अणुबॉम्ब तयार करताना निष्काळजीपणा झाला अन एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला

- Author, बीन प्लेट्स मिल्स
- Role, बीबीसी फ्युचरसाठी
तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. अणुबॉम्ब बनवता येईल का यासाठी अनेक देश चाचपणी करत होते, यात सर्वात पुढे होता अमेरिका.
अमेरिकेने अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' सुरू केला होता. यात देशभरातील सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची भरती सुरू होती.
हे सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंते न्यू मेक्सिकोमधील लॉस एलमॉस येथील गुप्त संशोधन केंद्रात राहायचे आणि काम करायचे.
हा अणुबॉम्ब विकसित करण्याचं काम सुरू होतं रॉबर्ट ओपेनहायमरच्या नेतृत्वाखाली. या संशोधन केंद्रात राहात असतानाच त्यांनी वाळवंटात जगातील पहिला अणुस्फोट घडवून आणला.
भौतिकशास्त्रज्ञ लुई स्लॉटन हे देखील त्या प्रकल्पाचा एक भाग होते. 21 मे 1946 नंतरचे दिवस त्यांचे शेवटचे दिवस होते.
ते बॉम्ब बनवण्यात निपुण होते आणि या प्रकल्पात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. जुलै 1945 मध्ये त्यांच्या 'ट्रिनिटी' यंत्राची पहिली चाचणी झाली.
एका महिन्यानंतर 'फॅटमॅन' आणि 'लिटल बॉय' नावाचे अणुबॉम्ब जपानवर टाकण्यात आले. युद्धात वापरलेली ही दोनच अण्वस्त्र होती.
लुई स्लॉटन यांना कळून चुकलं होतं की, आता अण्वस्त्र प्रकल्पावर काम करणं आपल्यासाठी शक्य नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा आपल्या सामान्य आयुष्यात परतायचं होतं. या प्रकल्पात काम करत असताना काही महिने गेल्यावर ओपेनहायमरला हे समजलं.
आता लुई स्लॉटन यांच्या ऐवजी वैज्ञानिक एल्विन ग्रेव्हस काम करण्यासाठी येणार होते. स्लॉटन त्यांना संशोधन केंद्र दाखवत होते. दुपारी तीनच्या सुमारास ग्रेव्हस प्रयोगशाळेच्या इमारतींमधून बॉम्ब बनवणाऱ्या 'क्रिटिकल असेंब्ली'कडे निघाले.
प्लुटोनियम कोरची सुरक्षित पद्धतीने चाचणी करणं ही अण्वस्त्रांची चाचणी करण्याची एक पद्धत आहे. यात स्लॉटन तज्ञ व्यक्ती होते.
ग्रेव्हस यांनी स्लॉटनला म्हटलं की, अणुबॉम्बच्या असेंब्लीमध्ये चालू असलेल्या कामाचा मला अद्याप अंदाज नाही. यावर स्लॉटन यांनी त्यांना काम दाखवण्याचं मान्य केलं.

खोलीच्या दुसऱ्या बाजूला स्लॉटनचे सहकारी रीमर श्रेबर उभे होते. त्यांनी सावधपणे आणि शांतपणे काम करण्याचा सल्ला दिला.
श्रेबर यांनी नंतर सांगितलं की, "मी सहमत होती कारण मला स्लॉटनच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता."
स्लॉटन अगदी कार सुरू केल्याप्रमाणे प्लुटोनियम कोअर सुरू करायचे.
स्लॉटन यांनी आधारासाठी चिमूटभर चुंबक वापरले. नंतर वरचे झाकण कोअरमध्ये हलवले, ज्यामुळे त्यात न्यूट्रॉनचा प्रवाह सुरू झाला.
चूक कुठे झाली याबाबत परस्परविरोधी दावे करण्यात आले. जवळच्याच एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, यावेळी स्लॉटनने गडबड केली. तर इतरांच्या म्हणण्याप्रमाणे ते अगदी शांत होते.
श्रेबरने आपल्या अधिकृत अहवालात म्हटलं होतं की, "स्लॉटनने यावेळी खूप घाई केली, सावधगिरी बाळगली नाही. खोलीतील इतरांनी त्यांच्या कामात दखल न देता शांतपणे सहमती दर्शवली."
श्रेबरने पुढे लिहिलंय, अचानक आलेल्या आवाजामुळे मी मागे वळलो. मला निळा दिवा दिसला आणि त्याच वेळी उष्णतेची लाट जाणवली.
रिफ्लेक्टर पडल्याने पॅच घसरला होता. प्लुटोनियम कोअर नियंत्रणाबाहेर गेला होता.
श्रेबरने आपल्या अहवालात लिहिलंय, "अगदी क्षणात या गोष्टी घडल्या. स्लॉटनने ओव्हरहेड रिफ्लेक्टर उलटा केला आणि जमिनीवर ठेवला. पण एव्हाना खूप उशीर झाला होता. अपघातानंतर काही क्षणात खोलीत शांतता पसरली."
अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. शास्त्रज्ञ बाहेरच्या कंपाऊंडमध्ये जमले. अपघाताच्या वेळी कोण कुठे उभं होतं याचं एक चित्र स्लॉटनने तयार केलं. श्रेबर सर्वात लांब उभा असल्याने त्याने रेडिएशन डेटा घेण्यास सुरुवात केली.

अपघाताच्या अहवालात असं म्हटलंय की, रेडिएशनच्या संपर्कात आल्यानंतर माणसांना स्वतःवर ताबा ठेवणं कठीण होऊन बसतं. त्यांना चक्कर येते, त्यांचं स्वतःवरचं संतुलन गमावतं. ऊर्जेच्या शक्तिशाली कणांमुळे हे घडतं. कधीकधी यातून मृत्यू सुद्धा ओढवू शकतो.
नऊ दिवसांनंतर अवयव निकामी होऊन स्लॉटनचा मृत्यू झाला.
स्लॉटनच्या एका सहकाऱ्याने त्यावेळी माहिती देताना सांगितलं होतं की, हे सरळ सरळ रेडिएशनमुळे झालेल्या मृत्यूचं प्रकरण आहे.
स्लॉटन त्यांच्या कामात निष्काळजी होते का? की एखाद्या अशा गोष्टीमुळे अपघात झाला हे ओळखणं कठीण होतं?
1940 च्या दरम्यान डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोहर हे क्वांटम मेकॅनिक्स नावाच्या विज्ञानाच्या नवीन क्षेत्रात काम करत होते. विज्ञानातील वस्तुनिष्ठतेची तत्त्व प्रकट करणारं हे क्षेत्र आहे.
भौतिकशास्त्राच्या तत्त्वांना आव्हान देताना बोहरने असा युक्तिवाद केला की, क्वांटम (म्हणजेच, संबंधित किरणोत्सर्गातील ऊर्जेच प्रमाण) मोजणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते संबंधित कणांवर परिणाम करतं. यामुळे केवळ कणांचे गुणधर्मच बदलत नाहीत तर त्यांचं मोजमाप करणारी उपकरणं देखील बदलतात.
म्हणजेच क्वांटम मॅटर हे मोजमाप करणाऱ्या उपकरणांशी आणि त्यावर काम करणाऱ्या लोकांशी संबंधित असते.

बोहरने प्रयोगात जेव्हा 'बॉडीज'चा उल्लेख केला तेव्हा त्याचा अर्थ प्रयोगशाळा असा होता, त्याचा मनुष्याशी संबंध नव्हता. पण ज्यादिवशी स्लॉटन हे स्वतः असेंब्लीचा भाग बनले त्या दिवशी त्यांचे शरीर हीच एक प्रयोगशाळा होती. त्यामुळे ती क्वांटमच्या प्रभावापासून वाचू शकली नाही.
2018 मध्ये या अपघातावर संशोधन करण्यात आले होते. त्यावेळी असं आढळून आलं की, जर त्यांचा हात न्यूट्रॉन रिफ्लेक्टर नसता तर प्लुटोनियम कोअर इतका प्राणघातक ठरला नसता.
चिंतेची बाब म्हणजे, अशा पद्धतीने मृत्यू होणारे स्लॉटन एकमेव नव्हते. त्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या एका सहकाऱ्याचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता.
खरं तर, त्यांचे वरिष्ठ एन्रिको फर्मी यांनी स्लॉटन यांना प्रयोगशाळेत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला होता.
पण फर्मी हे एकमेव व्यक्ती नव्हते ज्यांनी या प्रकारच्या कामाशी संबंधित धोके गांभीर्याने घेतले. दुसऱ्या महायुद्धात लेफ्टनंट एडवर्ड वेल्डर लॉस एल्मॉस असेंब्ली टीमचा भाग होते. त्यांनी प्रयोगशाळेत आग, विद्युत शॉक आणि स्फोट आदी घटना पाहिल्या होत्या.
त्यांनी एकदा एका व्यक्तीला त्याच्या तोंडात उडणारे स्फोटक कण गिळताना पाहिलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, तिथे कोणत्याही प्रकारची सावधगिरी बाळगली जात नव्हती.

लॉस एल्मॉस सांगतात त्याप्रमाणे तिथे दोन गोष्टी घडत होत्या. एक म्हणजे कामाचे स्वरूप बरेच गंभीर होते. भौतिकशास्त्रज्ञ फिलिप मॉरिसन यांनी 1986 मध्ये त्या कामाचं वर्णन करताना म्हटलं होतं की, जर्मन सरकार मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र बनवण्याची क्षमता होती. त्यातून चिंता आणि भीती निर्माण झाली होती.
आणि दुसरं म्हणजे, प्रायोगिक परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी मानवी शरीराचा वापर होणं सामान्य होतं. या कामाचे परिणाम असे झाले की लोक वास्तवापासून दूर गेले. याला भौतिकशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी सिद्धांतकार कॅरेन ब्रॉड यांनी 'प्ले' किंवा 'अँटी-रिअॅलिझम' म्हटलंय.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात आजही अगदी लहानात लहान प्रकल्पांमध्येही विनाशकारी परिणाम होण्याची शक्यता असते.
2022 मध्ये, एका फार्मास्युटिकल कंपनीच्या संशोधकांनी त्यांचे सॉफ्टवेअर बायोकेमिकल अस्त्र तयार करू शकते का याची चाचणी केली. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने केवळ सहा तासांत 40,000 हून अधिक संयुगांची ओळख पटवली जे युद्धात वापरल्या जाणार्या रसायनांपेक्षा अधिक घातक होते.

नील्स बोहर यांच्या मते, अनुभवाच्या जोरावर आपण इतरांना सांगू शकतो की आपण काय केलं, आपण काय शिकलो.
या पार्श्वभूमीवर स्लॉटन यांचा हा अपघात तंत्रज्ञानाच्या जगतातील एक वाईट क्षण होता. ना याची नोंद ठेवण्यात आली ना त्याचे पुनरावलोकन करण्यात आले.
त्यांच्या अंत्यसंस्काराला हजारो लोक उपस्थित होते. त्यांच्या मूळ गावी एका उद्यानाला त्यांचं नाव देण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू कसा झाला किंवा काय घडलं याची काही फारशी चर्चा झाली नाही. एका संशोधकाच्या मते, अमेरिकन सरकारने स्लॉटनच्या मृत्यूबद्दल आजतागायत गुप्तता बाळगली आहे.
या अपघाताने श्रेबर फारसा प्रभावित झाला नाही. ज्या ठिकाणी स्लॉटनचा मृत्यू झाला त्या प्रयोगशाळेची त्याने पुनर्रचना केली आणि सुरक्षिततेच्या उपायांवर जोर दिला.
स्लॉटनच्या बाजूला उभ्या असलेल्या ग्रेव्हसवर देखील परिणाम झाला आणि त्यांना गंभीर आजार झाला. अधिकृत अहवालात मात्र त्याचा प्रभाव कमी दाखवण्यात आला.
त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. शिवाय त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी झाली.

किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यानंतर 38 महिन्यांनी हा आजार बरा झाल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. त्यांना मोठी जबाबदारी दिली होती आणि ते खूप मेहनत करत होते.
दुर्घटनेनंतर ग्रेव्हसवर डॉ. फ्लॉय ऍग्नेस ली यांनी उपचार केले. त्यांनी 2017 च्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'त्यांच्या पांढऱ्या रक्तपेशी इतक्या कमी झाल्या होत्या की ते अजून जिवंत कसे हे आमच्यासाठी कोडं होतं.'
अपघातानंतर त्यांचे केस परत वाढू लागले.
त्यानंतर ग्रेव्हस लॉस एलमॉस येथे मुख्य वैज्ञानिक अधिकारी बनले. शीतयुद्धाच्या काळात त्यांनी इतिहासातील सर्वात विध्वंसक शस्त्र चाचण्यांचे नेतृत्व केले.
किरणोत्सर्गाचा महासागरी जीवनावर कसा परिणाम होतो यासाठी त्यांनी प्रशांत महासागरातील संपूर्ण बेटांचा अभ्यास केला.
अमेरिकेचे माजी गृह सचिव स्टीवर्ट उडाल यांच्या मते, 1946 च्या स्फोटात कोणीच ग्रेव्हसवर टीका केली नाही. कोणीही त्यांच्या सुरक्षा धोरणांना आव्हान दिलं नाही कारण किरणोत्सर्गाची तीव्रता त्यांनी स्वतः अनुभवली होती.
स्लॉटनचा जीव घेणाऱ्या प्लुटोनियमला 'डेमन कोअर' असं टोपणनाव देण्यात आलं. मार्च 1965 मध्ये, मृत्यूच्या चार महिने आधी ग्रेव्हस यांनी एक भाषण दिलं होतं. यात त्यांनी अण्वस्त्रांच्या अस्तित्वाची तुलना 'माणूस खाणाऱ्या शार्क'शी केली होती.
ते म्हणाले होते, 'सर्व शार्कच्या अंतःप्रेरणा त्यांना मांसाचा तुकडा मिळवा असं सांगतात. इथे अनैतिकतेचा प्रश्नच येत नाही.'
त्यामुळे नैतिकतेचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा माणूस त्या परिस्थिती मध्ये असतो. मला वाटतं की, अणुबॉम्बचा वापर अनैतिक हेतूंसाठी केला जाऊ शकतो पण तो स्वतःमध्ये अनैतिक नाहीये.
ते म्हणाले की अणुबॉम्बमुळे महायुद्ध 'अकल्पनीय' बनलं. ज्यामुळे विरोधकांना एकमेकांशी वाटाघाटी करण्यास वेळ मिळतो. युद्धनीती मध्ये शस्त्र नेहमीच शांतता आणण्याचं काम करतात.
स्लॉटनच्या मृत्यूवर ग्रेव्हसने कधीही भाष्य केलं नाही. अधिकृत नोंदीनुसार ते यावर चर्चा करण्यास नेहमी नाखूष असायचे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








