शमी, कोहली अय्यर : सिक्स, सेंच्युरी, विकेट्स... एकाच सामन्यात झाले अनेक रेकॉर्ड

भारतानं विश्वचषक सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केलाय.

आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात फायनल गाठण्याची भारताची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 1983, 2003 आणि 2011 मध्ये भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमव बुधवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 398 धावांचं विशाल आव्हान ठेवलं.

भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतक झळकावलं. त्यानंतर मोहम्मद शमीनं 7 विकेट्स घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताचा या स्पर्धेतील हा सलग दहावा विजय आहे. भारतीय क्रिकेटपटू प्रत्येक सामन्यात नवा इतिहास रचत आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलही त्याला अपवाद नव्हती.

रोहित शर्माच्या षटकारांनी विक्रमांची सुरूवात झाली. विराट कोहलीनं शतक झळकावत त्याला नवी उंची दिली. सामन्याच्या शेवटी शमीनं गोलंदाजीतही पराक्रम केला. या एकाच सामन्यत अनेक रेकॉर्डची नोंद झालीय.

51 षटकार

कर्णधार रोहित शर्मानं विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा विक्रम केलाय. रोहितनं या स्पर्धेत आत्तापर्यंत 51 षटकार लगावलेत.

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला त्यानं मागं टाकलंय. गेलनं या स्पर्धेत एकूण 49 षटकार लगावले होते.

रोहितनं या एकाच स्पर्धेत 28 षटकार लगावलेत. एकाच स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा गेलचा रेकॉर्डही रोहितनं मोडलाय. 2015 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत गेलनं 26 षटकार मारले होते.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 2023 या वर्षात 21 सामन्यांमध्ये भारतीय इनिंगची सुरुवात केली. त्यामध्ये 14 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केलीय. हा देखील एक रेकॉर्ड आहे.

50 शतकं

भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीच्या रेकॉर्डसाठी मुंबईतील सेमी फायनल कायम लक्षात राहणार आहे. विराटनं या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील 50 वं शतक झळकावलं.

या प्रकारात सर्वाधिक 49 शतकांचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड विराटनं मोडला.

एकाच विश्वचषकात सर्वांधिक धावा करण्याचा रेकॉर्डही विराटनं नोंदवलाय. यापूर्वी सचिननं 2003 मधील विश्वचषकातील 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या.

विराटनं आता 10 सामन्यांमध्येच सचिनला मागं टाकलंय. विराटनं या स्पर्धेत आत्तापर्यंत 711 धावा केल्या आहेत.

श्रेयसनं टाकलं गिलख्रिस्टला मागं

श्रेयस अय्यरनं विश्वचषक स्पर्धेतील एक खास रेकॉर्ड केलाय. त्यानं या स्पर्धेच्या नॉक आऊट सामन्यात सर्वात जलद शतक झळकावलंय.

श्रेयसनं न्यूझीलंडविरुद्ध फक्त 67 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.

यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक – फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. त्यानं 2007 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध 72 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.

नॉकआऊट सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या

विश्वचषक स्पर्धेच्या नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमाचीही टीम इंडियानं नोंद केली आहे.

टीम इंडियानं फक्त न्यूझीलंडला पराभूत केलं नाही. तर, पहिल्यांदा फलंदाजी करत फक्त 4 विकेट्सच्या मोबदल्यात 397 धावा करत न्यूझीलंडचाच विक्रम मोडला.

न्यूझीलंडनं 2015 मधील विश्वचषक स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 6 बाद 393 धावा केल्या होत्या.

पहिला भारतीय गोलंदाज

या विश्वचषक स्पर्धेत भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद शमीनं एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला.

शमीनं 57 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. कोणत्याही भारतीय गोलंदाजानं एका वन-डे सामन्यात घेतलेल्या या सर्वाधिक विकेट आहेत.

वर्ल्ड कप स्पर्धेतील एका नॉक आऊट सामन्यात 7 विकेट घेण्याचा विक्रमही शमीनं यावेळी नोंदवला.

विश्वचषक स्पर्धेत सर्वांत जलद 50 विकेट्स घेण्याचा विक्रमही शमीनं केलाय. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर हा विक्रम होता.

स्टार्कनं 19 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या. शमीनं 17 सामन्यातच 54 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)