वाढ होईल. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा पगार वर्षाला 4,00,000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 3.36 कोटी रुपये इतका आहे.
डोनाल्ड ट्रम्प 2016 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. पण ते पूर्ण पगार घेत नसत. पगार म्हणून ते केवळ 1 डॉलर घ्यायचे.
त्यांना पगारातून मिळणारी रक्कम ते विविध सरकारी विभाग आणि यंत्रणांना देणगी म्हणून देत.
2019 च्या चौथ्या तिमाहीत ट्रम्प यांनी त्यांचा पगार आरोग्य आणि मानवी सेवा विभागाला दान केला होता.
कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी ही रक्कम दान केली होती, असं त्यावेळेस व्हाईट हाऊसच्या प्रसारमाध्यम सचिवांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांची स्वत:ची मालमत्ता देखील प्रचंड आहे. फोर्ब्सनुसार ते जवळपास 3 अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर नियुक्ती होणारे ते आतापर्यंतचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते.
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना दरवर्षी 4,00,000 डॉलर्सचा ( 3 कोटी 36 लाख रुपये) पगार मिळतो. शिवाय इतर भत्ते देखील मिळतात.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पगाराची विभागणी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पगार आणि त्यांना मिळणारे भत्ते याकडे पाहूया.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळणारा वार्षिक पगार - 4,00,000 डॉलर्स
त्यांना मिळणारे इतर भत्ते -
कपडे इत्यादी खर्चासाठी - 50,000 डॉलर्स प्रति वर्ष
मनोरंजनासाठी - 19,000 डॉलर्स
निवड झाल्यावर राष्ट्राध्यक्ष जेव्हा पहिल्यांदाच व्हाईट हाऊस मध्ये येतात तेव्हा व्हाईट हाऊसच्या दुरुस्ती, सुशोभीकरणासाठी - 1,00,000 डॉलर्स
व्हाईट हाऊसमधील निवासाव्यतिरिक्त, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इतर कर्मचारी वर्ग देखील पुरवला जातो. यात स्वयंपाकी, बागकाम करणारे सहायक आणि इतर नोकर चाकर, यांचा त्यात समावेश असतो.
याशिवाय राष्ट्राध्यक्षांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते. खास राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या आलिशान आणि अतिशय सुरक्षित अशा कारमधून ते प्रवास करतात.
मरिन वन हे अती सुरक्षित आणि विशेष हेलिकॉप्टर त्यांच्या दिमतीला असतं.
तर एअर फोर्स वन या जगातील सर्वात आधुनिक आणि आलिशान सुविधा असलेल्या विमानानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगभरात प्रवास करतात.
त्याचबरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दरवर्षी 1,00,000 डॉलर्सचा करमुक्त प्रवास भत्ता देखील मिळतो.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पगारातील वाढ
1789 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पगारात फक्त पाच वेळा बदल झाला आहे.
सुरूवातीच्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दरवर्षी 25,000 डॉलर्स पगार मिळत होता. आजच्या चलनाशी तुलना करता आणि महागाई दराचा विचार करता ती रक्कम जवळपास 8,95,700 इतकी होते.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पगार देण्यामागे भ्रष्टाचाराला आळा घालण्याची कल्पना होती.
राष्ट्राध्यक्षांच्या पगारातील शेवटी वाढ 2001 मध्ये झाली होती. त्यावेळेस अमेरिकेच्या संसदेनं राष्ट्राध्यक्षांचा पगार दुपटीनं वाढवून तो 2,00,000 डॉलर्स वरून 4,00,000 डॉलर्स इतका केला होता.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पगारात आतापर्यंत झालेली वाढ:
1789: 25,000 डॉलर्स प्रति वर्ष
1873: 50,000 डॉलर्स प्रति वर्ष
1909: 75,000 डॉलर्स प्रति वर्ष
1949: 1,00,000 डॉलर्स प्रति वर्ष
1969: 2,00,000 डॉलर्स प्रति वर्ष
2001: 4,00,000 डॉलर्स प्रति वर्ष
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत 1 टक्का लोकांमध्ये येतात का?
जर, आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पगाराचा विचार केला तर त्या उत्पन्नानुसार त्यांचा समावेश अमेरिकेतील सर्वात श्रीमंत 1 टक्का लोकांमध्ये होत नाही.
राष्ट्राध्यक्षांचा पगार त्या तुलनेत फारच कमी आहे. कारण अमेरिकेतील सर्वात श्रीमंत 1 टक्का लोकांचं वार्षिक उत्पन्न 7,88,000 डॉलर्स आहे.
मात्र, असं असलं तरी अमेरिकेतील सरासरी वार्षिक उत्पन्नापेक्षा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पगार कितीतरी अधिक आहे. अमेरिकेतील सरासरी वार्षिक पगार किंवा उत्पन्न वर्षाकाठी 63,795 डॉलर्स आहे. त्या तुलनेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पगार सहापट अधिक आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पगारासंदर्भातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, जेव्हा त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपतो, तेव्हापासून त्यांचा मृत्यू होईपर्यंत अमेरिकन सरकार त्यांना एक प्रकारंच पेन्शन देत राहतं.
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना दरवर्षी पेन्शन म्हणून जवळपास 2,44,000 डॉलर्स मिळतात.
याशिवाय त्यांना खास सुरक्षा देखील पुरवली जाते. त्याचबरोबर मोफत आरोग्य सेवा दिल्या जातात आणि अधिकृत प्रवास देखील मोफत असतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.