You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजकीय प्रचार करणाऱ्या कीर्तनकारांवर टीका, रवींद्र पोखरकरांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुक्त पत्रकार, स्तंभलेखक आणि युट्युबर असलेल्या रवींद्र पोखरकर आणि त्यांच्या 'अभिव्यक्ती' या युट्यूब चॅनलवर ठाण्यात दाखल गुन्हा दाखल झाला. यानंतर राज्यभरात, विशेषत: समाजमाध्यमांवर चर्चा सुरू आहे.
पोखरकरांनी अलीकडेच त्यांच्या युट्यूब चॅनलवर काही कीर्तनकार महाराज आणि त्यांच्या निवडणुकीत प्रचारकी सहभागावर टीका करणारा व्हीडिओ प्रकाशित केला होता.
या व्हीडिओत असलेल्या तपशीलावर आक्षेप घेत भाजपाच्या 'सोशल मीडिया सेल'चे संयोजक प्रकाश गाडे यांनी ठाणे पोलिसांत 'माझ्या व माझ्यासारख्या अनेक हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या' असं म्हणत तक्रार दाखल केली.
त्या तक्रारीवर ठाणे शहरातील डायघर येथील पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 अंतर्गत पोलिसांनी पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. याची माहिती गाडे यांनीच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर दिली.
पोलिसांनी अद्याप पुढची कारवाई केली नसली, तरीही हा व्हीडिओ, त्यावरच्या कारवाईचा हेतू, या सगळ्या अनुषंगानं समाजमाध्यमांवर त्यावरुन वादळी चर्चा सुरू आहे.
काहींची भूमिका अशा कारवाईच्या समर्थनाची, तर काहींची भूमिका त्याच्या निषेधाची आहे. काही साहित्यिकांनी या कारवाईविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून हा गुन्हा मागे घेण्याची विनंती केली आहे.
अनेक साहित्यिक, पत्रकार, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार-अभ्यासक, समाजमाध्यमांमध्ये स्वतंत्रपणे काम करणारे पत्रकार यांनी या पोलीस कारवाईबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
स्वत: रवींद्र पोखरकर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजमाध्यमांवर लिहिताना आपण आपल्या भूमिकेशी आणि व्यक्त केलेल्या मतांशी ठाम असून मी न्यायालयातही त्याविषयी आपली बाजू मांडेन, असं म्हटलं आहे.
'त्या' व्हीडिओत काय होतं?
रवींद्र पोखरकर यांचं 'अभिव्यक्ती' नावाचं युट्यूब चॅनल आहे आणि 2020 सालापासून ते या माध्यमावर विविध विषयांशी संबंधित व्हीडिओ प्रकाशित करत असतात. त्यांच्या या चॅनलचे तीन लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत. त्यांचे सगळे व्हीडिओ मराठीत असतात.
पोखरकर हाताळत असलेले विषय धर्म, अंधश्रद्धा, सामाजिक प्रश्न अशा विविध चर्चांना स्पर्श करणारे असतात. असं असलं तरी बहुतांशी ते राजकारणावर बोलतात. त्यांच्या राजकीय भूमिकाही स्पष्ट असतात. ते विविध संदर्भ देत थेट भूमिका घेत असतात. बऱ्याचदा त्या भूमिका प्रस्थापित राजकारणाविरोधात असतात.
राजकारणातला धर्माचा वापर, हिंदुत्व, जातीय राजकारण या विषयांवर ते अनेकदा बोलले आहेत, हे त्यांच्या विषयांच्या यादीत दिसतं.
युट्यूबसोबत त्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र' सारख्या डिजिटल मंचांवर स्तंभलेखनही केलं आहे. फेसबुकसारख्या समाजमाध्यमांसोबत इतर प्रत्यक्षातील जाहीर कार्यक्रमांमध्येही पोखरकर सहभागी होत असतात.
विविध क्षेत्रातल्या व्यक्तींच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. त्यांचे व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरलही होत असतात.
ज्या व्हीडिओमुळे ते सध्या चर्चेत आहेत आणि जो वाद त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहोचला आहे, तो व्हीडिओ 'अभिव्यक्ती'वर 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाला. त्याचं शीर्षक आहे 'वारकरी समाजाला कलंकित करणारे सुपारीबाज कीर्तनकार महाराज'. एकूण 58 मिनिटांचा असलेला हा व्हीडिओ सात दिवसांत दीड लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे.
या व्हीडिओत पोखरकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गावागावांमध्ये कीर्तनं करणाऱ्या वारकरी संप्रदायातील काही महाराजांचा राजकारणासाठी कसा वापर झाला, या विषयाला हात घातला आहे.
वारकरी संप्रदाय कायम अशा राजकारणापासून लांब राहिला आहे, पण काही कीर्तनकारांनी भाजपाची बाजू घेत गावोगावी धर्मावर आधारित प्रचार केला. त्याचा भाजपाला फायदा झाला, असा रोख पोखरकर यांच्या या व्हीडिओत आहे.
अध्यात्मिक आणि विवेकवादी भूमिका घेऊन शतकांपासून सुरू असलेल्या वारकरी संप्रदायासाठी हे किती धोक्याचं आहे हे पोखरकर यांनी मांडलं. ही मांडणी करताना त्यांनी त्यांच्या या प्रकाशित व्हीडिओमध्ये वारकरी सांप्रदायिक शिक्षणात मोठं काम केलेल्या दिनकर शास्त्री भुकेले यांची मुलाखतही घेतली आहे.
पोखरकरांनी या व्हीडिओमध्ये भाजपासारख्या पक्षाला निवडणुकीत मदत करणारे काही कीर्तनकार असा उल्लेख करून त्यांना थेट शब्दांमध्ये सुनावलं. त्यातूनच हा वाद निर्माण झाला आहे.
पोखरकर सध्या वारकरी संप्रदायावरच्या व्हीडिओमुळे वादात अडकले असले तरीही, त्यांनी पहिल्यांदाच युट्यूब चॅनलवर वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हीडिओ प्रकाशित केलं असं नाही. त्यांच्या चॅनलवरच्या व्हीडिओ लिस्टमध्ये पाहिलं तरी ते दिसतं.
शिवाय, आता वाद होऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर मांडलेल्या आपल्या भूमिकेतही ते म्हणतात की, आपण आणि आपलं कुटुंब हे वारकरी संप्रदायातलं आहे. ते स्वत:सुद्धा देहू अथवा आळंदीच्या पायी वारीत नियमित सहभागी होत असतात.
वास्तविक, यंदाच्या निवडणुकीतील कीर्तनकारांच्या प्रचारावरही नोव्हेंबर महिन्यातल्या निकालानंतर अनेकदा लिहिलं बोललं गेलं आहे. त्यातही नवीन काही नाही. भाजपा वा अन्य पक्षांनी ही रणनीती पक्ष म्हणून वापरली का, असे प्रश्नही विचारले गेले. त्या विषयी लिहिलंही गेलं. विविध राजकीय पक्षांच्या 'अध्यात्मिक आघाड्या' यासाठी कार्यरत असतात.
पण तरीही पोखरकर यांच्या या व्हीडिओनं, त्यातल्या मांडणीनं, शब्दांनी वाद झाला आणि तो पोलीस कारवाईपर्यंत जाऊन पोहोचला. गुन्हा दाखल झाल्यावर काल, म्हणजे 16 फेब्रुवारीला, त्यांच्या 'अभिव्यक्ती' युट्यूब चॅनलवर आपली प्रतिक्रिया देणारा व्हीडिओही त्यांनी प्रकाशित केला. त्याचं शीर्षक 'अटक झाली तरी माझी लढाई सुरुच राहील' असं आहे.
'पोखरकर यांनी असा व्हीडिओ मशीदीतल्या फतव्यांबद्दल करुन दाखवावा'
पोखरकर आणि त्यांच्या 'अभिव्यक्ती' युट्यूब चॅनलविरुद्ध तक्रार करणाऱ्या भाजपा सोशल मीडिया सेलचे संघटक प्रकाश गाडे यांच्याशी 'बीबीसी मराठी'नं संपर्क साधला असता त्यांनी यामध्ये कोणतंही राजकारण नाही, असं म्हटलं.
गाडे म्हणाले, "आम्ही राजकीय टिकाटिपण्णी समजू शकतो. ती यापूर्वीही सहन केली आहे. मात्र, आम्हाला पूजनीय असणाऱ्या महंत, महाराज, कीर्तनकारांबद्दल असे शब्द वापराल तर कोण सहन करेल? आम्ही ते सहन करणार नाही."
गाडे त्यापुढे जाऊन पोखरकरांना आव्हान देत म्हणाले, "मी त्यांना तुमच्या माध्यमातून जाहीर आव्हान देतो की, त्यांनी असाच एक व्हीडिओ मशिदीतून निघणाऱ्या फतव्यांवरही करावा. जर त्यांनी तसा व्हीडिओ केला तर मी स्वत: जाऊन केलेली तक्रार मागे घेईन."
दुसरीकडे पोखरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
ते म्हणाले, "नरेंद्र दाभोलकर जसं म्हणाले होते की, दुसरे कोणीही काहीही करोत, मी माझ्या घरातला कचरा साफ करतो आहे. तो माझा अधिकार आहे. त्यामुळे मी माझं काम सुरू ठेवणार आहे."
पोखरकरांच्या माहितीनुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचं त्यांना समाजमाध्यमांतून समजलं. कोणत्याही कारवाईसाठी पोलिसांकडून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.
"हा सगळा गळचेपी करण्याचाच प्रकार आहे. लोक शहाणे होऊ नयेत, हीच या राजकारण्यांची अपेक्षा असते. कारण त्यावर त्यांचं धर्मांध राजकारण चालत राहतं. वारकरी संप्रदायातले लोक श्रद्धाळू असतात. त्यांचा असा वापर होतो असं दाखवलं की काही लोकांना राग येतो," पोखरकर म्हणाले.
'पोखरकर यांच्यावरचा गुन्हा तात्काळ मागे घेतला जावा'
पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याच्या कारवाईबद्दल अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याविषयी जाहीर भूमिकाही घेतल्या आहेत.
लेखक श्रीकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून पोखरकर यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
आपल्या पत्रात ते म्हणतात, "अध्यात्मिक परंपरेतील कुप्रवृत्तीविषयी जर ते बोलत असतील आणि त्याबद्दल जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर या मराठी मातीतल्या सगळ्याच डोळस संतांवर गुन्हा दाखल करावा लागेल."
श्रीकांत देशमुख पुढे म्हणाले, "तुकोबांच्या विचारात बाबासाहेब आंबेडकर यांनादेखील लोकशाही दिसत होती. एवढे श्रेष्ठत्व या परंपरेत आहे. तीच परंपरा काही पोटभरु, स्वार्थी लोकांनी हायजॅक केली आहे."
"तिला आवर घालणं हे खरं लोकशाहीतील कर्तव्य असताना विवेकाची रुजवण करू पाहणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल होत असतील, तर आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत याचा विचार करावा," अशी विनंती देशमुख यांनी केली.
स्वत: गावोगावी कीर्तन करणारे आणि 'होय होय वारकरी' या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे.
"पोखरकरांचा शब्द अन् शब्द बरोबर आहे. ते बोलले आहेत त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. वारकरी परंपरेनंही व्यावसायिक कीर्तनकारांचा निषेधच केला आहे. तेच पोखरकरही करत होते. या विषयावर तुकाराम महाराजांनीही कठोर शब्द वापरले आहेत," बंडगर महाराज 'बीबीसी मराठी'शी बोलताना म्हणाले.
"अशा प्रकारे गुन्हे वा खटले दाखल होणं इतिहासात संतांच्या बाबतीतही झालं होतं. सनातन्यांनी संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत तुकाराम या संतांवरही खटले भरले होते. आताही तसंच घडतं आहे. यावर 'होय होय वारकरी' या पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरणच आहे. आताही तसंच घडतं आहे. वेगळं ते काय?" बंडगर महाराज विचारतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)