You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रयान-3 : 'इस्रो'ची मुहूर्तमेढ रोवणारे विक्रम साराभाई नेमके कोण होते?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती. म्हणूनच त्यांना 'भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार' असंही म्हटलं जातं.
भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात विपुल संशोधन केलेल्या डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म अंबालाल साराभाई आणि सरलादेवी साराभाई दाम्पत्याच्या पोटी झाला. गुजरातमधील अहमदाबाद हे त्यांचं मूळ गाव. साराभाई कुटुंब अगदी सधन आणि संपन्न होतं.
डॉ. विक्रम साराभाई यांच्यासह एकूण आठ भावंडं. त्यामुळे त्यांची आई सरलादेवी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी माँटेसरी पद्धतीची शाळा सुरू केली. डॉ. विक्रम साराभाईंचं सुरूवातीचं शिक्षण इथंच झालं.
कुटुंबातील कुणीही राजकारण किंवा समाजकारणात सक्रियपणे कार्यरत नसलं, तरी साराभाई कुटुंबाचं आणि तत्कालीन राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचं घरी-येणं जाणं असायचं.
रविंद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरूंपासून ते अगदी महात्मा गांधीजींपर्यंत. पुढे शिक्षण घेत असताना डॉ. विक्रम साराभाईंना टागोरांनी तर अगदी जवळून मदत केली, सूचना दिल्या, मार्गदर्शन केलं.
दुसऱ्या महायुद्धामुळे तारांबळ
गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणाऱ्या डॉ. विक्रम साराभाईंनी पुढील शिक्षणासाठी ब्रिटन गाठलं.
1937 साली ते ब्रिटनला गेले. प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात. मात्र, त्याचवेळी दुसरं महायुद्ध ऐन भरात होतं. त्यामुळे तिथून ते पुन्हा मायदेशी परतले.
भारतात आल्यानंतर डॉ. विक्रम साराभाई यांनी बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये संशोधनास सुरुवात केली. इथे त्यांना जे मार्गदर्शक लाभले, त्यातून डॉ. विक्रम साराभाई यांची आगामी वाटचाल कशी असेल, हे निश्चित झालं. कारण मार्गदर्शक होते नोबेल पुरस्कार विजेते सी. व्ही. रामन.
1947 साली दुसरं महायुद्ध संपलं आणि ते पुन्हा ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इनव्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. ते वर्ष होते 1947.
भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राची पायाभरणी
ब्रिटनमधून परतल्यानंतर डॉ. विक्रम साराभाई यांनी 11 नोव्हेंबर 1947 रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली. इथूनच त्यांनी खगोलशास्त्र, भौतिकशास्त्रातील संशोधनाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली.
अवकाश क्षेत्रात भारत आज उंच भरारी घेत असताना, ज्या संस्था हे यश मिळवत आहेत, त्यांची पायाभरणी करण्यास डॉ. विक्रम साराभाई यांनी 1950च्या दशकातच सुरुवात केली होती.
21 नोव्हेंबर 1965 हा दिवस भारताच्या अवकाश संशोधनातील अत्यंत सुवर्ण दिवस ठरला. कारण याच दिवशी भारताने पहिलं रॉकेट लाँच केलं. तेही डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्न आणि पुढाकारातूनच.
केरळमधील थुंबा येथे लाँचपॅड निश्चित करण्यात आलं होतं. तिथेही अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांना डॉ. साराभाईंना सामोरं जावं लागलं. मात्र या सगळ्यावर मात करत रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, संयुक्त राष्ट्राने पुढे या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली.
पुढे भारताने या केंद्राला डॉ. विक्रम साराभाई यांचंच नाव दिलं. आज हे केंद्र 'डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर' म्हणून ओळखलं जातं. तिथे त्यांच्या पुतळ्याखाली त्यांचा एक विचार कोरण्यात आला आहे - "आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण माणूस आणि समाजाचे खरे प्रश्न सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत."
ATIRAची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉ. साराभाईंनी रचला ECIL, UCIL यांसारख्या संस्थांसह IIM-अहमदाबादची स्थापना सुद्धा डॉ. विक्रम साराभाई यांनीच केली.
'इस्रो'ची स्थापना
अवकाश संशोधनासाठी भारत सरकारने 1962 साली समिती नेमली. अर्थात, या समितीचं नेतृत्त्व डॉ. विक्रम साराभाई यांनीच केलं. डॉ. साराभाई यांच्या ज्ञानाचा आणि दूरदृष्टीचा इथेही फायदा झाला.
1969 साली याच समितीच्या शिफारशीतून 'भारतीय अवकाश संशोधन संस्था' अर्थात तुम्हा-आम्हाला अधिक ओळखीची असलेली 'इस्रो'ची स्थापना करण्यात आली.
इस्रोने पुढे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचं नाव अमेरिका, रशिया यांसारख्या प्रगत देशांच्या यादीत नेऊन ठेवलं.
12 ऑगस्ट 2019 हा डॉ. विक्रम साराभाई यांचा 100वा जन्मदिन होता. त्यावेळी गूगलनेही डूडलद्वारेही डॉ. साराभाईंना अभिवादन केलं होतं.
डॉ. विक्रम साराभाई मृत्यू संशयास्पद?
31 डिसेंबर 1971 ही भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रासाठी 'काळरात्र' ठरली. डॉ. विक्रम साराभाई यांचं रात्री झोपेतच निधन झालं.
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी त्यांच्या 'ओरमाकलुडे ब्राह्मणापथम' या आत्मचरित्रातून डॉ. विक्रम साराभाई यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली.
नंबी नारायणन म्हणतात, "डॉ. विक्रम साराभाई यांचा मृत्यू संशयास्पद असतानाही पोस्टमार्टम का केलं गेलं नाही?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)