'फक्त 52 कोटींचं' भिंतीवर चिकटवलेलं साधं केळ इतकं चर्चेत का आलंय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ॲलेक्स लोफ्टस
- Role, बीबीसी न्यूज
'भिंतीवर एका डक्ट-टेपने चिकटवलेलं एक साधं केळ' सध्या चर्चेचं कारण ठरलं आहे.
तब्बल पन्नास कोटींच्या घरात किंमत असणारं हे केळ एका चायनीज उद्योजकानं खाऊन टाकल्यानं सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
तुम्ही म्हणाल की, केळी बाजारामध्ये साधारण पन्नास रुपयांना डझनवारी मिळतात, तर एका डक्ट-टेपने चिकटवलेलं एक साधं केळ पन्नास कोटींचं कसं काय असू शकतं?
आणि ते कुणी खाल्लं म्हणून इतकं चर्चेत कसं काय येऊ शकतं?
बावन्न कोटी रुपयांची कलाकृती
चीनमध्ये जन्मलेले 34 वर्षीय क्रिप्टोकरन्सी उद्योजक जस्टीस सन यांनी लिलावामध्ये जिंकलेलं हे केळ खाऊन टाकलं आहे.
इटलीतील मॉरिझिओ कॅटेलन या कलाकाराने 2019 मध्ये हे केळ्याचं आर्टवर्क तयार केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूयॉर्कमधील 'सोदबी ऑक्शन हाऊस'मधील भिंतीवर एका साध्या डक्ट-टेपनं चिकटवलेलं हे केळ चर्चेतील आर्टवर्क मानलं जातं. या आर्टवर्कला 'कॉमेडियन' या नावानं संबोधलं जातं.
चायनीज उद्योजक जस्टीस सन यांनी लिलावामध्ये तब्बल 6.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर अर्थात 52.42 कोटी रुपयांना हे केळ विकत घेतलं. त्यांच्यासोबत आणखी सहा जणांनी या केळ्यासाठी लिलावामध्ये सहभाग घेतला होता.
20 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावामध्ये इतरांना मागे टाकत जस्टीस सन यांनी या केळ्याच्या आर्टवर्कचा लिलाव जिंकला.

फोटो स्रोत, Getty Images
हा लिलाव जिंकल्यानंतर येत्या काळात मी हे केळं खाऊन टाकेन, अशी घोषणाही त्यांनी केली होती.
त्यानंतर जस्टीस सन यांनी शुक्रवारी (29 नोव्हेंबर) हाँगकाँगमधील एका न्यूज कॉन्फरन्सदरम्यान हे केळ खाऊन टाकलं.
एखादी अमूर्त कलाकृती आणि क्रिप्टोकरन्सी या दोघांमधील साम्य अधोरेखित करण्यासाठी आपण ही कृती केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या कलाकृतीमधील केळ खासकरुन प्रदर्शनांच्या आधी वेळोवेळी बदललं जातं. जस्टीस सन यांनी ही कलाकृती प्रदर्शित करण्याचा अधिकार विकत घेतला आहे. त्यामध्ये त्यांनी या कलाकृतीमधील केळ कसं बदललं जावं, यासाठीचं मार्गदर्शनही मिळालं आहे.


याआधीही खाल्लं गेलंय केळ
चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कलाकृतीतील हे केळ पहिल्यांदाच खाल्लं गेलं आहे, असं नाही. याआधी ते दोनदा खाण्यात आलं आहे.
2019 साली पहिल्यांदा एका परफॉर्मन्स आर्टीस्टने तर 2023 साली दक्षिण कोरियातील एका विद्यार्थ्याने हे केळं खाल्लं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, कलाकृतीतील हे केळ खाण्यासाठी 52 कोटी रुपये सोडाच, त्यांनी साधा एक रुपयाही मोजलेला नव्हता. ना त्यांना केळ खाल्ल्याबद्दल त्याची भरपाई द्यावी लागली होती.
मात्र, लिलावात 52 कोटी रुपयांना ही कलाकृती जिंकून उद्योजक जस्टीस सन यांनी हे केळ खाल्ल्यामुळे ते आधीपेक्षा अधिकच चर्चेत आलं आहे.
काय म्हणाले जस्टीस सन?
केळ खाल्ल्यानंतर उद्योजक जस्टीस सन म्हणाले की, "पत्रकार परिषदेमध्ये हे केळं खाणं ही कृतीदेखील या कलाकृतीच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग झाली आहे. हे फक्त केळ नाही तर ते एका सांस्कृतिक घटनेचं प्रतिनिधित्व करतं. ते कला, मीम्स आणि क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील लोकांना एकमेकांशी जोडतं."
"हे केळ इतर केळ्यांहून अधिक चांगलं लागत आहे," असंही ते म्हणाले.
या आर्टवर्कबाबत आपल्याला उत्सुकता असल्याचंही त्यांनी म्हटलं. हे केळ इतर केळ्यांप्रमाणेच कुजतं का, असे काही 'खुळचट प्रश्नही' आपल्याला पडल्याचं त्यांनी मान्य केलं.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात या कलाकृतीचा लिलाव होण्यापूर्वी एक ताजं केळ फक्त 35 सेंट्सना आणण्यात आलं होतं.
मात्र, आता हेच स्वस्तातलं आणलेलं केळ या सगळ्या कृतीमुळे कदाचित जगातील सगळ्यात महागडं फळ ठरलं असावं.
शुक्रवारच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचं स्मरण रहावं म्हणून प्रत्येक उपस्थित व्यक्तीला एक केळ आणि डक्ट-टेपचा रोल भेट म्हणून देण्यात आला.
त्यावेळी जस्टीस सन म्हणाले की, "प्रत्येकाकडे खाण्यासाठी एक केळ आहे."
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्यावर गुंतवणूक केल्याचा खुलासा
जस्टीस सन हे ट्रॉन ब्लॉकचेन नेटवर्क चालवतात. ही एक अशी सर्व्हीस आहे, ज्याद्वारे क्रिप्टोकरन्सीमधील व्यवहार करता येतात.
क्रिप्टोकरन्सी ही डिजीटल करन्सी असते. क्रिप्टोकरन्सीची माहिती जगभरातील वेगवेगळ्या कॉम्प्युटरमध्ये ठेवली जाते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीत बॅंकासारख्या तिसऱ्या घटकाशी आवश्यकता नसते.
जस्टीस सन यांनी या केळ्याच्या कलाकृतीची तसेच इतर अमूर्त कलाकृतींची तुलना 'एनएफटीं'शी केली.
हे 'नॉन फंगीबल टोकन्स' डिजीटल आर्टवर्कचेच घटक आहेत, ज्यांना कोणतंही वस्तुगत मूल्य नाहीये. लोकच त्याला मूल्य प्रदान करतात.

फोटो स्रोत, Getty Images
जस्टीस सन यांच्या ट्रॉन ब्लॉकचेन नेटवर्कमध्ये एनएफटींसंदर्भातील व्यवहार करता येतो.
गेल्या वर्षी, जस्टीस सन यांच्यावर यूएस सिक्यूरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. जस्टीस सन यांनी नोंदणी नसलेल्या सिक्यूरिटी टोकन्सचा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मात्र, जस्टीस सन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. अद्यापही हा खटला सुरुच आहे.
या आठवड्यातच, जस्टीस सन यांनी असा खुलासा केला आहे की, त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्यावर केलेल्या क्रिप्टो प्रोजेक्टमध्ये 30 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











