वर्ल्ड कप 2023: अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करणं किती कठीण?

    • Author, अभिजित श्रीवास्तव
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

विश्वचषक 2023 चा दुसरा उपांत्य सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळला गेला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचं दमदार पुनरागमन झालं.

या उपांत्य फेरीत नाणेफेक जिंकून आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी आफ्रिकन संघाला मिचेल स्टार्क आणि जोस हेझलवूड यांनी दिलेल्या सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आलं नाही. डेव्हिड मिलरने शतक ठोकून देखील त्यांना केवळ 212 धावा करता आल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे चार फलंदाज अवघ्या 24 धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले तेव्हा सामना महत्वाच्या वळणावर आला होता.

यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर आला होता. मात्र, डेव्हिड मिलरने एका टोकाची जबाबदारी सांभाळत धावसंख्या जेमतेम 100 वर नेली.

ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा ज्या वेगाने डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने धावा काढायला सुरुवात केली, तेव्हा लवकरच ऑस्ट्रेलियाचं पारड जड होईल असं वाटत होतं..

पण ही जोडी जेव्हा फुटली तेव्हा ऑस्ट्रेलियाने एकामागून एक सात विकेट गमावल्या. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी त्यांना सहजासहजी धावा काढू दिल्या नाहीत. ऑस्ट्रेलियन संघाला प्रत्येक धावांसाठी संघर्ष करावा लागला.

या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सुरुवात सलग दोन पराभवांनी झाली. पहिल्यांदा भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आणि दुसऱ्या वेळी दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी पराभव केला.

पण पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुढचा एकही सामना गमावला नाही आणि सलग आठ विजयांसह अंतिम फेरी गाठली.

कर्णधार काय म्हणाले?

सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सांगितलं की, डग आउटमध्ये बसणं सोपं नसतं. पण काही तास खूप चिंताजनक होते. अतिशय दमदार प्रयत्न केल्यामुळे हा एक उत्तम सामना ठरला. आम्हाला वाटलं की खेळपट्टी चांगली स्पिन करेल. ट्रॅव्हिस हेडकडे विकेट घेण्याची क्षमता आहे. संपूर्ण स्पर्धेत वेगवेगळ्या गोलंदाजांनी योगदान दिलं."

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्याची मी आतुरतेने वाट पाहतोय असं कमिन्सने सांगितलं.

तो म्हणाला, "आमच्यापैकी काहीजण याआधी विश्वचषक खेळले आहेत आणि ही संघासाठी चांगली गोष्ट आहे. 2015 चा विश्वचषक सामना संस्मरणीय होता. आता आणखी एक विश्वचषक, आणि तो ही भारतात, त्यामुळे वाट बघणं अवघड आहे."

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणाला, "आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी ज्या पद्धतीने हल्ला केला, त्यामुळे आमच्या टॉप ऑर्डरला धक्का बसला. त्यांनी आमच्यावर पूर्ण दबाव आणला."

सामना संपल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेला ट्रॅव्हिस हेड म्हणाला, "खूप तणावपूर्ण शेवट होता. आम्हाला माहित होतं की ही खेळपट्टी कशी असेल. पण इतकी स्पिन असेल असं मला वाटलं नव्हतं."

भारतीय संघासोबतच्या अंतिम सामन्याबाबत हेड म्हणाला, "त्यांचं आक्रमण जबरदस्त आहे."

या आधी काय काय झालं आहे?

ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून कधीही पराभूत झालेला नाही.

1999 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत खेळलेला सामना बरोबरीत सुटला होता, तर 2007 आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ जिंकला होता.

दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळत आहे. आतापर्यंत त्यांना एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही.

डेव्हिड मिलर विश्वचषकाच्या नॉकआउट मध्ये शतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला. त्याने 2015 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध फाफ डू प्लेसिसने केलेल्या 82 धावांचा विक्रम मोडला होता.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्लेच्या पहिल्या 10 षटकात केवळ 80 धावा केल्या. या विश्वचषकात पॉवरप्ले दरम्यान केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

भारताला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी

भारताला रविवारी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकण्याची तिसरी संधी आहे.

भारतीय संघाने अखेरचा विश्वचषक 12 वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करून जिंकला होता.

1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच हा प्रतिष्ठित चषक जिंकला होता.

पण ऑस्ट्रेलियावर मात करणं तितकं सोपं नाहीये.

ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत त्याच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता, ज्यांच्याविरुद्ध दुसऱ्या साखळी सामन्यात त्यांना 134 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.

आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला अंतिम फेरीत आमनेसामने येतील.

2003 च्या अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

ऑस्ट्रेलियाने आठ वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे आणि पाच वेळा हा चषक जिंकला आहे.

भारत चौथ्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे. भारताने दोनदा हा चषक जिंकला आहे. 2003 साली भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियानेच भारताचा पराभव केला होता.

त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा 125 धावांनी पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.

गुरुवारी जेव्हा ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर '2003 WC' पुन्हा एकदा ट्रेंड करू लागलं.

अनेक यूजर्सने लिहिलंय की, "अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून, आम्ही 2003 चा हिशोब निकालात काढू."

एकदिवसीय सामन्यात असते चुरशीची लढत

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड फारसा उत्साहवर्धक नाहीये.

दोन्ही संघ आतापर्यंत 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ऑस्ट्रेलियाने 83 वेळा भारताला पराभूत करून विजय मिळवला आहे. तर भारत 57 वेळा विजयी झाला आहे.

विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 13 सामने खेळले आहेत आणि इथेही ऑस्ट्रेलिया 8-5 ने पुढे आहे.

पण भारतीय भूमीवर होत असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे.

इथे खेळलेल्या 71 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 33 सामने सामने जिंकले आहेत.

शिवाय या वर्षी या दोन्ही संघांमध्ये झालेल्या 7 सामन्यांवर नजर टाकली तर भारताने चार सामने जिंकून थोडीशी आघाडी घेतली आहे.

या विश्वचषकाबद्दल बोलायचं तर भारताची टॉप ऑर्डर असो की मिडल ऑर्डर, प्रत्येकजण पूर्ण फॉर्ममध्ये दिसत आहे.

विराट कोहलीने इतर कोणत्याही संघाच्या फलंदाजांपेक्षा 711 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्मा (550 धावा) आणि श्रेयस अय्यर (526 धावा) देखील मागे नाहीत.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 528 धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांनीही प्रत्येकी दोन शतकं झळकावली आहेत.

गोलंदाजीत आघाडीवर असलेल्या मोहम्मद शमीने केवळ सहा सामन्यांत 23 बळी घेतले आहेत, तर ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा थोडाच मागे आहे.

जसप्रीत बुमराह (18), रवींद्र जडेजा (16), कुलदीप यादव (15 विकेट) आणि मोहम्मद सिराज (13 विकेट) यांनीही चांगलेच बळी टिपलेत. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेझलवूड (14 विकेट) आणि मिचेल स्टार्क (13 विकेट) देखील मागे नाहीत.

त्यामुळे या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चुरशीचा सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांनी करायला हवी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)