माजी गृहमंत्री अनिल देशमुख दगडफेकीत जखमी, भाजप म्हणतं, 'स्वतःच स्वतःवर हल्ला घडवलाय'

अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (18 नोव्हेंबर) हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोख्याला जबर दुखापत झाली आहे.

यासंदर्भात अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

एका बाजूला, या हल्ल्यामागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचा दावा अनिल देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे तर दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांची ही स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

लाल रेष
लाल रेष

नेमकं काय घडलं?

अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री असून त्यांचा मुलगा सलील देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून निवडणुकीमध्ये उभे आहेत.

अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये घडलेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, "सलील देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे अधिकृत उमेदवार असल्याकारणाने त्यांच्या प्रचाराची सभा सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास संपवून आम्ही एक-दोन जणांच्या घरी भेटी घेऊन काटोलला येण्यास निघालो होते. ड्रायव्हर धीरज चंडालीया व डॉ. गौरव चतुर्वेदी सोबत होते. आमची गाडी पुढे होती तर मागे कार्यकर्त्यांच्या दोन गाड्या होत्या. रात्री आठ-साडेआठच्या सुमारास बेल फाट्यावर गाडीची गती कमी असताना अचानक चार इसम गाडीसमोर आले आणि त्यांनी हल्ला केला. ते 'भाजप जिंदाबाद, अनिलबाबू मुर्दाबाद' अशा घोषणा देत होते. चौघेही दोन मोटरसायकलवरून भारसिंगी रोडने पळून गेले."

पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दिली.

डॉ. इटनकर यांनी म्हटलं आहे की, “नरखेड येथून परत येताना बेला फाटा इथे अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक प्रकार घडला. त्यांना तात्काळ आरएच काटोल येथे तात्काळ प्राथमिक उपचार करून दर्शनी केअर सेंटर येथे उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस तपास करीत आहेत.”

अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक

आम्ही गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करत आहोत, अशी माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "आम्ही तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी काटोलमध्ये येत आहेत. मी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरु केला आहे. हा हल्ला कुणी केला, याबाबत कोणत्याही निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलेलो नाही. मात्र, लवकरच तपास पूर्ण करुन याबाबतचा खुलासा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येईल."

नागपूरचे डीसीपी राहुल मनाडे यांनीही या घटनेबाबत माहिती म्हटलं आहे की, "अनिल देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास आम्ही सुरु केला आहे."

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
लाल रेष

देशमुखांवरील हल्ला दुर्दैवी आणि संतापजनक - सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स'वर लिहिलं आहे की, "प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती."

सुप्रिया सुळे

"हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध," असंही त्यांनी म्हटलं आहे.

देशमुखांची स्टंटबाजी - भाजपचा आरोप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुसऱ्या बाजूला भाजपने ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे विधानसभा प्रमुख अविनाश ठाकरे यांनी एक व्हीडिओ प्रसारित करत प्रत्यारोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांची निवडणुकीतील हार निश्चित आहे, याची जाणीव झाल्यानेच सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केला आहे. स्वत:च्याच कार्यकर्त्यांच्या हातून त्यांनी स्वत:च्या गाडीवर हल्ला केला. आता ते पट्ट्या बांधून फिरत आहेत. त्यांची प्रकृती एवढी गंभीर असेल तर त्यांनी सर्वांत आधी नागपूर वा मुंबईमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. हार पचवू शकत नसल्यानेच हा स्टंट करण्यात आला आहे."

पुढे त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेल्या हल्ल्याच्या आरोपावरही प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लावलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. भाजपचे कार्यकर्ते बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते. कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता. सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा स्टंट असून आम्ही त्याचा निषेध करतो."

माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनीही याच प्रकारचा आरोप केला आहे. हे एकूण प्रकरणच संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

परिणय फुके

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, भाजप नेते परिणय फुके

'भाजपा महाराष्ट्र' या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री परिणय फुके यांनी म्हटलं आहे की, "आज सायंकाळी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मला मिळाली. मात्र, मी या व्हीडिओच्या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करू इच्छितो. मी याआधीही माझ्या अनेक सभांच्या माध्यमातून याबाबतच जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होतो की, अशा प्रकारचं खोटंनाटं नाटक आणि खोटी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला जाईल, याचं भाकित मी केलं होतं. आज हाच प्रकार घडला आहे."

पुढे त्यांनी काही फोटो दाखवत म्हटलं की, "त्यांच्या गाडीवर कुणीतरी दहा किलोचा दगड टाकलेला दिसत आहे. परंतु, दहा किलोचा दगड दहा फुटांवरुन कुणीही फेकून मारु शकत नाही. दगडफेक करताना कोणते दगड वापरतात, हे सामान्य शेतकऱ्यांना माहित आहे. एवढा मोठा दगड पडलेला असूनही त्यांच्या बोनेटवर साधा स्क्रॅचही नाही. काच पूर्ण न फुटता फक्त भेगा पडलेल्या आहेत. पण अनिल देशमुख ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले दिसत आहेत. या सगळ्याच गोष्टी फारच संशयास्पद आहेत. यासंदर्भात पोलीस विभाग तपास करणारच आहेत. मात्र, मी काटोलच्या जनतेला सतर्क करण्यासाठी हा व्हीडिओ केला आहे."