चेटूक करणाऱ्या 12 जणांना 370 वर्षांनी केले दोषमुक्त

    • Author, बरन्ड डेबुस्मन ज्यु.
    • Role, बीबीसी न्यूज वॉशिंग्टन

चेटूक केल्याचा आरोप ठेवून समूहाने मारल्याच्या किंवा शिक्षा केल्याच्या घटना आपण भारतात अधूनमधून वाचतो. अशा आरोपांमुळे अनेक व्यक्तींना आजवर अन्याय झाल्याच्या बातम्या आपण वाचतो. परंतु अशी एक घटना अमेरिकेत आणि ते ही 17 व्या शतकात झाल्याचं तुम्हाला सांगितलं तर? आणि त्या पलीकडे जाऊन या लोकांना मृत्यूनंतर 370 वर्षांनी दोषमुक्त केल्याचं सांगितलं तर? हो... हे असंच झालंय.

370 वर्षांपूर्वी चेटूक केल्याचा आरोप ठेवून 12 लोकांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. अमेरिकेतील कनेक्टिकट राज्याच्या सिनेटने त्यांना आता दोषमुक्त केले आहे. यातील 11 जणांना फाशी झाली होती.

आता सिनेटने ही चूक आणि अन्याय असल्याचं मान्य करत त्यांना दोषमुक्त केलं आहे.

चेटूक केल्याचा चुकीचा आरोप ठेवून मारल्या गेलेल्या लोकांचे वंशज या इतिहासातील कृतिविरोधात लढत आहेत. त्याच चळवळीचा हा एक भाग आहे.

25 मे 2023 रोजी कनेक्टिकटच्या सिनेटमध्ये 33 विरुद्ध 1 अशा मतांनी दोषमुक्तीचा निर्णय मंजूर झाला.

रॉब सॅमसन यांनी या ठरावाविरोधात मतदान केले. ते म्हणाले," ज्या काळाचं आपल्याला ज्ञानच नाही त्याबद्दल काय चूक आणि काय बरोबर ठरवणं योग्य नाही. "

ते म्हणतात, "अमेरिकेच्या इतिहासात काय चूक काय बरोबर झालं हे ठरवणं म्हणजे अमेरिका हा एक वाईट इतिहास असलेला देश ठरवल्यासारखं आहे. "

"मला वाटतं सध्या काय सुरू आहे जे भूतकाळापेक्षा चांगलं आणि उज्ज्वल भविष्य याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. "

हा ठराव कनेक्टिकटच्या प्रतिनिधीसभागृहात 121 विरुद्ध 30 असा आधीच मंजूर झाला होता.

या ठरावासाठी जवळपास दोन दशकं कनेक्टिकट चेटूक खटले दोषमुक्ती प्रकल्पाद्वारे लॉबिंग सुरू होतं. हा लॉबीगट 2005 साली अशाच दोषी ठरवलेल्या लोकांच्या वंशजांनी स्थापन केला होता.

अमेरिकेत न्यू इंग्लंडमध्ये अॅलिस यंग यांना सर्वप्रथम असा दोष ठेवून सुळावर चढवलं होतं, त्याला 376 वर्षे पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशीच हा निर्णय आल्याने आपल्याला आनंद झाल्याचं या गटाने म्हटलं आहे.

आम्ही सर्व वंशजांचे, वकिलांचे, इतिहासअभ्यासकांचे, सभागृहातील दोन्ही पक्षाच्या सदस्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हा ठराव मंजूर होण्यासाठी मदत केल्याबद्दल कृतज्ञ आहोत.

अशाप्रकारे इतिहासात चेटूक केल्याचा आरोप ठेवून झालेले खटले आणि इतिहासाचं शिक्षण याबद्दल आम्ही जागृती करत राहूच असा मानस या गटाने व्यक्त केला आहे.

इतिहासात घडलेल्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी अशा दोषमुक्तीची गरज असल्याचं या पीडितांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

सौद अन्वर या सिनेट सदस्यांना आपले पूर्वजही असा आरोप ठेवून मारले गेल्याचं समजल्यावर त्यांनी या कानात विशेष रस घेतला. ते असोसिएटेड प्रेसशी बोलताना म्हणाले, अशा घटना जगभरात आजही होतात त्यामुळे आजही हे काम कालसुसंगत आहे.

कनेक्टिकटमध्ये किमान 45 लोकांना अशा आरोपाखाली मारलं गेलं असावं, अर्थात ही आकडेवारी अपूर्ण असल्याचं या प्रकल्पाच्या सदस्यांना लाटतं.

या इतिहासात मॅसॅच्युसेट्सजवळील सालेम चेटूक खटला सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. यात 200 जणांवर आरोप ठेवण्यात आला होता आणि 25 लोकांना मारण्यात आलं होतं.

सालेम खटल्यांत सर्वात शेवटचे दोषी ठरवल्या गेलेल्या एलिझाबेथ जॉन्सन यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मॅसॅच्युसेट्सने दोषमूक्त केले.

त्यांना फाशी सुनावण्यात आली होती. परंतु नंतर त्यांना माफी मिळाली आणि 77 वर्षांचं आयुष्य जगता आलं. इतिहास अभ्यासकांच्यामते त्यांना मानसिक अस्वास्थ्याला सामोरं जावं लागलं होतं.

इतिहासात अनेक देशांमध्ये अशा प्रकारे चेटूक केल्याच्या आरोपाखाली अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याही देशांमध्ये अशाप्रकारे चुका झाल्या असल्यास त्याची दखल घेण्याचं काम सुरू आहे.

गेल्यावर्षी स्क़ॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्ट्रुजन यांनी 400 स्कॉटिश लोकांची माफी मागितली. यातील बहुतांश महिला होत्या. त्यांच्यावर 1569 आणि 1736मध्ये चेटूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यातील 2500 जणींना आपले प्राण गमवावे लागले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)