बंदा सिंह बहादूर : मुघलांना सळो की पळो करून सोडणारा वीर योद्धा

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वीर योद्धे बंदा सिंह बहादूर यांचा जीवनप्रवास सर्वांसारखा किंवा सामान्यांसारखा नव्हता. किशोरवयातच भक्तिमार्गाला लागून संत बनल्यानंतर बंदा हे पुढं काही वर्षांनी पुन्हा गृहस्थ जीवनाकडं वळले.

अत्यंत कमी काळामध्ये हिंदू धर्मग्रंथांचे अभ्यासक ते एक वीर योद्धा आणि त्यानंतर एक अत्यंत यशस्वी आणि सक्षम नेते असा त्यांचा प्रवास राहिला.

शीख रिसर्च इन्स्टिट्यूट, टेक्सासचे सह संस्थापक हरिंदर सिंग यांनी असं लिहिलं आहे की, "38 वर्षांच्या वयातच बंदा सिंग बहादूर यांच्या जीवनात दोन महत्त्वाचे टप्पे दिसून येतात. गुरू गोविंद सिंग यांच्या भेटीपूर्वी ते वैष्णव आणि शैव परंपरांचं पालन करत होते."

"मात्र, त्यानंतर त्यांनी कोणतंही प्रशिक्षण, शस्त्र आणि लष्कराशिवाय 2500 किलोमीटरचं अंतर पार करत 20 महिन्यांच्या आत सरहिंद ताब्यात घेत खालसा राज्याची स्थापना केली."

गुरू गोविंद सिंग यांची भेट

बंदा सिंग बहादूर यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1670 रोजी राजौरीमध्ये झाला होता. त्यावेळी अत्यंत कमी वयामध्ये घर सोडत त्यांनी वैराग्य पत्करलं. माधोदास वैरागी या नावानं त्यांना ओळखलं जाऊ लागलं.

बंदा घरातून निघाले आणि देशभर फिरत फिरत ते महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये पोहोचले. याठिकाणी 1708 मध्ये त्यांची भेट शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंग यांच्याशी झाली. गुरू गोविंद सिंग यांनी त्यांना वैराग्याचा त्याग करून पंजाबच्या लोकांना मुघलांच्या तावडीतून सोडवण्याची जबाबदारी सोपवली.

जेएल गरेवाल यांनी त्यांच्या 'सिख्स ऑफ पंजाब' या पुस्तकात लिहिलं आहे की, "गुरू गोविंद सिंग यांनी बंदा सिंगला एक तलवार, पाच बाण आणि तीन सहकारी दिले. तसंच त्यांनी मुघलांच्या विरोधात शिखांचं नेतृत्व करावं असं फरमानही गुरू गोविंद सिंगांनी काढलं होतं."

गोपाल सिंग गुरू गोविंद सिंग पुस्तकात याचं वर्णन करताना असं लिहितात की, "गुरूंनी बंदा बहादूरला तीन सहकाऱ्यांसह पंजाबला कूच करण्याचा आदेश दिला. सरहिंद नगरला जाऊन ते ताब्यात घ्या आणि स्वतःच्या हातानं वजीर खानला मृत्यूदंड द्या. नंतर गुरू गोविंद सिंगदेखील तिथं पोहोचतील, असं त्यांना सांगण्यात आलं होतं."

पंजाबला पोहोचले बंदा बहादूर

बंदा सिंग बहादूर पंजाबकडे निघाले होते, पण काही दिवसांतच जमशेद खान नावाच्या एका अफगाण्यानं गुरू गोविंद सिंग यांच्यावर खुखरीनं हल्ला केला. त्यामुळं गुरू गोविंद सिंग अनेक दिवस जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत होते.

राजमोहन गांधी यांनी 'पंजाब अ हिस्ट्री फ्रॉम औरंगजेब टू माऊंटबेटन' मध्ये असं लिहिलं आहे की, "जखमी झाल्यानंतर मृत्यूशी संघर्ष सुरू असताना गुरू गोविंद सिंग हे, त्यांच्या पूर्वजांप्रमाणं एखाद्याला पुढचा गुरू घोषित करू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी गुरू ग्रंथ साहिबलाच शिखांच्या कायमस्वरुपी गुरूचा दर्जा देण्याची घोषणा केली."

इकडे 1709 मध्ये एकीकडं मुघल बादशहा बहादूर शहा दक्षिणेत लढाईत व्यस्त होता, त्यावेळी बंदा बहादूर पंजाबच्या सतलज नदीच्या पूर्वेला पोहोचले. त्यांनी शीख शेतकऱ्यांना त्यांच्या बाजूनं वळवण्यास सुरुवात केली. सर्वांत आधी त्यांनी सोनिपत आणि कैथलमध्ये मुघलांच्या खजान्याची लूट केली.

प्रसिद्ध इतिहासकार हरिराम गुप्ता यांच्या 'लेटर मुगल हिस्ट्री ऑफ पंजाब' पुस्तकातील नोंदींनुसार, त्याकाळातील मुघल इतिहासकार खफी खान यांना असं सांगितलं आहे की, "तीन ते चार महिन्यांमध्ये बंदा बहादूरच्या लष्करात जवळपास पाच हजार घोडे आणि आठ हजार पायदळ सहभागी झालं होतं. काही दिवसांनी या सैनिकांची संख्या वाढून 19 हजार झाली."

समाना शहरावर हल्ला

सावकारांच्या अत्याचारानं त्रस्त झालेल्या सरहिंदमधील शेतकऱ्यांचं जीवन असह्य झालं होतं. त्यांना एका निडर नेत्याची आवश्यकता होती. गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांबरोबर काय घडलं हेही अद्याप शेतकरी विसलेले नव्हते.

त्या परिसरातील शिखांनी बंदा यांना घोडे आणि धान्य उपलब्ध करून दिलं. अनेक वर्षांपासूनची मनसबदारी असलेल्या मनसबदारांनी सैनिकांना पगार दिलेला नव्हता. त्यामुळं तेही उदरनिर्वाहासाठी काहीतरी शोधत होते. यातूनच त्यांना बंदा बहादूरबरोबर जाण्याची प्रेरणा मिळाली.

औरंगजेबानंतरचा नवा मुघल बादशहा बहादूर शहाची प्रतिमा उदारवादी अशी नक्कीच होती. पण तो पंजाब आणि दिल्लीपासून लांब असल्यानं त्याचे अधिकारी आणि नागरिकही त्याला कमकुवत समजू लागले होते.

लोकांच्या मनात बादशहासाठी जी भीती असते ती कमी होत गेली. नोव्हेंबर 1709 मध्ये बंदा बहादूरनं अचानक सरहिंदच्या समाना शहरावर हल्ला केला.

हरिराम गुप्ता लिहितात की, "समानावर हल्ला करण्याचं कारण म्हणजे 34 वर्षांपूर्वी शिखांचे गुरू - गुरू तेग बहादूर यांचं शीर कापणारा आणि गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांना मारणारा वजीर खान त्याच शहरात राहत होता."

"समानाच्या जवळ असलेल्या सिधौरा येथील मनसबदार उस्मान खाननं गुरू गोविंद सिंग यांच्याशी मैत्री असलेल्या एका मुस्लीम धार्मिक गुरूंना (पीर) त्रास दिला होता. म्हणून त्याठिकाणीच त्याला संपवण्याचा आदेश देण्यात आला होता. पुढं खफी खान यांनी लिहिलं की, बंदा बहादूर यांनी मुघल अधिकाऱ्यांना पदत्याग करण्याचा आदेश दिला."

समानाच्या मदतीसाठी दिल्लीहून सरहिंदला कोणीही आलं नाही. सरहिंद हे दिल्ली आणि लाहोर यांच्या मध्ये वसलेलं शहर होतं. याठिकाणी मुघलांनी मोठ-मोठे महल बांधलेले होते. तसंच त्याकाळात संपूर्ण भारतात लाल मलमल तयार करण्यासाठीही ते प्रसिद्ध होतं.

सरहिंदवर विजय

बंदा बहादूरने मे 1710 मध्ये सरहिंदवर हल्ला केला. हरिश धिल्लन त्यांच्या 'फर्स्ट राज ऑफ द सिख्स द लाइफ अँड टाइम्स ऑफ बंदा सिंग बहादूर' मध्ये असं लिहितात की, "बंदा यांच्या सैन्यात 35000 सैनिक होते. त्यात 11,000 भाडोत्री होते. तर वजीर खानकडं उत्तम प्रशिक्षित असे 15,000 सैनिक होते. संख्येनं कमी असले तरी वजीरच्या सैनिकांकडे शिखांपेक्षा चांगली शस्त्रं होती.

"त्यांच्याकडं जवळपास दोन डझनापेक्षा जास्त तोफा होत्या आणि त्यांचं अर्ध सैन्य हे घोडदळ होतं."

22 मे 1710 ला झालेल्या या युद्धामध्ये बंदा यांच्या सर्वांत कमकुवत तोफा नेहमी मध्यभागी असतात, असा विचार करून मध्यभागी असलेल्या चारही तोफांवर हल्ला चढवला. या हल्ल्याची जबाबदारी त्यांनी भाई फतेह सिंगवर सोपवली. हरिश धिल्लन यांच्या मते, "समोरा-समोर झालेल्या या लढाईमद्ये फतेह सिंगनं वजीर खानचं डोकं उडवलं होतं."

"सरहिंदच्या सैनिकांनी सेनापतीचं धडावेगळं झालेलं शीर पाहिलं आणि त्यांचं मनोबल ढासळलं, त्यानंतर या सैनिकांनी युद्धाचं मैदान सोडून पळ काढला."

युद्धामध्ये बंदा बहादूर यांचा विजय झाला. सरहिंद उध्वस्त करून संपूर्ण शहराची जणू माती केल्यानंतर, बंदा बहादूर यांना, यमुना नदीच्या पूर्वेच्या भागात हिंदुचा छळ केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळं त्यांनी यमुना नदी ओलांडली आणि सहारनपूरला जाऊन ते शहरही उध्वस्त केलं.

बंदा बहादूर यांच्या हल्ल्यांमुळं प्रेरणा घेत, स्थानिक शिखांनी जालंधर दोआबमधील राहोन, बटाला आणि पठाणकोटवरही ताबा मिळवला.

नवं चलन आणि मुद्रा

बंदा सिंग बहादूरनं त्याच्या नव्या छावणीला लोहगड असं नाव दिलं. सरहिंदवरील विजयाच्या स्मरणार्थ त्यानं नवी नाणी पाडली आणि मुद्रा (मोहोर) तयार केली.

नाण्यांवर गुरू नानक आणि गुरू गोविंद सिंग यांची चित्रं होती. त्यानंतर 1710 मध्ये 66 वर्षीय मुघल बादशहा बहादूर शहा हा स्वतः बंदा सिंग बहादूरच्या विरोधात मैदानात उतरला.

दक्षिणेतून परतल्यानंतर बहादूर शहा दिल्लीत थांबला नाही. त्यानं थेट लोहगडला कूच केलं. मुघल सैन्य बंदा सिंग यांच्या सैन्याच्या तुलनेत खूप जास्त होतं. त्यामुळं बंदा यांना नाईलाजानं वेशभूषा बदलून लोहगडमधून निघून जावं लागलं.

एसएम लतिफ त्यांच्या 'द हिस्ट्री ऑफ पंजाब' पुस्तकात लिहितात की "बंदा बहादूरचा विचार करूनच मुघल बादशहा बहादूर शहानं दिल्लीऐवजी लाहोर राजधानी असेल अशी घोषणा केली होती."

"लाहोरहून त्यानं बंदाला पकडण्यासाठी सैन्यातील प्रमुख शिपाई (कमांडर) पाठवले होते. तोपर्यंत बंदा यांनी पत्नी आणि काही अनुयायांसह डोंगरांमध्ये आसरा शोधला होता. तिथंच ते लपले होते. एक कमांडर रिकाम्या हातानं परतला तेव्हा, बहादूर शहानं त्याला किल्ल्यातच तुरुंगात डांबलं. लाहोरमध्ये शिखांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली. पण बंदा यांचे साथीदार रात्री रावी नदीतून पोहून लाहोरमध्ये जायचे आणि मुघलांना त्रास देऊन रात्रीतून पोहून ते परत निघून येत होते."

फर्रुखसियरनं बंदा यांना पकडण्याची जबाबदारी समद खानला सोपवली

या दरम्यानच 1712 मध्ये बादशहा बहादूर शहा यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या युद्धामध्ये सत्ता आधी जहंदरच्या हाती आली आणि नंतर त्याचा पुतण्या फर्रुखसियर मुघलांचा बादशहा बनला.

फर्रुखसियरनं काश्मिरचा सुभेदार अब्दुल समद खान याला बंदा सिंग बहादूर विरोधात मोहीम राबवण्याचा आदेश दिला.

समद यानं मोहिमांद्वारे 1713 पर्यंत बंदा बहादूरला सरहिंद सोडण्यास भाग पाडलं. पण तरीही समद आणि बंदा बहादूर यांच्या सैन्यात लपंडाव सुरुच होता. अखेर समद खानला बंदा बहादूर यांना घेरण्यात यश आलं. सध्याच्या गुरदासपूर शहरापासून चार पाच मैल अंतरावर गुरदास नांगल गावातील एका किल्ल्यापर्यंत समदनं बंदा बहादूर आणि त्याच्या साथीदारांना पळवलं.

त्यानंतर समद खाननं या किल्ल्याला असा काही वेढा टाकला की, आतमध्ये धान्याचा कणही पोहोचणं शक्य नव्हतं. किल्ल्याच्या आत असलेल्यांची उपासमार सुरू झाली. बंदा यांचे सहकारी अक्षरश: गाढवं आणि घोड्यांचं मांस खाऊन जगले.

हरिराम गुप्ता लिहितात की, "गवत, झाडांची पानं आणि मांस खाऊन बंदा बहादूरनं शक्तिशाली अशा मुघल सैन्याचा आठ महिने अत्यंत शौर्यानं सामना केला. पण अखेर डिसेंबर 1715 मध्ये समद खानला किल्ला भेदण्यात यश आलं."

बंदा बहादूरला दिल्लीला आणलं

बंदा बहादूर यांनी समदसमोर शरणागती पत्करल्यानंतर त्यांच्या काही सहकाऱ्यांना गुरदास नांगलमध्येच ठार करण्यात आलं. तर काही जणांची लाहोरला परतत असताना रावी नदीच्या किनाऱ्यावर हत्या करण्यात आली.

एसएम लतिफ यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, "सुभेदार समद खाननं विजेत्याप्रमाणं लाहोर शहरात प्रवेश केला. त्याच्या मागे बंदा हे त्यांच्या सैनिकांसह होते."

"अटक करण्यात आलेल्या सर्वांना साखळ्यांनी बांधून गाढवांवर किंवा उंटांवर बसवण्यात आलं होतं."

समद खाननं बादशहाकडे स्वतः बंदा बहादूर यांना दिल्लीला नेण्याची परवानही मागितली होती, पण बादशहानं त्याला नकार दिला. त्यामुळं समद खाननं मुलगा झकरिया खान याच्या नेतृत्वात दुसऱ्या दिवशी सर्व बंदींना दिल्लीला पाठवलं.

झकरिया खान सर्व बंदींना घेऊन 27 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचला. जणू या सर्वांची मिरवणूक काढण्यात आली होती, आणि ती पाहण्यासाठी दिल्लीतील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती.

'रिलिजन, सिव्हिल सोसायटी अँड द स्टेट : अ स्टडी ऑफ सिखिजम' या पुस्तकात जेबीएस युबिरॉय यांनी लिहिलं की, "1976 च्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये असलेल्या एका इंग्रजानं असं लिहिलं होतं की, त्यानं दिल्लीमधली ती मिरवणूक पाहिली होती. त्यामध्ये 744 जीवंत कैदी होते."

"या कैद्यांना काठ्या नसलेल्या एका उंटावर दोघे अशा पद्धतीनं बांधण्यात आलं होतं. म्हणजे 377 उंटांचा तो ताफा होता. प्रत्येक कैद्याचा एक हात मानेच्या मागे लोखंडी साखळीनं बांधलेला होता. त्याशिवाय त्यांनी बांबूंवर 2000 शिखांचे शीर लटकवलेले होते. त्यांच्या मागे बंदा बहादूर होते. त्यांना हत्तीवरून एका लोखंडी पिंजऱ्यातून नेलं जात होतं. दोन्ही पाय लोखंडी साखळ्यांनी बांधलेले होतं. तर दोन बाजुला हातात तलवारी घेऊन दोन मुघल सैनिक उभे होते."

कैद्यांना मारण्याचा आदेश

लाहोरहून दिल्लीला आणलेल्या या सर्व कैद्यांना एक आठवडा कैदेत ठेवल्यानंतर 5 मार्च 1716 रोजी त्यांची कत्तल सुरू झाली. रोज सकाळी सरबराह खान नावाचा मुघलांचा कोतवाल कैद्यांना म्हणायचा की, "तुम्हाला झालेली चूक सुधारण्याची शेवटची संधी दिली जात आहे. शीख गुरूंच्या शिकवणीचा (शीख धर्माचा) त्याग करा आणि इस्लाम स्वीकारा. तुम्हाला जीवनदान दिलं जाईल.

हरिश धिल्लन लिहिलतात की, "प्रत्येक शीख हसत हसत कोतवालाला नकार देत होता. सात दिवस सलग झालेला शिखांचा हा नरसंहार त्यानंतर काही दिवसांसाठी थांबवण्यात आला. बंदा बहादूरला निर्णयावर विचार करण्यासाठी वेळ दिला जावा असा सल्ला कोतलवालानं बादशहा फर्रुखसियरला दिला. तुरुंगात बंदा बहादूर एकांतवासात होते. कोतवाल त्यांच्या कोठडीसमोरून जायचा तेव्हा बंदा हे नेहमी माळ जपत असल्याचं त्याला दिसायचं."

क्रौर्याच्या सीमा ओलांडल्या

बंदा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना 9 जून, 1716 रोजी कुतूब मिनारच्या जवळ असलेल्या बहादूर शहाच्या कबरीजवळ नेण्यात आलं. बंदा यांना कबरीसमोर नतमस्तक होण्यास सांगण्यात आलं. त्यांचा चार वर्षांचा मुलगा अजय सिंग याला त्यांच्या समोर आणून बसवलं.

हरिश धिल्लन यांनी कोतवालाच्या क्रूरतेचं वर्णन करताना म्हटलं आहे की, "कोतवाल सरबराह खानच्या इशाऱ्यावर अजय सिंगचे तलवारीने अक्षरश: तुकडे करण्यात आले. बंदा बहादूर जराही न हलता स्तब्ध बसलेले होते. मुलगा अजय सिंगचं हृदय त्याच्या शरिरातून काढलं आणि बंदा बहादूरच्या तोंडात कोंबण्यात आलं. त्यानंतर जल्लाद बंदा यांच्याकडं वळला. त्यांच्या शरिराचेही तुकडे-तुकडे करण्यात आले. पण शक्य तेवढं त्यांना जीवंत ठेवलं जात होतं. शेवटी जल्लादानं त्यांचं शीर धडापासून वेगळं केलं."

बंदा सिंग बहादूर यांच्या मृत्यूच्या दोन वर्षांनंतर सईद बंधूंनी मराठ्यांच्या मदतीनं फर्रुखसियरला गादीवरून हटवलं आणि अटक करून त्याचे डोळेही फोडण्यात आले.

त्यानंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. शेवटच्या काळामध्ये तर अशी अवस्था झाली होती की, दिल्लीचा बादशहा इंग्रजांच्या हातातलं बाहुलं बनला होता. त्याचं राज्यही दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून कुतूब मिनारपर्यंतच शिल्लक राहिलं होतं.

काबूल, श्रीनगर आणी लाहोरवर रणजित सिंहचा ताबा होता आणि दक्षिण भारतापासून ते पानिपतपर्यंतचा मोठा भूभाग हा मराठ्यांनी मिळवला होता.

रविंद्रनाथ टागोर यांनी बंदा बहादूर यांच्या सन्मानार्थ 'बंदी बीर' (बंदी वीर) नावाची एक कविता लिहिली होती..

"पंच नदीर तीरे

वेणी पाकाई शीरे

देखिते देखिते गुरूर मंत्रे"

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

जागिया उठीचे सिख

निर्मम निर्भीक.....