नितीन गडकरी असं का म्हणाले? 'पक्षांतर करणारे उंदरांसारखे'

फोटो स्रोत, Twitter
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा रविवारी (1 सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोलापूरमध्ये त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या तीन मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. नेहमीप्रमाणे यावेळी जोरदार भाषणं झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशाप्रकारे संपवण्यात येईल, याबाबत सांगूनही झालं.
पण याचवेळी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी हे 'लोकमत'ने आयोजित केलेल्या 'पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ' या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात राजकीय क्षमता असणाऱ्या विदर्भातील तरूणांना गडकरी यांनी मार्गदर्शन केलं.
गडकरी म्हणाले, "आजच्या राजकीय नेत्यांना राजकारणाचा खरा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणाचा अर्थ सत्ताकारण असाच गृहीत धरण्यात येतो आणि लोक सत्तेच्या मागे धावतात. ज्याप्रमाणे जहाज बुडताना सर्वांत आधी उंदीर बाहेर पडतात. त्याचप्रमाणे सत्ता बदलली की अनेकजण पक्ष बदलतात. परंतु ही गोष्ट योग्य नाही. असे लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत, अशा शब्दांत गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली."
वैचारिक भूमिकेवर ठाम राहावं
गडकरी पुढे म्हणतात, "स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी सत्ताकारण नव्हे तर समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण केलं. आज याच गोष्टीची आवश्यकता आहे. परंतु राजकीय नेते सत्तेच्याच मागे धावतात. आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहून राजकारण्यांकडून संयम ठेवला गेला पाहिजे."

फोटो स्रोत, Twitter
"राजकारणात असताना विचारभिन्नता असणे स्वाभाविक आहे. पण आजच्या राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांना कधीच कुणासमोर झुकण्याची आवश्यकता नाही. इतिहास हा लोडावर टेकून अत्तराचा सुगंध घेत लिहिला जात नाही, तर तो परिश्रमाच्या घामाच्या धारांनी लिहिला जातो. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल, तर शॉर्टकट मारण्याच्या फंदात पडू नका. चौकटीबाहेर जाऊन विचार करायला हवा. पोस्टर्स, बॅनर्स लावून लोक कधीच निवडून येत नाहीत," असंही गडकरी म्हणाले.
गडकरींच्या या वक्तव्यांतर माध्यमांनी त्यांचं उंदरांबाबतच्या वक्तव्यांचे राजकीय अर्थ काढायला सुरू केलं. पक्षात होत असलेल्या मेगाभरतीबाबत गडकरी नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली.
यापूर्वीही अनेकवेळा गडकरींनी अशी थेट विधानं केली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीन गडकरींच्या अशा वक्तव्यांमुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून त्यांना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र विशेषतः रंगवण्यात आलं होतं. पण मोदींच्या विजयानंतर याबाबत चर्चा थांबली होती. आता पुन्हा नितीन गडकरी यांनी अशा प्रकारचं सूचक वक्तव्य केलं आहे.
सत्ता येणार माहीत असताना इतरांना प्रवेश का?
ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात, "नितीन गडकरी यांचं विधान खूप बोलकं आहे. मोदी-शहा-फडणवीस यांच्यासारखी त्यांची भाषा नसून ते वेगळी भूमिका मांडत आहेत. हीच भूमिका अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे."
"मोदी-शहांकडे इतकं मोठं पाठबळ असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती वाईट आहे, हे माहीत असतानाही त्यांच्या नेत्यांना प्रवेश देणं म्हणजे तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी काय करावं. तुम्ही लोकांची कामं केली असतील आणि सत्तेत येणार हे तुम्हाला माहीत असेल तर इतरांना घेण्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यास काय हरकत आहे," हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे," केसरी सांगतात.

केसरी पुढे सांगतात, "मोदी-शहा नेहमी घराणेशाहीबाबत बोलत असतात. मक्तेदारी बदलण्याची भाषा केली होती. पण अशाच घराण्यातील नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. एकेकाळी गांधी टोपी घालणारे आज भगवी वस्त्र घालताना दिसत आहेत, हे सध्याचं महाराष्ट्राचं चित्र आहे."
"विरोधक नसलाच पाहिजे, किंवा असला तरी गलितगात्र असला पाहिजे असं धोरण लोकशाही मूल्यात नाही. महाराष्ट्रात इतर अनेक प्रश्न आहेत, त्यांच्याबाबत बोलताना कुणी दिसत नाहीत. कलम 370, मोदीजी याबाबतच बोलायचं आणि विरोधकांना तुच्छ लेखायचं, असे प्रकार सुरू आहेत. महाराष्ट्रातील सुजाण नागरिक या सगळ्या गोष्टी पाहत असतात. मोदी-शहा हे राजकारणी आहेत तसेच गडकरीही राजकारणी आहेत. लोकांच्या मनात काय चाललं आहे, याचा त्यांना अंदाज आहे. त्यामुळेच गडकरी असं म्हणाले असण्याची शक्यता आहे."
केसरी सांगतात, "सध्या सत्ता हीच विचारधारा अशी परिस्थिती सर्वच राजकीय पक्षात निर्माण झाली आहे. गडकरींनी विचारधारेबाबत सांगताना नेमकं हेच पक्षाला दर्शवण्याचा प्रयत्न केला असेल."
भाजपमधील वास्तव
नितीन गडकरींनी केलेलं वक्तव्य म्हणजे आजचं वास्तव असल्याचं राजकीय अभ्यासक आणि मुंबई लोकमतचे वरीष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणाले. ते सांगतात, "आज जे पक्षांतर करत आहेत, त्यांचा काही ना काही हेतू आहे. त्यामुळे ते सत्ताधारी पक्षात दाखल होत आहेत. गडकरी हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे हे लोक भाजपशी किती बांधील राहतील, असा त्यांच्या बोलण्याचा रोख असू शकतो. या प्रवेशामुळे निष्ठावंत नाराज आहेत का हे पक्षानं तपासून पाहणं गरजेचं आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्याचप्रमाणे कलम 370 कलम रद्द केल्यानंतर त्यांना प्रचंड जनाधार मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षात राहून पराभूत होण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय अनेक नेत्यांनी घेतला आहे. या सगळ्यांना प्रवेश देण्यावरून पक्षावर नाराज असण्यापेक्षाही ते पक्षाला अशा पक्षांतरातील धोका लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असतील, असं संदीप प्रधान सांगतात.
"गडकरी कोणत्याही भाषणांमध्ये हलकीफुलकी विधानं करत असतात. पण त्याचा अर्थ माध्यमं वेगळा लावतात, असं अनेकवेळा घडलं आहे. गडकरींनी केलेलं हे विधान विनोदनिर्मितीसाठीही असू शकतं," असं नागपूरमधील लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर सांगतात. त्यांच्या मते, "देशात-राज्यात भाजपची सत्ता नव्हती त्या काळापासून नितीन गडकरी असं बोलत असतात. सध्या सुरू असलेली राजकीय पळापळ पाहता स्वाभाविकपणे त्यांचं वक्तव्य आजच्या घडामोडींशी जोडू शकतात. पण पक्षांतर करणाऱ्यांपैकी अनेक नेते गडकरी यांची भेट घेऊनच पक्षात दाखल होतात."
"मोकळेपणानं बोलणं हे नितीन गडकरी यांचं वैशिष्ट्य आहे. ते निखळपणे आपलं म्हणणं मांडतात. त्यांनी यापूर्वी केलेल्या अनेक वक्तव्यांबाबत असे राजकीय अर्थ काढता येऊ शकतात. पण गडकरी यांच्या स्वभावानुसार याचा संदर्भ जोडला जाऊ नये. आयोजित कार्यक्रम राजकीय क्षमता असणाऱ्या पॉलिटिकल आयकॉनसाठी होता. त्यामुळे त्या नवोदित नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं उदाहरण दिलेलं असू शकतं," असं जानभोर सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








