डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली इलॉन मस्क आणि विवेक रामस्वामी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेत इलॉन मस्क आणि विवेक रामस्वामी यांच्याकडे नव्या खात्याची जबाबदारी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गव्हर्नमेंट एफिशियन्सी नावाचा विभाग सुरू केला असून त्याची जबाबदारी या दोघांकडे दिली आहे.

ट्रम्प यांनी दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, "हे दोघे उत्तम अमेरिकन नागरिक सरकारी नोकरशाहीत बदल करुन, अतिरेकी नियम कमी करुन, अनाठायी खर्च टाळण्याचे मार्ग काढून माझ्या प्रशासनाला मदत करतील आणि 'सेव्ह अमेरिका' या माझ्या मोहिमेसाठी संघराज्यीय एजन्सींची नव्याने मांडणी करण्यास मदत करतील."

इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेस एक्स कंपनीला देखील ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा फायदा होऊ शकतो. सरकारी उपग्रह अंतराळात पाठवण्याच्या उद्योगात स्पेसएक्स या कंपनीने आधीच वर्चस्व मिळवलेलं आहे.

व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या एवढ्या जवळचा सहकारी एवढ्या मोठ्या पदावर गेल्याने हे संबंध अधिक दृढ होऊ शकतात. इलॉन मस्क यांनी त्यांची प्रतिस्पर्धी असलेल्या बोईंग कंपनीच्या सरकारी कंत्राटांवर आधीच टीका केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या कंत्राटांच्या रचनेमुळे बोईंग कंपनी ठरलेल्या खर्चात आणि मुदतीत दिलेली कामे करत नाही.

अमेरिकेच्या गुप्तहेर संस्था आणि पेंटागॉन सारख्या संस्थांनी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दाखवल्यानंतर स्पेसएक्स आता हेरगिरी करणारे उपग्रह देखील तयार करणार आहेत.

ट्रम्प यांनी उद्योगांबाबत भाष्य करताना म्हटलं होतं की ते कमीत कमी सरकारी हस्तक्षेप असणारं उद्योग धोरण आणणार आहेत आणि याचा देखील मस्क यांच्या इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या टेस्ला कंपनीला फायदा होऊ शकतो.

मागच्याच महिन्यात रस्ता सुरक्षेसाठी काम करणाऱ्या अमेरिकेच्या सरकारी संस्थेने टेस्ला कंपनीच्या 'सेल्फ ड्राइव्ह सॉफ्टवेअर सिस्टीम'ची चौकशी करणार असल्याचं म्हटलं होतं.

टेस्लामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संघटनात्मक पातळीवर एकत्र येण्यास पायबंद घातल्याबाबत इलॉन मस्क यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

अमेरिकेतील ऑटोउद्योगातील कर्मचारी संघटनेने इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात बेकायदेशीर कामगार धोरण राबवल्याची तक्रार केली होती.

आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या कथित निर्णयाबाबत ट्रम्प आणि मस्क यांनी एक्सवरून केलेल्या चर्चेनंतर ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील मोठे उद्योग आणि अतिश्रीमंत वर्गावर असलेले कर कमी करण्याची घोषणा केली होती. इलॉन मस्क यांना अपेक्षा आहे की ट्रम्प त्यांनी दिलेलं हे आश्वासन पाळतील.

कोण आहेत विवेक रामस्वामी?

37 वर्षांच्या रामस्वामींचा जन्म ओहायोमध्ये झाला होता. त्यांनी हॉर्वर्ड आणि येल विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कोट्यवधींची कमाई केली. त्यानंतर त्यांनी अॅसेट मॅनेजमेंट फर्म बनवली.

वोक पुस्तकाचे लेखक, कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आणि उद्योजक विवेक रामास्वामींनी 21 फेब्रुवारी 2023 ला फॉक्स न्यूजच्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण उतरणार असल्याचे सांगितलं होतं. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली होती.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)