नितीन गडकरी यांच्या पंतप्रधानपदाबाबतच्या वक्तव्यानं सुरू केली 'ही' चर्चा

फोटो स्रोत, ANI
नितीन गडकरी खरंच पंतप्रधान होऊ शकतात का? गडकरींनी नुकतंच विरोधी पक्षांनी त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचा सांगितलं आणि पुन्हा एकदा मोदींची जागा गडकरी घेणार का? या चर्चांना उधाण आलं.
नितीन गडकरी आणि मोदी-शाह यांच्यातील संबंधांची चर्चा सातत्यानं होत असते. गडकरी, पंतप्रधानपद आणि भाजपातील अंतर्गत संघर्ष याचा आढावा घेणारा हा लेख :
भाजपा नेते राव इंद्रजीत, अनिल विज आणि नितीन गडकरी.
या तीन नेत्यांची वक्तव्यं सध्या चर्चेत आहेत. राव इंद्रजीत आणि अनिल विज यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्री पदावर उघडपणे दावा केला आहे. हरियाणात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या वक्तव्यांकडे पाहिलं जातं आहे.
तर नितीन गडकरी यांनी दिलेल्या वक्तव्यंदेखील त्याच स्वरुपाचं असल्याचं विरोधी पक्षातील काही नेत्यांना वाटतं आहे.
मागील आठवड्यात केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गौप्यस्फोट करत म्हटलं होतं की "मला विरोधी पक्षातील एका नेत्यानं सांगितलं की जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध नसलेला नेता अशीच नितीन गडकरी यांची भाजपामधील प्रतिमा आहे.
नितीन गडकरी यांच्या काही वक्तव्यांमुळे देखील नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी त्यांचे संबंध सलोख्याचे नाहीत, अंतर्गत स्पर्धा किंवा वाद असल्याच्या तर्काला बळ मिळालं.
त्यामुळेच त्यांच्या या विधानांकडे जाणकारांनी एक राजकीय संकेत म्हणूनच पाहिलं.
गडकरी यांचं ताजं वक्तव्यं देखील याच शृंखलेचा भाग आहे.
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
14 सप्टेंबर 2024 ला नागपूर येथील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात भाषण करताना गडकरी म्हणाले, "मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही. मात्र एकदा विरोधी पक्षातील एका नेत्यानं मला सांगितलं होतं की जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ."
गडकरी पुढे म्हणाले, "मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का देणार आणि मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधानपद हे काही माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी संघटना आणि माझ्या विचारधारेशी प्रामाणिक आहे. कोणत्याही पदासाठी मी माझ्या मूल्यांशी तडजोड करणार नाही. माझ्यासाठी माझी मूल्ये सर्वोच्च आहेत."
गडकरी सांगतात की कधी कधी मला वाटतं की मूल्यांसाठीचा निर्धार हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गडकरी यांची प्रतिमा मवाळ राजकारण्याची आहे. तसंच ते सर्वसमावेशक राजकारण करतात आणि त्यांचे विरोधी पक्षांशी देखील चांगले संबंध आहेत असं मानलं जातं.
अलीकडेच इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या 'आयडिया एक्सचेंज' या कार्यक्रमात नितीन गडकरी यांना याच संदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
गडकरींना विचारण्यात आलं की "विरोधी पक्षाला शत्रू किंवा देशविरोधी न मानणाऱ्या भाजपाच्या काही मोजक्या नेत्यांपैकी तुम्ही एक आहात. यासंदर्भात विचार करता, मजबूत विरोधी पक्ष असणं राजकारणासाठी योग्य आहे की भाजपाला लोकसभेत स्वबळावर बहुमत होतं ते योग्य आहे?"
त्यावर गडकरींनी उत्तर दिलं होतं, "आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत. पंतप्रधान मोदी म्हणतात की आपण 'मदर ऑफ डेमोक्रसी' आहोत. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघेही असतात. कार किंवा ट्रेनला दोन्ही बाजूला असणाऱ्या चाकांप्रमाणेच हे दोघेही लोकशाहीसाठी महत्त्वाचे असतात."
"लोकशाहीत समतोल आवश्यक असतो. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही विरोधी पक्षात होतो आणि आता सरकारमध्येही आहोत. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, हीच आमची भावना असली पाहिजे."
गडकरी यांच्या वक्तव्यावर आलेल्या प्रतिक्रिया
नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदासारख्या महत्त्वाच्या पदाबाबत आणि तेही विरोधी पक्षांच्या संदर्भात वक्तव्यं दिल्यानंतर साहजिकच विरोधी पक्षाचे नेते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर लिहिलं, "नितीन गडकरी सत्तेच्या सर्वोच्च पदासाठी त्यांची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यासाठी ते विरोधी पक्षांच्या बहाण्यानं नरेंद्र मोदींना संदेश देत आहेत."
"देशाचं नेतृत्व करू शकतील असे अनेक सक्षम नेते इंडिया आघाडीमध्ये आहेत. आम्हाला भाजपाकडून नेता उधार घेण्याची आवश्यकता नाही. चांगला डाव मांडलात...नितीन जी."
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, आरजेडीचे नेते मनोज कुमार झा म्हणाले, "भाजपामध्ये पंतप्रधानपदासाठी संघर्ष सुरू झाला आहे. आगामी काळात या संघर्षाचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
"निवडणूक निकालानंतर यावेळेस भाजपानं नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड केली होती का? टाइमलाइन तपासा. मोदींची निवड एनडीए आघाडीनं केली होती."
खरंतर 2024 च्या लोकसभा निकालांनंतर भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठकच झाली नव्हती. त्याऐवजी एनडीएची बैठक झाली होती आणि त्यात नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदासाठीचा नेता म्हणून निवड झाली होती.
भाजपाच्या वेबसाईटवर देखील 2024 च्या निकालानंतर भाजपाच्या संसदीय पक्षाच्या नाही तर एनडीएच्या बैठकीचं प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं होतं.
तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 303 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 24 मे ला भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली होती. त्यावेळेस एनडीएची बैठक झाली नव्हती.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सात जूनला नीतीश कुमार यांनी मोदी हेच संसदीय पक्षाचे नेते असल्याचं म्हटलं होतं.
चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांच्या भरवशावर सरकार
भाजपाचे लोकसभेत 240 खासदार निवडून आले आहेत. साहजिकच भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळालेलं नाही.
त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला जेडीयू आणि टीडीपी यांच्या पाठिंब्याची गरज होती.
एनडीएतील या घटक पक्षांचा पाठिंबा घेत नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापन करण्यात यश आलं आणि ते पुन्हा एकदा पंतप्रधान देखील झाले.
कुमार केतकर राज्यसभेचे माजी खासदार, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांची जागा नितीन गडकरी घेऊ शकतात का?
त्यावर केतकर यांनी उत्तर दिलं की, "जर नरेंद्र मोदी अविश्वास ठराव हारले तर दुसऱ्या उमेदवाराची मागणी समोर येईल. अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांचं नाव पुढे येऊ शकतं. पत्रकार असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की, पंतप्रधानपदासाठी गडकरी यांचं नाव पुढे करण्याबाबत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांमध्येही वातावरण तयार होऊ लागलं होतं.
"नरेंद्र मोदी यांची जागा इतर कोणी घेऊ शकतं का? असं घडण्यासाठी मोदी सरकारसमोर एखादं संकट येण्याची आणि सरकार अविश्वास ठराव हारण्याची आवश्यकता आहे."

फोटो स्रोत, Getty Images
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार सत्तेत आल्यानंतर सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांसाठी खास आर्थिक पॅकेजची तरतूद करण्यात आली.
या दोन राज्यांसाठी विविध योजना जाहीर करताना त्यांना अर्थसंकल्पात झुकतं माप दिलं गेलं.
जाणकारांनी या केंद्रीय अर्थसंकल्पाचं वर्णन सरकारमधील मित्र पक्षांना खूष करणारा आणि सरकार वाचवणारा अर्थसंकल्प असं केलं होतं.
नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांबद्दल कुमार केतकर म्हणाले, " प्रत्यक्षात नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू नरेंद्र मोदींवर जास्त अवलंबून आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्यावर तितके अवलंबून नाहीत."
"या दोन्ही नेत्यांपैकी कोणी एकानं जरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला तरी देखील नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर राहतील."
"मोदींना हे माहित आहे की नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीसोबत जाऊन फार काही मिळणार नाही. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांचं सरकारच सत्तेत राहील."
कोणतंही राजकीय संकट आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीचा पर्याय म्हणून गडकरी यांच्या नावाबद्दल बोलताना केतकर म्हणाले, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांमध्येही गडकरी यांना पसंती आहे.
गडकरी यांचं वक्तव्यं आणि वेगवेगळे अंदाज
नितीन गडकरी यांनी याप्रकारचं वक्तव्यं देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भाजपाच्या अंतर्गत आणि देशाच्या राजकारणात चर्चा होईल अशी वक्तव्ये त्यांनी आधी देखील दिली आहेत.
जानेवारी 2019 मध्ये मुंबईत गडकरी म्हणाले होते की, "स्वप्नं दाखवणारे नेते लोकांना आवडतात. मात्र जे नेते ही दाखवलेली स्वप्नं पूर्ण करत नाहीत, जनता अशा नेत्यांना धडा शिकवते."
"त्यामुळे पूर्ण होऊ शकतील अशीच स्वप्नं लोकांना दाखवा. लोकांना स्वप्नं दाखवणाऱ्या नैत्यांपैकी मी नाही. मी जे बोलतो, ते 100 टक्के पूर्ण करून दाखवतो."
भाजपा नेहमीच इंदिरा गांधींवर टीका करत असते. तर 2019 मध्ये गडकरी यांनी इंदिरा गांधी यांचं कौतुक केलं होतं.
मे 2019 मध्ये गडकरी म्हणाले होते, "भाजपा एक विचारधारा असलेला पक्ष आहे. भाजपाची बांधिलकी त्यांच्या विचारांशी आहे. भाजपा फक्त अटल-आडवाणी यांचाही पक्ष नव्हता आणि आता मोदी-शाह यांचाही नाही."
2019 मध्ये लोकसभेत अधिवेशनाच्या काळात नितीन गडकरी म्हणाले होते, "मी चांगलं काम केलं आहे, असं कौतुक सर्वच पक्षांचे खासदार करतात ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Getty Images
गडकरी यांच्या वक्तव्यावर सोनिया गांधी यांनी देखील डेस्क वाजवला होता आणि सहमती दाखवली होती. (संसदेत खासदार जेव्हा गोष्टीला पाठिंबा द्यायचा असेल किंवा एखाद मुद्दा खासदारांना आवडला असेल तेव्हा त्यांच्यासमोरील डेस्क वाजवतात.)
2018 मध्ये सोनिया गांधी यांनी गडकरी यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात रायबरेलीमध्ये गडकरी यांच्या मंत्रालयानं केलेल्या कामाचं कौतुक केलं होतं.
मार्च 2022 मध्ये गडकरी म्हणाले होते, "लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका देखील खूपच महत्त्वाची होती. मला मनापासून वाटतं की काँग्रेस पक्ष भक्कम असला पाहिजे."
"आज जे लोक काँग्रेसमध्ये आहेत, त्यांनी पक्षाबद्दल निष्ठा दाखवत पक्षातच राहिलं पाहिजे. पराभवामुळे निराश न होता त्यांनी काम करत राहिलं पाहिजे."
जुलै 2022 मध्ये नितीन गडकरी म्हणाले होते, "अनेकदा राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा होते. कारण असं वाटतं की राजकारणाव्यतिरिक्त देखील आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे."


जुलै 2022 मध्ये गडकरी म्हणाले होते की राजकीय पक्षांना वर्गणी देणाऱ्यांना वाटतं की ते जी मागणी करतील ती मान्य केली जाईल.
गडकरी करत असलेल्या वक्तव्यांचा परिणाम भाजपामध्ये होणारच होता. त्यामुळेच अशाच काही विधानानंतर तीन आठवड्यांनी गडकरी यांना भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवण्यात आलं होतं.
त्याचबरोबर भाजपानं गडकरी यांना पक्षाच्या केंद्रीय निवड समितीमधून सुद्धा बाजूला सारण्यात आलं होतं. त्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचा त्या समितीत समावेश करण्यात आला होता.
2024 च्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे म्हणाले होते, "जर नितीन गडकरी यांना असं वाटत असेल की भाजपात त्यांचा 'अपमान' होतो आहे, तर त्यांनी आमच्यासोबत यावं. 2024 च्या निवडणुकीत ते जिंकून येतील याची काळजी आम्ही घेऊ."
यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले होते की, "उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांची काळजी करण्याची आवश्यकता नाही."
गडकरी जेव्हा भाजपाचे अध्यक्ष झाले होते
नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आवडत्या नेत्यांपैकी एक असल्याचं मानलं जातं. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या गडकरींशी असलेल्या संबंधाबाबत बरीच चर्चा होत असते, त्यावर अनेक गोष्टी बोलल्या जातात.
वरिष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी बीबीसीला सांगितलं होतं, "जेव्हा नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष होते तेव्हा अमित शाह यांना न्यायालयाच्या आदेशामुळे गुजरात सोडावं लागलं होतं. भाजपाचे अध्यक्ष असलेल्या गडकरींची भेट घेण्यासाठी शाह यांना तासनतास वाट पाहावी लागायची.
"या पार्श्वभूमीवर मोदी आणि शाह यांच्या हाती भाजपाची सूत्रं आल्यावर आणि त्यांनी केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर हळूहळू गडकरी यांचं पक्षातील महत्त्व कमी करण्यात येऊ लागलं. त्यांचे पंख छाटण्यात सुरूवात झाली होती."
2013 नंतर देखील नितीन गडकरी हेच भाजपाचे अध्यक्ष राहावेत यासाठी प्रयत्न केले गेले होते. त्यासाठी पक्षाच्या घटनेत सुधारणा देखील करण्यात आली होती.
मात्र, त्याच काळात नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महत्त्वाचं म्हणजे गडकरी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा एकदम बंद झाली होती.
गडकरीनंतर राजनाथ सिंह यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
राजनाथ सिंह भाजपाचे अध्यक्ष असतानाच नरेंद्र मोदी यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यात आलं होतं.
प्रदीप सिंह यांना वाटतं की, जर पक्षाचं अध्यक्षपद नितीन गडकरी यांच्याकडेच राहिलं असतं तर बहुधा भाजपाकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव समोर आलं नसतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











