खैबर खिंड : अलेक्झांडरपासून इंग्रजांपर्यंत अनेक शक्तिशाली आक्रमकांना झुकवणारी जागा...

    • Author, मेहमूद जान बाबर
    • Role, बीबीसी उर्दू

लहानपणापासून आपण जादूई दुनियेच्या अनेक गोष्टी किंवा तथाकथिक किस्से ऐकत आलेलो आहोते. कुठं एक पाऊल पुढं टाकल्यानं मृत्यू येतो, तर कुठं मागं वळून पाहणारा दगडाची मूर्ती बनतो, अशा एक ना अनेक रंजक गोष्टी आपण ऐकल्या, वाचल्या आहेत.

पण जर प्रत्यक्ष जगामध्ये एखाद्या ठिकाणालाही अशीच ओळख मिळू शकणार असेल तर ती पाकिस्तानात- अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर खिंड या भागाला मिळू शकते. अफगाणिस्तानला जाणाऱ्या आणि येणाऱ्यांना या मार्गाचा वापर करताना आफ्रिदी कबिल्याच्या लोकांना (समुदायांना) भेटवस्तू किंवा उपहार (मोबदला) द्यावा लागायचा. अगदी जगज्जेता ठरलेल्या महान पराक्रमी योद्ध्यांनाही याठिकाणी झुकावं लागलं आहे.

आफ्रिदी कबिले म्हणजे असं संकट आहे, ज्यांना युद्ध आवडतं आणि तेच त्यांच्या शत्रूच्या पराभवाचं कारणही बनतं, असाच उल्लेख जवळपास सर्वच इतिहासकारांनी त्यांच्याबाबत लिहिताना केला आहे.

खैबर खिंडीवर जेवढे हल्ले झाले आहेत, तेवढे जगातील इतर कोणत्याही मार्गावर झालेले नसतील, असं म्हटलं जातं. याबाबत स्थानिक आणि विदेशी लेखकांचंही एकमत झालं आहे.

या जगभरात प्रसिद्ध असलेल्या खैबर खिंडीची सीमा पेशावरपासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'बाब-ए-खैबर' या ऐतिहासिक द्वारापासून सुरू होते. तिथपासून जवळपास 24 मैल म्हणजे तोरखमजवळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेपर्यंत हा परिसर आहे. इथूनच 'ड्युरंड रेषा' ओलांडून अफगाणिस्तानातही प्रवेश करता येतो.

बाब-ए-खैबर आणि तोरखम या दरम्यानचा हा परिसर, पराक्रमासाठी आलेल्या किंवा शत्रूंसाठी एवढा धोकादायक आहे की, त्याची तुलना जगातील इतर कोणत्याही भागाबरोबर करणं शक्य नाही. त्यामुळंच जगभरात किंवा अगदी खैबर खिंडीच्या आसपासपर्यंत पोहोचलेल्या कोणत्याही शासकाला, ही खिंड (मार्ग) किंवा या परिसरावर ताबा मिळवता आला नाही.

भौगोलिक स्थिती आणि युद्धभूमी

दोन्ही बाजुंनी सुमारे दीड हजार फूट उंचीचे डोंगर, टेकड्या असा खैबर खिंडीचा मार्ग आहे. त्यात अनेक गुहांमुळं भूलभुलैय्या तयार झाला आहे. या सर्वांमुळं खिंडीतून जाणाऱ्यासाठी हा जणू नैसर्गिक वेढाच ठरतो, आणि जगातील कोणत्याही शस्त्राच्या मदतीनं हा वेढा तोडणं शक्य नाही.

या मार्गावरील सर्वात धोकादायक भाग अली मशीद परिसराचा आहे. याठिकाणी खिंड एवढी अरुंद झालेली आहे, की तिची रुंदी अवघी काही मीटर एवढी होते.

शत्रूला गाठण्यासाठी खिंडीतील ही उत्तम जागा आहे. इथूनच आफ्रिदी टोळ्यांचे (कबिला) सदस्य लपलेले असायचे. खालून जाणाऱ्या हजारोंच्या सैन्यावर हल्ला करत ते त्यांना परत फिरण्यास भाग पाडायचे. त्यांची एवढी दहशत असायची की, शत्रू त्यांच्या मृत सैनिकांचे मृतदेह उचलण्यासाठीही आधी त्यांची परवानगी घ्यायचे.

'मृत्यूचं द्वार'

पेशावर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जमरूद तालुक्यातलं 'बाब-ए-खैबर' हे द्वार शत्रूंसाठी 'मृत्यूचं द्वार' आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

खैबर खिंडीचं महत्त्व वाढण्यामध्ये या द्वाराचाही मोठा वाटा होता. या दरवाजाची निर्मिती माजी राष्ट्रपती फील्ड मार्शल अयूब खान यांच्या कार्यकाळात करण्यात आली. जून 1963 मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं. त्याकाळच्या कैंबलपूर (सध्याचं अटक) मधील गामा आणि त्यांचा पुतण्या सादीक या दोन गवंड्यांनी याचं बांधकाम केलं होतं.

त्यासाठी या दोघांना दोन वर्षांचा कालावधी लागला होता. या दरवाजावर असलेल्या शिलालेखांवर, या मार्गाचा वापर केलेल्या अनेक शासकांची आणि आक्रमण करणाऱ्यांची नावं लिहिलेली आहे.

शिख जनरल हरी सिंग नलवा यांनी या दरवाजाच्या जवळच जहाजासारख्या आकाराचा किल्ला तयार केला होता. खैबर खिंडीवर निगराणी ठेवण्यासाठी सैनिकांना या किल्ल्यावर तैनात करणं हा किल्ला बांधण्यामागचा मुख्य हेतू होता.

हा दरवाजा असलेल्या परिसरामध्ये राहणारे बहुतांश लोक हे आफ्रिदी या मुदायाची उपशाखा असलेल्या कोकी खेल समुदायाचे आहेत.

अलेक्झांडरनेही बदलला मार्ग

खैबरला लागून असलेल्या ओरकजई जिल्ह्यातील गिलजो येथील गवर्नमेंट डिग्री कॉलेजचे प्राचार्य आणि इतिहासाचे अभ्यासक प्रोफेसर डॉक्टर अस्लम तासीर आफ्रिदी यांनी अलेक्झांडरचा (सिकंदर) या खिंडीसंदर्भातला किस्सा सांगितला.

त्यांच्या मते, पख्तूनांच्या प्रांतावर (गांधार) विजय मिळवण्याच्या उद्देशानं जगज्जेत्या अलेक्झांडरच्या सैन्यालाही खैबर खिंडीमध्ये सर्वाधिक विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अलेक्झांडरनं त्याच्या आईच्या सांगण्यावरून त्याचा पुढील आक्रमणासाठी जाण्याचा मार्ग बदलला होता.

आफ्रिदी समुदायाच्या या तीव्र विरोधामागची कारणं शोधण्यासाठी अलेक्झांडरच्या आईनं या भागातील काही रहिवाशांना मेजवानीसाठी त्यांच्याकडं पाठवण्यास सांगितलं.

आफ्रिदी समुदायांचे प्रमुख अलेक्झांडरच्या आईबरोबर चर्चा करत होते, त्यावेळी त्यांनी तुमच्यापैकी प्रमुख (मुखिया) कोण आहे, असं विचारल्याचा उल्लेख, अस्लम तासीर आफ्रिदी करतात.

अलेक्झांडरच्या आईच्या या प्रश्नावर मेजवानीसाठी आलेल्या प्रत्येकानं आपणच प्रमुख असल्याचा दावा करायला सुरुवात केली. यावरून त्या सर्वांमध्ये आपसातच बरेच वादही झाले. या सर्वावरून अलेक्झांडरच्या आईनं असा विचार केला की, हे सगळे जर त्यांच्यापैकी कुणा एकालच मोठं असल्याचं मान्य करायला तयार नाहीत, तर मग ते अलेक्झांडरला मोठं समजून, कसा मार्ग देणार?

या सर्वानंतर अखेर अलेक्झांडरच्या आईनं त्याला, भारतात जाण्यासाठी खैबर खिंडीच्या मार्गाचा विचार मनातून काढून टाक असं सांगितलं. त्यामुळं अलेक्झांडरला त्याचा मार्ग बदलावा लागला आणि तो बाजौडमार्गे पुढील प्रवासावर निघाला.

अलेक्झांडरला सद्याच्या पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या पेशावरमध्ये प्रवेश करताच आला नाही, त्यानं कोसुसप्ला आणि गोरीस या नद्या पार केल्या असा उल्लेख माजी ब्रिटिश गव्हर्नर सर ओलाफ कारो यांनी 'पठाण' नावाच्या पुस्तकामध्ये केला आहे.

यामध्ये एक झरा होता, तो फक्त कोंटर म्हणजे पंज कोडाचा शिखराचा भाग असून शकतो. सध्या इथून डुरंड रेषा गेलेली आहे. तसंच या भागाला बाजौडमधील एरी गायींच्या पुनरुत्पादनासाठी आता ओळखलं जातं.

बौद्ध धर्माची मोठी स्मारकं

खैबर खिंड परिसरात मोठ्या प्रमाणावर बौद्धकालीन पुरातत्व वास्तू आणि स्थळं सापडली होती. पण पख्तून लोकांच्या विचारणी आणि मान्यतांमुळं मूर्तींपूजेचे ते विरोधक असल्यानं ते हे सर्व भग्न करायचे, असं प्रसिद्ध पत्रकार अल्लाह बक्क्ष यूसुफी यांनी त्यांच्या 'तारिख-ए-अफरीदी' या पुस्तकामध्ये लिहिलं आहे.

या परिसरामध्ये लांडी खानाच्या आसपास एका डोंगरावर प्राचीन काळातील एक किल्ल्यासारखी पुरातन वास्तू आहे. या वास्तूचा येथील आफ्रिदी समुदाय 'काफिर कोट' असा उल्लेख करतात.

सुलतान मेहमूद गझनवीनं भारतावर हल्ला करताना पख्तुनांशी शत्रूत्व पत्करण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांची ओळख करून देताना ते त्यांना 'आमचा अभिमान', असं म्हणायचे असंही अल्लाह बक्श यूसुफी यांनी म्हटलं आहे.

मेहमूद गझनवीबरोबर युद्धात सहभागी झालेल्या पख्तुनी प्रमुखांमध्ये (मुखिया) मलिक खानो, मलिक आमू, मलिक दावर, मलिक याह्या, मलिक मेहमूद, मलिक आरीफ, मलिक गाझी, मलिक शाहीद आणि मलिक अहमद (या प्रमुखांना मलिक असं संबोधलं जायचं) यांचा समावेश आहे. मेहमूद गझनवीनं सोमनाथवर विजय मिळवला, त्यावेळी हे सर्वच अत्यंत शौर्यानं लढले आणि त्यांच्या लढाईच्या शैलीमुळं गझनवीला त्यांना 'खान' ही पदवी देणं भाग पाडलं. केवळ पख्तुनीच खान पदवीसाठी योग्य आहेत, असंही गझनवी म्हणाला होता.

इतिहासकारांच्या मते, झहीरुद्दीन बाबर बळाच्या जोरावर भारत ताब्यात घेण्याच्या इराद्यानं, खैबरच्या दिशेनं निघाला होता. पण त्याच्या वाटेत आफ्रिदी एखाद्या लोखंडी भिंतीसारखे ठामपणे उभे होते. केवळ शक्तीच्या जोरावर खैबर खिंड पार करणं शक्य नसल्याचं बाबरच्या लक्षात आलं. अगदी तसंच घडलं. अफगाणिस्तान ओलांडलं तरी मागं कायम असुरक्षिततेची चिंता राहील हे बाबरला माहिती होतं.

या विचारानं बाबरनं पुन्हा एकदा 1519 मध्ये खैबरवर विजय मिळवण्याचा निश्चय केला. पण एका भीषण युद्धानंतर झहीरुद्दीन बाबरचा अली मशिद परिसरात केवळ एका रात्रीसाठी टिकाव लागला. जेव्हा तो जमरुदला पोहोचला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, तो पुढं पंजाबला गेला तर परत येताना अधिक मोठ्या संकटाचा सामना त्याला करावा लागेल.

शीखांचं शासन

शीख शासक रणजित सिंग यांना पख्तुनींवर सत्ता कायम ठेवण्यासाठी एका मोठ्या शक्तीची आवश्यकता असल्याची जाणीव होती. त्यामुळं त्यांचे सर्वात प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी जनरल हरी सिंग नलवा यांना त्यांनी मोठ्या सैन्य बळासह पेशावरमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं.

हरी सिंग यांनी पख्तुनींना काहीसा त्रास दिला असं म्हणता येईल. पण त्यांचं काहीही नुकसान करू शकले नाहीत. उलट या समुदायानं केलेल्या कारवाया पाहून रणजीत सिंग स्वतःच अधिक घाबरले.

या भीतीपोटी आणि हल्ल्यापासून वाचण्यासाठी हरी सिंग नलवा यांनी बाब-ए-खैबरजवळ म्हणजे खिंडीच्या तोंडाशी एक किल्ला तयार करण्याचा निर्णय घेतला होता. 1836 मध्ये या किल्ल्याचं काम सुरू झालं.

शिखांनी पख्तुनींच्या हल्ल्यापासून बचावासाठी हा किल्ला बांधला होता. पण अफगानिस्तानचा मित्र असलेल्या धनाढ्य मोहम्मद खानला हे त्याच्या विरोधात उचललेलं पाऊल वाटलं. त्यामुळं त्यानं शीख सैन्यावर हल्ला केला आणि त्यात हरी सिंग नलवा ठार झाले.

ब्रिटिश सरकारकडून 'मवाजिब'

ब्रिटिश शीख सैन्य जेव्हा अफगाणिस्तानात तैनात होतं तेव्हा त्यांच्यासाठी खैबर खिंड खुली ठेवणं गरजेचं होतं. पण आफ्रिदी कबिल्याला याचा मोबदला दिल्याशिवाय त्याचा वापर करणं शक्य नव्हतं.

आफ्रिदींना मोबदला दिला नाही, तर अडचणींचा सामना करावा लागेल हे इंग्रजांनाही माहिती होतं. त्यामुळं आपला मार्ग मोकळा व्हावा आणि खैबर खिंडीत शांतता कायम राहावी म्हणून आफ्रिदी समुदायाला वर्षाला एक लाख पंचवीस हजार रुपये ते मोजत होते.

अफगाणिस्तानात दोन वर्ष राहिल्यानंतर, इंग्रजांचा पराभव झाला. त्यावेळी त्यांच्याबरोबर आलेल्या म्हणजे सैन्याला घेऊन ते परतत असताना खैबर खिंडीमध्ये आफ्रिदींनी त्यांना गाठलं होतं. त्यावेळी इंग्रजांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.

खैबर खिंडीमध्ये अली मशिदीजवळ इंग्रजांच्या तोफा आणि बंदुका असं सर्व काही आफ्रिदींनी हिसकावून घेतलं.

आफ्रिदींबरोबर झालेल्या करारानुसार या समुदायांना रस्त्याची सुरक्षा आणि शांतता कायम राहावी यासाठी ही रक्कम दिली जाते, तिला स्थानिक भाषेमध्ये 'मवाजिब' म्हटलं जातं.

वर्षातून दोन वेळा ही रक्कम दिली जाते आणि ती घेणाऱ्यासाठी ही अभिमानास्पद अशी बाब असते. या समुदायांमध्ये मलिक (प्रमुख) आणि ज्येष्ठांचा समावेशही असतो. ते प्रत्यक्षात सर्वापासून लांब असतात. पण त्यांच्या वाट्याचा मोबदला (मवाजिब) मिळवण्यासाठी ते हजारो रुपयेही खर्च करतात. मात्र कोणत्याही स्थितीत ते हा हिस्सा सोडत नाहीत.

सरकारांकडून या कबिल्यांमधील ज्येष्ठांना लिंगी (दस्तार) च्या नावाखालीही रक्कम दिली जाते.

आफ्रिदींचा इतिहास?

जमरूदपासून तिराह आणि चौराहपर्यंत आफ्रिदींची उपस्थिती आहे. त्यांच्यासाठी जलालाबादपासून पाकिस्तानच्या मर्दान शहरापर्यंत एका पख्तून राज्याची स्थापनाही करण्यात आली आहे. त्याचे संस्थापक बायजीद अन्सारी किंवा पीर रोखान होते. त्यात वजिरीस्तानच्या परिसराचाही समावेश असल्याचं प्रोफेसर डॉक्टर अस्लम तासीर आफ्रिदी सांगतात.

त्यांच्या मते, भारतातील कृषी क्षेत्र आणि स्मृद्धीमुळं भारताला सोन्याची चिमणी म्हटलं जात होता. त्यामुळं आक्रमकांना नेहमींच भारताबद्दल आकर्षण राहिलं. भारतावर आक्रमण करून राज्य करायची इच्छा त्यांची असायची. या आक्रमकांनी पख्तून (गांधार) चा मार्ग अवलंबला होता. पण 'खैबर खिंड' ही त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनली.

बाब-ए-खैबरच्या जवळ असलेल्या भागांमध्ये जवळपास 29 युद्धं ही आस-पासच्या विविध गटांमध्येच झाली होती. त्यात शीख, इंग्रज आणि काही युद्ध तर या कबिल्यांमध्ये आपसांतच झाली होती, असंही ते सांगतात.

आफ्रिदी समुदायांच्या अनेक शाखा आहेत, पण या सर्व शाखा वेगवेगळ्या भागांमध्ये राहतात. त्यांची सर्वात मोठी शाखा, कोकी खेल ही बाब-ए-खैबर पासून ते खैबर खिंडीपर्यंत आणि सोबतच तिराहच्या मोठ्या परिसरात राहते.

या समुदायाचा मलिक (प्रमुख) अब्दुल्ला नूरच्या मते, जमरूदवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहकालचा अरबाब सरफराज खान यांनी त्यांची मदत केली होती. जगातील प्रत्येक भागातून आलेले शासक, आक्रमक या भागावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी या समुदायामध्ये देखील सत्तेसाठी अंतर्गत संघर्ष सुरू होता.

मात्र आता या परिसरात दीर्घ काळापासून शांती असून सर्व समुदाय त्यांच्या ठरलेल्या सीमांमध्ये शांततेनं जीवन जगत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)