'मी लेस्बियन आहे म्हणून त्याने गुप्तांगाच्या गप्पा केल्या आणि तिने पैशांना लुबाडलं'

फोटो स्रोत, SOUNDARYA
भारतासारख्या देशात जिथं रुढी परंपरा पाळणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत, अशा समाजात आपली समलिंगी किंवा होमोसेक्शुअल ओळख उघड करणं एखाद्या व्यक्तीसाठी मोठं आव्हान असतं. आणि स्त्रियांचं म्हणालं तर त्यांच्यासाठी हे अग्निदिव्यच म्हणता येईल.
पण भारतात अशाही काही स्त्रिया आहेत ज्यांनी भेदभावाला तोंड देत समाजासमोर आपली लिंग ओळख उघड केली. आणि आज त्या खऱ्या नायिका आहेत.
सौंदर्या अशीच एक नायिका आहे. सेलम जिल्ह्यात राहणाऱ्या सौंदर्याने जेव्हा तिचं प्रेम घरादासमोर, समाजासमोर उघड केलं तेव्हा तिला भयानक त्रास सहन करावा लागला.
पण सौंदर्या निर्धाराने उभी राहिली. ती विचारते की, "स्त्री देहाच्या पलीकडेही माझी ओळख आहे. मी ती का लपवू?"
होमोसेक्शुअल असणाऱ्या सौंदर्याने बीबीसीशी बोलताना तिची व्यथा मांडली.

फोटो स्रोत, SOUNDARYA
मी होमोसेक्शुअल आहे, हे मी माझ्या बहिणीला आणि काकांना तीन वर्षांपूर्वी सांगितलं होतं. पण यावर त्या दोघांचाही काही आक्षेप नव्हता, ते माझ्या पाठीशी होते. पण हेच जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं तेव्हा तिची नजर काहीतरी वेगळंच बोलत होती.
साधारण दीड वर्षांपूर्वी मी माझ्या काका आणि बहिणीला सोबत घेऊन आई वडिलांना माझ्या होमोसेक्शुअल असण्याबद्दल कल्पना दिली. या गोष्टीला माझ्या आईने तीव्र विरोध केला.आजही माझी आई मला लग्नासाठी जबरदस्ती करत असते.
कुटुंबाव्यतिरिक्त समाजात देखील भेदभावाचा सामना करावा लागला. जेव्हा मी एका नोकरी संदर्भात मुलाखतीसाठी गेले तेव्हा मला पहिलाच प्रश्न विचारला की, "तुम्ही मुलांसारखे केस का कापलेत?"
यावर मी लेस्बियन असल्याचं सांगितलं. तिथं मुलाखत घेणाऱ्यांपैकी एक टीम लीडर माझ्याकडे आला. त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझी ओळख उघड करत होते.
माझ्याविषयी काही समज गैरसमज व्हायला नको म्हणून मी त्यांना तपशीलवार माहिती दिली. मला माझ्या कुटुंबीयांचा पाठिंबा नसल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी मला उघड उघड त्रास द्यायला सुरुवात केली.
ऑफिसची मीटिंग असल्याचं सांगून तो टीम लीडर मला रात्री दहानंतर फोन करायचा. मिटिंगविषयीच्या गोष्टी 5 मिनिटांत सांगून झाल्या असल्या तरी तो व्यक्ती फोनवर बराच वेळ अनावश्यक गोष्टी सांगत राहायचा.

फोटो स्रोत, Getty Images
एकदा एक मिटिंग बराच वेळ लांबली, अगदी मध्यरात्री पर्यंत. पण आता चर्चा वेगळ्या दिशेने सुरू व्हायला लागली, त्यामुळे मी माझ्या बहिणीला बाजूला बसवलं आणि मीटिंगचे स्क्रीनशॉट्स घेतले.
तो माझ्यावर सतत दबाव आणत होता. मी माझ्या अडचणी त्याच्याव्यतिरीक्त दुसऱ्या कोणाकडे घेऊन जाऊ शकत नाही आणि तसं काही झालंच तर वरिष्ठ मलाच टार्गेट करतील अशी भीती घालण्याचा त्याने प्रयत्न केला.
एकदा मीटिंग सुरू असताना त्याने त्याच्या जननेंद्रियाविषयी सांगायला सुरुवात केली. कुटुंबाचा पाठिंबा नसल्याने मी फार काही करू शकत नाही, असा विचार करून त्याने सुरुवातीपासूनच माझ्याशी गैरवर्तन केलं.
लहान असताना माझं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं. या दरम्यान ज्या गोष्टी घडल्या त्यातून मी अजून सावरलेले नव्हते. आणि ऑफीसमध्ये सुरू असणाऱ्या त्या व्यक्तीच्या गैरवर्तनामुळे मी आणखीनच तणावाखाली आले. यामुळे मला कौन्सलिंग सुरू करावं लागलं.
आणि एक वेळ अशी आली की हे सगळं सहन करण्यापलीकडे गेलं. शेवटी कंटाळून मी आमच्या मॅनेजरकडे तक्रार केली. पण असं करून मी एक चांगली टीम खराब करते आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.
"गैरसमज करून घेऊ नका, फक्त आपल्या कामाशी काम ठेवा," असं त्या मॅनेजरने मला सांगितलं. मी आता या गोष्टी सहन होणाऱ्यातल्या नव्हत्या म्हणून मी नोकरी सोडायचं ठरवलं. यावेळी मला कंपनीच्या एचआरशी बोलण्याची संधी मिळाली.
त्यांना मी घडलेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी तत्काळ कारवाई केली.
आणि माझं प्रेम हिरावून घेतलं...

फोटो स्रोत, SOUNDARYA
आपण लेस्बियन आहोत म्हणून आपल्याला आपल्या कुटुंबाचा पाठिंबा नाहीये असं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा ते तुमच्याशी गैरवर्तन करतात. मग ते तुमचं कामाचं ठिकाण असो किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असोत, असं होणं स्वाभाविक आहे.
समाजातले लोक समलिंगी लोकांना भाड्याने घरसुद्धा देत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाचा वापर करताना समस्या येतात. मला अशा सर्व घटनांना सामोरं जावं लागलंय.
मी पुरुषांसारखे कपडे घातले होते, केस कापले होते म्हणून सार्वजनिक शौचालयातून माझा पाठलाग करण्यात आला.
आजही जेव्हा मी सार्वजनिक ठिकाणी जाते तेव्हा लोकांच्या नजरा माझ्यावर रोखलेल्या असतात, "ती अशी का आहे?" असे प्रश्न त्यांच्या डोळ्यात मला दिसतात.
मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर लेस्बियन असल्याचं पोस्ट केलंय. कधीकधी समोरून लेस्बियन असल्याचं सांगत मला फसवलं जातं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी एका मुलीशी मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पण नंतर गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या, माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात होता.
मी ज्या मुलीच्या प्रेमात पडले होते, तिच्या मोठ्या बहिणीला या गोष्टी समजल्या होत्या. तिने आम्हाला मदत करण्याचं वचन दिलं.
जेव्हा तुमचं एखाद्या विरुद्ध लिंगी व्यक्तीवर प्रेम असतं तेव्हा मित्र, भाऊ, बहीण आणि कधी कधी आई-वडील देखील तुमच्या प्रेमाच्या समर्थनार्थ उभे असतात.
पण जेव्हा होमोसेक्शुअल रिलेशनशिपला सपोर्ट करायची वेळ येते तेव्हा भाऊ बहीण क्वचितच मदतीला येतात. त्यामुळे, तिच्या बहिणीने मदत करते, असं म्हटल्यावर मला आनंद झाला.
पण आमच्या नात्याचा वापर करून ती माझ्याकडून पैसे उकळत होती. घरी अडचणी आहेत असं सांगत तिने माझ्याकडून बऱ्याचदा पैसे घेतले.
ज्या मुलीवर माझं प्रेम होतं तिच्या बहिणीने आमच्या नात्याचा गैरवापर करून माझ्याकडून बरेच पैसे काढले, शेवटी मी पैसे देणं बंद केलं.
त्यानंतर, ज्या मुलीवर माझं प्रेम होतं तिने माझ्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. पण मी नकार दिला तेव्हा त्या मुलीने आमच्यात असलेलं नातं तोडलं.
मी लेस्बियन असल्याचं इंस्टाग्रामसह इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलं आहे. मला कोणीही मदत करणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी माझा गैरफायदा घेतला. खऱ्या गोष्टी कळेपर्यंत माझे खूप पैसे गेले होते.
माझी ओळख माझी ताकद आहे...

फोटो स्रोत, Getty Images
एवढ्या अडचणी येऊनसुद्धा मी माझी खरी ओळख का सांगते, याबद्दल मला एकदाही स्वतःचं आश्चर्य वाटलेलं नाही. कारण मी स्वतःची खरी ओळख सांगितल्यावर मला अंतकरणातून ताकद मिळतो.
पूर्वी माझी जितकी मित्रमंडळी होती, आज त्यापेक्षा खूप कमी माझे मित्रमंडळी आहेत. कारण मला ज्यांच्याजवळ सुरक्षित वाटतं तेच आज माझ्या जवळ आहेत.
माझे बरेच मित्रमैत्रिणी उच्चशिक्षित आहेत. मात्र त्यातल्या अनेकांना माझ्याविषयी कळलं तेव्हा त्यांनी मला ब्लॉक केलं, मला दूर लोटलं. यावरून सुशिक्षित समाजालाही याची जाणीव नसल्याचं दिसून येतं.
आपल्या समाजात टॉयलेट वापरण्यापासून ते कपडे निवडीपर्यंत बऱ्याच समस्या आहेत. जेव्हा एखाद्या मुलीला शाळेत तिच्या लैंगिक भावनांविषयी समज येते तेव्हा ती पुरुषांसारखे कपडे का निवडू शकत नाही?
नाही... कारण शाळा-कॉलेजात याविषयीचे गैरसमज दूर करण्याची वृत्ती दिसून येत नाही.
जर तुम्ही जन्माने पुरुष असाल तर तुम्हाला पुरुषाचे कपडे घालण्याची सक्ती केली जाते आणि जर तुम्ही जन्माने स्त्री असाल तर तुम्हाला स्त्रीचे कपडे घालण्याची सक्ती केली जाते. शाळा-महाविद्यालयांनी जर याविषयी दृष्टिकोन बदलला तरच जनजागृती होईल.
आज माझ्याविषयी माझ्या कुटुंबाला माहीती आहे, माझ्या मित्रांना माहीती आहे. विशेष म्हणजे, मी आता माझ्या कम्युनिटी मधील लोकांशी बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माझ्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. याआधी मी सोशलाईज व्हायला घाबरायचे. माझी खरी ओळख त्यांना समजली तर... या कल्पनेनेच मी गांगरून जायचे.
ज्याप्रमाणे विरुद्ध लिंगाचे लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात त्याचप्रमाणे समलिंगी भावना सुद्धा असू शकतात. पण त्याविषयी कोणालाच काही देणंघेणं नसतं. मला खूप भीती वाटत होती की त्याचा माझ्यावर परिणाम होईल.
पण आता मला अशी भीती वाटत नाही.
सोशल मीडियावर ओंगळवाणे प्रश्न विचारणाऱ्यांना काय उत्तर द्यायचं आता मला चांगलंच माहिती आहे. मी त्यांना घाबरत नाही.
आज माझ्यात कोणत्याही समस्येला सामोरं जाण्याची हिंमत आहे. स्वतःची ओळख उघड केल्यामुळे हे शक्य झालंय. आणि आता कोणासाठीही माघार घेण्याची माझी तयारी नाहीये.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








