160 किलो वजनाच्या महिलेनी दिला बाळाला जन्म; लठ्ठपणा असलेल्या गर्भवतींनी काय काळजी घ्यावी?

सिमोरा डिसूझा

फोटो स्रोत, SIMORA DESOUZA

फोटो कॅप्शन, सिमोरा डिसूझा त्यांच्या बाळासह आणि सोबत डॉक्टर
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लठ्ठपणा, हायपर थायरॉइडिझम, पीसीओडी, पाळीसंदर्भातील अनियमितता, रक्तदाब, डायबेटिस अशा अनेक आजारांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलेलं आहे.

कामाचं बदललेलं स्वरूप, बदललेली जीवनशैली, उच्च कॅलरीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, जनुकीय दोष, ताण-तणाव, झोपेचा अभाव असे अनेक स्त्री-पुरुषांवर परिणाम करत आहेत.

त्यातही मुलींमध्ये बालपणातच वजन वाढायला सुरुवात होऊन लठ्ठपणा (ओबेसिटी) आजार होणं, पाळी लवकर येणे, पाळी अनियमित येणं, तिशी-पस्तिशीनंतरच्या गरोदरपणामुळे होणाऱ्या गुंतागुंती, उच्च रक्तदाब, मधुमेह यामुळे गर्भवती होणं आणि प्रसुती यामध्ये अडचणी येत असल्याचं दिसून येतं.

पण मुंबईजवळच्या मिरा रोड इथल्या 160 किलो वजन असलेल्या एका महिलेने मात्र या अडचणींवर मात करुन दाखवली आहे.

सिमोरा डिसूझा असं त्यांचं नाव असून वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे.

लग्नानंतर 14 वर्षांनंतर त्यांनी या बाळाला जन्म दिला आहे. ही प्रसुती सिझेरियन पद्धतीने झालेली आहे. सिमोरा या एका बीपीओ कंपनीमध्ये कार्यरत आहेत.

लहानपणापासून होता लठ्ठपणा आणि हायपोथायरॉईडिझमचा त्रास

सिमोरा डिसूझा यांना लहानपणापासूनच लठ्ठपणा आणि हायपोथायरॉईडिझमचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांचे वजन काही वर्षांपूर्वी 185 किलोंपर्यंत गेले होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रीया करावी लागली होती. त्यामुळे त्यांचे वजन 130 पर्यंत खाली आले होते.

त्यानंतर त्या गरोदर राहिल्या आणि त्यांची प्रसूती झाली. या गरोदरपणाच्या काळात त्यांचं वजन 30 किलोंनी वाढून प्रसुतीपर्यंत त्यांचं वजन 160 किलोंवर पोहोचले होते.

सिमोरा यांनी सर्व सूचना पाळल्यामुळे त्यांना गरोदरपणाच्या काळात होणारा डायबेटिस झाला नाही, असं त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सांगतात. इतकंच नाही तर 3.2 किलोग्रॅम वजनाचं सुदृढ बाळ जन्माला आलं. जन्मानंतर बाळाच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. त्या सर्व नॉर्मल आहेत.

इतकंच नाही तर आईला दूध सुरू होण्यासाठी प्रसूतीनंतर थोडाकाळ जातो. या दोघांच्या बाबतीत अगदीच अल्पावधीत ते नातं सुरू झालं. आई आणि बाळाचं नातं (Bonding) तयार व्हायलाही थोडासा वेळ जातो मात्र सिमोरा आणि त्यांच्या बाळात ते अगदीच वेगानं झालं, असं त्यांची काळजी घेणारे डॉक्टर सांगतात.

सिमोरा यांना इतर महिलांप्रमाणे दोन-तीन दिवसांत घरी सोडण्यात आलं. विशेष म्हणजे या काळात त्यांचं वजन 160 वरुन 152 वर आलं. त्याचप्रमाणे शस्त्रक्रीयेच्या जागी कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला नाही.

गर्भधारणा आणि प्रसूतीत काय होते अडथळे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लठ्ठपणा तसेच इतर आजार असलेल्या महिलांच्या प्रसुती जोखमीच्या किंवा या उदाहरणाप्रमाणे अतिजोखमीच्या समजल्या जातात. त्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स तसेच विशेष अनुभवी भूलतज्ज्ञांची आवश्यकता असते.

सिमोरा यांची प्रसूती करणाऱ्या मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ज्ञ डॉ. मंगला पाटील यांनी बीबीसी मराठीला याबद्दल अधिक माहिती दिली.

डॉ. पाटील म्हणाल्या, “लठ्ठपणा आणि इतर कोमॉर्बिडीटीज असल्याने या रुग्णाची गर्भधारणा धोक्याची होती. गर्भधारणेतील लठ्ठ महिलांना मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात, गर्भधारणेत अडचणी, गर्भधारणेदरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब, आकुंचन आणि कमी वजनाचे बाळ यासारख्या आव्हानांना आणि गुंतागुंताीस सामोरे जावे लागते.”

“उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणेमध्ये, रुग्णाला शस्त्रक्रिया आवश्यकता भासते आणि सिझेरियन प्रसुतीची शक्यता अधिक असते. प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर रुग्णाला रक्तस्त्राव होऊ शकतो आणि त्याला रक्त संक्रमणाची तसेच अतिदक्षता विभागाची आवश्यकता भासू शकते. डिलिव्हरीनंतर आजारी लठ्ठपणामुळे डिव्हीटी (डीप वेन थ्रोम्बोसिस) होण्याची शक्यता असते.”

सिमोरा डिसूझा त्यांच्या बाळासह आणि सोबत डॉक्टर

फोटो स्रोत, SIMORA DESOUZA

सिमोरा यांच्या बाबतीत बोलताना त्या म्हणाल्या, “लठ्ठ रुग्णाने गर्भधारणेपूर्वी योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करून वजन कमी केले पाहिजे आणि थायरॉईड विकार, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार असल्यास, रुग्णाने वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करावे त्यामुळे परिणाम सुधारतील. अतिलठ्ठ रूग्ण आहार आणि व्यायामाद्वारे वजन कमी करू शकत नाहीत आणि वजन कमी करण्यासाठी अशा रुग्णांसाठी बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेचा पर्याय आहे. रुग्णाला गर्भधारणा करायची होती म्हणून तिने बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया केली, ज्यामुळे तिचे वजन 185 किलोवरून 130 किलोपर्यंत कमी झाले.”

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

उच्च जोखमीच्या गर्भधारणेमुळे रुग्णाला योग्य आहार आणि व्यायामाबरोबरच वारंवार फॉलोअप आणि नियमित अल्ट्रासोनोग्राफीची आवश्यकता भासते. साधारणपणे गरोदरपणात सरासरी वजन 11 किलो वजन वाढते, मात्र या प्रकरणात ते 30 किलोपर्यंत वाढले होते.”

“प्रसूतीतज्ज्ञांचा विशेष विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अॅनेस्थेशिया विभाग, निओनॅटोलॉजी विभाग आणि एंडोक्रिनोलॉजिस्ट विभागाने सर्व आव्हाने पेलत आई आणि बाळ दोघांची सुरक्षित प्रसूती केली. रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोनाने उच्च जोखमीच्या गर्भधारणेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यात आल्याचं”, त्या सांगतात.

'समुपदेशनाचा वाटा मोठा'

बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. मंगला पाटील म्हणाल्या, या प्रसूतीमध्ये सुरुवातीपासूनच आम्ही रुग्णाबरोबर एकत्रित काम केले. सिमोरा गर्भधारणा झाल्यावर थोड्या साशंक होत्या. त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल आम्ही विश्वास प्राप्त करुन दिला. सिमोरा यांनीही त्यांच्या जीवनशैलीत मोठे बदल केले, आम्ही दिलेले डाएट आणि नियम पाळले. त्यांनी सगळ्या सूचना अत्यंत प्रामाणिकपणे पाळल्यामुळेच हे यश मिळालं आहे.

सिमोरा यांच्याबद्दल सांगताना डॉ. पाटील म्हणाल्या, "केवळ प्रसुती नीट व्हावी हे उद्दिष्ट नसतं तर आई आणि बाळ हे दोघेही सुरक्षित असले पाहिजेत हे ध्येय समोर ठेवलं पाहिजे. अशा गरोदरपणाच्या बाबतीत कौन्सिलिंगचा मोठा वाटा असतो. रुग्णाला धीर देणं तसेच आत्मविश्वास प्राप्त करुन देणं आवश्यक आहे."

हे तर नवं आयुष्य- सिमोरा डिसूझा

आम्ही लग्नानंतर बाळाबद्दल कधीच विचार केला नव्हता, पण आता या वयात मी निरोगी बाळाला जन्म देऊ शकले हे मला एक नवं आयुष्य मिळाल्यासारखं वाटतं, असं सिमोरा बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, “मला लहानपणापासून लठ्ठपणा आणि थायरॉईडसंदर्भातला त्रास होता. त्यामुळे हा प्रवास अतिशय जोखमीचा होता. परंतु माझ्या पतीने यात फार सहकार्य केलं. माझ्या पतीच्या वडिलांनाही थायरॉईडसंबंधित त्रास आहे. त्यामुळे त्यांना यातील त्रासाची जाणिव होती. आमचा विवाह 2010 साली झाला. वयाची तिशी आल्यावर मी बॅरिएट्रिक सर्जरीला सामोरी गेले आणि आता 33 व्या वर्षी मी हे करू शकले.”

Simora Disouza
हताश होऊन प्रयत्न सोडू नका, सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केल्यास सर्व शक्य आहे. मी जीवनशैलीत बदल केल्यामुळे हा आनंद जीवनात आला आहे.
सिमोरा डिसूझा

मला वाटतं तुम्हाला असलेल्या त्रासांबरोबर, आजारांबरोबर जगताना सकारात्मक दृष्टी असेल तर तुमचा प्रवास फार सोपा होतो, तुमचा जगाकडे, परिस्थितीकडे पाहाण्य़ाचा दृष्टिकोन सकारात्मक केलात तर फार सोपं होतं असं त्या सांगतात.

आता मला हे नवं आयुष्य मिळालं आहे. मला आता एक चांगली आई व्हायचं आहे आणि बाळाची काळजी घ्यायची आहे.

गरोदर होण्यात कोणत्या महिलांना अडथळे येतात?

बऱ्याचदा महिलांमध्ये आपलं वजन गरोदर राहाण्यासाठी योग्य आहे का? आपण गर्भवती होऊ शकू का असा प्रश्न असतो. त्यांना आपल्या वजनाबद्दल शंका असते. अशा महिलांना डॉ. मंगला पाटील वजनापेक्षा बीएमआयकडे (बॉडी मास इंडेक्स) लक्ष देण्यास सांगतात. सरसकट वजनाचा नियम सर्वांना लावण्याऐवजी प्रत्येक महिलेने बीएमआयचा विचार करावा असं त्या सांगतात.

डॉ. पाटील सांगतात, “सध्याच्या वजनामध्ये 10 टक्के घट झाली तरी ओव्ह्युलेशनमध्ये येणारे अडथळे भरपूर कमी होतात. (अंडाशयातून फॅलोपियन नलिकेकडे स्त्रीबीज सोडण्याची प्रक्रिया म्हणजे ओव्ह्युलेशन). तुमचा बीएमआय 18.5 ते 24 मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. 25 च्या पुढे ओव्हरवेट आणि 30 च्या पुढे ओबिस किंवा लठ्ठ म्हणून गणलं जातं.”

जर 24 च्या पुढे बीएमआय असेल तर ओव्ह्युलेशनसह अनेक शारीरिक क्रियांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे 30 पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या महिलांनी तो खाली आणण्याचा प्रयत्न करावा. 24 ते 29 मधील महिलांनी तो आणखी खाली आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही जास्त फायदा होतो.

लठ्ठपणा टाळण्यासाठी काय करायचं?

लठ्ठपणामुळे महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी डॉ. मंगला पाटील काही उपाय सुचवतात.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, “सर्वांत आधी कोणत्याही प्रकारचं धूम्रपान आणि मद्यपान थांबवलं पाहिजे. आजकाल बहुतांश महिला नोकऱ्या करतात. त्यांचं काम बैठं असेल तर त्यांनी आपली हालचाल वाढवली पाहिजे.

"जीवनशैलीत मोठे बदल केले पाहिजेत. मसालेदार-तेलकट, पाकिटबंद पदार्थ खाणं थांबवलं पाहिजे. बीएमआय नीट राहाण्यासाठी योग्य़ डाएट आणि व्यायाम केला पाहिजे. त्यातही झोप व्यवस्थित घेणं आणि पुरेशा झोपेसह चांगल्या गुणवत्तेची झोप महत्त्वाची आहे," असं पाटील म्हणाल्या.

लठ्ठपणा टाळण्यासाठी जीवशैलीत बदल करणं आवश्यक आहे असं डॉक्टर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लठ्ठपणा टाळण्यासाठी जीवशैलीत बदल करणं आवश्यक आहे असं डॉक्टर सांगतात.

त्या सांगतात अशा रुग्णांना ड जीवनसत्व, फॉलिक असिड, मल्टिव्हिटॅमिन तसेच थायरॉईड असेल तर त्याची औषधं द्यावी लागतात.

आता लठ्ठपणा असलेल्या महिलांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दर महिन्याला एकतरी रुग्ण 110-120 किलोंच्या आसपास असल्याची रुग्णालयात येते असं त्या सांगतात. डॉ. पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी 143 किलो वजनाच्या महिलेची प्रसुती केली होती.