एली आणि नेल : 'ती'पासून 'तो'पर्यंत आणि पुन्हा 'ती' बनण्याचा प्रवास

एली आणि नेल
    • Author, लिंडा प्रेस्ली आणि लुसी प्रोक्टर
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसेस, जर्मनी

संशोधनांमधून असं समोर येतं की, लिंग परिवर्तन करणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांच्या मनात शक्यतो त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत द्विधा मनस्थिती किंवा संभ्रम नसतो.

पण, जेव्हा दोन ट्रान्स पुरुष एकमेकांना भेटतात आणि प्रेमात पडतात, त्यानंतर त्यांचा लैंगिक ओळखीचा प्रवास एक अनपेक्षित वळण घेतो आणि ते अशा ठिकाणी पोहोचतात ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. अशीच ही कथा आहे.

"मला नेहमी वाटायचं की, आमचा एक वेगळा आणि खास इतिहास आहे. आमची शरीरं खास आहेत आणि आम्ही अनुभवलेल्या शारीरिक अनुभवांमुळं आमच्यामध्ये असलेलं नातंही खास आहे."

एली 21 वर्षांच्या असून बेल्जियन आहेत तर त्यांच्या जर्मन पार्टनर नेल 24 वर्षांच्या आहेत. दोघींनी पुरुष बनण्यासाठी टेस्टोस्टेरॉन घेतलं. तसंच शस्त्रक्रिया करून स्तनही काढले. पण आता त्यांनी पुन्हा एकदा लिंग परिवर्तन केलं असून त्या पुन्हा महिला म्हणून जगत आहेत. अगदी जशा त्या जन्माच्या वेळी होत्या.

"मी हायस्टेरेक्टमी शस्त्रक्रिया (गर्भपिशवी काढण्याची) केली नाही, याचा मला आनंद आहे," असं नेल सांगतात. "याचा अर्थ म्हणजे मी हार्मोन्स घेणं बंद करू शकते आणि त्यामुळं माझं शरीर पुन्हा महिलांसारखं दिसायला लागू शकतं."

गेल्यावर्षी या दोघींनी टेस्टोस्टेरॉनचा वापर बंद करण्याचा आणि स्वतःसाठी पुन्हा "ती" -"तिचे" असे स्त्रीलिंगी उच्चार वापरण्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

हळूहळू त्यांच्या शरीरातील नैसर्गिक ओस्ट्रोजेन (महिलांच्या लैंगिकतेशी संबंधित हार्मोन) मुळं त्यांची शरीरं पुन्हा महिलांसारखी व्हायला सुरुवात झाली.

"माझ्यात होणारे बदल पाहून मला खूपच आनंद झाला," असं एली म्हणाल्या.

त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचा कोमलपणा जाणवू लागला, त्यांच्या शरिरानंदेखील आकार घ्यायला सुरुवात केली. पण अनेक वर्षे टेस्टोस्टेरॉनचे सेवन केल्यामुळं एक अत्यंत गंभीर आणि अपरिवर्तनीय असा परिणाम त्यांच्या शरिरावर झाला.

नेले
फोटो कॅप्शन, नेले

'मला मुलगी किंवा महिला व्हायचं नव्हतं'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"माझा आवाज कधीही पूर्वीसारखा (महिला किंवा मुलीसारखा) होऊ शकणार नाही," असं नेल म्हणाल्या. "मला गायला आवडत होतं पण आता मी गाऊ शकणार नाही. कारण हा आवाज अगदीच एकसुरी (पुरुषी) आणि फार वेगळा असा आहे. मी जेव्हा एखाद्याला फोन करते, त्यावेळी शक्यतो मला, पुरुषच समजलं जातं."

या दोन तरुणींच्या कथा या अत्यंत गुंतागुंतीच्या अशा आहेत.

एका लिंगातून दुसऱ्या लिंगात परिवर्तन केलेल्या दोन सामान्य व्यक्तींसारख्या या दोघी नाहीत. पण इतर ट्रान्स लोकांच्या संदर्भातही, त्यांनी ट्रान्स महिला राहावं किंवा ट्रान्स पुरुष राहावं अथवा नॉन बायनरी (दोन्ही नसलेले) याबाबत या दोघींचं काही म्हणणं नाही.

एलीला लहानपणी मुलगी म्हणून वावरताना काही त्रास झाला असावा किंवा अस्वस्थ वाटल्याचं तिला तरी आठवत नाही. मात्र, ती किशोरवयात आल्यानंतर बदल सुरू झाले.

"माझ्या लक्षात आले की, मी मुलांसारख्या अनेक गोष्टी करायला सुरुवात केली होती. काही लोकांना त्याबाबत आक्षेप होता, विशेषतः इतर मुलांना. मला उभयलिंगी अशा अर्थाचे शब्द वापरून चिडवलं जात होतं".

उंच आणि खेळासाठी योग्य शरीरयष्टी असलेल्या एलीच्या बास्केटबॉलबाबत असलेल्या आवडीकडेही "मुलांनी करायची गोष्ट" अशाच दृष्टीनं पाहिलं गेलं. वयाच्या 14 व्या वर्षी तिच्या लक्षात आलं की, तिला मुलींविषयी आकर्षण वाटत आहे, त्यानंतर तिच्या पालकांना हे समजलं.

"मी मुलींबरोबर डेट करत होते आणि त्याचा मला आनंद होता," असं ती सांगते.

त्यानंतर एलीनं बहिणीला ती लेस्बियन असल्याचं सांगितलं.

त्यावर "मी ज्या प्रकारची महिला बनत आहे, त्याचा अभिमान असल्याचं, माझी बहीण मला म्हणाली. त्यामुळं कुठंतरी माझ्या मनात विचार आला. मी विचार करू लागले की, 'म्हणजे आता मी महिला आहे? पण मला ते योग्य वाटत नव्हतं.' याचा अर्थ असा नव्हता की, मला मुलगा व्हायचं होतं. तर मला फक्त मुलगी किंवा महिला व्हायचं नव्हतं. मला तटस्थ राहून मला जे हवं आहे ते करायचं होतं."

वयाच्या 15 व्या वर्षी एलीला असं वाटलं की, महिला बनल्यामुळं तिच्या जीवनातील आवडीनिवडींवर मर्यादा येतील. दुसरीकडं नेलसाठीही महिला म्हणून मोठं होणं हे फारसं आनंदी किंवा चांगलं नव्हतं.

नेल, एली

'मी महिलांकडे आकर्षित होऊ लागले'

"याची सुरुवात वयात येण्यापासून (puberty)झाली. तेव्हा मी नऊ वर्षांची होते. माझे स्तन तयार व्हायला सुरुवात झाली होती. शरिरात स्तन असणं म्हणजे नेमकं काय हेही मला तेव्हा माहिती नव्हतं. माझ्या आईनं मला कपडे परिधान न करता किंवा उघड्या शरीरानं घराबाहेर जायची बंदी घातली. आमची खूप भांडणं होत होती. कारण मला वाटायचे की, माझा भाऊ कसा शर्ट परिधान न करता उघडा घराबाहेर जाऊ शकतो? मग मी का नाही? अर्थात माझ्या आईला माझं रक्षणच करायचं होतं, पण ते मला त्यावेळी लक्षात आलं नाही."

नेल मोठी झाली, त्यावेळी तिच्याबरोबर वाईट वर्तन करणारे काही पुरुष होतेच.

"मला मोठ्या प्रमाणावर छेडछाडीचा, शोषणाचा सामना करावा लागला. माझ्या घराजवळचा एक रस्ता होता, त्यावरून जाताना मला पुरुषानं त्रास दिला नाही, असा एकही दिवस जात नव्हता. मला हळूहळू लक्षात यायला सुरुवात झाली होती की, समाजात ज्याला सेक्सी कामुक समजलं जातं आणि पुरुषांना हवं असतं, ते सर्व माझ्या शरिरात आलं होतं. पण माझं व्यक्तिमत्त्वं मात्र तसं (महिलांसारखं) नव्हतं."

नेल यांच्या शरीरात वेगानं बदल होत होते आणि सोबतच त्या लठ्ठही झाल्या होत्या. नंतर त्यांना खाण्यासंदर्भातला एक विकारही जडला होता.

"मी खूपच लठ्ठ झाले होते. त्यामुळं वजन कमी करण्याची गरज असल्याचा विचारही लवकरच सुरू झाला."

नेल या महिलांकडं आकर्षित होत होत्या. पण लेस्बियन म्हणून ओळख जाहीर करणं हा विचार अत्यंत भीतीदायक होता.

"मला एक अत्यंत वाईट किंवा घृणास्पद महिला म्हणून ओळखलं जाईल. तसंच मी त्यांच्याच म्हणजे माझ्या मैत्रिणींबरोबरच नातं जोडण्याचा प्रयत्न करेल, या भीतीनं त्या माझ्याशी संबंधही ठेवणार नाहीत, अशी एकूणच प्रतिमा माझ्या मनात निर्माण झाली होती."

एली, नेल

वयाच्या 19 व्या वर्षी नेल यांनी उभयलिंगी अशी ओळख जाहीर केली, ती त्यांना सुरक्षित वाटली. पण स्त्रीचं शरीर असल्यामुळं पुरुषांना त्यांच्याबद्दल वाटणारं आकर्षण हे त्यांच्यासाठी अस्वस्थतेचं कारण ठरतं होतं. त्यांनी स्तन काढण्याच्या संदर्भात विचार करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना समजलं की, ट्रान्स पुरुषांना मास्टेक्टोमिज (स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) करता येते.

"मला ते योग्य वाटलं. पण मी तर ट्रान्स नाही, असंही वाटलं. कदाचित ट्रान्स बनल्यानंतर मी खरेपणानं वागणार नाही, असंही मला वाटलं. त्यानंतर मी खूप संशोधन केलं, त्यातून माझ्या लक्षात आलं की, ट्रान्स पुरुष ज्याबाबत बोलतात त्यापैकी अनेक गोष्टींचं मला आलेल्या अनुभवांशी साम्य होतं. म्हणजे शरिराबाबत समाधानी किंवा आनंदी नसणं, लहानपणी मुलगा होण्याची इच्छा असणं, यांचा त्यात समावेश होता."

ट्रान्स असलेल्यांची लैंगिक ओळख आणि त्यांची जन्माजात लैंगिक ओळख यामध्ये तफावत असल्यामुळं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यालाच जेंडर डिस्फोरिया म्हटलं जातं. याच काळात नेल यांना या डिस्फोरियाची जाणीव होऊ लागली होती.

"मला वाटलं की, माझ्या ट्रान्स बनण्यामध्ये काहीही खोटेपणा नाही, कारण मी एक ट्रान्सजेंडर आहे."

नेल यांना केवळ दोन पर्याय दिसत होते, लिंग परिवर्तन करणं किंवा आत्महत्या करणं. त्यांनी ट्रान्सजेंडरना मदत करणाऱ्या एका संघटनेची मदत घेतली. त्यांनी नेल यांना एका डॉक्टरकडे पाठवलं.

"ज्यावेळी मी आले तेव्हा मला वाटलं होतं की, मी ट्रान्स अशू शकते. पण त्यांनी माझ्याशी बोलताना थेट पुरुषांसाठी वापरतात तसे शब्द वापरायला सुरुवात केली. मी ट्रान्सजेंडर आहे हे अगदी स्पष्ट आहे, असं ते म्हणाले. कुणाच्याही बाबतीत त्यांचं एवढं ठाम मत नव्हतं, असंही ते म्हणाले. "

तीन महिन्यांच्या आत मला टेस्टोस्टेरॉन घेण्याचा सल्ला देण्यात आला.

एली, नेल

एली यांनीदेखील मेल हार्मोन्स घेण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी तर त्या केवळ 16 वर्षांच्या होत्या.

"मी टेस्टोस्टेरॉन घेत असलेल्या काही ट्रान्स लोकांचे यूट्यूब व्हिडिओ पाहिले होते. लाजाळू लेस्बियन ते सुंदर किंवा हँडसम आणि अत्यंत प्रसिद्ध अशा पुरुषांत त्यांचं रुपांतर झालेलं मी पाहिलं. मला माझ्या स्वतःच्या बाबतीत अशा शक्यतेचा विचार करायला आवडू लागलं आणि मलाही अशी पुरुषांसारखं शरीर असावं असं वाटू लागलं."

पण अत्यंत कमी वय असल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय बाबींसाठी पालकांच्या परवानगीची आवश्यकता लागणार होती. पालकांसह त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा त्यांनी एली यांना काही काळ वाट पाहण्याचा सल्ला दिला. ते डॉक्टर ट्रान्सफोबिक (ट्रान्सजेंडरना विरोध असलेले) आहेत, असं एली यांना वाटलं. त्यांनी दुसरे डॉक्टर शोधले. ते त्यांच्या लिंग परिवर्तनाच्या इच्छेबाबत सकारात्मकही होते.

"त्यांनी माझ्या आई वडिलांना सांगितलं की, सगळे परिणाम हे पुन्हा बदलता येणारे म्हणजे पूर्वीप्रमाणे सर्व होऊ शकणारे आहेत. पण ते सर्वात मोठं असत्य होतं. मी माझ्या पातळीवर अभ्यास केलेला होता. त्यामुळं या डॉक्टरवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, हे मला समजलं होतं. पण त्यानं तसं सांगितल्यामुळं मी आनंदी होते, कारण त्यामुळं माझ्या पालकांचा होकार मिळणार होता."

एलीचे वडील एरिक टेस्टोस्टेरॉनचा त्यांच्या मुलीच्या शरिरावर परिणाम होईल या चिंतेत होते. पण डॉक्टरांनी त्यांना त्याबाबत आश्वासन आणि धीर दिला होता.

"आम्ही अजूनही या धक्क्यात होतो की, आम्हाला अशी मुलगी आहे जिला मुलगा बनायचं आहे. तसंच डॉक्टरांनी तिच्यासाठी हार्मोन्स योग्य ठरतील असंही म्हटलं होतं," असं ते सांगतात.

लिंग परिवर्तन करणाऱ्यांच्या या जगात एक मोठा समुद्र असल्यासारखं एरिक आणि एलीच्या आईला जाणवत होतं.

"मला असं वाटत होतं की, मी तिला याबाबत काही काळ वाट पाहण्यासाठी आणि पुन्हा एकदा विचार करण्यासाठी तयार करायला हवं. त्यासदंर्भात कोणीतरी माझ्याशी चर्चा करायला किंवा मला सांगायला हवं होतं. पण तसं कोणीही त्यावेळी तिथं नव्हतं," असं एरिक म्हणाले.

सुरुवातीला टेस्टोस्टेरॉनमुळं एलीला भावनिकदृष्ट्या सुन्न करणारा किंवा वेगळा परिणाम जाणवला. त्यानंतर मात्र तिला अधिक चांगलं वाटू लागलं. वयाच्या 17 व्या वर्षी तिनं मास्टेक्टोमी (स्तन काढण्याची शस्त्रक्रिया) केली. त्यानंतर ती हाय स्कूलचं शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी बेल्जियमला गेली.

पण, पुरुषात परिवर्तन झाल्यानंतरही नेलच्या नैराश्याच्या भावना कायम होत्या. आत्महत्येचा विचार आणि खाण्यासंदर्भातील विकार यामुळं त्या जेवणातून मोठ्या प्रमाणात कॅलरीचं सेवन करत होत्या. त्यांना खाण्याबाबत एक प्रकारचा ध्यास निर्माण झाला होता.

दुसरीकडं, आयुष्यात केवळ टेस्टोस्टेरॉन हीच एकमेव चांगली गोष्ट होती, असं नेलला वाटू लागलं. त्यांना मास्टेक्टोमी करायची होती, पण अजूनही तिच्या थेरपिस्टबरोबर पूर्णपणे प्रामाणिक होणं योग्य आहे, असं त्यांना वाटत नव्हतं.

"मला खाण्याच्या विकृतीची प्रचंड लाज वाटत होती. मी सुरुवातीलाच याचा उल्लेख केला होता. पण लाज वाटत असल्यामुळं मी याबाबत फार बोलणं टाळलं. अशा प्रकारची विकृती असणं सामान्य असावं असं मला वाटलं."

मात्र, मानसिक आरोग्याबाबत जर कोणाला काही शंका आली तर संबंधित व्यक्तिचा ट्रान्सजेंडरचा उपचार थांबवला जाऊ शकतो अशी काळजी नेलला वाटत होती.

"जर्मनीत ही अत्यंत कठीण स्थिती आहे. कारण हार्मोन आणि सर्जरीसाठी तुम्हाला केवळ थेरपिस्टच (डॉक्टर) प्रिस्क्रिप्शन देऊ शकतात."

खाण्यासंदर्भातील विकार आणि जेंडर डिस्फोरिया यातील संबंध दर्शवणारे काही अभ्यास उपलब्ध आहेत. यापैकी 2012 मधील युकेच्या जेंडर आयडेंटिटी डेव्हलपमेंट सर्व्हिसच्या एका अभ्यासानुसार, त्यावर्षीच्या किशोरवयीन रेफरल्सपैकी जवळपास 16% मुलांना खाण्याबाबतचा काहीतरी विकार होता.

पण यापैकी बहुतांश रेफरल्स हे जन्माच्या वेळी महिला किंवा स्त्रीलिंगी असलेले होते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये अशाप्रकारच्या विकारांचं प्रमाण जन्मजात अधिक असतं.

नेल
फोटो कॅप्शन, नेल

आधी होते पुरुष, मग महिला आणि पुन्हा पुरुष

ब्रायन आणि डॅनियल यांचाही एली आणि नेल यांच्यासारखाच प्रवास होता, पण तो वेगळ्या ठिकाणी सुरू झाला होता. दोघांचा जन्म पुरुष म्हणून झाला होता. त्यानंतर त्यांनी महिला अशी लैंगिक ओळख स्वीकारली आणि त्यानंतर परिवर्तन करून ते पुन्हा पुरुष बनले.

खाण्याचे विकार हे जेंडर डिस्फोरियावरील प्रतिक्रिया म्हणून उद्भवत असतात असं, खाण्याचे विकार आणि लैंगिक ओळखीच्या अडचणींचा सामना करणाऱ्यांवर उपचार करणारे युकेमधील मानसोपचारतज्ज्ञ अनास्तासिस स्पिलियाडिस यांनी म्हटलं.

यामागचा सिद्धांत असा आहे की, तुम्ही जर लैंगिकतेसंबंधीचा तणाव दूर केला तर खाण्याचा विकारही संपुष्टात येतो. हे घडू शकतं. त्यांच्या बहुतांश रुग्णांमध्ये मात्र स्पिलियाडिस यांना ते जाणवलं नाही.

नेलप्रमाणं जन्मानं महिला असलेल्या महिला या पुन्हा त्यांच्या मूळ लैंगिक ओळखीकडे परतत आहेत.

"त्यांना असं वाटलं की, लिंग परिवर्तन केल्यामुळं खाण्याचा विकार आणि डिस्फोरिया कमी किंवा बंद होईल. पण त्यामुळं गुंता अधिक वाढला. टेस्टोस्टेरॉन सेवन करण्याच्या आणि शस्त्रक्रियेच्या निर्णयाचा अशांना खेद वाटतो. पण त्यातही सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे, त्यापैकी अनेकांना अजूनही खाण्यासंबंधीचा विकार कायम आहे."

ज्यांना अॅनोरेक्सिया किंवा बुलिमियासारखे त्रास आहेत, ते पुन्हा बदल करता येणार नाहीत अशाप्रकारचे निर्णय घेऊ शकत नाहीत.

"खाण्यासंबंधीच्या विकारांमुळं लोकांवर जैव-मानसिक स्तरावर परिणाम होतो, याची आम्हाला जाणीव आहे. जे वैद्यकीय आणि शारीरिकदृष्ट्या आणि सोबतच लैंगिक ओळखीच्या संदर्भात तडजोड करत असतात त्यांचा कदाचित त्यांच्या शरिरांबाबतही वेगळा दृष्टीकोन असतो."

स्पिलियाडिस यांच्या मते, यासंदर्भात उपचाराची सर्वात योग्य पद्धत म्हणजे लैंगिक ओळखीसंदर्भात समस्या असलेल्या तरुणांची खाण्याच्या विकारांसंबंधी तपासणी करावी. तसंच जेंडर डिस्फोरियावर वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया करून उपचार करणं हे जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळं त्याआधी त्यांच्या खाण्याशी संबंधित विकारांवर उपचार करायला हवा.

जर्मनीत नवीन विद्यार्थी आणि ट्रान्स पुरुष म्हणून वावरताचा डिस्फोरिया ही आता भूतकाळातील गोष्ट आहे असं एलीला वाटू लागलं होतं. कारण ती जीवनात पुढं सरकत होती.

"मी पुरुष म्हणून पुढं जात होते आणि ते अगदी व्यवस्थित सुरू होतं. माझं लिंगपरिवर्तन हे यशस्वी ठरलं आहे, कारण मी ट्रान्स आहे हेही कळत नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून मिळत होती."

पण तरीही पुरुषी ओळखीबाबत त्यांच्या मनात कुठेतरी द्विधा मनस्थिती निर्माण झाली.

"मला असं वाटू लागलं की, मला माझ्या जीवनातील अनेक गोष्टी या लपवाव्या लागत आहेत. मी मुलगी म्हणून जगलेल्या माझ्या बालपणाबाबत बोलू शकत नव्हते. मला सिसजेंडर (CIS-जन्मजात)पुरुष म्हणून वावरण्यात सहजपणा वाटत नव्हता. त्यामुळं मी कुठंही फिट बसू शकत नाही, असं मला वाटू लागलं."

ट्रान्सजेंडर किंवा ट्रान्स - अशी व्यक्ती ज्यांची लैंगिक ओळख जन्माच्या वेळी असलेल्या लैंगिकतेपेक्षा वेगळी असते.

सिसजेंडर किंवा cis - अशी व्यक्ती ज्यांची लैंगिक ओळख जन्माच्या वेळी असलेल्या लैंगिकतेपेक्षा वेगळी नसेल.

नॉन बायनरी  - केवळ पुरुष किंवा केवळ स्त्री अशी ओळख नसलेली व्यक्ती

पॅनसेक्श्युअल  - अशी व्यक्ती जी इतरांकडे त्यांची लैंगिक ओळख काहीही असली तरी त्यांच्याकडे आकर्षित होते.

डेटींगही अडचणीचे होते. "मला महिलांना डेट करणं सहज वाटत नव्हतं. कारण, मी ट्रान्स असल्याने समोरच्या व्यक्तीने मला स्ट्रेट समजू नये अशी माझी इच्छा होती. मला माझ्या शारीरिक अवयवामुळंच ही भावना होती. मला त्याअर्थानं महिलांचं शरीर हे कमी आकर्षक आणि कमी मूल्य असलेलं वाटू लागलं होतं."

एली पुरुषांकडे आकर्षित होऊ लागली आणि पॅनसेक्श्युअल अशी लैंगिक ओळख तिला मिळाली.

"माझ्या मते अंतर्गत सुरू असलेल्या संभ्रम किंवा द्विधा स्थितीमुळं हे बाहेर आलं. पण मला कधीही कोणत्याही cis पुरुषाबाबत आकर्षण वाटलं नाही. त्यावेळी मला असं वाटलं की, कदाचित दुसऱ्या ट्रान्स पुरुषाला डेट केलं तर मला त्याच्याबद्दल आकर्षण आणि ती व्यक्ती जवळची वाटेल."

 मग, हा विचार कामी आला का?

 "तर उत्तर आहे, हो कामी आला!"

 एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून एलीची नेलबरोबर भेट झाली. नेलला मात्र, दुसऱ्या ट्रान्स पुरुषाबरोबर रोमान्स करण्यात फारसा रस नव्हता.

 "पण मी एलीबरोबर टेक्स मॅसेजवर बोलायला सुरुवात केल्यानंतर नक्की मला चांगलं वाटलं. आम्ही एकमेकांबरोबर अनेक अनुभव शेअर करत होतो. तिच्यासोबत असताना मला फार चांगलं वाटत होतं."

डसलडोर्फमध्ये पहिली डेट झाल्यानंतर त्यांचं नातं अगदी सहजपणे पुढं सरकलं. नेलला अनेक दिवसांपासून इच्छा असलेल्या स्तन शस्त्रक्रियेची परवानगीही मिळाली होती. त्यावेळी एलीचा नेलला चांगला आधार झाला. त्यानंतर हे जोडपं एका फ्लॅटमध्ये एकत्र राहू लागलं.

नेल, एली

याच काळामध्ये लैंगिक अभ्यासाची विद्यार्थिनी असलेल्या एलीला ट्रान्स चळवळीचे कार्यकर्ते आणि कट्टर स्त्रीवादी यांच्यात वारंवार सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी उफाळून येणाऱ्या सांस्कृतिक युद्धासंदर्भात रस निर्माण झाला होता.

त्यातून आपण खरंच ट्रान्सजेंडर आहोत का? की केवळ जीवन जगण्यासाठी निवडलेला हा एक मार्ग आहे? असा प्रश्न तिनं स्वतःला विचारायला सुरुवात केली.

एली आणि नेल यांच्यात त्यांच्या लैंगिक ओळखीच्या संदर्भात अत्यंत गंभीर अशा चर्चा झाल्या.

त्याशिवाय आणखीही काहीतरी समोर आलं होतं. ते म्हणझे दोघींना योनीमार्गाच्या कोरडेपणाचा (vaginal atrophy)आजार झाला होता. साधारणपणे रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांमध्ये हा आजार आढळतो. पण त्याशिवाय टेस्टोस्टेरॉनच्या सेवनाच्या दुष्परिणामामुळंही तो होतो. त्यावरील उपचार होता इस्ट्रोजेन (oestrogen) क्रिम.

"पण त्याचा काहीही फायदा झाला नाही," असं नेल म्हणाली. "मला वाटलं ती, मी केवळ माझ्या शरिरात हार्मोन्स भरत चालले आहे. पण खरं तर माझं शरीर स्वतःदेखील हार्मोन्स तयार करू शकतं".

एलीलाही तसंच काहीसं वाटत होतं.

"काही काळ पुन्हा आपण नैसर्गिकपणे होतो तसं बनण्याचा प्रयत्न करावा आणि काय होतं ते पाहावं", असा विचार त्यांच्या मनात आला.

त्यानंतर त्या दोघींनी टेस्टोस्टेरॉनचं सेवन बंद केलं. पण पुन्हा लिंग परिवर्तन करण्याचा किंवा मूळ होतो तसं बनण्याचा निर्णय कठीण होता.

"हार्मोन्स संपल्यानंतर पुन्हा मूळ शरीर मिळण्याबाबत मला भीती वाटत होती. मला तर माझं नैसर्गिक शरीर कसं आहे तेही माहिती नव्हतं, कारण मी फार लवकर बदल करून घेतले होते," असं एली म्हणाली.

नेलच्या मते, "पुन्हा माघारी फिरण्याचा विचार हा भीतीदायक होता. कारण मी माझ्या अडचणी सोडवण्यासाठी हा बदल करून घेतला होता. पुन्हा जुन्या ओळखीकडं परतणं म्हणजे, पुन्हा अशा गोष्टींचा सामना करणं ज्यातून मला कधीच बाहेर येता आलं नाही".

पुनर्परिवर्तनासंबंधी (detransition-लिंग परिवर्तनानंतर पुन्हा बदल करून मूळ लैंगिक ओळख मिळवणे) एक संशोधनात्मक अभ्यास आहे. या अभ्यासानुसार, अशाप्राकरे पुनर्परिवर्तनाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे.

ट्रान्सजेंडर बनल्यानंतर त्यांच्या जन्माच्या वेळी असलेल्या लैंगिक ओळखीकडे परतण्याचं हे प्रमाण अंदाजे 0.5% पेक्षा म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी आहे. पण अद्याप अभ्यासकांनी ट्रान्सजेंडर किंवा लिंगपरिवर्तन करणाऱ्यांच्या मोठ्या गटाचा अभ्यास करून त्यांच्याबाबत अनेक वर्षं सातत्यानं माहिती मिळवलेली नाही. त्यामुळं तसा डेटा नाही.

"याबाबत पूर्णपणे चोहोबाजुंनी विचार करून अभ्यास झालेला नाही," असं बाथ विद्यापीठातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कॅथरीन बटलर यांनी म्हटलंय.

"पण सोशल मीडियावर - उदाहरण द्यायचं झाल्यास रेडिटवर एक लैंगिक पुनर्परिवर्तन करणाऱ्यांचा एक ग्रुप आहे. त्यात 9000 पेक्षा अधिक वाचक आहेत. त्यात माझ्यासारखे काही अभ्यासकही असतीलच, पण तरीही हा आकडा मोठा आहे."

याबाबतच्या संशोधन आणि अभ्यासाच्या अभावामुळं, जे अशाप्रकारे लिंगपरिवर्तनानंतर पुन्हा मूळ लैंगिक ओळखीकडं परतण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यावर परिणाम होतो.

"याचाच अर्थ म्हणजे, लैंगिक पुनर्परिवर्तन करण्याची इच्छा असणाऱ्यांना कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते, याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्वे किंवा धोरण नाही. त्यामुळं त्यांना यासाठी स्वतःच्या संपर्कांच्या माध्यमातून, यासाठी स्वतःच व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे," असं त्या म्हणाल्या.

नेल आणि एली यांनी तेच केलं. नेल या चित्रकार (इलस्ट्रेटर) असल्यानं त्यांनी त्यांची कौशल्य वापरली आणि दोघींनी मिळून post-trans.com नावाची वेबसाईट सुरू केली. यावर त्यांनी त्यांच्यासारख्या लोकांना ( लैंगिक पुनर्परिवर्तन करणाऱ्यांना) त्यांचे विचार आणि अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.

अशा प्रकारच्या लैंगिक पुनर्परिवर्तन करणाऱ्यांच्या कथा किंवा अनुभवांचा वापर लिंगपरिवर्तनाला विरोध करणाऱ्या संघटना करू शकतात याची जाणीव या दोन्ही तरुणींना आहे. पण या दोघी ट्रान्सजेंडरचे अधिकार नाकारत नाहीत. तर त्या केवळ लिंगपरिवर्तन हा पर्याय नेहमी योग्यच असू शकतो का? हा प्रश्न उपस्थित करत आहेत.

या दोघींनी लैंगिक पुनर्परिवर्तन करून काही महिने लोटले असून त्या दोघी आता महिला आणि लेस्बियन कपल म्हणून जीवनाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे मित्र आणि कुटुंबीयदेखील त्याच प्रयत्नात आहेत.

"आम्हाला याबाबत फोन करून सांगणं हे तिच्यासाठी अत्यंत कठिण होतं," असं एलीचे वडिल एरिक म्हणाले. एलीला मुलगी म्हणून बोलण्याची त्यांची सवय अजूनही बदललेली नव्हती.

"माझ्यासाठी यात काहीही चूक किंवा बरोबर नाही. तिनं सुरुवातीला लिंगबदल केला तेव्हापासून मला माहिती होतं की, ती कधीही पुरुष बनू शकणार नाही. तिनं कधीही पूर्ण शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला नाही. त्यामुळं सध्या ती नव्यानं पुन्हा यात मार्ग शोधतेय, पण तो कायम तिचाच मार्ग होता".

पण, मग त्यांच्या मुलीला मास्टेक्टोमी शस्त्रक्रियेसारख्या निर्णयांवर पश्चात्ताप होता का?

एली, नेल

"माझ्या लैंगिक परिवर्तनाच्या काळामध्ये मी अनुभवलेले सर्व शारीरिक बदल हे मला माझ्या शरीराशी जवळचं नातं निर्माण करण्यात फायदेशीर ठरलेले आहेत. ते माझ्या या प्रवासाचा एक भाग आहेत," असं एली म्हणाल्या.

नेल यांनीही अगदी सहजपणे तसंच मत मांडलं.

"वयानुसार आणि अनेकदा अपघातानंही शरिरांत बदल होत असतात. मला माझे स्तन गमावल्याचं वाईट वाटत नाही."

तसंच पुन्हा स्तन मिळवण्याच्या शस्त्रक्रियेचाही विचार त्यांनी केलेला नाही. पुन्हा एकदा महिला म्हणून लैंगिक ओळख मिळवणं हे काहीसं कठिणही ठरतं. विशेषतः स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एकटं असताना पुरुषांकडून धोका निर्माण होऊ शकतो.

"कारण त्यानं मला पुरुष म्हणून पाहिलं तर मला काहीही वाटणार नाही. पण त्यानं मला स्त्री म्हणून पाहिलं तर कदाचित मला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळं मला सावध राहावं लागेल," असं नेल म्हणाल्या.

एली, नेल

पण त्यांचा "ती" पासून "तो" आणि पुन्हा "ती" बनण्याच्या अनुभवाचा सकारात्मक परिमाण झाला. प्रामुख्यानं नेलच्या करिअरवर.

"मी स्वतःबाबत नेहमीच असा विचार केला की, मी केवळ काही चित्र काढणारी एक सर्व साधारण मुलगी आहे. मी कधीही व्यावसायिक चित्रं काढू शकणार नाही. पण नंतर लैंगिक परिवर्तन करून मी पुरुष बनले आणि अचानक मला असं वाटू लागलं की, मी सर्वकाही करू शकते. मी ऐकलं होतं की, ट्रान्स पुरुषांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. हे तसंच काहीसं होतं. मी तो आत्मविश्वास कायम ठेवला आहे."

एली आणि नेल यांनी अगदी किशोरवयात असताना लैंगिक ओळखीसंदर्भात एखाद्या रोलरकोस्टर राईडसारखा चढ-उतार असलेला प्रवास केला. तो प्रवास काही सोपा नव्हता.

पण आता त्या दोघी हे सर्व मागं सोडून पुढे निघाल्या आहेत. जीवनाकडं नव्या आशेनं पाहत त्या पुढचा प्रवास करत आहेत.

एली आणि नेल यांनी पुढील संपूर्ण आयुष्यात त्यांचा उल्लेख महिलांप्रमाणंच केला जावा असं स्पष्ट केलं आहे. अगदी त्या ट्रान्स पुरुष म्हणून जगत होत्या तेव्हाचा उल्लेखदेखील महिलांसारखाच करावा अशी त्यांची इच्छा आहे.