महाराष्ट्रात शेतकरी सातत्याने गांजा लागवडीची मागणी का करत आहेत?

गांजाचे झाड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“साहेब आम्ही ह्या सर्व पिकांना कंटाळलो. आता सरळ आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्या.”

पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार नाशिक दौऱ्यावर असताना एका शेतकऱ्यानं त्यांच्याकडे थेट गांजा लागवडीसाठी परवानगी मागितली.

यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, “ते माझ्या हातामध्ये नाही.”

यानंतर माध्यमांशी बोलताना या शेतकऱ्यानं म्हटलं होतं, "शेती परवडूनच नाही राहिली. महागाई भरपूर वाढली. खताचे, मजुरीचे भाव वाढले. शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही पडू राहिलं. पाऊस झाला तर निदान गांजा 10-20% तरी जगेल. त्यातून काहीतरी परवडेल आम्हाला."

पण, गांजा लागवड आणि वाहतूक यासाठी परवानगी मागण्याची शेतकऱ्यांची ही काही पहिलीच वेळ नाहीये.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

गांजा लागवडीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत.

पण, मूळात गांजा लागवडीची शेतकरी मागणी का करत आहेत? गांजा लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदलेल? गांजा शेतीविषयी कायदा काय सांगतो? जाणून घेऊया.

‘गांजा लागवडीची परवानगी द्या, कारण...’

बीड जिल्ह्यातल्या वाघोरा गावचा शुभम माने ‘अॅग्रीकल्चर इंजिनियर’ आहे. सध्या तो आई-वडिलांना शेतीत मदत करतो. त्याने काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाकडं एक निवेदन दिलं.

तो सांगतो, “मी जिल्हाधिकारी महोदयांकडे गांजा या पिकांच्या लागवडीसाठी मागणी केलेली होती. कारण ऊस लावला, कापूस लावला, सोयाबीन लावली तर आपल्याकडे ज्यावेळेस पीक येतं, त्यावेळेस त्या पिकाला थोडीही किंमत मिळत नाही.

“ऊस लावला तर कारखाना पण लवकर तोडणीसाठी नेत नाही. ऊसाला वेळ झाला की उन्हाळ्यात त्याचं अॅव्हरेज घटतं. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रॉफिट कमी होतं.”

शुभम माने

फोटो स्रोत, ganesh wasalwar

फोटो कॅप्शन, शुभम माने

शुभमच्या कुटुंबीयांकडे 10 एकर शेती आहे. त्यात ऊस, सोयाबीन ही पिकं घेतली जातात. गांजा लागवड फायदेशीर ठरेल असं त्याला वाटतं.

“हमेशा मी न्यूज वगैरे बघतो की गांजा पकडला वगैरे. त्याच्यामध्ये रेट पोलीस सांगतात की, मुद्देमाल एवढ्या पैशाचा मिळाला. त्याच्यातून मला कळालं की गांजा पीक आपण पण लावलं पाहिजे. म्हणजे आपलं घर चालवण्यासाठी आपल्याला त्याच्यातून मदत होईल.”

छुप्या पद्धतीनं गांजाची लागवड

गांजा लागवडीची ही गोष्ट फक्त मागणीपुरतीच मर्यादित नाहीये. तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीनं शेतकरी गांजाची लागवडही करतात.

7 जून 2023 रोजी बीड पोलिसांनी चिंचपूर गावात अशाच एका शेतकऱ्यावर कारवाई केली.

बीड पोलिसांना चिंचपूर गावात गांजाची 8 झाडं सापडली होती.

फोटो स्रोत, yogesh ubale

फोटो कॅप्शन, बीड पोलिसांना चिंचपूर गावात गांजाची 8 झाडं सापडली होती.

बीडच्या युसूफ वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सांगतात, “चिंचपूर गावात गेल्यानंतर मिरचीच्या शेतात 8 गांजाची झाडं शेतकऱ्यानं लागवड केलेली दिसली. ती ताब्यात घेऊन त्याचं वजन केल्यानंतर ती 24 किलोची भरली.

"त्याचं बाजारभावाप्रमाणे मूल्य होतं 1 लाख 24 हजार रुपये. सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध NDPS Act 20 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आलेली आहे."

कायदा काय सांगतो?

NDPS म्हणजे NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES ACT, 1985.

या कायद्याद्वारे, अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गांजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारख्या मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाची निर्मिती, वाहतूक, बाळगणे, विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते.

या कायद्याच्या कलम 20 नुसार, गांजाची बेकायदेशीरपणे लागवड केल्यास 10 वर्षांपर्यंत सक्‍तमजुरी आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

NDPS कायद्यानुसार, भारतात गांजाची लागवड करता येत नसली तरी, राज्य सरकारांना याप्रकरणी कायदे तयार करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

देशभरात केवळ उत्तराखंड या राज्यात गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देण्यात आलीय. तर उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर या राज्यांमध्ये गांजावरील संशोधनासाठी लागवड करण्याची परवानगी देण्यात आलीय.

महाराष्ट्रात शुभमसारखे शेतकरी आजघडीला गांजाकडे पर्यायी पीक म्हणून पाहताहेत.

“आम्ही माझ्या आजोबाच्या काळापासून शेती करतो. त्यांच्यानंतर वडिलांची दुसरी पीढी आहे. आता मी पण शेताकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केला. परंतु शेतामध्ये थोडीही प्रॉफिट होत नाही. मी स्वत: अॅग्रीकल्चर इंजिनियर आहे.

“शेतामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करून आपण पिकांचं उत्पादन वाढवू शकतो. पण उत्पादन वाढवलं तरी मार्केटमध्ये भावच नाही. दुसरीकडे गांजाला योग्य भाव आहे. त्यामुळे गांजाला पर्यायी पीक म्हणून मी तशी मागणी केली.”

गांजा हाच एकमेव पर्याय शिल्लक?

पण केवळ गांजा लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पत सुधारेल का? तेवढा एकच पर्याय शिल्लक आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक चव्हाण सांगतात, “अर्थकारणाच्या दृष्टीनं विचार केला तर, कुठलंही पीक आपण शास्त्रोक्त पद्धतीनं लावलं, आधुनिक पद्धतीनं शेती केली तर शेतकऱ्याचा आर्थिक दर्जा नक्कीच सुधारू शकतो. त्यासाठी गांजाची लागवड केलीच पाहिजे याची काही आवश्यकता नाहीये.”

“पर्यायी उत्पन्नाची अनेक साधनं, नवीन जोडधंदे आपल्याकडे आहेत. तांत्रिक माध्यमातून झाडांची लागवड केल्यास, आधुनिक शेती केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावू शकतो,” असंही ते पुढे सांगतात.

डॉ. अशोक चव्हाण

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, डॉ. अशोक चव्हाण

गांजाचा उपयोग औषधीसाठीही

गांजाची बेकायदेशीरपणे लागवड ही साधारणत: जास्त उंचीच्या पिकांमध्ये जसं की ऊस, कपाशी, मिरची, मका या पिकांमध्ये केली जाते.

गांजाच्या झाडातील गैरनशेच्या हिश्श्यापासून मिरगी, मानसिक आजार तसंच कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केला जाऊ शकतो, असंही संशोधनातून समोर आलंय.

शुभमसारख्या शेतकऱ्यांना ही गोष्ट माहिती आहे. तो सांगतो, “गांजा हा औषधासाठी पण आणि ज्यांना नशा करायचा आहे त्यासाठी पण वापरतात. औषधं तयार केली जात असतील तर सरकारनं गांजा लागवडीसाठी मान्यता द्यावी.”

गांजाचा वापर वैद्यकीय कारणांसाठीही केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गांजाचा वापर वैद्यकीय कारणांसाठीही केला जातो.

गांजाच्या झाडात प्रमुख 2 रसायनं आढळतात. एक आहे टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (THC) आणि दुसरं म्हणजे कॅनाबिडॉल (CBD. यापैकी THCमुळे गांजात नशा येते. गांजा वनस्पतीमध्ये उच्च THC असल्यामुळे ते अंमली पीक म्हणून ओळखलं जातं.

तर कॅनाबिडॉलमध्ये नशा उत्पन्न करणारे घटक नसतात. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला गांज्यात सापडणाऱ्या या रसायनाविषयी उत्सुकता आहे, कारण याचा वापर आरोग्य सेवांमध्ये केला जातो.

National Botanical Research Institute च्या वेबसाईटवर नमूद केलंय की, गांजाच्या किंवा भांगेच्या वनस्पतीपासून जगभरात 25 हजारपेक्षा जास्त उत्पादनं तयार केली जातात.

उत्तराखंडचे शेतकरी काय म्हणतात?

उत्तराखंडमध्ये गांजा लागवडीस परवानगी आहे. अर्थात त्यासाठी आधी परवाना घ्यावा लागतो.

इथल्या एका तरुण शेतकऱ्यांना नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितलं, “गेल्या वर्षी आम्ही संशोधनाच्या उद्देशानं थोड्या क्षेत्रावर गांजाची लागवड केली होती. पण, यासाठीचं बियाणं आम्हाला विदेशातून आणावं लागलं.

“यंदा मात्र उत्तराखंड सरकार गांजा शेतीबद्दलच्या त्यांच्या धोरणात बदल करण्याची शक्यता आहे. यंदा सरकार भारताचं पारंपरिक वाण लागवड करण्यास परवानगी देऊ शकतं.”

भारतात गांजाची कायदेशीर लागवड करता येईल, असं वाण अद्याप विकसित झालेलं नाहीये.

गांजा वनस्पती लागवड

फोटो स्रोत, nbri

गांजा शेतीसमोर काय आव्हानं आहेत, असं विचारल्यावर तो शेतकरी म्हणाला, “गांजाचं पीक 3 महिन्यांचं असतं. 3 महिन्यांनंतर ते खरेदी कोण असणार? त्यासाठी उद्योग क्षेत्र पुढे येईल का? हे प्रश्न आहेत.”

गांजाच्या शेतीसाठी पाणी चांगलं लागतं. वर्षातून दोनदा पीक घेता येतं, असं उत्तराखंडचे शेतकरी सांगतात.

सध्या तरी, गांजा लागवडीमुळे आपलं अर्थकारण सुधारेल अशी आशा काही शेतकरी व्यक्त करत आहेत.

तर दुसरीकडे, गांजामुळे लोक व्यसनाधीन होत जातील, गांजा हा लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे, असं गांजाला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)