You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Dracula : हॉरर सिनेमातल्या नाही तर इतिहासातल्या खऱ्याखुऱ्या ड्रॅक्युलाबद्दल माहितीये?
- Author, असद अली
- Role, बीबीसी उर्दू, लंडन.
ते एका मैदानाचं दृश्य होतं…एका मैलाच्या परिसरात वीस हजारच्या आसपास भाले जमिनीत रोवले होते. जवळपास प्रत्येक भाल्यावर तुर्की सैनिकाचं छिन्नविच्छिन्न झालेलं प्रेत होतं.
सर्वांत उंच अशा दोन भाल्यांवर ऑटोमन साम्राज्यातील अधिकारी हमजा पाशा आणि ग्रीक सेनानी कॅटावोलिनोसचे मृतदेह होते. त्यांचा मृत्यू होऊन अनेक दिवस झाले होते. त्यांच्या शरीरावरील उंची कपडे फाटून त्याच्या चिंध्या हवेवर उडत होत्या.
हवेत सडक्या मांसांची दुर्गंधी भरून राहिली होती.
ग्रीक इतिहासकार चालकोंडिल्स लिहितात की, युरोपमधील ट्रान्सिल्वेनिया राज्यातील टर्गोविस्त शहरापासून 60 मैलांवरच्या या दृश्यानं जून 1462 मध्ये ऑटोमन साम्राज्याचे सातवे सुलतान मोहम्मद (द्वितीय) यांच्या सैन्याच्या आघाडीच्या दलाचं स्वागत केलं.
17 मे 1462 ला सुलतान मोहम्मद (द्वितीय) इस्तांबुलहून युरोपमध्ये डॅन्यूब नदीच्या पल्याड असलेल्या वालिचियाच्या राजाला, व्लाद (तृतीय) ड्रॅक्युला याला धडा शिकविण्याच्या दृष्टिनं मोहिमेवर निघाले. या मोहिमेचा परिणाम किती भीषण होईल, याची कदाचित त्यांना कल्पनाही नसावी.
इतिहासकार रादो फ्लोरेस्को आणि रेमन्ड मॅक्नली यांनी आपल्या 'ड्रॅक्युला : प्रिन्स ऑफ मेनी फेसेस, हिज लाइफ अँड टाइम्स'मध्ये ग्रीक इतिहासकारांच्या हवाल्यानं लिहिलं आहे की, या दृश्याचा सुलतान मोहम्मद यांच्यावर भयंकर परिणाम झाला. 'अशा प्रवृत्तीच्या माणसाकडून त्याची जमीन बळकावणं अतिशय अवघड आहे,' असे उद्गार त्यांनी काढले.
सुलतानाने ती रात्र कशीबशी काढली. आपल्या छावणीच्या चारी बाजूंना त्यांनी खोल खंदक खणायला लावला होता. आपल्या सैनिकांची किंमत मोजून हस्तगत करावा इतका काही हा भाग महत्त्वाचा नाही, असं म्हणत दुसऱ्या दिवशी त्यांनी लष्कराला परतायचा आदेश दिला.
वालीचिया पूर्वीही ऑटोमन साम्राज्याचं मांडलिक राज्य होतं आणि या मोहिमेनंतरही राहिलं. पण इतिहासकारांच्या मते, ते कधीच ऑटोमन साम्राज्याचा अधिकृत भाग बनलं नाही.
सुलतान स्वतः तिथून परतले, पण व्लाद ड्रॅक्युलाच्या विरोधातली मोहीम त्यांनी थांबवली नाही. ड्रॅक्युलाचा धाकटा भाऊ रादोला त्यांनी तुर्की लष्कराच्या काही सैनिकांसोबत तिथेच ठेवलं.
संघर्षानंतर ड्रॅक्युलाला आपलं राज्य सोडून फरार व्हावं लागलं आणि त्याच्या जागी ऑटोमन साम्राज्याचा समर्थक असलेला रादो 'द हँडसम' क्षेत्रीय अधिकारी बनला आणि नंतर ड्रॅक्युलाच्या अत्याचारांना वैतागलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मदतीने तो सिंहासनावरही बसला.
इतिहासकार कॅरोलिन फिंकल यांनी ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासावर लिहिलेल्या आपल्या पुस्तकात वालीचियाविरोधातील कारवाईवरही लिहिलं आहे.
"ऑटोमन साम्राज्याचं मांडलिक राज्य असलेल्या वालीचियाकडून वार्षिक टॅक्स आला नाही. त्यानंतर व्लाद ड्रॅक्युलाकडून हिंसक कारवाई करण्यात आली. म्हणून सुलतान मोहम्मदने 1462 साली डॅन्युब नदी ओलांडून जात शांतता प्रस्थापित करण्याचा आदेश दिला. व्लादचा भाऊ रादोला जेव्हा यश मिळालं, तेव्हा त्यालाच वालीचियाचा अधिकारी नेमण्यात आलं. व्लादकडून कोणताही उपद्रव होऊ नये म्हणून याच रादोला इस्तंबुलमध्ये बंदी बनवून ठेवण्यात आलं होतं. व्लाद स्वतः हंगेरीला फरार झाला."
युरोपमधल्या या मोहिमेच्या जवळपास दहा वर्षं आधी सुलतानाने अनेक शतकं दबदबा असलेल्या बायझन्टाईन साम्राज्याची शेवटची निशाणी असलेल्या इस्तंबुलवर विजय मिळवत 'फतेह सुलतान' ही उपाधी मिळवली होती.
त्यांचं साम्राज्य एकाहून अधिक महासागरांमध्ये पसरलं होतं. स्वतःला 'सिकंदर-ए-आझम' प्रमाणे जगज्जेता समजणाऱ्या सुलतानाची नजर आता युरोपमधील देशांवर होती.
याच दृष्टिने 1462 मध्ये त्यांनी ऑटोमन साम्राज्याचं मांडलिक राज्य असलेल्या वालीचियाच्या शासकाविरुद्ध, व्लाद ड्रॅक्युलाविरुद्ध मोहीम हाती घेतली. इतिहासकारांच्या मते व्लाद सलग तीन वर्षे कराचा भरणा करण्यासाठी सुलतानासमोर उपस्थित राहिला नव्हता.
फ्लोरेस्को आणि मॅक्नलीसारखे इतिहासकार लिहितात की, इस्तंबुलसोबतच बल्गेरिया, सर्बिया आणि ग्रीकमधील बराचसा भाग हस्तगत केल्यावर सुलतानाची नजर वालीचियाकडे वळणं अतिशय स्वाभाविक होतं. आपला हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी जर्मनीहून पूर्वेकडे जात डॅन्यूब नदीच्या भागात कारवाईचा आदेश दिला.
इतिहासाचा विचार केला, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाऊन विजय मिळविण्याची इच्छा असलेल्यांसाठी डॅन्यूब नदी हाच मुख्य रस्ता होता आणि वालीचिया याच नदीच्या उत्तर टोकावर वसलेलं होतं. दहा लाखांहूनही कमी लोकसंख्या असलेल्या या राज्याचे शासक आणि ऑटोमन साम्राज्यामधील संबंध हे कधी बरे तर कधी वाईट अशाच स्वरुपाचे राहिले होते.
फ्लोरेस्को आणि मॅक्नली लिहितात की, राज्याचा नवा शासक व्लाद तृतीय याच्या धोरणांमुळे नाराज असलेल्या सुलतानाने या समस्येचं निवारण करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी लिहिलंय,"ड्रॅक्युला आणि सुलतान मोहम्मद द्वितीय या दोघांमध्ये युद्ध होणं जवळपास ठरल्यासारखंच होतं. कधी हाच प्रश्न होता. सुलतान मोहम्मदसोबतच मोठ्या झालेल्या ड्रॅक्युलाला त्याची महत्त्वाकांक्षा चांगलीच माहीत होती."
मोहम्मदच्या तुलनेत ड्रॅक्युलाचं राज्य खूपच छोटं होतं, पण इतिहासकारांच्या मते त्याच्यामध्ये आपण शासनकर्ते आहोत ही भावना सुलतान मोहम्मदाइतकीच तीव्र होती.
हा तो काळ होता जेव्हा ड्रॅक्युला हे संबोधन एका सन्मानासारखं होतं.
एक नव्हे तर दोन ड्रॅक्युलांचा उल्लेख
पुढची गोष्ट जाणून घेण्याआधी थोडं इतिहासात डोकावून पाहू. इतिहासात दोन ड्रॅक्युलांचा उल्लेख आहे. परदेशात 26 मे रोजी 'ड्रॅक्युला डे' साजरा केला जातो. ज्या ड्रॅक्युलाच्या नावाने हा दिवस साजरा होतो, त्याला आपण अनेक हॉरर चित्रपटात पाहिलं आहे, त्याची वर्णनं वाचली आहेत.
हा ड्रॅक्युला आपल्या भक्ष्याच्या गळ्यात सुळे रुतवून त्याचं रक्त पितो.
या काल्पनिक व्यक्तिरेखेचा जन्म 26 मे 1897 रोजी झाला होता, जेव्हा ब्रॅम स्टोकरची कादंबरी प्रसिद्ध झाली होती. ब्रॅमनं निर्माण केलेली ही व्यक्तिरेखा पूर्णपणे काल्पनिक होती, पण तिचं नाव मात्र खरंखुरं होतं… ड्रॅक्युला नावाच्या राजकुमाराचं, ज्यानं त्याकाळातल्या एका महासत्तेला आव्हान दिलं होतं. एकीकडे त्याच्या स्वभावामुळे तो इतिहासात बदनाम झाला, तर दुसरीकडे त्याला रोमानियामध्ये राष्ट्रीय नायकाचा दर्जा मिळाला.
वालीचिया नावाच्या एका छोट्या देशाचा हा राजकुमार व्लाद तृतीय म्हणूनही ओळखला जायचा. ड्रॅक्युला या नावाचा अर्थ 'ड्रॅक्युलचा मुलगा.' यानं अनेकांना शरीरात खिळे ठोकून मारण्याची शिक्षा सुनावली होती. त्यामुळेच त्याला 'व्लाद द इम्पेलर' म्हणूनही ओळखलं जातं.
विशेष बाब म्हणजे ज्या सुलतान मोहम्मद द्वितीय विरूद्धच्या संघर्षामुळे ड्रॅक्युला ओळखला जातो, त्याच मोहम्मदसोबत तो काहीकाळ राहिला होता. त्यांचे शिक्षकही एक होते. वेगवेगळ्या महासागरांपर्यंत पसरलेल्या मुस्लिम साम्राज्याचा उत्तराधिकारी आणि दुसरीकडे या साम्राज्याचे मंडलिक असलेल्या युरोपातील अनेक राज्यांपैकी एका राज्याच्या ख्रिश्चन शासकाचा मुलगा…हे दोघं एकाच छताखाली कसे राहिले होते? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊच, पण आधी ड्रॅक्युला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकुमाराचा परिचय करून घेऊ.
'व्लाद द इम्पेलर' कोण होता?
एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार डॅन्यूब नदीच्या भागातील वालीचिया नावाच्या राज्याचा शासक असलेल्या राजकुमार 'व्लाद द इम्पेलर'चं पूर्ण नाव हे 'व्लाद तृतीय ड्रॅक्युला' असं होतं. त्याचा जन्म इसवी सन 1431 आणि मृत्यू 1476 मध्ये झाला होता. ट्रान्सिल्वेनियामध्ये त्याचा जन्म झाला होता आणि मृत्यू सध्याच्या रोमानियाची राजधानी असलेल्या बुखारेस्टच्या उत्तरेकडील एका भागात झाला होता.
रोमानियातील इतिहासकार फ्लोरेस्को आणि मॅक्नली लिहितात की, ड्रॅक्युलाचा काळ हा ऑटोमन साम्राज्यातील दोन महान सुलतान- मुराद द्वितीय (1421-1451) आणि मोहम्मद द्वितीय (1451-1481) यांचा काळ होता. या दोघांपैकी मोहम्मद द्वितीय सोबतच ड्रॅक्युला लहानाचा मोठा झाल्याचं फ्लोरेस्को आणि मॅक्नली लिहितात.
एन्साक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार पंधराव्या शतकात युरोपमध्ये व्लादची दुष्कीर्ती ही त्यानं आपल्या शत्रूंवर केलेल्या अत्याचारांमुळे पसरली होती. ब्रिटानिकामध्येही असाही उल्लेख आहे की, इतिहासकारांच्या एका समुहाच्या मते ब्रॅम स्टोमरच्या जगभर प्रसिद्ध झालेल्या कादंबरीमधला ड्रॅक्युला म्हणजे हा व्लादच आहे.
व्लादचे वडील व्लाद द्वितीय हे ड्रॅक्युल होते. त्यांना 'ड्रॅक्युल' ही उपाधी 'पवित्र रोमन सम्राट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिग्समंडने दिली होती. तुर्कांचे युरोपवर होणारे हल्ले रोखण्यासाठी बनविल्या गेलेल्या 'ऑर्डर ऑफ ड्रॅगन'मुळे त्यांना ही उपाधी दिली गेली होती. इमेज
एन्साक्लोपीडियानुसार 'ड्रॅक्युल' हा शब्द लॅटिनमधील 'ड्राकू' या शब्दापासून बनला आहे. 'ड्राकू' या शब्दाचा अर्थ ड्रॅगन आहे आणि ड्रॅक्युलाचा अर्थ होतो, ड्रॅक्युलचा मुलगा. अशारीतीने व्लाद द्वितीय ड्रॅक्युलच्या मुलाचं नाव पडलं व्लाद तृतीय ड्रॅक्युला.
इतिहासकार ड्रॅक्युला ही उपाधी मिळण्याची इतरही काही कारणं सांगतात. त्यांपैकी एक म्हणजे रोमानियन भाषेत ड्रॅक्युलचा अर्थ 'डेव्हिल' म्हणजेच शैतान असाही होतो.
एन्साक्लोपीडिया ब्रिटानिकामधील माहितीनुसार ड्रॅक्युला 1442 त 1448 या काळात ऑटोमन साम्राज्यात राहिला. वडील आणि मोठ्या भावाच्या हत्येनंतर तो वालीचियाला परत आला. ड्रॅक्युलानं राज्यकारभार हाती घ्यायला सत्तावर्तुळातील एका वर्गाचा (ज्यांना बूयार असं म्हटलं जायचं) तसंच त्याच्या धाकट्या भावाचाही विरोध होता. ऑटोमन साम्राज्याचं समर्थनही ड्रॅक्युलाच्या धाकट्या भावालाच होतं.
1948 मध्ये तो पहिल्यांदा शासक बनला, पण लवकरच त्याला हटविण्यात आलं. नंतर गादी मिळविण्यासाठी त्याला आठ वर्षं संघर्ष करावा लागला. दुसऱ्यांदा गादीवर आल्यानंतर त्यानं जे काही अत्याचार केले, त्यामुळे त्याची दुष्कीर्ती सगळीकडे पसरली. त्यानंतरच त्याला 'व्लाद द इम्पेलर' अर्थात खिळे ठोकून मारणारा म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं.
त्याचा हा अत्याचारी कालखंड सुलतान मोहम्मद द्वितीय याच्या 1462 मधील मोहिमेनंतर, ज्याचा वर उल्लेख केला आहे संपुष्टात आला.
व्लाद 1476 साली तिसऱ्यांदा आणि अखेरचा आपल्या वडिलांचं राज्य हस्तगत करण्यात यशस्वी झाला. मात्र याचवर्षी वयाच्या 45 व्या वर्षी तो एका युद्धात मारला गेला.
व्लाद तृतीय ड्रॅक्युला आणि सुलतान मोहम्मद द्वितीय
ऑटोमन साम्राज्यासोबत आपण बेईमानी करणार नाही, याचं वचन म्हणून सन 1442 मध्ये ड्रॅक्युलाच्या वडीलांनी त्याला आणि त्याच्या धाकट्या भावाला सुलतान मुराद यांच्या ताब्यात दिलं. त्यावेळी व्लादचं वय अकरा-बारा वर्षांचं असल्याचं इतिहासकार सांगतात. शहजादा मोहम्मदही जवळपास त्याच वयाचा होता.
त्यावेळी ऑटोमन साम्राज्याची सत्ता वाढत होती. अनेको शतकं जुनी असलेली आणि अखेरच्या घटका मोजत असलेल्या बायझन्टाईन साम्राज्याला अखेरचा धक्का देण्याचा सुलतान मुराद यांचा प्रयत्न होता.
ड्रॅक्युलाचे वडील ऑटोमन साम्राज्याच्या विरोधासाठी तसंच रोमन कॅथलिक चर्चच्या विरोधकांसाठी बनविलेल्या 'ऑर्डर ऑफ ड्रॅगन'चे सदस्य बनले होते. मात्र सत्तेचं पारडं ऑटोमन साम्राज्याच्या बाजूनं झुकताना पाहून त्यांनी रोमन सम्राट सिग्समंडच्या मृत्यूनंतर तुर्कांशी संधी केल्याचं फ्लोरेस्को आणि मॅक्नली लिहितात.
काही काळानंतर सुलतान मुरादच्या मनात त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला. तेव्हा व्लाद द्वितीय आपली दोन मुलं, ड्रॅक्युला आणि रादोसोबत सुलतानाला भेटायला गेले. मात्र दरवाजावरच तुर्की फौजांनी त्यांना अटक केल्याचं इतिहासकार सांगतात. व्लाद द्वितीय एक वर्ष कैदेत राहिले.
त्यानंतर कुराण आणि बायबलवर हात ठेवून त्यांनी ऑटोमन साम्राज्यासोबत निष्ठावान राहण्याची शपथ घेतली. त्यांना सोडण्यात आलं, मात्र त्यांच्या दोन्ही मुलांना सुलतानाने आपल्याकडेच ठेवून घेतलं.
पुढची सहा वर्षे ड्रॅक्युला आपल्या आई-वडिलांपासून दूर ऑटोमन साम्राज्यात होता. त्यांना तिथली भाषा येत नव्हती आणि त्यांचा धर्मही वेगळा होता.
ड्रॅक्युला 1448 पर्यंत आणि त्याचा भाऊ रादोला 1462 पर्यंत ऑटोमन साम्राज्यात राहिले.
बंदी असलेल्या ड्रॅक्युलाचं प्रशिक्षण
ऑटोमन सुलतानाच्या दरबारात जेव्हा छोट्या राज्यांचे राजकुमार बंदी बनून यायचे, तेव्हा ते आपल्यासोबत निष्ठावान राहतील यादृष्टिनेच त्यांना शिक्षण दिलं जायचं.
ड्रॅक्युलालाही त्याकाळच्या उत्तम शिक्षकांनी शिकवलं. इतिहासकारांच्या मते त्याला एकाहून अधिक युरोपियन भाषा यायच्याच. आता त्याला तुर्की भाषाही येऊ लागली. कुराणासोबतच त्याला तर्कशास्त्र आणि गणिताचंही शिक्षण दिलं गेलं.
याच दरम्यान ऑटोमन साम्राज्याला ड्रॅक्युलाचे वडील आणि शासक व्लाद द्वितीय यांच्याबद्दल संशय येऊ लागला.
1447 साली व्लाद ड्रॅक्युलाचे वडील आणि भाऊ युरोपमधील राजकारणाला बळी पडले आणि त्यांची हत्या केली गेली. ड्रॅक्युलाला स्वतंत्र करून ऑटोमन साम्राज्यात अधिकारी बनविण्यात आलं
ऑटोमन साम्राज्य वालीचियाचा शासक म्हणून त्याच्याकडे बघत असल्याचंही त्याला सांगण्यात आलं. 1448 मध्ये तो शासक बनला.
पण नंतर त्याला हटविण्यात आलं. आठ वर्षांच्या संघर्षानंतर वयाच्या 25 व्या वर्षी 1456 मध्ये त्यानं पुन्हा वालीचियाची गादी मिळवली.
व्लाद ड्रॅक्युलाचे अत्याचार
राज्यातील सत्ता आपल्या हाती घेणं हाच व्लाद ड्रॅक्युलाचा खरा हेतू होता. त्याने युरोपातील इतर काही राज्यांप्रमाणे एक फौज बनवली. हे सर्वजण ड्रॅक्युलाचे विश्वासू सहकारी होते.
बुयार हे ऑटोमन साम्राज्याला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असतात याची जाणीव ड्रॅक्युलाला होती. याशिवाय वालीचियामध्ये त्यांच्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचे समर्थकही राज्यात अस्तित्वात होतेच.
ड्रॅक्युलाला त्यांच्याकडून आपला भाऊ मेर्चा याच्या मृत्यूचा बदलाही घ्यायचा बाकी होता.
ड्रॅक्युलाच्या सैनिकांनी बुयार लोकांमधील वयोवृद्ध व्यक्तींच्या शरीरात खिळे ठोकून त्यांना शहरातील भिंतींवर लटकवून दिलं.
निरोगी व्यक्तींना त्यांच्या पूर्वजांच्या काळातील एका जुन्या पडक्या किल्ल्यात पाठवलं. तिथं त्यांना किल्ला दुरुस्तीकरिता मजुरीच्या कामावर जुंपण्यात आलं. या किल्ल्याला 'ड्रॅक्युलाचा किल्ला' असं संबोधलं जायचं.
फ्लोरेस्को आणि मॅकनली इतिहासकार चालकोंडिल्सचा हवाला देत सांगतात, सन 1457 मध्ये 200 बुयार कुटुंब आणि विशेष पदाधिकारी इस्टर समारोहासाठी त्यांच्या महालात एकत्रित आले होते. तिथं त्यांना पकडण्यात आलं.
इतिहासकार सांगतात, त्यावेळी कोणत्याही मांडलिक राज्याने किल्ला बनवणं म्हणजे हे हंगेरी आणि ऑटोमन या दोन ताकदवान साम्राज्यांच्या आदेशाविरोधात जाणं मानलं जायचं.
या किल्ल्यात एक गुप्त रस्ता होता. 1462 मध्ये सत्ता हातून गेली त्यावेळी याच मार्गाने पळून जाण्यात ड्रॅक्युला यशस्वी ठरला होता, असं म्हटलं जातं.
ड्रॅक्युलाने 'आरमाजी' नावाच एक पथक बनवलं होतं. हे आरमाज फक्त ड्रॅक्युलाचाच आदेश मानायचे. एक नवीन न्यायाव्यवस्था लागू करणं, हे त्यांचं काम होतं.
आरमाज पदावरील व्यक्तींमध्ये रोमन लोकांशिवाय, हंगेरी, तुर्की, सर्ब, तातार आणि त्यांच्याशिवाय काही हब्शी लोकांचाही समावेश होता.
त्यांना गलेलठ्ठ पगार मिळायचा, शिवाय त्यांच्यावर इतर कोणतेही नियम लागू नसायचे.
त्यांच्या मेंदूत अत्याचार आणि धर्माची व्याख्या एकसारखीच बनली होती. अनेकवेळा आपल्या गुन्ह्याचा बचाव करण्यासाठी ते धर्माचा आधार घेत.
फ्लोरेस्को आणि मॅकनली यांनी आपल्या पुस्तकात त्या काळातील एका जर्मन मायकल बेहम यांचा संदर्भही दिला आहे. त्यांनी इटलीहून ड्रॅक्युलाच्या दरबारात काही प्रतिनिधी आल्याच्या घटनेचा उल्लेख केला होता.
मायकल बेहम यांनी लिहिलं होतं की, त्यांच्या माहितीनुसार त्या राजकीय प्रतिनिधींनी ड्रॅक्युलाच्या सन्मानार्थ आपल्या मोठ-मोठ्या टोप्या डोक्यावरून खाली उतरवल्या. पण त्याच्या खाली घातली जाणारी 'स्कल कॅप' (पारंपरिक पद्धतीची जाळीदार टोपी) त्यांनी काढली नाही.
त्यांच्या परंपरेनुसार ही 'स्कल कॅप' सुल्तानासमोरसुद्धा काढली जात नाही, असं ते म्हणत त्यांनी ती डोक्यावरच ठेवली.
हे पाहून ड्रॅक्युलाने थेट त्यांच्या डोक्यावरील स्कल कॅप न उतरवता खिळे ठोकण्यात यावेत, असा आदेश दिला.
यादरम्यान ड्रॅक्युलाने म्हटलं, "विश्वास ठेवा. मी तुमची परंपरा आणखी मजबूत करत आहे," असं पुस्तकात पुढे लिहिलं आहे.
ड्रॅक्युला कुणाचा हिरो?
ड्रॅक्युलाने सन 1459 नंतर ऑटोमन साम्राज्याला कर देणं बंद केलं. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनाही तो कर देण्याची गरज उरली नाही.
याशिवाय, त्यांनी ऑटोमन सैन्यासाठी 500 तरूण मुलं देण्यासही नकार दिला. कोणत्याही मांडलिक राज्याकडून एरवी असे तरूण मुलं घेतले जायचे नाहीत. पण ड्रॅक्युलाला हे सांगण्यात आलं होतं.
इतिहासकारांच्या माहितीनुसार, ड्रॅक्युलाच्या शासनकाळात 'बडे लोक'सुद्धा पैसे देऊन शिक्षेपासून पळ काढू शकत नव्हते. पूर्वीच्या काळी हे नेहमीच घडताना दिसायचं. त्यामुळेच 1462 साली ऑटोमन हल्ल्यादरम्यान शेतकऱ्यांनी ड्रॅक्युलाची साथ दिली होती.
याशिवाय, ड्रॅक्युलाच्या काळात लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तसंच लग्नानंतर पतिशिवाय इतर व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जायची.
ड्रॅक्युलाबाबत एक किस्सा नेहमी सांगितला जातो. त्याने भिकाऱ्यांच्या एका गटाची एकदा अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवासुश्रषा केली. पण नंतर हे लोक इतरांच्या मेहनतीवर जगू इच्छितात, म्हणूनच त्याच खोलीत त्या भिकाऱ्यांना जिवंत जाळण्यात आलं होतं.
सुल्तान मोहम्मद द्वितीयची ड्रॅक्युलाविरोधात मोहीम
1459 नंतर ड्रॅक्युलाने ऑटोमन साम्राज्याला कर देणं बंद केलं. त्याशिवाय त्यांच्या विरोधात असणारी कृत्य करणंही सुरूच ठेवलं.
ऑटोमन आणि ड्रॅक्युला यांच्यात अनेकवेळा संपर्कही झाला होता. पण त्याचदरम्यान ड्रॅक्युलाकडून दोन ऑटोमन उच्चपदस्थांची हत्या करण्यात आली.
शिवाय, नंतर तुर्कीतील राजकीय अराजकतेचा फायदा घेऊन त्याने ऑटोमनांच्या ताब्यात असलेला एक किल्ल्याचा दरवाजा उघडला. हा किल्ला ड्रॅक्युलाने जाळून टाकल्यानंतर त्यांच्यात औपचारिकरित्या युद्ध सुरू झालं.
इतिहासकार सांगतात, ड्रॅक्युलाच्या हातून हत्या आणि नुकसानीच्या कहाण्या ऐकून सुल्तान स्वतः 17 मे 1462 रोजी वालीचिया जिंकण्यासाठी रवाना झाले. ड्रॅक्युलाने यानंतर युरोपकडून मदत मागवली. जर आपला पराभव झाला तर सगळ्या ख्रिश्चनांसाठी धोका निर्माण होईल, असं त्याने म्हटलं.
पण तरीही ड्रॅक्युलाला अपेक्षित मदत मिळाली नाही, असं इतिहासकारांनी लिहीलं आहे.
फ्लोरेस्को आणि मॅकनली लिहितात, सन 1462 मध्ये प्रचंड उन्हाळा होता. ड्रॅक्युलाने सगळ्या लोकांना डोंगरदऱ्या, जंगलं आणि पाणथळ परिसरात पाठवून दिलं होतं.
ऑटोमन साम्राज्याला अनेक दिवसांच्या प्रवासानंतरही लढाईची संधी मिळाली नाही. शिवाय, पाण्याची तहान भागवण्यासाठी कोणतीच सोय नव्हती. दरम्यान, गनिमी कावा करत केलेल्या हल्ल्यांनी ड्रॅक्युलाने तुर्की सैन्याचं प्रचंड नुकसान केलं.
ड्रॅक्युलाने सुलतानाला जीवे मारण्याच्या इराद्याने रात्रीच त्यांच्या तळावर हल्ला केला. पण हा हल्ला अयशस्वी ठरला. अखेरीस, सुलतानाचा फौज ड्रॅक्युलाच्या राजधानीच्या जवळ पोहोचली. तेव्हा त्यांनी तिथं जे दृश्य पाहिलं, त्याचाच उल्लेख इतिहासात सर्वाधिक केला जातो.
हे एका मैदानाचं दृश्य होतं…एका मैलाच्या परिसरात वीस हजारच्या आसपास भाले जमिनीत रोवले होते. जवळपास प्रत्येक भाल्यावर तुर्की सैनिकाचं छिन्नविच्छिन्न झालेलं प्रेत होतं.
सर्वांत उंच अशा दोन भाल्यांवर ऑटोमन साम्राज्यातील अधिकारी हमजा पाशा आणि ग्रीक सेनानी कॅटावोलिनोसचे मृतदेह होते. त्यांचा मृत्यू होऊन अनेक दिवस झाले होते. त्यांच्या शरीरावरील उंची कपडे फाटून त्याच्या चिंध्या हवेवर उडत होत्या.
हवेत सडक्या मांसांची दुर्गंधी भरून राहिली होती.
ड्रॅक्युलाचं पलायन
यानंतर ड्रॅक्युला तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे त्याने हंगेरीच्या बादशहाचा पाठिंबा मागितला. भाऊ रादो याला आपल्या ठिकाणी सत्तेवर बसवलं आणि सुल्तान मोहम्मदसोबत पाच वर्षांचा करार केला.
ड्रॅक्युला आता ताकदवान बादशहा राहिला नव्हता. त्यावेळी फक्त त्याच्याकडे भूतकाळातील कृत्यांची शिदोरी होती.
हंगेरीच्या बादशहाने आपल्या सर्व सीमांवर देखरेख ठेवून ड्रॅक्युलाला अटक केली. त्यानंतर पुढील 12 वर्षे तो हंगेरीच्या कैदेतच होता.
ड्रॅक्युलाची अखेरची लढाई
दरम्यान, ड्रॅक्युलाचा भाऊ रादो याच्या हातूनही वालीचियाची सत्ता निसटली होती. पुढे 1475 मध्ये रादोचं निधन झालं. त्यावेळी हंगेरीनेही ड्रॅक्युलाला पुन्हा वालीचिाच्या सत्तेवर बसवण्याबाबत विचार सुरू केला होता.
ड्रॅक्युलाने हंगेरीच्या बादशहासोबत हातमिळवणी केली. त्यांनी एकत्रितपणे बोस्नियामध्ये तुर्कांविरुद्धच्या एका मोहिमेत भाग घेतला. या लढाईत त्यांनी विजय मिळवला.
इतिहासकार लिहितात, की हंगेरीचा बादशाह मॅथियस यांनी ड्रॅक्युलाला ऑर्थोडॉक्स धर्म सोडून कॅथलिक धर्म स्वीकारण्यासाठी राजी केलं आणि तसं वचनही त्याच्याकडून घेतलं.
त्यानंतर ड्रॅक्युलाला तिसऱ्यांदा वालिचियाचा शासक बनण्यासाठी पाठिंबा दर्शवला.
ड्रॅक्युला पुन्हा नोव्हेंबर 1476 रोजी वालीचियाच्या गादीवर बसला. मात्र पुढच्याच म्हणजे डिसेंबर महिन्यात एका लढाईत तुर्कांच्या हातून तो मारला गेला.
ड्रॅक्युलाच्या अखेरच्या क्षणांबाबत वेगवेगळी माहिती आणि मतमतांतरं ऐकायला मिळतात.
भाल्यांवर लादलेल्या मृतदेहांचं मैदान : इतिहास आणि व्लाद तृतीय ड्रॅक्युला
इतिहासकार मातई कजाको आपल्या 'ड्रॅक्युला' या पुस्तकात सन 1463 मध्ये छापलेल्या एका 4 ते 6 पानी पुस्तिकेचा उल्लेख करतात. ही पुस्तिका व्हिएन्नामध्ये प्रकाशित झाली होती, असं म्हटलं जातं.
'व्लाद ड्रॅक्युला'चा इतिहास असं या पुस्तिकेचं नाव होतं.
कजाको म्हणतात, या पुस्तिकेच्या अज्ञात लेखकानुसार, ड्रॅक्युला हा इतिहासातील सर्वाधिक हिंसक आणि क्रूर शासक होता.
फक्त आपल्याच लोकांवर नव्हे तर यहुदी, ख्रिश्चन, तुर्क, जर्मन, इतालवी पैगन लोकांवरही त्याने केलेले अत्याचार दुर्लक्षित करता येऊ शकत नाहीत.
पण, या पुस्तकात आणखी एका पुस्तिकेचाही उल्लेख आहे. ही पुस्तिका 1486 मध्ये रशियामध्ये वाटण्यात आली होती.
ही पुस्तिका प्रिंट झाली नाही. पण याच्या हातांनी लिहिलेल्या 22 प्रती होत्या.
यामध्ये ड्रॅक्युला हा एक कठोर पण न्यायप्रिय शासक असल्याचं सांगण्यात आलं आहे. ड्रॅक्युला एक अत्यंत समजूतदार आणि सभ्य शासक होता, जो तुर्कांपासून आपलं राज्य वाचवण्याचा प्रयत्न करत होता, असंही या पुस्तिकेत म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)