इब्न बतूता : तुघलकाचा चीनमधला राजदूत, ज्यानं लाखो किलोमीटरचा प्रवास केला, दिल्लीतही ठोकलेला मुक्काम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वलीद बदरान
- Role, बीबीसी अरबी
मोरक्कोमधील अबू अब्दुल्ला मुहम्मद इब्न बतूता नावाचा तरुण 13 जून 1325 रोजी एका प्रवासावर निघाला. तीन दशकं फिरून उत्तर आफ्रिकेपासून चीनपर्यंत त्यानं केलेला हा थक्क करणारा प्रवास ऐतिहासिक आणि अनन्यसाधारण ठरला.
या प्रवासाची त्यानं लिहिलेली वर्णनं आणि अनुभव यांवरून चौदाव्या शतकातील महत्त्वाची माहिती मिळते.
इब्न बतूतानं 'तुहफत उन-नजर फगरैब इल-एमसार' नावाच्या पुस्तकात हे अनुभव लिहिले आहेत. त्याचा 'द ट्रॅव्हल्स ऑफ इब्न बतूता' नावाने अनुवादही करण्यात आला आहे.
एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार, इब्न बतूताचा जन्म 24 फेब्रुवारी 1304 रोजी मोरोक्कोमध्ये झाला होता.
मध्ययुगीन काळातील महान प्रवासी किंवा फिरस्ता असं त्यांचं वर्णन केलं जातं.
इब्न बतूतानं 1 लाख 20 हजार चौरस किलोमीटरहून अधिक प्रवास केला आणि त्या प्रवासाचं वर्णन लिहिलं.
प्रारंभिक जीवन आणि प्रवासाची सुरुवात
मोरोक्कोच्या टँजियर शहरात मुस्लीम विद्वानांच्या कुटुंबात इब्न बतुताचा जन्म झाला होता.
सुरुवातीला त्यांना मुस्लीम कायदे आणि कुराण शिकवण्यात आलं. पण एकाच जागी बसून आयुष्य घालवणं त्यांना मान्य नव्हता. जीवनाचे ध्येय शोधण्याचं वेध त्यांना लागले होते.
त्यामुळं हज करण्याच्या उद्देशानं वयाच्या 21 व्या वर्षी इब्न बतूतानं मूळ गाव टँजियर सोडलं. पण उरलेलं सगळं आयुष्य प्रवासातच जाईल याची तेव्हा त्यांना कल्पना नव्हती.
त्यांचा पहिला प्रवास मक्केचा होता. पण धार्मिक कल, साहित्यिक आवड यामुळं त्यांचा प्रवास पुढंही सुरू राहिला. पण उत्तर आफ्रिकेतला त्यांचा प्रवास धोकादायक ठरला.
त्यांना वाळवंट आणि डाकूंचा सामना करावा लागला.

फोटो स्रोत, Getty Images
इजिप्तला पोहोचल्यावर कैरो शहर पाहून इब्न बतूता थक्क झाले. प्राचीन काळापासून हे शहर प्रचंड गजबजलेलं होतं. मामलूक साम्राज्याच्या मोठ्या मशिदी, बाजारपेठा आणि शैक्षणिक संस्थांना त्यांनी तिथं भेट दिली. पुढं ते अलेक्झांड्रियालाही गेले.

इजिप्तमधील प्रवासादरम्यान त्यांच्यातील फिरस्त्याला आणखी प्रेरणा मिळाली. त्यामुळं त्यांनी जगभ्रमंती करायचं ठरवलं. त्याकाळी व्यापार, तीर्थयात्रा किंवा शिक्षणासाठी लोक प्रवास करायचे. पण इब्न बतूता यांना नवे देश आणि नवे लोक जाणून घेण्यात रस होता.
जगभरातील अनेक राजांनी त्यांचं स्वागत केलं. एवढंच नाही तर त्यांचा प्रवास सुरू राहावा म्हणून त्यांना मदतही केली.
हजनंतर लांब पल्ल्याचे प्रवास
कैरोहून मक्केकडून जाणाऱ्या एका समुहामध्ये इब्न बतूता सहभागी झाले.
नंतर 1326 मध्ये हज करून ते इराकला रवाना झाले. अब्बासी खलिफांचा बालेकिल्ला असलेल्या बगदादला भेट दिली. इराणमध्ये शेवटचे मंगोल गव्हर्नर अबू सईद यांनाही ते भेटले.
इराणमध्ये त्यांनी इस्फहान आणि शिराझ शहरांना भेट दिली. या शहरांच्या संस्कृती आणि साहित्यिक जीवनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

पुढं 1327 ते 1330 पर्यंत ते मक्का आणि मदिना मध्ये राहिले. हज त्यांच्यासाठी धार्मिक यात्रा होती. त्या दरम्यान त्यांनी विविध इस्लामिक संस्कृती आणि लोकांची भेट घेतली. हेही त्यांच्या पर्यटनाची आवड वाढण्यामागचं कारण ठरलं.
जेद्दाहहून एका जहाजातून ते तांबड्या समुद्रातून येमेनला रवाना झाले. तिथून नंतर एडनला गेले. नंतर त्यांनी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर प्रवास केला.
या प्रवासानंतर ते परत मक्केला आले.
भारतातील प्रवास
इब्न बतूता यांनी मक्केमध्ये असताना दिल्लीचा सुलतान मुहम्मद बिन तुघलक तसंच मुस्लिम विद्वानांच्या उदारतेच्या कथा ऐकल्या होत्या. त्यामुळं त्यांनी दिल्लीच्या दरबारात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी इजिप्त आणि सीरियातून प्रवास करत नंतर जहाजानं आशियातील मायनर (अनातोलिया)मध्ये गेले.
सेल्जुक साम्राज्याचं पतन आणि ऑटोमन साम्राज्याच्या उदयाबाबत इब्न बतूता यांचं लिखाण इतिहासकारांसाठी माहितीचा विश्वासार्ह स्त्रोत बनला. सर्वच स्थानिक राज्यकर्त्यांनी इब्न बतूता यांच उदारपणे स्वागतही केलं.
एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या मते, इब्न बतूता यांनी बायझन्टाईन साम्राज्याच्या राजधानीबद्दल दिलेली माहिती स्पष्ट आणि अचूक आहे.
कॉन्स्टँटिनोपोलहून परतल्यावर त्यांनी भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला.
दरम्यान, त्यांनी एका समुहाबरोबर मध्य आशियातील बुखारा, समरकंद आणि बल्ख या प्राचीन शहरांना भेटी दिल्या. नंतर हिंदुकुश पार करून ते भारत आणि दिल्ली साम्राज्यात पोहोचले.
दिल्लीत ते सुलतान मुहम्मद बिन तुघलक याच्यासमोर हजर झाले. सुलतानानं त्यांची काझी म्हणून नेमणूक केली.

फोटो स्रोत, Getty Images
इब्न बतूतानं भारतात बरीच वर्ष घालवली. समाज, प्रशासन आणि विविध धार्मिक परंपरांमधील गुंतागुंत त्यांना इथंच समजली.
पण भारतात आपल्याला धोका असल्याचं हळूहळू इब्न बतूताच्या लक्षात आलं. सुलतान मोहम्मद बिन तुघलक औदार्य आणि क्रूरता यांचं विलक्षण मिश्रण होता. मुस्लीम आणि हिंदूंशी अत्यंत क्रौर्यानं वागून त्यानं बहुतांश भारतावर नियंत्रण मिळवलं होतं.
इब्न बतूतानं दरबारातील अनेक लोकांना राजकारणाचे बळी ठरताना पाहिल्यानं ते खूप घाबरले होते.
तुघलकाबद्दल लिहिताना इब्न बतूतानं त्याच्या पात्राचं मनोवैज्ञानिक दृष्टिने वर्णन केलं आहे.
1342 मध्ये सुलतानानं इब्न बतूताला राजदूत म्हणून चिनी शासकाकडं पाठवलं.
इब्न बतूतानंही लगेचच दिल्ली सोडली. पण चीनचा प्रवास प्रचंड धोकादायक होता. सुलतानाविरोधात बंड केलेल्यांनी आधी दिल्लीत ते लपलेले असलेल्या ठिकाणांवर हल्ला केला होता. तेव्हा जीव मुठीत घेऊन ते निसटले होते.

मालदीवमधून ते श्रीलंकेला गेले. तिथं बौद्ध मंदिरांना भेटी दिल्या. नंतर बंगाल आणि आसाममध्ये गेले. आसाममध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी चीनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि सुमात्राच्या दिशेनं प्रस्थान केलं.
सुमात्राच्या मुस्लीम सुलतानानं त्यांना नवीन जहाज दिलं आणि ते चीनच्या दिशेनं निघाले. इब्न बतूता जिथे जिथे गेले, तिथल्या लोकांचा आणि संस्कृतींचा त्यांनी सखोल अभ्यास केला.
चीन भेट आणि परतीचा प्रवास
इब्न बतूताच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे चीन भेट. 1345 मध्ये ते चीनच्या क्वानझोउ या गजबजलेल्या व्यावसायिक केंद्रात पोहोचले. इब्न बतूता यांनी केलेलं वर्णन पाहता, युरोपियन किंवा अरबांनी यापूर्नी तसं काही क्वचितच पाहिलं किंवा ऐकलेलं असावं.
बीजिंगमधील शाही दरबार, चिनी सभ्यतेचा विकास आणि प्रशासनाचा कारभार पाहून ते थक्क झाले. व्यापाराचं जे विशाल जाळं होतं, त्याचंही वर्णन त्यांनी केलं आहे.
इब्न बतूता यांचा चीन प्रवास मध्ययुगातील व्यापार आणि मुत्सद्देगिरीबाबत तपशीलवार माहिती देणारा आहे.
पूर्वेच्या दिशेनं लांबपर्यंतच्या प्रवासानंतर इब्न बतूता सुमात्रा, मलबार आणि आखाती देशांच्या मार्गे 1346 मध्ये मोरोक्कोला परतण्यासाठी निघाले.

फोटो स्रोत, FACEBOOK
1348 साली सीरियामध्ये त्यांनी ब्लॅक डेथ (प्लेग) चा कहर पाहिला. त्याचवर्षी बतूता यांनी शेवटची हज यात्रा केली. तिथून इजिप्तला आणि पुढं अलेक्झांड्रिया, ट्युनिशिया, सार्डिनिया आणि अल्जेरियाला गेले. नोव्हेंबर 1349 मध्ये ते मोरोक्कोतील फेझ शहरात पोहोचले.
एवढ्या प्रदीर्घ प्रवासानंतरही दोन मुस्लीम देशांबद्दल त्यांना माहिती नव्हती. दोन वर्षांनंतर (1352 मध्ये) ते पश्चिम सुदानच्या प्रवासाला निघाले. सहारा वाळवंट पार करून माली साम्राज्यात ते एक वर्ष राहिले. त्यावेळी माली सत्तेच्या शिखरावर होतं.
1353 च्या उत्तरार्धात इब्न बतूता मोरोक्कोला परतले आणि सुलतानाच्या विनंतीनुसार त्यांनी प्रवासातील आठवणी लिहिल्या.
त्यानंतर इब्न बतूता यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी मोरक्कन शहरात काझी म्हणून काम केल्याचं सांगितलं जातं.
एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार, 1368, 1369 किंवा 1377 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या मूळ गावी टँजियरमध्ये दफन करण्यात आलं.
इब्न बतूताचा वारसा
इब्न बतूतानं अंदाजे 1 लाख 20 हजार चौरस किलोमीटर प्रवास केला. याबाबतीत त्यांनी प्रसिद्ध इटालियन संशोधक मार्को पोलोलाही मागे टाकलं होतं.
इब्न बतूताच्या लेखांमध्ये 14 व्या शतकातील जगाचं वर्णन करण्यात आलं आहे. मध्ययुगीन काळातील इस्लामिक जगाचं तपशीलवार वर्णनही त्यांच्या लिखाणात आढळतं.
व्यापारी जाळं, बौद्धिक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक संपर्कांबद्दल त्यात विशिष्ट माहिती मिळते.
इब्न बतूताच्या प्रवासातून हज यात्रा ही वेगवेगळ्या इस्लामिक जगतातील मुस्लिमांना एकत्र आणते हे दिसतं. याच काळात विचारांची देवाण-घेवाण होऊन मुस्लिमांना समान ओळख मिळते.
इब्न बतूताच्या प्रवास वर्णनांतून मिळालेल्या माहितीचा भूगोल, इतिहास आणि मानववंशशास्त्र या क्षेत्रांवर कायमचा प्रभाव पडला. त्याचं कारण म्हणजे, त्यांनी पश्चिमेला अज्ञात असलेल्या ठिकाणांचं आणि संस्कृतींचं वर्णन केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इतिहासकार आणि संशोधकांना त्यातून प्रचंड माहिती उपलब्ध झाली. त्यांचं पुस्तक अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं असून जगभरातील विद्वान अजूनही त्याचा अभ्यास करतात.
इब्न बतूता यांनी प्रवासादरम्यान किमान 60 राज्यकर्ते आणि अनेक मंत्री, गव्हर्नर आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेतली. पुस्तकात त्यांनी 2000 हून अधिक लोकांचा उल्लेख केला आहे, त्यांना ते वैयक्तिकरित्या ओळखत होते.
यापैकी बहुतांश लोकांची ओळख स्वतंत्र स्रोतांवरून होते. पण, इब्न बतूता यांच्या साहित्यात नावं किंवा तारखांमध्ये काही त्रुटीही आढळतात.
इब्न बतूता यांचं पुस्तक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या मनोरंजक पैलूंवरही प्रकाश टाकतं.
ज्ञानाची भूक माणसाला कुठंही नेऊ शकते याचा पुरावा म्हणजे इब्न बतूताचा प्रवास. त्यांच्या प्रवासाचा उद्देश केवळ वैयक्तिक मनोरंजन नव्हता तर त्यातून त्यांनी जगाबद्दलचं महत्त्वाचं ज्ञानही मिळवलं.
इब्न बतूता यांना आजही महान संशोधक समजलं जातं. त्यांनी प्रवासातून आणि जगभरात जोडलेल्या संबंधांतून अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे.











