भारतातील पहिला ‘गे प्राईड मार्च’ ज्याने इतिहास घडवला

फोटो स्रोत, Owais Khan
हल्ली भारतात प्राईड परेड मोठ्या थाटामाटात होतात, हजारो लोक एकत्र येऊन समलिंगी समुदायाला आपला पाठिंबा जाहीर करतात, व्यक्त होतात.
पण 1999 सालची परिस्थिती कशी असेल कल्पना करा. देशातला पहिला ‘प्राईड मार्च’ पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात साजरा झाला होता. पत्रकार संदीप रॉय या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार होते.
2 जुलै 1999 चा दिवस, समलिंगी अधिकारांसाठी काम करणारे कोलकात्याचे पवन ढाल त्या 15 लोकांपैकी होते ज्यांनी देशातल्या पहिल्या प्राईड वॉकमध्ये पाऊल टाकलं.
अमेरिकेत LGBTQ+ चळवळीची ज्यामुळे सुरुवात झाली त्या स्टोनवॉल दंगलींना 30 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने जगभर कार्यक्रम होत होते, हा प्राईड वॉकही त्यातलाच एक.
पण जुलैचा महिना म्हणजे भारतात मान्सूनचा काळ, छातीवर गुलाबी त्रिकोण असलेल्या पिवळ्या रंगाच्या लक्षवेधी टी – शर्ट्समध्ये चालणारे हे 15 मोर्चेकरी नखशिखांत भिजले होते.
"ते चालणं कमी, प्रवाहातून वाट काढण्यासारखं जास्त होतं," ढाल सांगतात.
त्यांनी या पदयात्रेला प्राईड मार्च नाव दिलं नव्हतं, ते याला ‘फ्रेंडशिप वॉक’ म्हणत होते. साधंसं नाव, जे ऐकून कुणी विरोध करायला येणार नाही.
1999 च्या सुमारास भारतात समलैंगिकता हा फौजदारी गुन्हा होता. भारतीय दंडसंहितेत टिकून राहिलेल्या ब्रिटीश प्रभावांपैकी हे एक उदाहरण. काही शहरांमध्ये या समुदायाला पाठिंबा देणारे गट स्थापन झाले होते पण समलैंगिकता बहुतकरून चोरून – लपूनच जगत होती.
भारतातील क्विअर लोक (समलिंगी) एकमेकांना मेलिंग लिस्ट्स किंवा याहू ग्रूप्समधून शोधत असत. प्राईड मार्चची कल्पना तिथेच जन्माला आली.
28 April 1999 चा दिवस, LGBTQ+ इंडिया ग्रूपचे निमंत्रक ओवेस खान यांनी न्यू यॉर्कमधील ‘गे लिबरेशन डे’ साजरा करण्यासाठी काहीतरी करण्याची कल्पना मांडली.
“सप्तरंगी मोर आणि गुलाबी त्रिकोणांनी भरलेली एक लहानशी पदयात्रा” त्यांच्या कल्पनेत आकार घेत होती.
न्यू यॉर्कमधल्या प्राईड परेड्स त्यांच्या डोळ्यासमोर होत्याच पण महात्मा गांधींच्या दांडी यात्रेनेही आपल्याला प्रेरणा दिल्याचं खान सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण ओवेस खानांप्रमाणे प्रत्येक जण उत्सुक होताच असं नाही. रफिकूल हक दोजाह कम्युनिकेशन कन्सलटंट आहेत. या समूहातले काही जण दोजाहांना ‘अटेन्शन सीकर’ आणि ‘पाश्चात्य कल्पनांची नक्कल करणारा’ म्हणत.
स्वतः ढाल सुद्धा फारसे उत्साही नव्हते. "कोलकात्यात आणखी एक मोर्चा! मी स्वतःच किती मोर्चे केलेत आतापर्यंत, मोठी उठाठेव असते ती,” असाच तेव्हा विचार केल्याचं ते सांगतात.
पण हा मार्च घडवून आणण्याबद्दल खान ठाम होते. ‘गुलाबी बागी’ (बागी म्हणजे बंडखोर) या आपल्या पुस्तकात त्यांनी भारतातील LGBTQ+ चळवळीबद्दल लिहून ठेवलंय. “मी एकटा जरी चालत गेलो तरी बेहत्तर, ही पदयात्रा होणारच”, असं आपल्या मित्रांना सांगितल्याची त्यांनी आठवण लिहीली आहे.
पण कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना एका लहानश्या चमूला हा मार्च घडवून आणणं सोपं नव्हतं.
ते सांगतात की, ‘पदयात्रेच्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा माझ्या पोटात या विचारानेच गोळा आला होता की कुणी येईल की नाही.’
अखेर 15 लोक सहभागी झाले. कोलकात्यातून सात लोक आणि दिल्ली, मुंबई तसंच पश्चिम बंगालच्या बोंगाव आणि कुर्सेगावसारख्या लहान शहरांमधून उर्वरित आठ लोक.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
या पदयात्रेशेजारून जाणाऱ्या एका वयस्कर महिलेने एकाला या यात्रेचं कारण विचारलं. आपल्या हक्कांसाठी ही यात्रा असल्याचं त्याने सांगितलं. सरकारकडे ‘लोकांच्या खासगी आयुष्यावर नियंत्रण ठेवण्यापलिकडे’ दुसरी कामं नाहीत का असं पुटपुटत ती महिला तिथून निघून गेली.
अनेकांना अचंबाही वाटत होता. पदयात्रेनंतर हे लोक दोन गटांमध्ये विभागले गेले आणि स्वयंसेवी संस्था तसंच राज्य मानवाधिकार आयोगात जाऊन त्यांनी माहितीपत्रकं वितरित केली.
"ज्या कनिष्ठ अधिकाऱ्याला आम्ही भेटलो ते या सगळ्याने भांबावून गेले होते,” असं पवन ढाल सांगतात.
दुपारी पत्रकार परिषदेत वार्ताहारांनी तक्रार केली की या पदयात्रेचा एकही फोटो त्यांना मिळाला नाही.
मग काय, या 15 लोकांनी कॅमेऱ्यांसमोर ती ऐतिहासिक ‘पदयात्रा’ पुन्हा करून दाखवली. "वर्तमानपत्रांमध्ये छापून आला तो तोच फोटो," पवन ढाल हसत हसत सांगतात.
सहभागी झालेल्यांपैकी सगळ्यांनीच आपल्या लैंगिकतेबद्दल आपल्या आप्तेष्टांना पूर्वकल्पना दिलेली नव्हती.
अटलांटात राहणारे पण त्या दिवशी कोलकात्यात नातेवाईकांना भेटायला आलेले नवारुण गुप्ता सांगतात, "त्या पदयात्रेच्या दिवशी मी कुठे गायब होतो याची माझ्या नातेवाईकांना काहीच कल्पना नव्हती."

फोटो स्रोत, Owais Khan
आदित्य मोहनोत आज कोलकात्यात फॅशन डिझायनर आहेत. आपले पालक बाहेरगावी गेले होते म्हणून आपण या मार्चमध्ये सहभागी झालो होतो असं ते सांगतात. पण दुसर्या दिवशी मोठ्या मथळ्यांसह त्या पदयात्रेचे फोटो पेपरमध्ये छापून येतील याची कल्पना नसल्याचं ते सांगतात.
या पदयात्रेनंतर सगळे आपापल्या वाटेने परतले. ‘कुणीच न ऐकलेल्या पडसादांची’ ही पदयात्रा असल्याचं ढाल यांना वाटलं होतं. पण याचे पडसाद निश्चितच उमटले होते आणि त्यांना प्रतिसादही मिळाला.
मोहनोत म्हणतात त्यांच्या मित्रांच्या पालकांनी वर्तमानपत्रात ही बातमी वाचली. सुदैवाने त्यांना आश्चर्याबरोबरच अभिमानही वाटला.
रफिकूल दोजाह यांच्या शेजाऱ्यांनी मात्र या पदयात्रेबद्दल वाचल्यानंतर त्यांच्याशी संबंध तोडून टाकले.
"अर्थातच मला खूप दु:ख आणि वेदना झाल्या. ते कुटुंब मला जन्मापासून ओळखत होतं," रफिकूल सांगतात.
पण ओवेस खान आशा सोडणाऱ्यांपैकी नव्हते. ते म्हणतात, "पंधरा हा आकडा तसा लहान होता, पण किमान दोन्ही हातांची बोटं वापरून मोजावा लागणार होता.
लवकरच परदेशातूनही लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू लागले.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतल्या अल फतिहा या मुस्लीम समलैंगिकांसाठी काम करणाऱ्या गटाचे संस्थापक फैसल अस्लम यांनी पत्र लिहून सांगितलं, "मला अश्रू अनावर झालेत."
‘क्विअरीस्तान – LGBTQ इन्क्लुजन इन द वर्कप्लेस’ या पुस्तकाचे लेखक परमेश शाहानी म्हणतात, "माझ्यासारख्या एका तरुण समलैंगिक व्यक्तीला या पदयात्रेने दाखवून दिलं की समलैंगिकांप्रति खुला भारत निर्माण करण्यासाठी चारचौघांत जाऊन, ताठ मानेने संघर्ष करता येऊ शकतो.”
"फक्त कल्पनेत नाही तर प्रत्यक्षात क्विअर पर्याय उभे करता येऊ शकतात हे या घटनेने खरं करून दाखवलं."
2019 साली या पदयात्रेला 20 वर्षं झाल्यानिमित्त पवन ढाल, रफिकूल दोजाह आणि ओवेस खान यांनी इतर काही क्विअर संघटनांसह एकत्र येत एका फ्रेंडशिप मार्चचं आयोजन केलं. पण यावेळी आपण वेगळ्याच कुठल्या देशात आहोत असा त्यांना अनुभव आला.
2018 सालीच समलैंगिकतेचा फौजदारी गुन्ह्याचा दर्जा रद्द झाला होता. काही वर्षांतच सुप्रीम कोर्टात समलिंगी विवाहांना मान्यता देण्यावरून युक्तीवाद उभे राहिले. ट्रान्सजेंडर कार्यकर्त्यांनी एक ऐतिहासिक (आणि वादग्रस्त) ट्रान्सजेंडर विधेयक आणलं होतं. त्यांच्या कार्यक्रमात देशातील लहान मोठ्या गावा – शहरांतून लोक सहभागी झाले होते.
पण अर्थात, सगळंच बदललं होतं असंही नाही. "20वी वर्धापनदिन पदयात्रा पावसामुळे पार धुवून निघाली होती," पवन ढाल सांगतात.
पण त्यांना एक सुखद धक्काही मिळाला. इतक्या वर्षांपूर्वी संबंध तोडलेल्या त्यांच्या शेजारी त्यांच्या घरी येऊन त्यांच्याशी बोलल्या आणि आपल्या वागणुकीबद्दल माफीही मागितली.
रफिकूल म्हणतात योग्य गोष्ट करत राहिली पाहिजे, “लोकांना समजेल. आज नाही, उद्या नाही, 20 वर्षांनी तरी.”
(संदीप रॉय कोलकातास्थित लेखक आणि पत्रकार आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








