You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताचं 'चंद्रयान' 40 दिवसांत चंद्रावर, मग रशिया 10 दिवसांत चंद्र कसा गाठणार?
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
- Reporting from, नवी दिल्ली
तब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं एक रॉकेट चंद्राच्या दिशेने झेपावलंय. 11 ऑगस्टच्या पहाटे 2 वाजून 50 मिनिटांनी रॉसकॉसमॉस स्टेट स्पेस कॉर्पोरेशनने लुना 25 हे अंतराळयान वोस्तोचनी कॉस्मोड्रोम इथून प्रक्षेपित केलं.
पण रशियाचं हे लुना 25 रॉकेट भारताशी अक्षरशः स्पर्धा करतंय. रशियाला 21 ऑगस्टपर्यंत म्हणजे प्रक्षेपणानंतर अवघ्या 10 दिवसांत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करायचं आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान 3 लाँच केलं होतं, ज्याने 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणं अपेक्षित आहे.
आता चंद्रयान 3 चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. 16 ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता चंद्रयानानं शेवटचं ऑर्बिट मॅनुव्हर पूर्ण केलं म्हणजे या यानाची चंद्राभोवतीची कक्षा नियोजित वेळापत्रकानुसार कमी करण्यात आली.
चंद्रयान 3 आता चंद्राभोवती 153 किलोमीटर बाय163 किलोमीटर उंचीवरील कक्षेत स्थिर झालं आहे. आता पुढच्या टप्प्यात 17 ऑगस्टला चंद्रयान 3 चं लँडर मोड्यूल प्रपल्शन मोड्यूलपासून वेगळं होईल आणि पुढे चंद्राच्या दिशेनं प्रवास करेल.
दुसरीकडे रशियाने भारताच्या बरोबर 27 दिवसानंतर चांद्र मोहीम सुरू केली असली तरीही त्यांना इस्रोच्या चंद्रयानच्या आधी चंद्रावर पोहोचायचंय.
इस्रोने रशियाच्या या मोहिमेचं एक छान ट्वीट करून अभिनंदनही केलं होतं.
पण खरंच लुना-25 चंद्रयान-3च्या आधी चंद्रावर का पोहोचू शकतं का? आणि जर चंद्रयानला चंद्रावर पोहोचायला 40 दिवस लागतात तर मग रशिया 10 दिवसांत चंद्र कसा गाठणार?
रशियाची चांद्र मोहीम काय आहे?
रशियासाठी ही चांद्र मोहीम एकप्रकारे ऐतिहासिक आहे. 1958 ते 1976 दरम्यान तत्कालीन सोव्हिएत रशियाने असेच 24 अधिकृत ‘लुना’ मिशन चंद्रावर पाठवले होते. पण तेव्हापासून सुमारे पाच दशकं काहीच नाही.
दरम्यान 90च्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएत रशियाचा पाडाव झाला आणि आत्ताचं रशिया जन्मास आलं. त्यामुळे ही आधुनिक रशियाची पहिलीच चांद्रमोहीम म्हणता येईल.
‘रशिया टुडे’ या रशियाच्या शासकीय वाहिनीनुसार, लुना 25च्या प्रोबमध्ये, म्हणजे चंद्रावर लँड करेल त्या भागात सगळी संपर्काची साधनं आणि सेन्सर्स लागलेले असतील, जे चंद्रावरून माहिती पृथ्वीवर परत पाठवतील.
आणि हे प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच बोगुलॉव्स्की क्रेटर (Boguslavsky Crater) शेजारी लँड करेल.आता चंद्रयान 3सुद्धा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच लँड होणार आहे, पण जर रशिया यशस्वी झाला तर भारत त्याच्या दोन दिवसांनंतर चंद्रावर लुनाच्या प्रोबला भेटेल. पण दक्षिण ध्रुवावरच का?
आजवर अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीन यांनी त्यांचे अंतराळयान आणि प्रोब्स चंद्रावर संशोधनासाठी यशस्वीरीत्या लँड केले आहेत. पण ते सर्व प्रामुख्याने चंद्राच्या दर्शनी भागातच आहेत, जिथे सूर्य प्रकाश नेहमी पडतो.
पण दक्षिण ध्रुवाजवळ सूर्य प्रकाश पडत नसल्याने तिथलं हवामान थंड असेल त्यामुळे तिथे पाण्याचे अवशेष सापडू शकतात, असा अंदाज अनेक दशकं वर्तवला जात होता.
अखेर 2009मध्ये भारताच्याच चंद्रयान-1 मोहिमेअंतर्गत घोषणा करण्यात आली होती की इस्रोच्या ‘मून इम्पॅक्ट’ प्रोबला चंद्रावर पाण्याचे अंश सापडले आहेत. तेव्हापासून या दक्षिण ध्रुवाजवळच्या भागाविषयी कमालीचं कुतूहल निर्माण झालं आहे.
चंद्रावर खरंच पाण्याचा विपुल साठा असेल तर तिथून चंद्रापलीकडच्या अंतराळ मोहिमांसाठी एक बेस तयार करता येईल, पाण्यातल्या हायड्रोजनला इंधनरूपात वापरता येईल, अशी आशा अंतराळ संशोधकांना आहे. त्यामुळे सगळे या दक्षिण ध्रुवाकडे चालले आहेत.
पण मुळात प्रश्न हा, की रॉसकॉसमॉसचं लुना 25 खरंच 10 दिवसांत चंद्र कसा गाठेल?
रशिया चंद्रयानला मागे टाकू शकेल?
1969 साली नासाचं अपोलो 11 यान तीन अंतराळवीरांसह अवघ्या चार दिवसांत चंद्रावर पोहोचलं होतं. त्याचं कारण होतं त्या यानाचा अगदी सरळ रस्ता, सोबतच अतिशय शक्तिशाली रॉकेट आणि भरपूर इंधन.
तुलनेने इस्रोच्या चांद्रमोहिमा या अगदीच बजेटमधल्या असतात. आत्ताची चंद्रयान 3 मोहीम गोफणच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने कमीत कमी इंधन खर्चून चंद्र गाठतेय.
थेट चंद्राच्या दिशेने सरळ प्रवास करण्याऐवजी चंद्रयान हळूहळू आपली कक्षा पृथ्वीपासून दूर वाढवत जातं, आणि एका ठराविक अंतरावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर पोहोचल्यावर मग ते चंद्राच्या दिशेने झेपावून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतं. म्हणून जास्त वेळ लागतो.
आता अशात रशिया काय करणार आहे? तर लुना 25 जरा अमेरिकेचाच मार्ग स्वीकारताना दिसतंय, पण जरा सावकाश. म्हणजे काय?
तर रशियाचं हे रॉकेट झेपावल्यानंतर त्यापासून फ्रिगॅट मॉड्यूल प्रोबसह वेगळं होईल. मग हे मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत राहण्यासाठी एकदा वेग आणि जोर लावेल करेल, आणि मग पुन्हा त्याच कक्षेतून चंद्राच्या दिशेने वेगात जाण्यासाठी दुसऱ्यांदा इंजिन फायर करून जोर लावेल.
वाटेत दोन वेळा हे मॉड्यूल आपली दिशा नीट करेल आणि मग चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडिंगची तयारी करेल.
पृथ्वीच्या कक्षेतून ते चंद्राच्या कक्षेपर्यंतचाच प्रवास सुमारे 5 दिवसांचा असेल, त्यानंतर तीन दिवस लुना-25चं प्रोब चंद्राच्या कक्षेत आपली लँडिंगची जागा शोधेल, आणि मग दक्षिण ध्रुवाजवळ लँड करेल.
शीतयुद्धापासूनच रशिया आणि अमेरिका यांच्यात अंतराळ मोहिमांच्या बाबतीत चढाओढ राहिली आहे. त्यातच आता चीन, जपान आणि इस्रायलसुद्धा चंद्र गाठायच्या शर्यतीत आहेत. आणि इलॉन मस्क यांच्या ‘SpaceX’ सारखे खासगी प्लेअरही आता या क्षेत्रात आले आहेत.
त्यामुळे रशिया तब्बल 43 वर्षांनंतर सक्रीय झाला आहे. आता त्यांची मोहीम यशस्वी होईल का, खरंच भारताच्या चंद्रयानच्या आधी चंद्र गाठेल का, हे तर पाहावं लागेल.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)