भाजपाध्यक्ष झाल्यावर फक्त ‘या’ दोघांच्या वाकून पाया पडलो होतो – गडकरी

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) भाजपाध्यक्ष झाल्यावर ‘या’ फक्त दोघांच्या पाया पडलो होतो – गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंचं चांगलं सहकार्य लाभलं. गोपीनाथ मुंडे हे माझे नेते होते.”

“भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर इंदूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. त्यावेळी आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केलेला. त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते,” असं नितीन गडकरी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं, नितीन तू खाली वाकून मला नमस्कार कशाला करतोय? अरे तू आता अध्यक्ष झाला. मी त्यांना तेव्हा सांगितलं, मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली. तुम्ही आणि मी कुठेही गेलो तरी तुम्हीच माझे नेतेच आहात.”

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा काल (18 मार्च) पार पडला. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

“गोपीनाथ मुंडे आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले त्यावेळी मी नागपूर युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. त्यांच्या स्वागताकरता आणि सत्काराकरता कार्यक्रम करण्याचा संयोजक होतो. त्यामुळे राजकारणात ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कुणी होतं तर गोपीनाथ मुंडे होते, याचा मला अभिमान आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

2) कुणाला दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते – सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या एका व्हीडिओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भारतातील मुलींवर, त्यांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर सोनालीनं भाष्य केलं होतं. या भाष्याचं कुणी समर्थन करतंय, तर कुणी विरोध करतंय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

सोशल मीडियावरून टीका करणाऱ्यांना उद्देशून सोनालीनं एक पत्रक ट्विटरवर शेअर केलंय. यात सोनालीनं म्हटलंय की, “माझा हेतू कुणाला दुखावण्याचा नव्हता, नकळतपणे दुखावला गेला असलात तर दिलगिरी व्यक्त करते.”

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

जो व्हीडिओ व्हायरल होतोय, त्यात सोनाली म्हणतेय की, “भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेन.”

याबाबतीत सोनालीने तिच्या एका मैत्रिणीची किस्सा सांगितला. सोनाली म्हणाली, “तिला 50 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेला मुलगा नकोच, त्याच्याकडे कारही हवी. आणि तो सासू-सासऱ्यांशिवाय एकटा राहात असेल तर उत्तम, अशा तिच्या अपेक्षा होत्या. मी मैत्रिणीला विचारलं की तू काय मॉलमध्ये आली आहेस का? तुला मुलगा हवाय की ऑफर हवी आहे. हे खरंच खूप अपमानास्पद आहे.”

सोनालीच्या वक्तव्याचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होतोय. काहीजण हे बोलल्याबद्दल कौतुक करतायेत, तर काहीजण टीकाही करतायेत.

3) उद्धव ठाकरे खेडमध्ये अफजल खानासारखे आले होते – रामदास कदम

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर टीका केली होती.

उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आता शिंदे गटानं खेडमधील त्याच मैदानात एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित केलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

या सभेपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

रामदास कदम

फोटो स्रोत, Getty Images

रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात कधीच बाहेर पडले नाहीत. तेव्हा बळीराजा कुठे गेला होता. तेव्हा त्यांचं शहाणपण कुठे गेलेलं? आता उद्धव इथे सभा घ्यायला अफजल खानासारखे अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व लोकांना घेऊन आले. आता त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सभा घेतोय. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी बळीराजासाठी एकही निर्णय घेतला नाही.”

तसंच, “ही सभा (खेड) आम्ही आयोजित केली आहे, कारण उद्धव ठाकरे म्हणाले होते की, कोकण त्यांच्यासोबत आहे. कोकण त्यांच्यासोबत नाही, कोकण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, हे सांगण्यासाठी, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. ही एक ऐतिहासिक सभा होईल,” असं रामदास कदम म्हणाले.

4) फक्त 48 जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? – शिरसाट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप-शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळतंय.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून, आमदार संजय शिरसाटांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे.

संजय शिरसाट

फोटो स्रोत, Twitter

“फक्त 48 जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का?” असा प्रश्न शिरसाटांनी बावनकुळेंना विचारलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

संजय शिरसाट म्हणाले, “बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार? अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.”

“आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त 48 जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करु द्यावा. बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला आहे? अशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत असते. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात असे विधान केले आहे. त्यांना वाटत आहे की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा यायला पाहिजे. पण आपल्या अशा वक्तव्यामुळे सहकारी पक्षाला त्रास होतो. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच बोलले पाहिजे,” असंही शिरसाट म्हणाले.

5) काही निवृत्त न्यायाधीश ‘देशविरोधी टोळी’तील – किरेन रिजिजू

देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत, असा गंभीर आरोप विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केला.

“कार्यकर्ते झालेले हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरोधात उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल,” असा इशाराही रिजिजू यांनी दिला. द वायरनं ही बातमी दिलीय.

तसेच, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही त्यांनी विरोध दर्शवला.

“कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांच्यासाठी राज्यघटनेने लक्ष्मणरेषा आखून दिली आहे आणि जर न्यायमूर्ती प्रशासकीय नियुक्त्या करण्यात सहभागी झाले तर न्यायालयाचे कामकाज कोण करेल,” असा प्रश्न रिजिजू यांनी उपस्थित केला.

हे वाचलंत का?