‘जपानवर पडलेल्या अणूबॉम्बसाठीचं युरेनियम मी तयार केलं होतं, हे मला माहितीच नव्हतं’

फोटो स्रोत, Getty Images
ते साल होतं 1943 चं. दुसरं महायुद्ध शिगेला पोहोचलं होतं.
अमेरिकेच्या टेनेसी येथील रुथ हडलस्टन या तरुणीने नुकतंच तिचं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं होतं.
त्यानंतर तिला स्थानिक होजियरी कारखान्यात नोकरी मिळाली. पण तिच्या बऱ्याच मैत्रिणींनी जवळच्या ओक रिज शहरात सुरू होणाऱ्या मोठ्या सरकारी एजन्सीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता.
तिनेही या नोकरीसाठी अर्ज करावा असा सल्ला तिच्या जवळच्या मैत्रिणींनी तिला दिला.
पण तिथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तिने तिच्या वडिलांना तिथे घेऊन जायला सांगितलं. अमेरिकेत सुरू होणाऱ्या नव्या वीज कंपनीत काम मिळवण्यासाठी रुथ खूप उत्सुक होती.
रुथ आज 93 वर्षांच्या आहेत. त्या सांगतात, "मला आणि माझ्या वडिलांना तिथे नोकरी मिळाली." अॅटोमिक हेरिटेज फाउंडेशनच्या "व्हॉइसेस ऑफ द मॅनहॅटन प्रोजेक्ट" येथील भाषणात त्यांनी ही कथा सांगितली.
द मॅनहॅटन प्रोजेक्ट
रुथ आणि तिच्या वडिलांनी ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीमध्ये काम करायला सुरुवात तर केली पण तिथे अणुबॉम्ब विकसित केला जातोय याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
दुसऱ्या महायुद्धात विनाशकारी ठरलेला जगातील पहिला अणुबॉम्ब द मॅनहॅटन प्रोजेक्टचाच एक भाग होता.
आज जगभरात गाजलेल्या ओपनहायमर चित्रपटात या प्रकल्पाचा उल्लेख आहे.
त्यावेळी रूथने ओक ब्रिज प्रयोगशाळेच्या Y-12 प्लांटमध्ये काम केलं होतं. त्या क्युबिकल ऑपरेटर म्हणून नोकरीवर रुजू झाल्या होत्या.
तिथे काम करणाऱ्या तरुणींना 'द गर्ल्स ऑफ द कॅल्युट्रॉन' म्हणत असत. युरेनियमचं समस्थानिक वेगळं करण्यासाठी जे साधन वापरलं जातं त्याला कॅल्युट्रॉन म्हटलं जातं.
या कॅल्युट्रॉन गर्ल्स काय काम करायच्या?
1945 मध्ये जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या 'लिटल बॉय'च्या निर्मितीमध्ये या महिलांचा मोलाचा वाटा होता.
केवळ रुथच नाही तर त्यांच्यासोबत या कामात 10,000 लोक गुंतले होते.
साधनं जटील होती, पण काम मात्र सोपं होतं
या महिलांना युरेनियमची समस्थानिकं वेगळी करण्यासाठी वापरल्या जाणार्या कॅल्युट्रॉनचे नियंत्रण पॅनेल चालवावे लागायचे. यातून मिळणारे युरेनियम अणुबॉम्बसाठी इंधन सवरुपत वापरले जात असे.
खरं तर, Y-12 हा प्लांट खास इलेक्ट्रोमॅग्नेटिक आइसोटोप वेगळे करण्यासाठी तयार केलेला होता. पण तिथे काम करणाऱ्या लोकांना याची खबरबातही नव्हती.
युरेनियम समृद्ध करण्यासाठी विकसित केलेले कॅल्युट्रॉन खूप जटील असतात. मात्र त्यांचं संचलन करणं किंवा त्यांना हाताळणं त्यामानाने सोपं असतं.
या पॅनलमध्ये मीटरचं निरीक्षण करून योग्य वेळी काही नॉब फिरवावे लागायचे.

फोटो स्रोत, ED WESTCOTT/US DEPARTMENT OF ENERGY
युद्धादरम्यान कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे, मॅनहॅटन प्रकल्प विकासकांनी तरुण महिलांना कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला.
शास्त्रज्ञांनी या यंत्रांवर काम करताना, त्याच्यावर नवनवीन प्रयोग करण्यात वेळ घालवला. पण या तरुणींनी आपलं काम चोख पार पाडलं.
आम्हाला शौचालयात जायचीही भीती वाटायची
रूथ सांगतात की त्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी भली मोठी राक्षसी उपकरणं पाहिली होती.
"त्यांनी आम्हाला काम सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर आम्हाला क्यूबिकल्स म्हटल्या जाणार्या ठिकाणी नेलं. ती मोठी धातूची उपकरणं होती. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची मोजमाप यंत्र होती. त्यांनी आम्हाला ती यंत्र कशी हाताळायची हे शिकवलं."

फोटो स्रोत, ED WESTCOTT/US DEPARTMENT OF ENERGY
त्यांना आजही Y-12 प्लांट मधील त्यांचा पहिला दिवस आठवतो.
रूथ सांगतात, "एखाद्या टूलवरील पिन खूप उजवीकडे सरकली तर ती तुम्हाला मध्यावर आणावी लागायची. जर ती खूप डावीकडे सरकल्यास पुन्हा ती मधोमध आणून ठेवावी लागायची. आणि जर कधी तुम्हाला ती हाताळणं शक्य झालं नाही तर पर्यवेक्षकाला बोलवावं लागायचं."
टाकीमध्ये तापमान स्थिर ठेवणं हे मुलींचं मुख्य काम होतं. जर ते तापमान वाढून खूप गरम झालं तर द्रव नायट्रोजन वापरून ते थंड करावं लागायचं.
रूथ सांगतात, "आम्ही दिवसभर क्युबिकलसमोर स्टूलवर बसायचो. आम्ही बाथरूमला जायलाही उठायचो नाही. इंजिन खराब होईल या भीतीने आम्हाला बाहेर जायला भीती वाटायची."
गोपनीयता हा सर्वांत महत्त्वाचा नियम
त्या काळातील एक महत्त्वाची आठवण म्हणजे सर्व ऑपरेशन्स करताना बाळगलेली गुप्तता.
रूथ सांगतात, "काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी आम्हाला काही आठवडे प्रशिक्षण दिलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे इथे जे काही सुरू आहे आणि आम्ही जे करतोय त्याबद्दल बाहेर कुठेही काही सांगायचं नाही."
"त्यांनी आम्हाला सांगितलं की जर आम्ही या नियमाचे उल्लंघन करताना पकडले गेलो तर दंड तर होईलच शिवाय तुम्हाला नोकरीवरून कमी केलं जाईल."
पण खरंच, जर रूथला कोणी विचारलं असतं की त्या काय काम करतात तर त्यांना सांगणं कठीण झालं असतं. कारण त्यांना या कामाविषयी काहीच माहीत नव्हतं असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, US DEPARTMENT OF ENERGY
आणि रूथप्रमाणे, युरेनियम समृद्ध करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या बहुतेक स्त्रियांना आपण काय करतोय याची कल्पना नव्हती.
रूथ सांगतात, "आता मला आश्चर्य वाटतंय की आम्ही काय काम करतोय हे आम्ही एकमेकींना का विचारलं नसेल?"
मॅनहॅटन प्रोजेक्ट नॅशनल पार्कच्या मते, अनेक महिलांना तिथे काय चाललं आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती.
रुथ पुढे सांगतात, "पण त्या प्रकल्पातील लोकांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही आम्ही अमेरिकेला युद्ध जिंकण्यास मदत करत आहोत. पण कसं ते आम्हाला आत्ताच सांगता येणार नाही."
शेवटी सत्य कळालं
6 ऑगस्ट 1945 रोजी जेव्हा अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा मॅनहॅटन प्रकल्पात काम करणाऱ्या सर्वांना आपण काय करतोय याची माहिती देण्यात आली.
त्या दिवशी जे अनुभव वाट्याला आले त्याविषयी रुथ संगतात.
"जेव्हा घोषणा झाली तेव्हा मी कामावर होते. युद्ध संपल्याचा प्रथम मला आनंद झाला. मला वाटलं की माझा प्रियकर आता युद्धातून घरी येईल."
"पण... नंतर प्रत्येकजण जपानमधील मृतांबद्दल बोलू लागला. मला जाणवलं की माझाही त्यात सहभाग आहे."

फोटो स्रोत, ED WESTCOTT/US DEPARTMENT OF ENERGY
त्या सांगतात, "युद्ध हे युद्ध आहे. ते थांबवण्याचा प्रयत्न करण्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही."
मला आजही ते आवडलेलं नाही. पण कोणाला तरी ते करावं लागणार असल्याचं रुथ सांगतात.
ज्या दिवशी लिटिल बॉयचा स्फोट झाला तेव्हा 50,000 ते 100,000 लोक मरण पावले असं म्हणतात. या Y-12 प्लांटमध्ये त्यासाठी 64 किलोग्रॅम युरेनियम-235 उत्पादित झालं होतं.
स्फोटातून वाचलेल्यांपैकी 50% लोकांचा मृत्यू किरणोत्सर्गामुळे झाला.
दरम्यान, या प्लांटमध्ये बॉम्ब बनविण्यात मदत करणाऱ्या अत्यंत किरणोत्सर्गी सामग्रीजवळ काम करूनही त्या महिलांवर कोणतेही परिणाम झाले नव्हते. त्यांच्या संपर्कात आलेल्या किरणोत्सर्गाचे प्रमाण दररोज मोजले जात होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








