तापमान 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर शरीरावर काय परिणाम होतात?

देशभरात उन्हाचा तडाखा वाढलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केलाय. अशा रखरखत्या उन्हात आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे? अती तापमानाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?

सविस्तर गोष्टी या लेखात पाहू

एका बाजूला रखरखीत ऊन तर दुसऱ्या बाजूला गारपीट आणि पाऊस सुरू आहे. अशा वातावरणात दरवर्षी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. लहान मुलं असो, वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिला, सर्वांनाच या उन्हाचा त्रास होताना दिसतो.

काही तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे उन्हाळ्यातील तापमान आणखी वाढणार असून तापमान कमी होण्याचे कोणतेही संकेत नाहीत.

प्रखर सूर्यप्रकाशावर मानवी शरीराची प्रतिक्रिया कशी असते?

जेव्हा बाहेरचं तापमान वाढू लागतं तेव्हा आपलं शरीर अंतर्गत उष्णता बाहेर फेकू लागतं. या प्रक्रियेदरम्यान रक्तप्रवाह आपल्या त्वचेच्या दिशेने वाढतो.

त्यानंतर शरीराचं तापमान घामाच्या स्वरूपात बाहेर येतं. या घामाचे बाष्पीभवन होत असताना शरीर थंड होतं.

मात्र थंड हवेच्या ठिकाणी शरीराचं तापमान बाहेरील तापमानापेक्षा जास्त असतं. मग शरीर आपली अंतर्गत उष्णता (बाहेरील वातावरणात) गमावतं. याला 'ड्राय हीट लॉस' असं म्हणतात.

पण जेव्हा बाहेरचं तापमान जास्त असते आणि शरीराचं तापमान कमी असते तेव्हा 'ड्राय हिट लॉस' हा सिद्धांत लागू होत नाही.

अशा परिस्थितीत शरीर (स्वतःला थंड करण्यासाठी) पूर्णपणे घामावर अवलंबून असतं.

मानवी शरीराचे सामान्य तापमान 37-38 सेंटीग्रेड असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानवी शरीराभोवती हवेचं तापमान 18 ते 24 सेंटीग्रेड असतं.

तापमान 39-40 सेंटीग्रेड पर्यंत पोहोचताच, मानवी मेंदू स्नायूंना काम थांबवण्याचे किंवा आहे त्या परिस्थितीत स्नायू शांत करण्याचे संदेश पाठवतो आणि थकवा लगेच वाढतो.

जेव्हा तापमान 41 डिग्री सेल्सिअस ओलांडते तेव्हा मानवी शरीरात महत्त्वपूर्ण बदल होऊ लागतात.

तापमानाचा शरीरातील रासायनिक प्रक्रियांवर परिणाम होतो. तापमान जास्त असेल तर अंतर्गत पेशी खराब होऊ लागतात. याचा मोठा धोका म्हणजेच अवयव निकामी होऊ शकतात.

त्वचेला रक्तपुरवठा करणं कठीण होऊन बसतं, अशात घाम येणं देखील बंद होतं आणि अवयव सुन्न पडतात.

तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्यानंतर सनबर्न होण्याची शक्यता असते.

उष्माघाताने त्रस्त असलेल्यांनी तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो

उन्हाळ्यात स्वतःचं संरक्षण कसं कराल?

  • ऊन जास्त असल्यास भरपूर पाणी पिणं फार महत्वाचं आहे
  • उन्हाळ्यात शरीराला ताण देणारे व्यायाम अजिबात करू नयेत.
  • हलके, फिकट रंगाचे आणि सैलसर कपडे घालावे.
  • जेव्हा तापमान जास्त असेल तेव्हा थंड ठिकाणी, सावलीत बसा.
  • 'इफेक्ट ऑफ हिट ऑन द बॉडी'च्या अभ्यासक प्राध्यापक व्हर्जिनिया मरे म्हणतात, "दिवस आणि रात्र यांच्यातील तापमानामुळे शरीराला शांत होण्याची संधी मिळत नाही. अशावेळी थंड ठिकाण शोधलं पाहिजे. मग ती एअर कंडिशन्ड रुमही असू शकते."

सनबर्न झाल्यास काय कराल?

  • ताबडतोब जवळच्या रुग्णालयात जा.
  • सनबर्न झालेल्या जागेवर ताबडतोब थंड पाणी ओतावे, सोबतच व्यक्तीच्या कपाळावर आणि बगलेत बर्फाचा पॅक देखील लावावा.
  • अशा प्रकारे बर्फाचा पॅक लावल्याने शरीरातील महत्त्वाचे अवयव थंड होतात.
  • पण व्यक्ती उन्हात किंवा उच्च तापमानात किती काळासाठी होती यावरही काही गोष्टी अवलंबून असतात.
  • अशा परिस्थितीत घाम येणं खूप महत्त्वाचं असतं.
  • लॉफबरो युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉर्ज हॅविनिट म्हणाले, हवेतील तापमान आपल्या शरीराची घाम येण्याची क्षमता ठरवते.
  • जर लोहाचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या शरीराची घाम येण्याची क्षमता कमी होते. जर लोहाचे प्रमाण कमी असेल तर शरीर जास्त घाम येऊन तापमान सहन करण्याची क्षमता वाढते.

उन्हाचा इतर सजीवांवर कसा परिणाम होतो?

उच्च तापमान आणि सूर्यप्रकाशामुळे केवळ मानवांसाठीच नाही तर पृथ्वीवरील अनेक सजीवांसाठीही जीवघेणी परिस्थिती निर्माण होत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन दिवसांच्या उष्णतेच्या लाटेमुळे ऑस्ट्रेलियातील एक तृतीयांश वटवाघुळांचा मृत्यू झाला होता.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे 30 हजार वटवाघळं दोन दिवसांत मृत्युमुखी पडली.

वाढत्या तापमानामुळे सर्व सजीवांवर कोणत्या ना कोणत्या मार्गाने परिणाम होतोच आहे. सजीवांव्यतिरिक्त, शेती, गोडे पाणी, मोकळ्या जागेत काम करणारे कामगार, जंगल अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम होतो.

2003 मध्ये, युरोपमध्ये सर्वात मोठी उष्णतेची लाट आली होती यात 70 हजार लोकांचा मृत्यू झाला. युरोपियन इतिहासातील ही सर्वात प्राणघातक लाट होती.