'अक्का-बापूच्या हातातला कोयता सोडवण्यासाठी MPSC ची तयारी केली आणि अधिकारी झालो'

फोटो स्रोत, santosh khade
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नुकत्याच जाहीर केलेल्या MPSC परीक्षेच्या निकालात संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या, तर एनटीडी संवर्गातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालाय.
संतोष मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाटचे रहिवासी आहे.
त्याचे आई-वडील गेल्या 30 वर्षांपासून ऊसतोडीला जात होते. यंदा मात्र त्यांच्या हातातील कोयता थांबला आहे.
आता पंचक्रोशीत या दोघांनाही क्लास वन अधिकाऱ्याचे आई-वडील म्हणून ओळखलं जातं.
पण, संतोषसाठी मात्र ते त्याचे अक्का आणि बापूच आहेत. ज्यांनी मोठ्या हिंमतीनं संतोषला शिकवलं आणि क्लास वन अधिकारी केलं.
बालपण ते कॉलेज
संतोषचं बालपण गावातल्याच खाडे वस्तीवर गेलं. आई-वडील ऊसतोडीला गेल्यानंतर संतोष यांची आजी त्यांचा आणि भावंडांचा सांभाळ करायची.
संतोष सांगतो, “माझे आई-वडील ज्यावेळेस कारखान्यावरती जायचे, त्यावेळेस आम्ही सगळे भावंडं इथं आजीपाशी असायचो. इथं असल्यामुळे छोटेखानी शेतातले जे काही कामं आहे, जसं की खुरपणी, काढणी, शेताला पाणी देणं, एक छोटी विहीर होती. त्यातून एक पाणी बसायचं. अशी छोटी कामं आम्ही भावंडं मिळून करायचो. आई-वडील कधीमधी येऊन आम्हाला भेटून जायचे.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
संतोषचे वडील अपंग आहेत. त्यांना एका पायानं व्यवस्थित चालता येत नाही. अशास्थितीत ऊसतोडीला गेल्यानंतर संतोषची आई सरूबाई खाडे याच ऊसाची मोळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असे. गेल्या 30 वर्षांच्या या अंगमेहनतीमुळे त्यांची कमर आणि मानेचा दोन्ही मणके वाकडे झालेत.
“संतोषच्या शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी. झुंबर आणि कानतली फुलं दिली. त्यानं मला म्हटलं की, अक्का मला शाळाच शिकायची नाही. म्हटलं, का रं बाळा? तर तो म्हटला, तू अंगावरली डाग मोडायलीस. अरं म्हटलं, तू हायेस तर डाग आहे. मला बाकी काही नको,” हे सांगताना सरुबाईंचे डोळो पाणावतात.
घरची आणि शेतातली कामं करत संतोषनं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्याचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं. पुढे भगवान महाराज विद्यालय येथून त्यानं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण बलभीम महाविद्यालय बीडमधून इतिहास या विषयातून पूर्ण केलं.
संतोषनं पदवीचा अभ्यास चालू असताना त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा ठरवलं. शिवाय केवळ अभ्यासाच्या जोरावर इथं अधिकारी होता येतं आणि या माध्यमातून आई-वडिलांच्या हातातील कोयता खाली टाकता येईल, हा त्यामागचा उद्देश.
संतोष सांगतो, “2017 पासून पदवी प्लस त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे दोन्हीही चालू ठेवलं. 2019 ला माझी पदवी पूर्ण झाली. त्यानंतर मग मी फुल टाईम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला.”
पहिला प्रयत्न
राज्यसेवा 2020 पूर्वपरीक्षा ही संतोषची पहिली परीक्षा होती. पहिला अटेम्प्ट होता. ती त्यानं 2021ला दिली. मुख्यपरीक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली.
एप्रिल 2022ला त्याची मुलाखत झाली आणि 28 एप्रिल 2022ला त्यावेळी आलेल्या निकालात त्याला 0.75 कमी मार्क मिळाले आणि यशानं त्याला हुलकावणी दिली.
संतोष सांगतो, “28 एप्रिलच्या रात्री निकाल आला तेव्हा पूर्ण अंधार पसरल्यासारखं झालं समोर. एक जोराचा झटका बसला, कारण आपल्याला पोस्ट भेटणार होती आणि होत्याचं नव्हतं झालं. मुलाखतीला मला फक्त 45 मार्क आलेले होते. लहानपणापासून वक्तृत्वाची आवड होती, स्टेजची आवड होती. पण, मुलाखतीला कमी मार्क्स आले हे न पचणारं होतं.”

फोटो स्रोत, santosh khade
निकाल आल्यानंतर आता मात्र आई-वडिलांच्या हातातील कोयता तसाच राहणार या विचारानं संतोषला चिंतेत टाकलं. मग मोठ्या धाडसानं त्यानं वडिलांना कॉल केला आणि त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकलं.
संतोष सांगतो, “मी बापूंना कॉल केला आणि निकाल सांगितला. तर ते मला प्रेमाने 'भावड्या' म्हणतात. ते म्हणाले, भावड्या, आम्ही आतापर्यंत 30 वर्षं ऊस तोडलाय. आम्ही तुझ्यासाठी अजून 5 वर्षं ऊस तोडू. पण तुला मागं हटायचं नाहीये.”
तुझ्या वडिलांचं शिक्षण किती झालंय, असं विचारल्यावर संतोष सांगतो, “मी एकदा वडिलांना गंमतीनं विचारलं होतं की तुमचं शिक्षण किती झालंय. तर ते म्हटले दुपारपर्यंत झालंय. म्हणजे ते सकाळी गेले आणि दुपारी माघारी आले, एवढंच त्यांचं शिक्षण.”
मित्रासोबतचा करार
मधल्या काळात संतोष परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला गेला. तिथं त्याला दीपक पोळ नावाचा मित्र भेटला. या दोघांनी मग अभ्यासासाठी एक करार करून घेतला.
संतोष सांगतो, “दीपक आणि मी एक अॅग्रीमेंट बनवलं दोघांचं, की आपण दोघांनी टाईमपास करायचा नाही. आपण दोघांनी मोबाईल वापरायचा नाही. मी सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 1 वाजेपर्यंत मोबाईल रूममध्ये ठेवायचो आणि मी अभ्यासिकेमध्ये असायचो. मोबाईल पूर्णत: बंद असायचा.
“अभ्यासिकेत गेल्यावर एक अॅग्रीमेंटच बनवलं की, एक तासापेक्षा जास्त वेळ आपल्यापैकी कुणी अभ्यासिकेत नसेल तर 1 हजार रुपये दंड लावायचा. कुणाच्या बर्थडेला गेलो तर 500 रुपये दंड लावायचा. स्वत:चा बर्थडे साजरा केला तर 5000 रुपये दंड लावायचा. असे छोटेछोटे बंधनं आम्ही स्वत: वर घालून घेतले.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
अशी केली सुधारणा...
28 एप्रिलला ज्यावेळेस निकाल आला आणि संतोषची पोस्ट 0.75 ने हुकली, त्याच्या पुढच्या 6 दिवसांमध्येच संतोषची राज्यसेवेची मुख्य परीक्षा 2021 होती.
7,8,9 मे रोजी संतोषनं मुख्य परीक्षा झाली. यावेळी त्यानं पहिल्या प्रयत्नात त्याच्याकडून ज्या काही चुका झाल्या होत्या, त्या टाळल्या.
या चुकांविषयी विचारल्यावर संतोष आधी पूर्वपरीक्षेबद्दल सांगतो, “एवढे पुस्तके आहेत मार्केटमध्ये की आपण हे सगळे पुस्तके वाचू शकत नाही. मग मी ठरवलं की एका ठरावीक विषयाला ठरावीक एक किंवा जास्तीत जास्त दोनच पुस्तक वापरायचे.
“त्यात एक पुस्तक ज्ञानी किंवा अभ्यासू लोकांचं वापरायचं आणि एक पुस्तक शिक्षकांचं वापरायचं. कारण अभ्यासकांनी डीपमध्ये मांडणी केलेली असते आणि शिक्षक लोकांनी आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं मांडणी केलेली असते. तर ती एक गोष्ट मी सुधारून घेतली.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
“दुसरी गोष्ट म्हणजे राज्यसेवेची तयारी करताना आपला MCQ प्रश्नांचा अभ्यास खूप असला पाहिजे. त्यासाठी आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका मी 2011 पासून 2022 पर्यंतच्या आयोगाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी झेरॉक्स मारुन आणल्या. त्या इतक्या वेळेस सोडवल्या की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझं तोंडपाठ असलं पाहिजे असा मी निश्चय केला होता. मी रोज 400 ते 500 प्रश्न सोडवायचो,” संतोष पुढे सांगतो.
यापद्धतीच्या तयारीमुळे काळे गोल करताना चुकत नाही, आपलं लॉजिक डेव्हलप होतं. नेमकं आयोगाला काय म्हणायचं हे डेव्हलप होतं. परीक्षेला बसण्याची जी तास तासाची कॅपॅसिटी आहे, ती डेव्हलप होते, असं संतोष सांगतो.
मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी
मुख्य परीक्षेची तयारी कशी केली, याविषयी तो सांगतो, “मुख्य परीक्षेला अभ्यासक्रम व्हास्ट असल्यामुळे आपण सगळा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही. आपण तेच तेच परत इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमीवर जास्त फोकस करतो. आणि आपण दुर्दैवानं कृषी, विज्ञआन-तंत्रज्ञान, कायद्यासारख्या विषय अशा अभ्यासक्रमाकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. मुख्य परीक्षेला जे नवीन पॉईंट आहेत, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मी त्याच्यावर जास्त फोकस केला.”
7,8,9 मे रोजी राज्यसेवा 2021 ची मुख्य परीक्षा झाली. 26 ऑगस्ट 2022 ला निकाल आला. 4 जानेवारी 2023 ला संतोषनं मुलाखत दिली. 28 फेब्रुवारी 2023 ला आयोगानं गुणवत्ता यादी प्रकाशित केली. यात संतोष सर्वसाधारण गटातून राज्यात 16 वा आणि एनटीडी प्रवर्गातून पहिला आहे.
पहिल्या प्रयत्नात मुलाखतीत त्याला 44 गुण मिळाले होते. दुसऱ्या प्रयत्नात 58 मिळाले.

फोटो स्रोत, santosh khade
मुलाखतीच्या तयारीत कशी सुधारणा केली, याविषयी तो सांगतो, “पहिल्या प्रयत्नात मी मुलाखतीला प्रेशर खूप घेतलं होतं. समाजात पॅनेलबाबतचे जे पूर्वग्रह आहेत, ते मी लक्षात घेतले होते. मुलाखतीच्या वेळेस भीती नाही बाळगली पाहिजे.
“आपण काय करतो घाबरतो. आपल्याला वाटतं एवढे मोठे लोक बसलेत आपल्यासमोर तर आपण त्यांना घाबरतो. 2020 ला मुलाखत देताना मीही घाबरलो होतो. उत्तर देत नव्हतो, सॉरी सर म्हणायचो. तर तसं करू नका, जे येतंय ते त्यांना मोकळेपणाने सांगा.”
जे आपण आहोत, तेच पॅनेलला दाखवलं पाहिजे. आपण खोटं नाही बोललं पाहिजे, असंही संतोष सांगतो.
संतोषनं त्याच्या आई-वडिलांचा कोयता बंद केलाय, पण पोस्ट भेटल्यानंतर जेवढे कोयते बंद करता येईल, तेवढे बंद करण्याचा त्यानं निश्चय केलाय. त्याला ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








