You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पर्सनल ट्रेनरऐवजी एआय कोच, हा बदल फिटनेससाठी किती परिणामकारक? युजर्सचा अनुभव काय?
- Author, एलेरी ग्रिफिथ्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सणासुदीच्या काळात भरपूर खाणं-पिणं आणि विश्रांती घेतल्यानंतर, जानेवारीमध्ये अनेक लोक पुन्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायचं ठरवतात.
पण वैयक्तिक प्रशिक्षकाऐवजी (पर्सनल ट्रेनर) एआयचा पर्याय वापरून फिटनेस क्षेत्रात बदल घडू शकेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
स्वान्सीमधील 23 वर्षीय रिचर्ड गॅलिमोर फिटनेस आणि आहारासाठी एआयचा वापर करतो.
एआयमुळे त्याने बेंच प्रेस 70 किलोवरून थेट 110 किलोपर्यंत वाढवला आहे. "मला आजपर्यंत कधीही इतकं फीट वाटलं नव्हतं," असं तो आता म्हणतो.
दरम्यान, रॉन्था सायनॉन टाफमधील अबरडेर येथील 21 वर्षांच्या लिया वॉल्शने आपल्या दुसऱ्या हाफ मॅरेथॉनच्या तयारीसाठी एआय टूलचा वापर केला होता.
ती म्हणते, "एआयचा वापर खूप उपयोगी आणि प्रभावी ठरला. या स्पर्धेत मी स्वतःची सर्वोत्तम कामगिरी केली."
तिला दिवसाच्या कुठल्याही वेळी एआयला प्रश्न विचारता येतात. ही सोय तिला खूप महत्त्वाची वाटली. कारण पर्सनल ट्रेनरकडून हे शक्य नसल्याचं तिला वाटतं.
कार्डिफचे पर्सनल ट्रेनर डॅफिड जड म्हणतात की, एआय वेगानं प्रगती करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
परंतु, प्रशिक्षकासोबत प्रत्यक्ष सराव करताना येणारा 'मानवी संपर्क' आणि 'जबाबदारी'ची भावना एआय कधीच पूर्णपणे देऊ शकणार नाही.
'पर्सनल ट्रेनरची फी परवडत नाही'
अनफिट होत असल्याचं जाणवल्यानंतर मी पुन्हा जिम सुरू करण्यासाठी एआयची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
मे महिन्यात झालेल्या एका फंड रेझर रनमध्ये तो चालत गेला, यामुळे तो खूप निराश झाला होता. यापूर्वी त्याने ती शर्यत धावून पूर्ण केली होती, असं तो म्हणतो. "आता स्वतःकडे नीट लक्ष द्यायला हवं," हे त्याचवेळी त्याला जाणवलं.
रिचर्डने आपल्या उद्दिष्टांनुसार व्यायाम आणि आहार योजना (डाएट प्लॅन) तयार करण्यासाठी एआय टूलचा वापर केला. एआयमुळे त्याला व्यवस्थित नियोजन केलेला दिनक्रम मिळाला आणि आहार तसेच सप्लिमेंट्सबद्दलही माहिती मिळाली.
तो म्हणतो, "मी दररोज साधारण 2 तास व्यायाम करतो आणि खरोखर मला आता फरक जाणवत आहे." त्यानं सांगितलं की, एआयने त्याला त्याच्या 'पूर्ण क्षमते'पर्यंत पोहोचण्यास मदत केली.
जिमची फी आणि सप्लिमेंट्स महाग असल्यामुळे रिचर्डने पर्सनल ट्रेनरऐवजी एआयची निवड केली.
तो म्हणाला की, एआय मोफत आहे, ते सहज वापरता येतं आणि महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःच्या गतीने व्यायाम करू शकतो.
एआय वापरायला सुरुवात केल्यापासून, आता त्याच्याशिवाय राहणं कठीण आहे, असं रिचर्ड म्हणतो.
त्याला त्याची इतकी सवय झाली आहे की, एआय नसेल तर आपल्याला खूप अडचण आली असती, असं तो सांगतो.
तो म्हणतो, "आता ही माझी सवय झाली आहे, मी याचा दररोज वापर करतो."
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या 'विच?' (Which?) सर्व्हेमध्ये यूकेतील 17 मोठ्या जिम ब्रँडच्या किमतींचा अभ्यास करण्यात आला. त्यात दिसून आलं की, साध्या पूर्ण प्रवेश असलेल्या प्लॅनसाठी सरासरी जिम मेंबरशिपची किंमत महिन्याला 38 पाऊंड (4 हजार 608 रुपये) आहे.
याच्या किमतीही कमी-जास्त प्रमाणात होत्या, सर्वात स्वस्त जिमची मेंबरशिप 23 पाऊंड (2 हजार 789 रुपये) आणि सर्वात महागड्या जिमची 132 पाऊंड (16 हजार रुपये) होती.
प्युअर जिमच्या संशोधनानुसार, पर्सनल ट्रेनर्स स्वतःचे दर स्वतःच ठरवतात. लंडनबाहेर 45 ते 60 मिनिटांच्या सत्रासाठी साधारणपणे 30 पाऊंड ते 65 पाऊंड (3 हजार 637 ते 7 हजार 882 रुपये) आणि लंडनमध्ये सुमारे 45 पाऊंड ते 65 पाऊंड (5 हजार 456 ते 7 हजार 882 रुपये) घेतले जातात.
संशोधनात आढळून आलं की, ग्राहक साधारणपणे आठवड्यात एक-दोन वेळा पर्सनल ट्रेनरसोबत व्यायाम करतात आणि महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांसाठीच ते काम करतात. पण हे पूर्णपणे लवचिक असल्याचं दिसून आलं.
'एआयने 11 आठवड्यांचा प्लॅनच दिला'
लिया म्हणते की, तिला कार्डिफ हाफ मॅरेथॉनसाठी तयारी करायची होती. पण अगदी शेवटच्या क्षणी तिने तयारीला सुरुवात केली. त्यावेळी तिने एआय टूलची मदत घेतली.
तिने एआयला एक प्लॅन तयार करायला सांगितला, ज्यात धावण्याचा आणि जिमच्या सत्रांचा (सेशन्स) म्हणजे दोन्हींचा समावेश तिला हवा होता.
एआयने तिच्या शर्यतीच्या तारखेनुसार आणि उद्दिष्टांनुसार 11 आठवड्यांचा कार्यक्रम तयार केला. त्यामध्ये जिमचे दिवस, सोपं किंवा सहज धावणे आणि लाँग रनचे दिवस ठरवले होते, प्रत्येकासाठी ठराविक वेळ दिली होती.
त्यानंतर लियाने त्या वेळापत्रकात थोडासा बदल करून तो जीवनशैलीप्रमाणे जुळवला. ही प्रक्रिया जलद आणि सोयीस्कर असल्याचं तिने सांगितलं.
मागील वर्षीही लियाने आपल्या पहिल्या हाफ मॅरेथॉनची तयारी करत असताना एआयची मदत घेतली होती. ती म्हणाली की, तिने एआय-आधारित रनिंग अॅप वापरलं होतं, जे पर्सनलाइज्ड प्लॅन देतं आणि ऑडिओ कोचिंगसह धावण्याची गती ठरवतं.
'अत्यंत उपयोगी आणि निकालही उत्तम'
यावर्षी, तिने दुसरं एआय टूल वापरण्याचा निर्णय घेतला. त्यात मागील अॅपमधील काही सुविधा नसल्या तरीही ते कमी खर्चिक होतं.
ती 'दिवसाच्या कोणत्याही वेळी' प्रश्न विचारू शकते आणि आपला प्लॅन सहज बदलू शकते, ही गोष्ट तिला खूप आवडली. तिने सांगितलं, "जर पर्सनल ट्रेनरने प्लॅन तयार केला, तर तुम्ही त्यांना मध्यरात्री मेसेज करू शकत नाही."
लिया म्हणते की, तिला स्वतःच्या वेळेनुसार, स्वतंत्रपणे प्रशिक्षण घेणं जास्त आवडतं आणि तिला सतत मागे लागलेला प्रशिक्षक नको असतो.
ती म्हणते, "एआय वापरताना मला स्वतःला प्रेरित करावं लागतं आणि मला हीच गोष्ट खूप आवडते."
2 तास 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचं तिचं उद्दिष्ट होतं. पण तिने ही मॅरेथॉन 2 तास 11 मिनिटांतच पूर्ण केली.
"हा खूप छान अनुभव होता," असं तिने म्हटलं.
ट्रेनर्सला 'जबाबदारी' वाटते महत्त्वाची
37 वर्षीय डॅफिड हे मागील 12 वर्षांपासून पर्सनल ट्रेनर म्हणून काम करतात. ते वृद्ध आणि दुखापतग्रस्त लोकांना प्रशिक्षण किंवा त्यांचं पुनर्वसन करण्यात तज्ज्ञ मानले जातात.
ते म्हणतात की, लोक एआय वापरून फिटनेस शिकत आहेत हे छान आहे, कारण यामुळे प्रगती लवकर होते.
ते म्हणतात, "माझ्या मते हे खूप महत्त्वाचं आहे- जास्त ज्ञान मिळवणं हे चांगलं आहे."
डॅफिड सांगतात की, त्यांचे काही क्लाइंट आधीपासूनच एआय वापरतात. यामुळे त्यांना चांगले प्रश्न विचारता येतात आणि जिममध्ये मिळालेल्या वेळेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास मदत होते.
त्यांना एआय ट्रेनर्सची जागा घेईल याची काळजी नाही, कारण लोक अजूनही 'मानवी संपर्क' आणि 'जबाबदारीची भावना' महत्त्वाची मानतात, असा युक्तिवाद त्यांनी केला.
ते म्हणतात, "माझ्या मते, लोक जितकं जास्त ऑनलाइन राहतील, तितका त्यांना मानवी संपर्क किंवा लोकांशी संपर्क हवा वाटतो, कारण कॉम्प्युटरमधून ती जाणीव किंवा माणुसकी मिळत नाही."
डॅफिड म्हणतात की, एआय क्लायंटला सोप्या आणि स्पष्ट पद्धतीनं शिकवतं, अंदाज लावण्याची गरज कमी करतं आणि थेट मार्गदर्शन देतं. त्यामुळे प्रशिक्षण अधिक चांगल्या पद्धतीनं आणि परिणामकारक होतं. यामुळे नव्यानं सुरुवात करणाऱ्यांचा ताणही कमी होतो.
पण त्यांचं म्हणणं आहे की, खऱ्या बांधिलकीची जाणीव तेव्हाच होते, जेव्हा लोक प्रत्यक्ष जिममध्ये येऊन पैसे खर्च करतात.
डॅफिड म्हणाले, "एआय पहाटे 2 वाजता कितीही उपयोगी असो, पण सकाळी 7 वाजता कामाला जाण्याआधी उठवून,'चल व्यायाम कर' असं जबाबदारीने सांगू शकत नाही."
अनेक लोकांसाठी जिम म्हणजे मोबाइल बाजूला ठेवण्याची आणि स्क्रीनपासून थोडा ब्रेक घेण्याची जागा आहे. विशेषतः जे दिवसभर कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर काम करतात त्यांच्यासाठी, असंही त्यांनी पुढं म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)